पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत ओमान व्यवसाय मंचात झाले सहभागी

प्रविष्टि तिथि: 18 DEC 2025 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे भारत-ओमान व्यवसाय मंचाला संबोधित केले.ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री  कैस अल युसुफ; ओमान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष  शेख फैसल अल रवास;  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पियुष गोयल; आणि सीआयआयचे अध्यक्ष   राजीव मेमानी या बैठकीला उपस्थित होते. ऊर्जा, शेती, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा, उत्पादन, आरोग्य, वित्तीय सेवा, हरित विकास, शिक्षण आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांतील दोन्ही देशांतील अग्रगण्य उद्योग प्रतिनिधींनी या फोरममध्ये सहभाग घेतला.

पंतप्रधानांनी या बैठकीला संबोधित करताना मांडवी ते मस्कतपर्यंतचे दोन्ही देशांतील शतकांपासूनचे सागरी व्यापारसंबंध अधोरेखित केले, हे बंध आज गतिमान व्यापारी  आदान-प्रदानाचा आधारस्तंभ बनले आहेत. दोन्ही देशांमधील  धोरणात्मक संबंधांची 70 वर्षे  म्हणजे कित्येक शतकांपासूनच्या विश्वासाचे आणि मैत्रीचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. भारत आणि ओमान यांच्या संयुक्त भविष्याचा  आराखडा म्हणून वर्णन केल्या जाणाऱ्या भारत-ओमान व्यापक आर्थिक भागीदारीच्या संपूर्ण क्षमतेचा उद्योजकांनी लाभ करुन घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. भारत-ओमान व्यापक आर्थिक भागीदारी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांना नवीन ऊर्जा प्रदान करेल  आणि परस्पर विकास, नवोन्मेष आणि रोजगार निर्मिती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या 11 वर्षातील भारताच्या आर्थिक कामगिरीला अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की नवीन पिढीतील सुधारणा, धोरणात्मक निश्चितता, सुशासन आणि  गुंतवणूकदारांच्या उच्च विश्वासाच्या बळावर देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात भारताच्या अर्थव्यवस्थेने गेल्या तिमाहीत नोंदवलेली  8 टक्क्यांहून अधिक वृद्धी अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेचे आणि आंतरिक सामर्थ्याचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.  'जीवन सुलभता ' आणि 'उद्योगस्नेही वातावरण' यांना चालना देण्यासाठी भारत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती, लॉजिस्टिक्स, संपर्कयंत्रणा, विश्वासार्ह मूल्य साखळी, उत्पादकता क्षमता आणि हरित वृद्धी यांची निर्मिती जलदगतीने आणि व्यापक प्रमाणावर करत असल्याचे यांनी सांगितले. ओमानच्या उद्योजकांनी ऊर्जा, तेल आणि वायू, पेट्रोकेमिकल्स आणि खते यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांच्या पलीकडे हरित ऊर्जा, सौर पार्क, ऊर्जा साठवणूक, स्मार्ट ग्रीडस, ऍग्री टेक, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा यांसारख्या नवीन क्षेत्रांमध्येही संधींचा शोध घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. व्यावसायिक भागीदारी भविष्यासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने त्यांनी भारत–ओमान कृषी नवोन्मेष केंद्र आणि भारत–ओमान नवोन्मेष सेतू स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला.  या केवळ कल्पना नसून, गुंतवणूक करण्याचे, नवकल्पना घडवण्याचे आणि एकत्रितपणे भविष्य घडवण्याचे आमंत्रण आहे, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि त्या सर्वांनी उद्योग आणि धोरणांची सांगड घालून भारत-ओमान व्यापक आर्थिक भागीदारीला नवीन पंख द्यावेत, असे आवाहन केले. भारत आणि ओमान हे केवळ जवळचे शेजारीच नाहीत, तर प्रदेशात आणि त्यापलीकडे स्थैर्य, विकास आणि सामायिक समृद्धीसाठी कटिबद्ध असलेले धोरणात्मक भागीदार आहेत, असे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.


निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2206136) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam