आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
हाती घेतलेले उपक्रम आणि कामगिरी -2025
प्रविष्टि तिथि:
01 JAN 2026 2:16PM by PIB Mumbai
1. आयुषमान भारत:
आयुषमान भारत योजनेत चार घटकांचा समावेश होतो.
अ. आयुषमान आरोग्य मंदिर
पहिल्या घटकामध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांतील उप-आरोग्य केंद्रे (SHCs) आणि ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHCs) यांचे श्रेणीवर्धन करून 1,50,000 आरोग्य आणि निरामयता केंद्रांच्या स्थापनेचा समावेश असून त्यांना आता आयुषमान आरोग्य मंदिर असे नाव देण्यात आले आहे. त्यामाध्यमातून समुदायाला आरोग्य सेवांचे वितरण अधिक व्यवस्थित करणे शक्य होऊ शकेल. व्यापक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान हे या केंद्रांचे उद्दिष्ट असून यामध्ये सध्याच्या प्रजनन आणि बाल आरोग्य आणि संसर्गजन्य रोगांशी संबंधित सेवांचा विस्तार आणि बळकटीकरण करून, त्यामध्ये असंसर्गजन्य रोगांशी (उदा. उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) संबंधित सेवा समाविष्ट केल्या जातात. तसेच मानसिक आरोग्य, कान-नाक-घसा, नेत्ररोग, मुखाचे आरोग्य, वृद्धापकाळाशी संबंधित आणि उपशामक काळजी आणि आघात काळजी तसेच योगाभ्यासासारख्या आरोग्य संवर्धन आणि कल्याणकारी उपक्रमांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जातात.
आयुषमान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा - आयुषमान भारत योजनेच्या माध्यमातून प्राथमिक, माध्यमिकआणि तृतीय स्तरावर आरोग्याविषयक गरजा सर्वांगीणपणे (प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक, पुनर्वसन आणि उपशामक देखभाल ) पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण काळजी घेण्याचा दृष्टिकोन बाळगणे असा यामागील उद्देश आहे. एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात, प्राथमिक आरोग्य सेवा एकूण आरोग्य गरजांपैकी सुमारे 80- 90% गरजा पूर्ण करतात, ज्यामुळे लोकसंख्येचे आरोग्य परिणाम सुधारतात आणि जीवनमानाची गुणवत्ता उंचावते.
प्राथमिक आरोग्य सेवा पथक हे सुनिश्चित करते की त्यांच्या कार्यक्षेत्रातील व्यक्तींसाठी समुदायासाठीचे जनसंपर्क उपक्रम आणि आणि लोकसंख्येची नोंदणी केली जाईल. या अंतर्गत संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान होण्यासाठी व्यक्तींची तपासणी केली जाते आणि अचूक निदानासाठी वेळेवर योग्य ठिकाणी संदर्भ दिला जातो. तसेच उपचारांचे पालन केले जात आहे की नाही आणि समुदायातील रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जाते का याची खात्री हे पथक करते. समुदायाच्या परिसरातील केंद्रांच्या माध्यमातून आवश्यक आरोग्य सुविधा आणि निदान सेवा पुरवल्या जातात तसेच आवश्यक औषधांची तरतूद केली जाते. यातूनच लोकसंख्येच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारी एक मजबूत आणि लवचिक प्राथमिक आरोग्यसेवा प्रणाली उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकले जात आहे

आयुषमान आरोग्य मंदिर योजनेची कामगिरी आणि सेवा वितरण:
-
30 नोव्हेंबर 2025 पर्यंत 1,81,873 आयुषमान आरोग्य मंदिर कार्यान्वित झाली असून त्यात विस्तारित 12 सेवांचा समावेश आहे तसेच टेलिकन्सल्टेशन सुविधा देखील सुरु करण्यात आली आहे, याठिकाणी 494.71 कोटी रुग्णांनी भेट दिली असून 41.93 कोटी टेलिकन्सल्टेशन्स झाली आहेत.
-
आजपर्यंत उच्च रक्तदाबासाठी 39.50 कोटी आणि मधुमेहासाठी 36.70 कोटी तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, तोंडाच्या कर्करोगासाठी 32.40 कोटी तपासण्या, महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी 15.23 कोटी तपासण्या आणि महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगासाठी 8.37 लाखांहून अधिक तपासण्या करण्यात आल्या आहेत.
-
त्यासोबतच कार्यान्वित आयुषमान आरोग्य केंद्रांमध्ये 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत 6.54 कोटी योग / निरामयता सत्रे घेण्यात आली आहेत.
ब. आयुष्मान भारत प्रधानमंत्री - जन आरोग्य योजना:
-
आयुषमान भारत योजनेचा दुसरा मोठा आधारस्तंभ म्हणजे प्रधानमंत्री - जन आरोग्य योजना (एबी पीएम-जेएवाय), जगातील सर्वात मोठी सार्वजनिक वित्तपोषित आरोग्य विमा योजना, या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी दुय्यम आणि तृतीय श्रेणीच्या रुग्णालयीन उपचारांसाठी 5 लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण प्रदान केले जाते.
-
सध्या या योजनेअंतर्गत 12 कोटी कुटुंबांना विमा संरक्षण देण्यात आले आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणाऱ्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वखर्चाने आपापल्या राज्यात किंवा केंद्र शासित प्रदेशांमध्ये लाभार्थ्यांचे प्रमाण वाढवले आहे.
-
फेब्रुवारी 2024 पासून अंदाजे 37 लाख आशा, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांचा एबी पीएम-जेएवाय योजनेत समावेश करण्यात आला आहे.
-
1 डिसेंबर 2025 पर्यंत, योजनेच्या सुरुवातीपासून सुमारे 42.48 कोटी आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली आहेत.
-
1 डिसेंबर 2025 पर्यंत, या योजनेअंतर्गत एकूण रुग्णालयातील 10.98 कोटी दाखल प्रकरणांना 1.60 लाख कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
-
1 डिसेंबर 2025 पर्यंत, योजनेच्या लाभार्थ्यांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी एबी पीएम-जेएवाय अंतर्गत एकूण 32,574 रुग्णालये पॅनेलमध्ये समाविष्ट असून त्यापैकी 15,532 खासगी रुग्णालये आहेत.
-
आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने आरोग्यसेवा वितरणाच्या बाबतीत लिंगभाव समानता राखली आहे. तयार केलेल्या एकूण आयुषमान कार्डांपैकी सुमारे 49 % कार्ड महिलांच्या नावावर आहेत आणि एकूण अधिकृत रुग्णालयातील प्रवेशांपैकी सुमारे 48 % प्रवेश महिलांचे आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 ऑक्टोबर 2024 रोजी, 'आयुषमान वय वंदना कार्ड' सुरू केले, ज्या अंतर्गत 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थिती चा विचार न करता, आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सर्व फायदे दिले जातील. आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या या विस्ताराद्वारे सुमारे 4.5 कोटी कुटुंबे, म्हणजेच अंदाजे 6 कोटी व्यक्तींना लाभ मिळेल असा अंदाज आहे. आतापर्यंत 94,19,515 लोकांनी आयुष्मान वय वंदना कार्डसाठी नोंदणी केली आहे.
-
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने अँड्रॉइड आधारित ‘आयुषमान ॲप’ लाँच केले असून त्याद्वारे लाभार्थ्यांना स्वयं-पडताळणी करणे शक्य होते. हे ॲप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केले गेले आहे आणि आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी फेस-ऑथ, ओटीपी, आयआरआयएस आणि फिंगरप्रिंट यांसारखे विविध प्रमाणीकरण पर्याय प्रदान केले आहेत. यामुळे कोणत्याही मोबाइल डिव्हाइसचा वापर करून आयुषमान कार्ड तयार करता येईल याची खात्री होते.
-
राज्यांसोबत सामंजस्य करार झाल्यानंतर 2025 मध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दिल्ली आणि ओडिशा राज्यांमध्ये विस्तारित करण्यात आली.
क. प्रधान मंत्री आयुषमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (पीएम-एबीएचआयएम):
तिसरा स्तंभ म्हणजे प्रधानमंत्री आयुषमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (पीएम-एबीएचआयएम), यासाठी सुमारे 64.18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी हे अभियान 25 ऑक्टोबर, 2021 रोजी सुरू केले असून, ते आर्थिक वर्ष 2021-22 ते आर्थिक वर्ष 2025-26 या योजनेच्या कालावधीत राबवले जाईल. देशभरात आरोग्यसेवा पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठीची ही सर्वात मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय सेवा अशा सर्व स्तरांवरील आरोग्य सेवांच्या संपूर्ण साखळीमध्ये आरोग्य प्रणाली क्षमता विकसित करण्यासह सध्याच्या आणि भविष्यातील महामारी/आपत्त्यांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी आरोग्य प्रणालींना तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
प्रधानमंत्री आयुषमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचे मुख्य उद्दिष्ट, म्हणजे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आणि रोगांच्या उद्रेकांचे प्रभावीपणे शोध घेणे, तपास करणे, प्रतिबंध करणे आणि त्यांचा सामना करण्यासाठी, महानगरीय क्षेत्रांमध्ये तसेच प्रवेशद्वारांवरील आरोग्य युनिट्सना मजबूत करून, गट, जिल्हा, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर पाळत ठेवणाऱ्या प्रयोगशाळांचे जाळे विकसित करणे, माहिती तंत्रज्ञानावर आधारित रोग पाळत प्रणाली तयार करणे हे आहे.
कोविड 19 आणि इतर संसर्गजन्य रोगांवरील संशोधनाला चालना देण्यासाठी गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये कोविड 19 सारख्या महामारीला मध्यम आणि अल्पकालीन मुदतीचा प्रतिसाद देण्यासाठी पुरावे निर्माण करण्याकरता जैववैद्यकीय संशोधनाचा समावेश आहे. तसेच प्राणी आणि मानवांमध्ये संसर्गजन्य रोगांच्या उद्रेकांना प्रतिबंध करण्यासाठी, त्यांचे निदान करण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी 'वन हेल्थ' दृष्टिकोन लागू करण्याची मूळ क्षमता विकसित करणे हेही यात समाविष्ट आहे.
या अभियानांतर्गत केलेली अर्थसंकल्पीय तरतूद ही राष्ट्रीय आरोग्य अभियाना व्यतिरिक्त आहे.
या योजनेच्या केंद्र पुरस्कृत घटकाअंतर्गत खालील गोष्टींची तरतूद करण्यात आली आहे:
या योजनेअंतर्गत 2021- 22 ते 2025-26 या कालावधीत झोपडपट्ट्या आणि झोपडपट्टीसदृश भागांवर लक्ष केंद्रित करून,17,788 इमारतविरहित उप-केंद्रांचे 'आयुषमान आरोग्य मंदिर' म्हणून आणि शहरी भागांमध्ये 11,024 आरोग्य आणि निरामयता केंद्रांचे बांधकाम करण्याची योजना आहे. याव्यतिरिक्त, गट पातळीवर 3382 ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्स आणि देशभरात 730 जिल्हा एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची स्थापना केली जाईल, प्रत्येक जिल्ह्यात अशी एक प्रयोगशाळा असेल. 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये 50 ते 100 खाटांचे क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक असतील आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये रेफरलची सोय उपलब्ध असेल.
केंद्र पुरस्कृत योजना घटकांची सध्याची स्थिती:
या योजनेअंतर्गत (XV वित्त आयोगाचा वाटा वगळून), योजना कालावधी 2021–2026 दरम्यान राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी एकूण आर्थिक तरतूद 34,932.27 कोटी रुपये इतकी आहे. प्रधानमंत्री आयुषमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशनच्या केंद्र पुरस्कृत योजना घटकाअंतर्गत, आतापर्यंत 9519 उप-आरोग्य केंद्रे (एएएम), 5456 शहरी एएएम,2151 ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्स, जिल्हा स्तरावरील 744 एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि 621 क्रिटिकल केअर ब्लॉक्स (सीसीबी) यांच्या बांधकाम/सक्षमीकरणासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 32,928.82 कोटी रुपयांच्या रकमेसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आयुषमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन अंतर्गत 12 केंद्रीय रुग्णालयांमध्ये 150 खाटांचे क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक (CCHB) उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये AIIMS - भोपाळ (मध्य प्रदेश), भुवनेश्वर (ओडिशा), जोधपूर (राजस्थान), पाटणा (बिहार), ऋषिकेश (उत्तराखंड), रायपूर (छत्तीसगड), IMS-BHU (वाराणसी) , AIIMS नवी दिल्ली, पीजीआय चंदिगढ, JIPMER पुडुचेरी, RIMS इंफाळ आणि NEIGRIHMS शिलाँग यांचा समावेश आहे.
प्रस्तावित 150 खाटांच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉकमध्ये आपत्कालीन संकुल, इंटरमीडिएट केअर आणि एचडीयू, विलगीकरण-विशेष श्रेणी वॉर्ड, अतिदक्षता विभाग, विलगीकरण कक्ष- बर्न्स आयसीयू आणि एचडीयू, शस्त्रक्रिया कक्ष संकुल इत्यादींचा समावेश आहे, या सुविधा सध्या अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. तसेच,पीएम-एबीएचआयएम अंतर्गत 150 खाटांच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉकसाठी मानक उपकरणांची यादी तयार करण्यात आली आहे.
ड आयुष्मान भारत डिजिटल मिशन-एबीडीएम :
सप्टेंबर 2021 मध्ये सुरू करण्यात आलेली आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) हा सरकारचा उपक्रम असून, त्याद्वारे नागरिक-केंद्रित आणि परस्पर-सुसंगत डिजिटल आरोग्य परिसंस्था उभारण्याचा उद्देश आहे. एबीडीएम अंतर्गत, नागरिकांना त्यांच्या वैद्यकीय नोंदी (उदा. प्रिस्क्रिप्शन, निदान अहवाल, डिस्चार्ज समरी इत्यादी) सुरक्षितपणे संग्रहित करता येतात आणि आवश्यकतेनुसार त्या नोंदी मिळवता येतात. यामुळे दीर्घकालीन आरोग्य इतिहास तयार करणे शक्य होते आणि उपचारांची सातत्यता सुनिश्चित होते. नागरिकांना आरोग्य सुविधा आणि सेवा पुरवठादारांबाबत अचूक आणि प्रमाणित माहिती उपलब्ध होऊ शकेल. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्यसेवा अधिक सुलभ करणे हा आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा उद्देश आहे.
एबीडीएमच्या तांत्रिक रचनेच्या मुख्य घटकांमध्ये आरोग्य परिसंस्थेतील सर्व भागधारकांना विश्वासार्ह ओळख प्रदान करण्यासाठी नागरिकांसाठी आयुष्मान भारत आरोग्य खाते (एबीएचए), आरोग्य व्यावसायिक नोंदणी (एचपीआर), आरोग्य सुविधा नोंदणी (एचएफआर) आणि औषध नोंदणी, या चार नोंदणींचा समावेश आहे. याशिवाय, परस्परसुसंगतता सुनिश्चित करून आरोग्यविषयक माहितीची अखंड देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी आरोग्य माहिती संमती व्यवस्थापक (एचआयई-सीएम), राष्ट्रीय आरोग्य दावे विनिमय (एनएचसीएक्स), आणि युनिफाइड हेल्थ इंटरफेस (यूएचआय) तीन गेटवे कार्यरत आहेत.
अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
***
NehaKulkarni/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2211708)
आगंतुक पटल : 11