युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली पुद्दुचेरीमध्ये 'फिट इंडिया संडेज् ऑन सायकल' अभियानाचा पहिला वर्धापन दिन साजरा
प्रविष्टि तिथि:
21 DEC 2025 2:33PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी समाजमाध्यमावर वर्षभराच्या अनुभवाचा थोडक्यात सारांश मांडला आहे. 2 लाख+ ठिकाणे, 20 लाख+ लोक. एकच अभियान - फिट इंडिया. #SundaysOnCycle या उपक्रमाच्या 1 वर्षपूर्तीचा उत्सव, असे त्यांनी X या समाजमाध्यमावर आज रविवारी सामायिक केलेल्या संदेशात म्हटले आहे.
शालेय विद्यार्थी, नमो सायकलिंग क्लब, पुद्दुचेरी विद्यापीठाचे विद्यार्थी आणि सर्व स्तरांतील लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 1500 हून अधिक सायकलस्वारांसह आज यानिमित्ताने पुद्दुचेरीतील निसर्गरम्य रॉक बीच इथं आरोग्यवर्धनासाठीचा उत्साहपूर्ण सायकलींग उपक्रम झाला. या उपक्रमातून या अभियानाचे वाढते राष्ट्रीय महत्त्व आणि देशातील सायकलिंगचा वाढता कलही दिसून आला. पद्मभूषण आणि खेलरत्न पुरस्कार विजेते पी. आर. श्रीजेश आणि शरथ कमल यांनीही या उपक्रमाअंतर्गत तरुणांसोबत सायकल चालवली आणि सहभागींना क्रीडा आणि तंदुरुस्तीचा अवलंब करण्याची प्रेरणा दिली.

पुद्दुचेरीमध्ये आज झालेल्या फिट इंडिया संडेज् ऑन सायकल उपक्रम, या अभियानाच्या पहिल्या वर्धापन दिनाचा फिटनेस कार्निव्हल सोहळाच ठरला. या उपक्रमाअंतर्गत झुंबा, कॅरम, बुद्धिबळ, मल्लखांब, सिलंबम, योगा आणि दोरीच्या उड्या यांसारखे अनेक मनोरंजक खेळ आणि इतर आरोग्यदायी उपक्रमांचेही आयोजन केले गेले. 21 डिसेंबर या जागतिक ध्यान दिनाचा योगायोगही आज जुळून आला, त्याअनुषंगाने या उपक्रमाअंतर्गत तंदुरुस्ती म्हणजे चालत्या फिरत्या अवस्थेतले ध्यान असा संदेश दिला गेला.

यावेळी डॉ. मांडविया यांनी उपस्थितांना संबोधितही केले. फिट इंडिया संडेज् ऑन सायकलची सुरुवात साध्या पातळीवर झाली, मात्र आता या उपक्रमाने देशव्यापी लोकचळवळीचे रुप धारण केले असल्याचे ते म्हणाले.
एक वर्षापूर्वी या उपक्रमाचा प्रारंभ झाला, त्यावेळी केवळ पाच ठिकाणी सुमारे 500 सहभागींसह त्याचे आयोजन केले गेले होते, मात्र आज देशभरात दर रविवारी 10,000 पेक्षा जास्त ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन होते आणि त्यात 10 लाखांपेक्षा जास्त नागरिक नियमितपणे सहभागी होतात असे त्यांनी सांगितले. ही मोहीम एक तडफ, संस्कृती आणि प्रदूषणावरील ठोस उपाययोजना बनली असल्याचे ते म्हणाले.

पुद्दुचेरीमधील आजच्या सकाळच्या कार्यक्रमात फिट इंडिया मोबाईल ॲप कार्बन क्रेडिट इन्सेंटीव्हायझेशन या बहुप्रतिक्षित ॲपचाही प्रारंभ करण्यात आला. या ॲपअंतर्गत नागरिक आता सायकल चालवून कार्बन क्रेडिट मिळवू शकतात, हे क्रेडिट नंतर वटवताही येणार आहे. याॲपचा प्रारंभ झाल्यापासून दर महिन्याला, फिट इंडिया मोबाईल ॲपद्वारे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सायकलस्वारांचे मॅपिंग केले जाईल आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन जणांना प्रोत्साहनपर लाभ दिले जातील. नागरिकांना सायकलिंगची दैनंदिन सवय लावण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यासाठी त्यांना बक्षीस देणे हा यामागचा उद्देश असल्याचे मांडविया यांनी सांगितले.
***
सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207182)
आगंतुक पटल : 12