अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एचएसएनएस उपकर कायदा, 2026 आणि एचएसएनएस उपकर नियम, 2026 बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रविष्टि तिथि: 02 JAN 2026 5:03PM by PIB Mumbai

 

प्रश्न 1. एचएसएनएस उपकर नियमंतर्गत कोणी नोंदणी करणे आवश्यक आहे?

उत्तर. आरोग्य सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा उपकर कायदा, 2025 च्या कलम 3 (यापुढे 'कायदा' असे संबोधले जाईल) नुसार प्रत्येक करपात्र व्यक्तीने नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी अर्ज एसीईएस पोर्टलद्वारे एचएसएनएस आरईजी -01 या फॉर्ममध्ये करावा. जेथे एकापेक्षा जास्त कारखान्यांमध्ये यंत्रे बसवली गेली आहेत, तेथे प्रत्येक कारखान्यासाठी स्वतंत्र नोंदणी आवश्यक असेल.

प्रश्न 2. मी पान मसाल्याचा उत्पादक आहे. नवीन एचएसएनएस उपकर नियमांनुसार नोंदणीसाठी मी कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे?

उत्तर. आपण कायदा आणि एचएसएनएस उपकर नियम लागू झाल्यानंतर ताबडतोब, म्हणजेच, 1 फेब्रुवारी, 2026 रोजी नोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. उपकर भरण्याची जबाबदारी त्या तारखेपासून सुरू होत असल्यामुळे, आपण पोर्टलवर फॉर्म एचएसएनएस आरईजी -01 मध्ये नोंदणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. आपली जबाबदारी सुरू झाल्याच्या तारखेपासून आपले नोंदणी प्रमाणपत्र लागू होईल. विद्यमान उत्पादकांसाठी ही तारीख 1 फेब्रुवारी 2026 आहे.

प्रश्न 3. मी नोंदणीसाठी अर्ज केला होता, पण गेल्या दहा दिवसांपासून त्या अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही. मी उत्पादन सुरू करू शकतो का?

उत्तर: होय. एचएसएनएस उपकर नियमांच्या नियम 5 (3) अंतर्गत, पात्र अधिकाऱ्याने कामकाजाच्या सात दिवसांमध्ये प्रतिसाद दिला नाही, तर अर्ज मंजूर झाला, असे समजले जाईल. फॉर्म एचएसएनएस आरईजी -02 मधील नोंदणी प्रमाणपत्र पोर्टलवर उपलब्ध केले जाईल.

प्रश्न 4. नोंदणी प्रमाणपत्र न घेता नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर मी उपकर भरू शकतो का?

उत्तर. होय, फॉर्म एचएसएनएस आरईजी -01 यशस्वीपणे दाखल केल्यानंतर तात्पुरता नोंदणी क्रमांक प्राप्त झाल्यावर आपण आपला उपकर भरू शकता. या कायद्यानुसार प्रत्येक करपात्र व्यक्तीकडून प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीला, परंतु त्या महिन्याच्या 7 व्या दिवसाच्या आधी उपकर वसूल करणे आवश्यक आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी ज्या नवीन अर्जदारांकडे आधीपासूनच मशीन आहे, अथवा त्यावर त्यांचे नियंत्रण आहे, आणि ज्यांची नोंदणी प्रमाणपत्र (जे सात कामकाजाच्या दिवसांच्या आत दिले जाईल) प्रक्रिया सुरू आहे, त्यांना तात्पुरत्या नोंदणी क्रमांकाचा वापर करून पोर्टलवर उपकर भरता येईल.

प्रश्न 5. नोंदणी झाल्यावर, मशीनबद्दल घोषणापत्र दाखल करण्याची मुदत काय?

उत्तर. नोंदणी मंजूर झाल्यापासून सात दिवसांच्या आत पोर्टलवर एचएसएनएस फॉर्म डीईसी-01 द्वारे घोषणापत्र दाखल करणे आवश्यक आहे. या घोषणेत उपकराच्या गणनेसाठी संबंधित मशीनचे तपशील (कमाल निर्धारित वेग, निर्दिष्ट वस्तूंचे वजन इ.) निर्दिष्ट करणे आवश्यक आहे.

उदाहरण: 'एबीसी लिमिटेड'ला 10 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यांनी 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत फॉर्म एचएसएनएस डीईसी-01 दाखल करणे आवश्यक आहे.

प्रश्न 6. नवीन मशीन घेतले तर काय करावे? विभागाला कळवणे आवश्यक आहे का?

उत्तर: होय. कायद्याच्या कलम 9 (2) आणि एचएसएनएस उपकर नियमांच्या नियम 9 (2) अंतर्गत उपकराच्या गणनेसाठी संबंधित पॅरामीटर्स (तपशील) मधील कोणत्याही बदलाच्या पंधरा दिवसांच्या आत नवीन घोषणापत्र दाखल करणे आवश्यक आहे, यात नवीन मशीन बसवणे अथवा त्याच्या संख्येत वाढ करणे समाविष्ट आहे.

उदाहरण: 1 मार्च 2026 रोजी, आपण एक नवीन पॅकिंग मशीन बसवले. हा बदल प्रतिबिंबित करणारा, फॉर्म एचएसएनएस डीईसी-01 मध्ये आपण 16 मार्च 2026 पर्यंत नवीन घोषणापत्र दाखल करणे आवश्यक आहे.

प्रश्न 7. पहिले घोषणापत्र दाखल केल्यावर मी लगेच नवीन घोषणापत्रव दाखल करू शकतो का?

उत्तर. एचएसएनएस उपकर नियमांच्या नियम 9 (2) अंतर्गत, पात्र अधिकाऱ्या द्वारे आपल्या मागील घोषणेच्या संदर्भात नियम 11 अंतर्गत आदेश जारी होई पर्यन्त आपण नवीन घोषणापत्र दाखल करू शकत नाही.

प्रश्न 8. विभाग माझ्या घोषणपत्राची पडताळणी कशी करेल?

उत्तर. एचएसएनएस उपकर नियम (खंड III) च्या नियम 10 अंतर्गत, पात्र अधिकारी 90 दिवसांच्या आत आपल्या घोषणपत्राची पडताळणी करेल.

प्रश्न 9. माझ्या मशीनचा कमाल रेट केलेला वेग मी घोषित केलेल्या वेगापेक्षा जास्त आहे, असे अधिकाऱ्याला आढळून आले, तर काय होईल?

उत्तर. उपकराच्या गणनेवर परिणाम करणारी विसंगती आढळल्यावर:

1. अधिकारी आपल्याला विसंगतीबद्दल माहिती देईल.

2. आपल्याला सुनावणीची संधी दिल्यानंतर, पात्र अधिकारी पडताळणीच्या 30 दिवसांच्या आत उपकराच्या गणनेची पुष्टी करणारा आदेश पारित करेल.

3. आपल्याला नियम 11 (3) अंतर्गत नमूद केलेल्या कालावधीसाठी आणि मागील कालावधीसाठी निर्धारित केलेल्या उपकराची रक्कम भरावी लागेल. त्यानुसार, आपल्याला मशीन बसवल्याच्या तारखेपासून (प्रारंभिक घोषणेनुसार), अथवा तपशीलात बदल करण्याच्या तारखेपासून (नवीन घोषणेनुसार) देयकाच्या प्रत्यक्ष तारखेपर्यंत व्याजासह उपकराची अतिरिक्त रक्कम भरण्यास जबाबदार आहात आणि त्यानंतरच्या कालावधीसाठी निर्धारित उपकराची रक्कम, आणि त्यानंतरच्या कालावधीसाठी निर्धारित उपकराची रक्कम देखील भरणे बंधनकारक आहे.

उदाहरण: 1 फेब्रुवारी रोजी, उत्पादकाने 300 पाउच / मिनिट वेगाचे मशीन कार्यान्वित केले, आणि त्याचे तपशील विभागाला जाहीर केले. 1 एप्रिल रोजी, पात्र अधिकाऱ्याने पडताळणीनंतर, असा निष्कर्ष काढला की मशीनची कमाल रेट केलेली गती प्रत्यक्षात 700 पाउच / मिनिट आहे. सुनावणीची वाजवी संधी दिल्यानंतर योग्य अधिकारी 30 एप्रिलपर्यंत उपकराच्या गणनेचा तपशील देणारा आदेश जारी करेल. नोंदणीकृत व्यक्तीला फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांसाठी उपकराची अतिरिक्त रक्कम व्याजासह भरावी लागेल, कारण त्याची उपकर जमा करण्याची जबाबदारी मशीन बसवल्याच्या तारखेला (1 फेब्रुवारी) सुरू झाली आहे. तसेच, संबंधित उत्पादकाला जारी केलेल्या आदेशानुसार पुढील कालावधीसाठी निर्धारित केल्याप्रमाणे उपकर भरावा लागेल.

प्रश्न 10. अधिकारी माझ्या घोषणेशी सहमत असेल तर मला पुष्टी मिळेल का?

उत्तर: होय. कोणतीही विसंगती आढळली नाही, तर पात्र अधिकारी पडताळणीच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत आपल्या घोषणेची पुष्टी करणारा आदेश पारित करेल.

प्रश्न 11. एचएसएनएस उपकराची गणना कशी केली जाते? ते प्रत्यक्ष उत्पादनावर आधारित आहे का?

उत्तर. नाही. कायद्याच्या अनुसूची II च्या तक्ता 1 अनुसार, स्थापित केलेल्या पॅकिंग मशीनची संख्या आणि त्यांच्या कमाल पॅकिंग गतीच्या आधारावर ते मासिक आधारावर मोजले जाते, आणि ते भरणे बंधनकारक आहे. पूर्णपणे मॅन्युअल प्रक्रिया युनिट असेल तर, देय उपकर कायद्याच्या अनुसूची II च्या तक्ता 2 अनुसार लागू होईल.

 

प्रश्न 12. महिन्याच्या मध्यावर नवीन मशीन स्थापन केले, मला संपूर्ण महिन्याचा उपकर भरावा लागेल का?

उत्तर: होय. जर तुम्ही नोंदणीकृत व्यक्ती असाल आणि तुम्ही महिन्याच्या मध्यावर नवीन मशीन जोडले किंवा स्थापित केले, तर त्या नवीन मशीनसाठी देय उपकर ते जोडल्याच्या, किंवा त्याच्या स्थापनेच्या पाच दिवसांच्या आत, भरावा लागेल तसेच त्या संपूर्ण महिन्याचा पूर्ण उपकार भरावा लागेल.

उदाहरण: 'मेसर्स एबीसी लिमिटेड' (विद्यमान नोंदणीकृत संस्था) 4 मशीन्स चालवते. 20 ऑगस्ट 2026 रोजी, त्यांनी ₹ 1,01,00,000 च्या मासिक उपकर दायित्वासह 5 वे मशीन स्थापित केले. त्यांनी 25 ऑगस्ट 2026 पर्यंत 1,01,00,000 रुपयांचा मासिक उपकर भरणे आवश्यक आहे. देयकामध्ये कोणताही विलंब झाला, तर 26 ऑगस्ट 2026 पासून प्रत्यक्ष देयकाच्या तारखेपर्यंत व्याजाची रक्कम भरणे बंधनकारक असेल.

प्रश्न 13. पेमेंट आणि रिटर्न फाइलिंगच्या देय तारखा काय आहेत?

उत्तर. चालू महिन्याच्या 7 व्या दिवसापर्यंत मासिक उपकर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरणे आवश्यक आहे. पुढील महिन्याच्या 20 व्या दिवसापर्यंत फॉर्म एचएसएनएस आरईटी-01 मध्ये मासिक विवरणपत्र भरणे आवश्यक आहे.

प्रश्न 14. रिटर्न उशिरा भरले, तर काय होईल?

उत्तर. आपण देय तारखेपर्यंत परतावा सादर करण्यात अपयशी ठरलात, तर पात्र अधिकारी आपल्याला नोटीस जारी करेल. नोटीस मिळाल्यावर पंधरा दिवसांच्या आत विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच, कायद्याच्या कलम 18 (1) (सी) अनुसार, देय तारखेला विवरणपत्र सादर केले नाही, तर 10,000 रुपये दंड आकारला जाईल.

प्रश्न 15. परतावा भरताना चुका केल्या, अथवा चुकीची माहिती दिली, तर काय होईल?

उत्तर. मूळ परतावा दाखल केलेल्या संबंधित वर्षातील महिन्याच्या समाप्तीपूर्वी आपण आपल्या परताव्यातील कोणतीही चूक अथवा चुकीचे तपशील दुरुस्त करू शकता. तथापि, अशा दुरुस्तीमुळे मूळ घोषित केलेल्या रकमेहून अधिक उपकर आकारला गेला, तर आपल्याला व्याजासह फरकाची रक्कम भरावी लागेल.

प्रश्न 16. एचएसएनएस उपकर नियमांनुसार "सवलत" म्हणजे काय?

उत्तर. सवलत म्हणजे नोंदणीकृत व्यक्तीच्या उपकर दायित्वामध्ये केले जाणारे एक प्रकारचे समायोजन, जेव्हा एखादे यंत्र किंवा मानवीय प्रक्रिया एकांश सलग पंधरा दिवस किंवा त्याहून अधिक काळ बंद राहते. हा उपकर प्रत्येक यंत्रामागे मासिक आधारावर मोजला जात असल्याने सवलतीमुळे ज्या कालावधीत यंत्र सील केलेले होते आणि वापरात नव्हते, त्या कालावधीसाठी आधीच भरलेल्या उपकराचे समायोजन सुनिश्चित होते.

प्रश्न 17. सवलत मिळवण्यासाठी यंत्रणा किती किमान कालावधीसाठी बंद असणे आवश्यक आहे?

उत्तर. तुम्ही सवलतीचा दावा तेव्हाच करू शकता, जेव्हा यंत्र किंवा मॅन्युअल युनिट सलग पंधरा दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी बंद असेल. जर एखादे यंत्र 10 दिवसांसाठी सील केले गेले, नंतर दोन दिवसांसाठी सील काढले गेले आणि पुन्हा 10 दिवसांसाठी सील केले गेले, तर तुम्ही सवलतीचा दावा करू शकत नाही, कारण बंद राहण्याचा सलग कालावधी 15 दिवसांपेक्षा कमी आहे.

प्रश्न 18. मी फक्त यंत्र बंद करून नंतर सवलतीचा दावा करू शकतो का?

उत्तर. नाही. तुम्ही उद्दिष्ट बंद करण्याच्या किमान 3 कार्यालयीन दिवसांपूर्वी संबंधित अधिकाऱ्याला माहिती दिली पाहिजे. माहिती मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत संबंधित अधिकारी तुमच्या कारखान्याला भेट देईल आणि यंत्राला अधिकृतपणे सील करेल, जेणेकरून ते चालवता येणार नाही.

यंत्र सील केलेल्या कालावधीत त्या यंत्रावर कोणतेही उत्पादन होणार नाही याची तुम्ही खात्री केली पाहिजे.

प्रश्न 19. माझे यंत्र बंद असल्यास किंवा मागणी नसल्यास मी उपकर भरणे थांबवू शकतो का?

उत्तर. जर यंत्र सलग 15 दिवस किंवा त्याहून अधिक काळ बंद असेल, तेव्हाच तुम्ही सवलतीचा (समायोजनाचा) दावा करू शकता. एचएसएनएस उपकर नियमांच्या अध्याय पाच अंतर्गत सवलतीचा दावा करण्यासाठीची कार्यपद्धती पाळली पाहिजे.

प्रश्न 20. सवलतीची रक्कम कशी मोजली जाते?

उत्तर. सवलत खाली दिलेल्या सूत्रानुसार, प्रमाणशीर आधारावर मोजली जाते:

A=(C/N)×D

येथे,

A: सवलतीची रक्कम

C: त्या यंत्रासाठी त्या महिन्यातील एकूण मासिक उपकर दायित्व

N: त्या महिन्यातील एकूण दिवसांची संख्या (उदा. 28, 29, 30 किंवा 31)

D: त्या महिन्यात यंत्र सलग बंद असलेल्या दिवसांची एकूण संख्या.

उदाहरण 1: ‘एबीसी लिमिटेड’ ने एक हाय-स्पीड पाउच पॅकिंग मशीन (700 पीपीएम) बसवली आहे. त्यांची मासिक देयता (C) ₹ 2,02,00,000 आहे. हे यंत्र 1 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर (19 दिवस) या कालावधीसाठी सील करण्यात आले होते. ते 20 सप्टेंबर रोजी पुन्हा सुरू करण्यात आले. शटडाउनचा कालावधी (19 दिवस) 15 दिवसांपेक्षा जास्त असल्याने, ते सवलतीसाठी पात्र आहेत, जी खालीलप्रमाणे मोजली जाईल:

  • महिन्यातील एकूण दिवसांची संख्या (N): 30
  • महिन्यात यंत्र सतत बंद असलेल्या दिवसांची एकूण संख्या (D): 19
  • सवलतीची रक्कम (A):

A=(2,02,00,000/30)×19=₹ 1,27,93,333

  • ते 20 ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी योग्य अधिकाऱ्याकडे अर्ज करून 1.28 कोटी रुपयांची सूट मिळवू शकतात. उदाहरणार्थ, जर त्यांनी 25 सप्टेंबर रोजी दावा दाखल केला आणि 7ऑक्टोबर रोजी सवलतीचा आदेश मंजूर झाला, तर ते ही रक्कम नोव्हेंबर महिन्याच्या त्यांच्या दायित्वामध्ये समायोजित करू शकतात.

उदाहरण 2: ‘एबीसी लिमिटेड’ ने एक हाय-स्पीड पाउच पॅकिंग मशीन (700 पीपीएम) बसवली आहे. त्याची मासिक शुल्क देयता (C) ₹ 2,02,00,000 आहे. मशीन 20 जुलै रोजी सील करण्यात आले व 9 ऑगस्ट रोजी सील उघडण्यात आले. मशीन बंद असण्याचा कालावधी (21 दिवस) 15 दिवसांपेक्षा जास्त असल्याने, ते सवलतीसाठी पात्र आहेत, ही सवलत प्रत्येक महिन्यासाठी खालीलप्रमाणे स्वतंत्रपणे मोजली जाईल:

  • जुलै महिन्यासाठी :

N: 31 दिवस

D: 12 दिवस (जुलै 20-31)

सवलत (A1):

A1=(2,02,00,000/31)×12=₹ 78,19,355

ऑगस्ट महिन्यासाठी :

N: 31 दिवस

D: 9 दिवस (Aug 1-9)

सवलत (A2):

A2=(2,02,00,000/31)×9=₹ 58,64,516

  • कंपनी 20 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी योग्य अधिकाऱ्याकडे अर्ज करून ₹ 1,36,83,871 (A1 + A2) ची सवलत रक्कम मिळवू शकते. उदाहरणार्थ, जर कंपनीने 25 ऑगस्ट रोजी दावा दाखल केला आणि 5 सप्टेंबर रोजी सवलत आदेश मंजूर झाला, तर ते ही रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या त्यांच्या शुल्काच्या दायित्वामध्ये समायोजित करू शकतात.

प्रश्न 21. मला ही रक्कम केव्हा परत मिळेल?

उत्तर. ही रक्कम रोख परतावा स्वरूपात दिली जात नाही. ज्या कालावधीसाठी सवलत मागितली आहे, त्यापुढील महिन्याच्या 20 तारखेला किंवा त्यापूर्वी तुम्हाला दावा सादर करावा लागतो. संबंधित अधिकारी दावा मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत आदेश जारी करतात. ज्या महिन्यात तो आदेश जारी केला जाईल, त्यापुढील महिन्याच्या तुमच्या उपकर दायित्वामध्ये सवलतीची रक्कम समायोजित केली जाते.

प्रश्न 22. सील केलेले यंत्र पुन्हा कसे सुरू करता येईल ?

उत्तर. तुम्ही यंत्र पुन्हा सुरू करण्याचा विचार करत असाल, तर संबंधित अधिकाऱ्याला किमान 3 कामकाजाच्या दिवसांआधी माहिती देणे आवश्यक आहे. अधिकारी यंत्राचे सील काढण्यासाठी तुमच्या कारखान्याला भेट देईल.

प्रश्न 23. माझ्या कारखान्यासाठी कोणतीही अनिवार्य देखरेख आवश्यकता आहेत का?

उत्तर. होय. तुम्ही सर्व पॅकिंग मशीन आणि मॅन्युअल प्रक्रिया युनिट्सना कव्हर करणारी सीसीटीव्ही प्रणाली स्थापित करणे आवश्यक आहे. त्याचे फुटेज 24 महिन्यांसाठी जतन केले पाहिजे आणि विनंती केल्यावर 48 तासांच्या आत अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे.

प्रश्न 24. मी माझ्या कारखान्यातून जुना मशीन काढून टाकू शकतो का?

उत्तर. होय. संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही 3 कार्यालयीन दिवसांपूर्वी सूचित केले पाहिजे. तो अधिकारी मशीन काढण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवेल. जर मशीन काढणे शक्य नसेल, तर ते सील केले जाईल.

प्रश्न 25. माझ्या मशीनची कमाल रेटेड गती 700 पाउचेस/मिनिट आहे, परंतु मी ती फक्त 300 पाउचेस/मिनिट वेगाने चालवतो. माझ्यासाठी अनुसूची II मधील कोणता स्लॅब लागू होतो?

उत्तर. तुम्हाला प्रत्यक्ष वेगावर नाही, तर कमाल वेगावर आधारित उपकराची रक्कम भरावी लागेल. नियम 12 नुसार, ते मशीन कोणत्याही वजनाच्या वस्तू तयार करण्यासाठी प्रत्यक्षात कोणत्याही वेगाने वापरले जात असले तरीही यंत्राचा कमाल वेग म्हणजे त्या यंत्राद्वारे ‘साध्य करता येणारा कमाल वेग’च ग्राह्य धरला जाईल.

प्र26. जर मी एका महिन्यात निर्दिष्ट वस्तूंचे उत्पादन केले नाही, परंतु मशीन सील केले नव्हते, तरीही मला उपकर भरावा लागेल का?

उत्तर. होय.

प्रश्न 27. माझे मशीन 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत सील होते. 15 सप्टेंबरच्या संध्याकाळी सीलमुक्त करण्यात आले. मी सवलतीसाठी दावा करण्यास पात्र आहे का?

उत्तर. नाही. कारण मशीन केवळ सलग 14 दिवसांसाठी बंद होते, त्यामुळे तुम्ही सवलतीसाठी दावा करण्यास पात्र नाही.

प्रश्न 28. माझ्याकडे 5 मशीन आहेत. 4 मशीन 20 दिवसांसाठी सील होत्या, परंतु 1 मशीन चालू होती. मी त्या 4 मशीनसाठी सवलतीचा दावा करू शकतो का?

उत्तर. होय. सवलतीचा दावा प्रत्येक मशीननुसार करायचा आहे.

प्रश्न 29. मला एक जुने मशीन स्क्रॅप करायचे आहे. मी ते थेट डिसमेंटल करु शकतो का?

उत्तर. नाही. तुम्हाला नियम 34 नुसार ठरवलेल्या प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार तुम्हाला मशीन काढण्याच्या नियोजित तारखेच्या किमान तीन कामकाजाच्या दिवसांपूर्वी संबंधित अधिकाऱ्याला माहिती द्यावी लागेल. त्यानंतर संबंधित अधिकारी कारखान्यातून मशीन काढण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवेल. जर मशीन काढणे शक्य नसेल, तर अधिकारी ते अशा प्रकारे सील करेल की ते चालवता येणार नाही.

प्रश्न 30. जर माझा कारखाना मशीन आणि मॅन्युअल प्रक्रिया दोन्ही वापरत असेल, तर उपकराची मोजणी कशी केली जाते?

उत्तर. कायद्यानुसार, उपकराची गणना उत्पादन व्यवस्थेच्या विशिष्ट स्वरूपावर आधारित असते. जर प्रक्रियेच्या कोणत्याही भागात मशीनचा वापर होत असेल, तर उपकराची गणना कायद्याच्या अनुसूची II च्या तक्ता 1 मधील मशीन-आधारित दरांनुसार केली जाते. एखादी प्रक्रिया केवळ तेव्हाच "पूर्णपणे मॅन्युअल" मानली जाते, जेव्हा कारखान्यात उत्पादन किंवा निर्मितीच्या कोणत्याही भागास मदत करण्यास किंवा पूर्ण करण्यास सक्षम असलेले कोणतेही मशीन वापरले जात नाही. अशा प्रकरणात देय उपकराची रक्कम कायद्याच्या अनुसूची II च्या तक्ता 2 नुसार असेल (दरमहा 11 लाख रुपये).

प्रश्न 31. मी मार्च 2026 मध्ये (नियम अधिसूचित झाल्यानंतर) एक नवीन पान मसाला उत्पादन युनिट सुरू करण्याची योजना आखत आहे. जर मी माझी मशीन स्थापित केली आणि महिन्याच्या 10 तारखेला उत्पादन सुरू केले, तर मला संपूर्ण महिन्याचा उपकर भरावा लागेल का?

उत्तर. नाही. एचएसएनएस नियमांच्या नियम 12 च्या तरतुदीनुसार, जर एखाद्या नव्याने नोंदणीकृत व्यक्तीने एका महिन्यात मशीन स्थापन केले, तर त्या विशिष्ट महिन्यासाठी देय उपकर प्रमाणानुसार मोजले जाते. तुम्हाला केवळ त्या महिन्यात शिल्लक असलेल्या दिवसांसाठीच उपकर द्यावा लागेल, मशीन बसवल्याच्या तारखेपासून किंवा मॅन्युअल प्रक्रिया युनिट सुरू झाल्याच्या तारखेपासून (जे लागू असेल त्यानुसार) दिवस मोजले जातील. शिवाय, तुम्ही ही प्रमाणशीर उपकराची रक्कम अशा स्थापनेच्या किंवा सुरुवातीच्या पाच दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे.

उदाहरण: जर तुम्ही नवीन युनिट सुरू केले आणि 16 सप्टेंबर रोजी मशिन बसवली, तर तुम्हाला 15 दिवसांसाठी (16 - 30 सप्टेंबर) देय असलेली उपकराची रक्कम प्रमाणानुसार 21 सप्टेंबरपर्यंत भरावी लागेल.

प्रश्न 32. मशीनची पडताळणी किती वेळा केली जाईल?

उत्तर. कारखाना आणि मशीनची प्रत्यक्ष पडताळणी संबंधित अधिकाऱ्याद्वारे ‘फॉर्म एचएसएनएस डीईसी-01’ मध्ये प्रारंभिक घोषणा दाखल केल्याच्या 90 दिवसांच्या आत केली जाईल. उपकराच्या गणनेसाठीच्या कोणत्याही निकषात बदल झाल्यास (मशीनची जोडणी किंवा स्थापना, यंत्राचा कमाल निर्धारित वेग किंवा निर्दिष्ट वस्तूंचे वजन), अशा बदलाच्या 15 दिवसांच्या आत नवीन घोषणा सादर करणे आवश्यक आहे. नवीन घोषणांची पडताळणी देखील त्यांची नोंदणी झाल्यानंतर नव्वद दिवसांच्या आत केली जाईल.

***

नेहा कुलकर्णी / नितीन फुल्लुके / राजश्री आगाशे / नंदिनी मथुरे / उमा रायकर / श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2210853) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी , Punjabi , Odia , Kannada