ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय ग्राहक दिन 2025 चे औचित्य साधून ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते बॉम्ब निकामीकरण प्रणालींसाठी भारतीय मानकाचे प्रकाशन

प्रविष्टि तिथि: 28 DEC 2025 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025

 

राष्ट्रीय ग्राहक दिन 2025 च्या निमित्ताने नवी दिल्ली स्थित भारत मंडपम इथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी IS 19445:2025 – ‘बॉम्ब निकामीकरण प्रणाली — कार्यक्षमतेचे मूल्यमापन आणि आवश्यक अटी’ या भारतीय मानकाचे प्रकाशन केले. बॉम्ब निकामीकरणाच्या प्रक्रियेत सुरक्षितता आणि प्रमाणीकरणाला बळकटी देण्याच्या उद्देशाने हे मानक विकसित करण्यात आले आहे.

 

मानकाची आवश्यकता

IS 19445:2025 ची निर्मिती गृह मंत्रालय आणि टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी (टीबीआरएल), डीआरडीओ यांच्या विनंतीनंतर पुढील कारणांचा विचार करून सुरू करण्यात आली:

  • सुरक्षा यंत्रणा तसेच नागरी संस्थांमध्ये बॉम्ब निकामीकरण प्रणालींचा वाढता वापर
  • अशा प्रणालींच्या कार्यक्षमतेच्या मूल्यमापनासाठी भारतीय मानकाचा अभाव
  • आंतरराष्ट्रीय मानकांची मर्यादित उपलब्धता आणि भारतीय धोक्यांच्या स्वरूपाशी, शस्त्रसाठ्याशी तसेच कार्यप्रणालीशी अंशतः विसंगती

बॉम्ब ब्लँकेट्स, बॉम्ब बास्केट्स आणि बॉम्ब इनहिबिटर्स यांसारख्या बॉम्ब निकामीकरण प्रणालींचा वापर स्फोटाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वसामान्यतः केला जातो. भारतात अनेक सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील संस्था अशा प्रणालींचे उत्पादन करतात, मात्र, त्यांच्या सुरक्षित आणि प्रभावी क्षेत्रीय वापरासाठी काटेकोर व प्रमाणित कार्यक्षमता मूल्यमापन आवश्यक आहे.

 

IS 19445:2025 मधील प्रमुख तरतुदी

बॉम्ब निकामीकरण प्रणालींच्या मूल्यमापनासाठी, विशेषतः स्फोटजन्य भार आणि स्फोटानंतर उडणाऱ्या तुकड्यांच्या (स्प्लिंटर) परिणामांसंदर्भात हे मानक एक सर्वसमावेशक चौकट देते. मानकात पुढील बाबी स्पष्ट केल्या आहेत:

  • चाचणी उपकरणे आणि चाचणी क्षेत्राकरिता आवश्यक निकष
  • प्रणालीची कार्यक्षमता वस्तुनिष्ठपणे मोजण्यासाठी मूल्यमापन पद्धती
  • निश्चित चाचणी पद्धती, उपकरणे, चाचणी नमुने आणि स्वीकाराचे निकष

हे मानक चाचणी प्रायोजक, उत्पादक आणि मान्यताप्राप्त चाचणी संस्थांसाठी संदर्भ म्हणून कार्य करेल; त्यामुळे चाचणी, प्रमाणिकरण आणि खरेदी प्रक्रियांमध्ये एकसमानता आणणे शक्य होईल.

 

विकास प्रक्रिया

IS 19445:2025 हे नागरी वापरासाठी शस्त्रे आणि दारुगोळा विभागीय समिती (पीजीडी 28) अंतर्गत सहमतीवर आधारित प्रक्रियेद्वारे विकसित करण्यात आले आहे. या उद्देशासाठी टीबीआरएल, डीआरडीओ यांच्या समन्वयाने बॉम्ब निकामीकरण प्रणाली पॅनेल (पीजीडी 28/पी1) ची स्थापना करण्यात आली होती.

या मानकाच्या मांडणी प्रक्रियेत खालील विविध भागधारकांचा व्यापक सहभाग होता:

  • संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा संस्था: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी), सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, गुणवत्ता आश्वासन महासंचालनालय (डीजीक्यूए), केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
  • केंद्र आणि राज्य सरकारी संस्था: राज्य पोलीस यंत्रणा, भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय), राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (एनसीआरटीसी)
  • संशोधन आणि विकास संस्था: पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो (बीपीआर अँड डी), नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया, (एनआरएआय), टर्मिनल बॅलेस्टिक रिसर्च लॅबोरेटरी (टीबीआरएल), राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (एनएसएफयू)
  • सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील उत्पादक
  • चाचणी आणि प्रमाणन तज्ञ

सरकारी वापरकर्ता संस्थांच्या सक्रिय सहभागामुळे, ही मानके बॉम्ब शोध आणि विल्हेवाट लावण्याच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यान्वित गरजा, सुरक्षिततेचे मुद्दे आणि क्षेत्रीय स्तरावरील आवश्यकता प्रतिबिंबित करतात याची खात्री होते.

 

जागतिक पद्धतींशी सुसंगतता

IS 19445:2025 विकसित करताना, आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती आणि जागतिक स्तरावर स्वीकारलेल्या कार्यक्षमतेच्या संकल्पनांचा योग्य विचार करण्यात आला असून भारतीय धोक्याच्या परिस्थिती आणि कार्यप्रणालीच्या वातावरणाशी अनुकूल करण्यात आल्या आहेत. हा दृष्टिकोन राष्ट्रीय प्रासंगिकता कायम ठेवत जागतिक सुसंगततेला प्रोत्साहन देतो आणि भारतीय उत्पादकांना आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता वाढविण्यात मदत करतो.

 

प्रमुख लाभ

नवीन जारी केलेले मानक भारतीय सशस्त्र सेना, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य पोलीस आणि नागरी संस्थांना संघर्ष क्षेत्रे, छावणी क्षेत्रे आणि सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या न फुटलेले बॉम्ब, सुधारित स्फोटक उपकरणे (आयईडी) आणि हातबॉम्बमुळे उद्भवणाऱ्या धोका व्यवस्थापनात मदत मिळणार आहे. या मानकामुळे खालील फायदे अपेक्षित आहेत:

  • स्पष्टपणे परिभाषित आणि वस्तुनिष्ठ कार्यप्रदर्शन मूल्यांकन निकष
  • ऑपरेटर, प्रथम प्रतिसाद देणारे कर्मचारी आणि सामान्य नागरिकांची वाढीव सुरक्षा
  • खरेदी, चाचणी आणि प्रमाणनासाठी एक पारदर्शक आणि एकसमान आधार
  • 'मेक इन इंडिया' अंतर्गत स्वदेशी विकास आणि नवोन्मेषाला पाठबळ 
  • विविध संस्थांमध्ये उपकरणांची सुधारित विश्वसनीयता आणि आंतरकार्यक्षमता वाढवणे 

IS 19445:2025 हे मानक खरेदी संस्था, उत्पादक आणि चाचणी संस्थांनी ऐच्छिकरित्या स्वीकारण्यासाठी असून यामुळे मूल्यांकन पद्धतींमध्ये एकसमानता येईल, गुणवत्ता-आधारित उत्पादनाला चालना मिळेल आणि गंभीर सुरक्षा कार्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉम्ब विल्हेवाट प्रणालींवरील विश्वास वाढेल अशी अपेक्षा आहे, असे ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी सांगितले.

IS 19445:2025 च्या प्रकाशनामुळे भारतीय मानक ब्युरो (BIS) चे सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि तांत्रिक आत्मनिर्भरतेमध्ये योगदान देत, वेळेवर आणि संबंधित मानकीकरणाद्वारे राष्ट्रीय प्राधान्यक्रम पुढे नेण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी होते.

 

* * *

शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/नितीन गायकवाड/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2209248) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Tamil