खते विभाग
शेतकऱ्यांचे जीवन सुकर करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2026 6:19PM by PIB Mumbai
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून भारत सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करणे, खतांची वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करणे आणि मृदा आरोग्य सुधारणे या उद्देशाने, खत विभागाने आज नवी दिल्ली येथे एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले होते.


या सत्रात खत विभाग आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी, तज्ञ आणि उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले. या सर्वांनी केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्याशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच शेतकऱ्यांना प्रशासनाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यामुळे, आपली धोरणे आणि निर्णय शेतकऱ्यांचे जीवन अधिक सोपे आणि चांगले बनवण्याच्या दिशेने असले पाहिजेत, असे उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले.

विविध प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती असूनही, विभागाने शेतकऱ्यांच्या खतांच्या गरज यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत, असे नड्डा यांनी नमूद केले. खत विभागाने केलेल्या शेतकरी-स्नेही उपायांमुळे, देशाने यावर्षी विक्रमी उत्पादन साध्य केले आहे तसेच आवश्यक आयातही केली आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
भारत हे जागतिक अन्नधान्याचे केंद्र व्हावे, हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे, असे राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितले. हे 'चिंतन शिबिर' अशा कल्पनांना जन्म देईल, ज्या भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यात मदत करतील, असे त्या म्हणाल्या.



नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुलात आयोजित या एक दिवसीय शिबिरादरम्यान, 15 वेगवेगळ्या गटांनी सखोल विचारमंथन केले आणि सरकारला प्रभावी सूचना दिल्या. केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री आणि खत सचिव यांनी प्रत्येक गटासोबत स्वतंत्रपणे बसून त्यांच्या सूचना ऐकल्या.
या गटांनी नवीन युगातील खते, खत उत्पादनात आत्मनिर्भरता, चांगली कामगिरी तसेच शेतकरी जागरूकता, डिजिटल माध्यमांद्वारे खत परिसंस्थेत सुधारणा आणि पोषक तत्व आधारित अनुदान इत्यादी 15 महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
खत विभागाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे वरिष्ठ अधिकारी, तसेच सहकारी संस्था आणि खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी या चिंतन शिबिरात सहभागी झाले.
***
माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2211142)
आगंतुक पटल : 30