पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ओमानमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2025 3:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025
पंतप्रधानांनी आज मस्कतमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाला संबोधित केले. या श्रोत्यांमध्ये विविध भारतीय शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे वर्ष ओमानमधील भारतीय शाळांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण यंदा या देशातील आपला 50 वा वर्धापनदिन त्या साजरा करत आहेत.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील कुटुंबीय आणि मित्रांच्या वतीने समुदायाला शुभेच्छा दिल्या. त्यांनी केलेल्या अत्यंत स्नेहपूर्ण आणि उत्साही स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले. ओमानमध्ये स्थायिक झालेल्या भारतातील विविध भागांतील लोकांना भेटून आपल्याला आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले आणि नमूद केले की विविधता हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे - हेच मूल्य त्यांना ते ज्या कोणत्याही समाजाचा भाग बनतात, त्यात मिसळून जाण्यास मदत करते. ओमानमध्ये भारतीय समुदायाकडे किती आदराने पाहिले जाते याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की सहअस्तित्व आणि सहकार्य हे भारतीय समुदायाचे वैशिष्ट्य राहिले आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले की, भारत आणि ओमान यांचे मांडवीपासून मस्कतपर्यंतचे शतकानुशतकांचे जुने संबंध आज भारतीय समुदाय आपल्या कठोर परिश्रम आणि एकजुटीने जोपासत आहे. 'भारताला जाणून घ्या' या प्रश्नमंजुषा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल त्यांनी समुदायाचे कौतुक केले. भारत-ओमान संबंधांच्या केंद्रस्थानी ज्ञान आहे, यावर जोर देत त्यांनी देशातील भारतीय शाळांना 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. समुदायाच्या कल्याणासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांचेही पंतप्रधानांनी आभार मानले.
पंतप्रधानांनी यावेळी भारताची परिवर्तनकारी प्रगती आणि विकासाचा उल्लेख करुन सांगितले की या बदलाचा वेग आणि प्रमाण आणि अर्थव्यवस्थेची मजबुती गेल्या तिमाहीत नोंदवलेल्या आठ टक्क्यांहून अधिक वृद्धीतून दिसून येते. गेल्या 11 वर्षातील केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल सांगताना पंतप्रधान म्हणाले की देशात पायाभूत सेवासुविधा विकास, उत्पादकता, आरोग्यसेवा, हरितविकास आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात परिवर्तनकारक बदल घडून आले आहेत. भारत जागतिक दर्जाच्या नवोन्मेषांची निर्मिती, स्टार्टअप आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत परिसंस्था या क्षेत्रातील प्रगतीच्या आधारे 21 व्या शतकासाठी सज्ज होत आहे. भारताची युपीआय ही देयक प्रणालीचा जागतिक स्तरावर होणाऱ्या सर्व डिजिटल पेमेंटपैकी 50% हुन अधिक वाटा आहे आणि ही बाब भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे, असे ते म्हणाले. याशिवाय पंतप्रधानांनी भारताच्या अंतराळ क्षेत्रातील अलीकडील यशाचा आढावा घेताना चंद्रावर उतरण्यापासून ते नियोजित गगनयान मानवी अंतराळ मोहिमेपर्यंतच्या बाबींचा उल्लेख केला. भारत आणि ओमान यांच्यात अंतराळ क्षेत्रातील सहयोग हा एक महत्त्वाचा भाग आहे असे सांगून पंतप्रधानांनी तेथील विद्यार्थ्यांना खास युवकांसाठी तयार केलेल्या इस्रोच्या युविका कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. भारत ही केवळ एक बाजारपेठ नव्हे तर जगासाठी वस्तू आणि सेवांपासून डिजिटल सेवांपर्यंत एक आदर्श आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
ओमान मधील भारतीय समुदायाच्या कल्याणासाठीची भारताची दृढ वचनबद्धता अधोरेखित करुन सांगितले की कोठेही आणि कधीही आपल्या लोकांना मदतीची आवश्यकता असते, तिथे सरकार त्यांना हात देण्यासाठी सज्ज आहे.
भारत- ओमान, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील सहयोग, डिजिटल अध्ययन, नवोन्मेष भागीदारी आणि उद्योजकता आदानप्रदान या शक्यतांमधून आपली भागीदारी भविष्यासाठी सज्ज करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. युवकांनी मोठे स्वप्न बघावे, सखोल ज्ञान घ्यावे आणि धाडसी नवोन्मेष साकारावेत ज्यामुळे ते मानवतेला अर्थपूर्ण योगदान देऊ शकतील, असे आवाहन त्यांनी केले.
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2205862)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam