पंतप्रधान कार्यालय
भारत ओमान मंचाला पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मराठी अनुवाद
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2025 4:08PM by PIB Mumbai
महामहिम कैस अल युसूफ,
वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
उद्योग-व्यवसाय जगतातील नेतेगण,
महिला आणि सज्जनहो !
नमस्कार.
मला सात वर्षांनंतर ओमानला येण्याचे भाग्य लाभले आहे. आणि आज तुम्हा सर्वांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.
या व्यवसाय शिखर परिषदेसाठीचा तुमचा उत्साह माझाही उत्साह वाढवत आहे. आजची ही शिखर परिषद भारत-ओमान भागीदारीला नवीन दिशा देईल, नवीन गती देईल आणि नवीन उंची गाठून देण्यासाठी मदत करेल. आणि यात तुम्हा सर्वांची मोठी भूमिका आहे.
मित्रहो,
आपण भारत आणि ओमानच्या उद्योग-व्यवसाय, आपल्या व्यापाराचे प्रतिनिधित्व करता. आपण त्या वारशाचे वारस आहात, ज्याचा समृद्ध इतिहास आहे. नागरी संस्कृतीच्या उदयापासूनच, आपले पूर्वज परस्परांसोबत सागरी व्यापार करत होते.
वारंवार म्हटले जाते की समुद्राचे दोन किनारे खूप दूर असतात, परंतु मांडवी आणि मस्कतच्या दरम्यान, अरबी समुद्र एका मजबूत पुल बनला आहे. एक असा पूल आहे ज्याने आपले संबंध दृढ केले, संस्कृती तसेच अर्थव्यवस्थेला बळ दिले. आज आपण विश्वासाने म्हणू शकतो की समुद्राच्या लाटा बदलतात, ऋतू बदलतात, पण भारत-ओमानची मैत्री प्रत्येक ऋतूत अधिक मजबूत होते आणि प्रत्येक लाटेसोबत नवीन उंची गाठते.
मित्रहो,
आपले नाते विश्वासाच्या पायावर रचले गेले, मैत्रीच्या ताकदीने पुढे गेले आणि काळानुसार अधिक गहीरे होत गेले.
आज आपल्यातील राजनैतिक संबंध देखील 70 वर्षांचे झाले आहेत. हा केवळ सत्तर वर्षांचा उत्सव नाही, हा असा टप्पा आहे जिथून आपल्याला आपला शतकानुशतकांचा वारसा एका समृद्ध भविष्याच्या दिशेने घेऊन जायचा आहे.
मित्रहो,
आज आपण एक असा ऐतिहासिक निर्णय घेत आहोत, ज्याचे पडसाद येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत उमटत राहतील. सर्वंकष आर्थिक भागीदारी करार (Comprehensive Economic Partnership Agreement) म्हणजेच सीपा, आपल्या भागीदारीला, 21 व्या शतकात नवीन विश्वास आणि नवीन ऊर्जने भरून टाकेल. ही आपल्या सामायिक भविष्याची ब्ल्यू प्रिंट आहे. यामुळे आपल्या व्यापाराला नवीन गती मिळेल, गुंतवणुकीला नवीन विश्वास देईल आणि प्रत्येक क्षेत्रात संधींची नवीन दारे खुली होतील.
सीपा आपल्या युवा वर्गासाठी विकास, नवोन्मेष आणि रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण करेल. हा करार कागदावर निघत, कामगिरीत बदलावा, यात तुम्हा सर्वांची भूमिका खूप मोठी आहे. कारण जेव्हा धोरण आणि उद्यमशीलता एकत्र चालतात, तेव्हाच भागीदारी नवीन इतिहास घडवते.
मित्रहो,
भारताची प्रगती ही नेहमीच सामायिक प्रगतीची कथा राहिली आहे. भारत जेव्हा प्रगती करतो, तेव्हा आपल्या मित्रांनाही त्या प्रगतीचा भागीदार बनवतो. आज देखील आपण हेच करत आहोत.
आज भारत जगातील तीसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. यात संपूर्ण जगासाठी संधी आहेत, पण ओमानसाठी तर फायदा अधिक मोठा आहे.
कारण आपण पक्के मित्र तर आहोतच, पण आपण सागरी शेजारी देखील आहोत. आपले लोक परस्परांना ओळखतात, आपल्या उद्योग जगतात पिढ्यानपिढ्यांची विश्वासार्हता आहे, आणि आपण एकमेकांच्या बाजारपेठांनाही खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो. अशा परिस्थितीत भारताच्या विकासाच्या वाटचालीत ओमानसाठी संधीच संधी आहेत.
मित्रहो,
आज उद्योग जगतात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेची चर्चा होते. लोक वारंवार विचारतात की, जगात इतकी अनिश्चितता आहे, जागतिक अर्थव्यवस्था देखील अडचणीत आहे, तर अशा परिस्थितीत भारत 8 टक्क्यापेक्षा जास्त विकास दर कसा साध्य करत आहे? मी तुम्हाला याचे एक मोठे कारण सांगतो.
खरं तर गेल्या 11 वर्षांच्या काळात भारताने केवळ धोरणे बदलली नाहीत, तर भारताने आपला आर्थिक डीएनए बदलला आहे.
मी तुम्हाला काही उदाहरणे देतो. जसे की, वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमुळे संपूर्ण भारत एका एकात्मिक आणि संघटित बाजारपेठेत परावर्तीत झाला आहे. दिवाळखोरी आणि नादारी संहितेमुळे आर्थिक शिस्त आली, पारदर्शकतेला प्रोत्साहन मिळाले आणि यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत झाला. अशाच तऱ्हेने आम्ही कॉर्पोरेट करात सुधारणा केल्या, यामुळे भारत जगातील सर्वात स्पर्धात्मक गुंतवणूक ठिकाणांपैकी एक बनला आहे.
मित्रहो,
अलिकडेच आपण कामगार सुधारणांविषयी देखील ऐकले असेल. आम्ही डझनभर कामगार कायद्यांचे केवळ 4 सहिंतांमध्ये एकात्मिकरण केले. या भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कामगार सुधारणांपैकी एक आहेत.
मित्रहो,
जेव्हा धोरणामध्ये स्पष्टता येते, तेव्हा उत्पादनाला देखील नवा विश्वास मिळतो. एका बाजूने आम्ही धोरणात्मक आणि प्रक्रियात्मक सुधारणा करत आहोत, तर दुसऱ्या बाजुला भारतात उत्पादनाला चालना देण्यासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन देखील देत आहोत. अशा प्रयत्नांमुळेच आज मेक इन इंडिया अभियानाबद्दल जगात मोठी उत्सुकता आहे.
मित्रहो,
सुधारणांना भारताच्या 'डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांनी अधिक बळ दिले आहे. प्रशासन कागदविरहित झाले आहे, अर्थव्यवस्था कॅशलेस झाली आहे आणि व्यवस्था अधिक जास्त कार्यक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनली आहे.
डिजिटल इंडिया केवळ एक प्रकल्प नाही आहे, ही जगातील सर्वात मोठी समावेशकतेची क्रांती देखील आहे. यामुळे जीवन सुलभतेत सुधारणा झाली, आणि ease of doing नवीन उंचीवर पोहोचली आहे. आणि भारतात उभारल्या जाणाऱ्या आधुनिक भौतिक पायाभूत सुविधा याला अधिक बळकट करत आहेत. सुधारत असलेल्या संपर्क जोडणीमुळे भारतात logistics चा खर्च सातत्याने कमी होत आहे.
मित्रहो,
भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण आहे, हे तर जग मानतेच. त्याचबरोबर भारत एक विश्वासार्ह आणि भविष्य सज्ज भागीदार आहे. आणि ओमान हे चांगल्या प्रकारे जाणतो आणि त्याची प्रशंसाही करतो.
आपला संयुक्त गुंतवणूक निधी, अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहे. ऊर्जा असो, तेल आणि वायू असो, खते, आरोग्य, पेट्रोकेमिकल्स आणि हरित ऊर्जा असो अशा प्रत्येक क्षेत्रात नवीन शक्यता निर्माण होत आहेत.
पण सहकाऱ्यांनो,
भारत आणि ओमान केवळ एवढ्यानेच समाधानी नाही आहेत. आपण सोयीस्कर स्थितीत राहात नाही. आपल्याला भारत-ओमान भागीदारीला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. यासाठी दोन्ही देशांतील उद्योग विश्वाला स्वतःसाठी काही मोठी ध्येय निश्चित करावी लागतील.
मी तुमचे हे काम थोडे सोपे करतो आणि तुम्हाला काही आव्हाने देतो. आपण हरित ऊर्जेमध्ये मिळून काही मोठे करू शकतो का? आपण पुढच्या 5 वर्षांत 5 मोठे हरित प्रकल्प सुरू करू शकतो का? आपल्याला हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सोलर पार्क्स, ऊर्जा साठवण आणि स्मार्ट ग्रिडच्या क्षेत्रात नवीन मानदंड प्रस्थापित करायचे आहेत.
मित्रहो,
ऊर्जा सुरक्षा जितकी महत्त्वाची आहे, तितकीच गरजेची अन्न सुरक्षा देखील आहे. आगामी काळात हे एक मोठे जागतिक आव्हान ठरणार आहे. आपण मिळून भारत-ओमान कृषी नवोन्मेष केंद्र उभारू शकतो का? यामुळे ओमानच्या अन्न सुरक्षेला बळकटी मिळेल आणि भारताच्या कृषी-तंत्रज्ञानाला जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल.
मित्रहो,
कृषी तर एक क्षेत्र आहे, अशाच प्रकारे प्रत्येक क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत आपण ओमान–भारत नवोन्मेष सेतूची स्थापन करू शकतो का? आपल्याला हे ठरवून वाटचाल करावी लागेल की, येणाऱ्या 2 वर्षांत 200 भारतीय आणि ओमानी स्टार्टअप्स आपण जोडू शकू.
आपल्याला संयुक्त गुंतवणूक निधी बनवावा लागेल, फिनटेक सॅंडबॉक्सेस, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सुरक्षा प्रयोगशाळेची निर्मिती करावी लागेल आणि सीमापार उद्यम भांडवली निधी (cross-border venture funding) ला चालना द्यावी लागेल.
मित्रहो,
या केवळ कल्पना नाहीत, तर ही निमंत्रणे आहेत.
आमंत्रण- गुंतवणुकीचे
आमंत्रण- नवोन्मेषासाठीचे
आमंत्रण- एकत्रितपणे भविष्य घडविण्याचे
चला, आपण या जुन्या मैत्रीला नवीन तंत्रज्ञान, नवीन ऊर्जा आणि नवीन स्वप्नांच्या ताकदीने पुढे नेऊ या.
शुक्रन जझी--लन!
धन्यवाद!
***
NehaKulkarni/TusharPawar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2206393)
आगंतुक पटल : 7