पंतप्रधान कार्यालय
डेहराडूनहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले संबोधन
प्रविष्टि तिथि:
25 MAY 2023 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2023
नमस्कार,
उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह जी, उत्तराखंडचे लोकप्रिय मुख्यमंत्री, पुष्कर सिंह धामी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उत्तराखंड सरकारचा मंत्रीवर्ग, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषदेचे सदस्य, इतर मान्यवर आणि उत्तराखंडच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, उत्तराखंडमधल्या सर्वांचे वंदे भारत एक्स्प्रेस गाडीसाठी खूप-खूप अभिनंदन.
दिल्ली आणि डेहराडून दरम्यान धावणारी ही गाडी, देशाची राजधानी आणि देवभूमी यांना वेगाने जोडणार आहे. वंदे भारत गाडीमुळे दिल्ली आणि डेहराडून दरम्यानचा रेल्वे प्रवास आता कमी वेळात होणार आहे. ही गाडी वेगवान तर आहेच त्याच बरोबर या गाडीमधल्या सुविधा, हा प्रवास अतिशय सुखकर करणार आहेत.
मित्रांनो,
काही वेळापूर्वीच मी तीन देशांचा दौरा करून परतलो आहे. आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. आपण भारतवासियांनी, ज्या प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे, ज्या प्रकारे आपण दारिद्र्याशी लढा देत आहोत,त्याने अवघ्या जगाला विश्वास दिला आहे. ज्या कोरोनाशी लढताना मोठ-मोठे देश नामोहरम झाले त्याच कोरोनाला आपण भारतीयांनी एकजुटीने टक्कर दिली आहे.आपण जगातले सर्वात मोठे लसीकरण अभियान राबवले. आज संपूर्ण जग भारताची चर्चा करत आहे, भारत जाणून घेण्यासाठी, भारत पाहण्यासाठी जगभरातले लोक येत आहेत. उत्तराखंडसारख्या निसर्गरम्य राज्यांसाठी ही उत्तम संधी आहे. या संधीचा लाभ उठवण्यासाठी ही वंदे भारत गाडी सहाय्यक ठरणार आहे.
मित्रहो,
उत्तराखंड देवभूमी आहे.मला आठवते आहे,मी जेव्हा बाबा केदार यांचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो तेव्हा दर्शन घेतल्यानंतर माझ्या तोंडून उद्गार निघाला होता. हे दशक उत्तराखंडचे दशक असेल असे मी म्हटले, बाबा केदार यांच्या आशीर्वचनपर हे उद्गार होते. आज कायदा व्यवस्था सर्वोपरी राखत विकासाच्या मार्गावर उत्तराखंडची सुरु असलेली आगेकूच प्रशंसनीय आहे. या देवभूमीची ओळख अशीच राखण्यासाठी हे महत्वाचे आहे. ही देवभूमी येत्या काळात अवघ्या जगाच्या आध्यात्मिक जाणिवेचे केंद्र ठरेल असा मला विश्वास आहे.या अनुषंगानेही उत्तराखंडचा विकास करायला हवा.
आपण पाहत असाल; चारधामची यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंची संख्या दर वर्षी मागचे विक्रम मोडते आणि नवे विक्रम करते. बाबा केदार यांच्या दर्शनाला इतक्या भाविकांची गर्दी होते हे आपण पाहत आहोत. हरिद्वारमध्ये होणाऱ्या कुंभ आणि अर्ध कुंभ साठी जगभरातून भाविक येतात. दर वर्षी होणाऱ्या कावड यात्रेसाठीही लाखो भाविक उत्तराखंडमध्ये येतात. इतक्या मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात अशी राज्ये देशात मोजकीच आहेत. भाविकांची इतकी मोठी संख्या एका बाजूने भेट आहे तर इतक्या विशाल संख्येतल्या भाविकांसाठी नियोजन हे भगीरथ कार्यही आहे. हे भगीरथ कार्य सुलभ करण्यासाठी दुहेरी इंजिन सरकार, दुप्पट शक्तीने, दुप्पट वेगाने काम करत आहे.
भाजपा सरकारचा संपूर्ण जोर विकासाच्या नवरत्नांवर आहे. पहिले रत्न -केदारनाथ-बद्रीनाथ धाम इथे 1300 कोटी रुपयांचे पुनर्निर्माण कार्य, दुसरे रत्न- अडीच हजार कोटी रुपये खर्चाच्या गौरीकुंड - केदारनाथ आणि गोविंदघाट- हेमकुंड साहिब रोपवेचे काम, तिसरे रत्न- कुमायूं इथली पौराणिक मंदिरे भव्य करण्यासाठी मानसखंड मंदिर माला मिशनचे काम, चौथे रत्न- संपूर्ण राज्यात होम स्टे साठी प्रोत्साहन.मला अशी माहिती देण्यात आली आहे की संपूर्ण राज्यात 4,000 पेक्षा जास्त होम स्टेची नोंदणी झाली आहे. पाचवे रत्न- 16 इको टुरिझम स्थानांचा विकास. सहावे रत्न- उत्तराखंडमध्ये आरोग्य सेवांचा विस्तार. उधमसिंह नगर इथे एम्सचे सॅटेलाईट केंद्रही उभारण्यात येत आहे. सातवे रत्न- सुमारे 2 हजार कोटी रुपये खर्चाचा टिहरी सरोवर विकास प्रकल्प. आठवे रत्न- ऋषिकेश-हरिद्वार चा साहसी पर्यटन आणि योग राजधानी म्हणून विकास आणि नववे रत्न- टनकपुर-बागेश्वर रेल्वे मार्ग.या रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरु होईल.आपल्याला एक म्हण माहित असेल सोने पे सुहागा. नवरत्नांची ही माळ गुंफण्यासाठी इथे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम सुरु आहे. या प्रकल्पांनाही धामी सरकारने नवी उर्जा दिली आहे. 12 हजार कोटी रुपये खर्चाच्या चारधाम महापरियोजनेचे वेगाने काम सुरु आहे. दिल्ली डेहराडून द्रुतगती महामार्ग तयार झाल्याने डेहराडून -दिल्ली दरम्यानचा प्रवास सुलभ होईल. रस्ते कनेक्टिविटी बरोबरच रोप-वे कनेक्टिविटी साठीही उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात काम होत आहे. पर्वतमाला योजनेमुळे येत्या काळात उत्तराखंडचा चेहरा-मोहरा पालटणार आहे.ज्या कनेक्टिविटीसाठी उत्तराखंडच्या लोकांनी वर्षानुवर्षे प्रतीक्षा केली आमचे सरकार, ती प्रतीक्षा आता संपुष्टात आणत आहे.
ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प दोन-तीन वर्षात पूर्ण होईल. 16 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च या योजनेसाठी केला जात आहे. ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यावर उत्तराखंडच्या एका मोठ्या प्रदेशात राज्यातील लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी सुलभता येईल. यामुळे इथे गुंतवणूक, उद्योगांचा विकास आणि रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील. आणि देवभूमीतील विकासाच्या या महाअभियानादरम्यान, आता ही वंदे भारत रेल्वे देखील, उत्तराखंडच्या लोकांसाठी एक भव्य भेट सिद्ध होणार आहे.
मित्रहो,
आज राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे उत्तराखंड वेगाने पर्यटन केंद्र, साहसी पर्यटन केंद्र, चित्रपट चित्रीकरणाचे ठिकाण, विवाहांसाठीचे ठिकाण म्हणूनही उदयाला येत आहे. आज उत्तराखंडमधील नवनवीन ठिकाणे, नवनवीन पर्यटन केंद्रे देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. या सगळ्यांना वंदे भारत रेल्वेमुळे खूप मदत मिळेल. आता तर देशाच्या कानाकोपऱ्यात वंदे भारत रेल्वे धावायला लागली आहे. जेव्हा कुटुंबासोबत कुठेतरी लांबचा प्रवास करायचा असतो, तेव्हा रेल्वे हीच लोकांची पहिली पसंती असते. अशा परिस्थितीत आता वंदे भारत, भारतातील सर्वसामान्य कुटुंबांची पहिली पसंती बनू लागली आहे.
बंधू आणि भगिनींनो,
21 व्या शतकातील भारत, आपल्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून अधिक वेगाने विकसित होऊ शकतो. यापूर्वी दीर्घकाळ ज्या पक्षांची सरकारे होती, त्यांनी देशाची ही गरज कधी समजूनच घेतली नाही. त्या पक्षांचे लक्ष घोटाळ्यांवर होते, भ्रष्टाचारावर होते. ते घराणेशाहीतच गुरफटून अडकले होते. घराणेशाहीतून बाहेर पडणे, हा त्यांच्या अवाक्यातला विषय नव्हताच. भारतात हाय स्पीड रेल्वे बाबतही या पूर्वीच्या सरकारांनी मोठे मोठे दावे केले होते. या दाव्यांमध्येच किती तरी वर्षे निघून गेली. हाय स्पीड रेल्वे तर सोडाच, रेल्वे सेवेतील मानवरहित फाटक देखील हटवता आले नव्हते. रेल्वेच्या विद्युतीकरणाची स्थिती तर याहूनही गंभीर होती. 2014 पर्यंत देशाच्या एक तृतीयांश रेल्वे सेवेचेच विद्युतीकरण होऊ शकले होते. जर अशी स्थिती होती, तर, वेगाने धावणाऱ्या रेल्वे चालवण्याचा विचार करणेही अशक्य होते. 2014 या वर्षानंतर आम्ही रेल्वेचे रूपांतरण करण्यासाठी चहुबाजूंनी काम सुरू केले. एका बाजूला आम्ही देशातील पहिल्या हाय स्पीड रेल्वेच्या स्वप्नाला जमिनीवर उतरवण्यास सुरुवात केली. दुसरीकडे संपूर्ण देशाला सेमी हाय स्पीड रेल्वेसेवेसाठी सज्ज करायलाही सुरुवात केली. कधीकाळी 2014 पूर्वी दरवर्षी सरासरी 600 किलोमीटर रेल्वे मार्गिकांचे विद्युतीकरण होत होते. मात्र आता दरवर्षी 6 हजार किलोमीटर रेल्वे मार्गिकांचे विद्युतीकरण केले जात आहे. कुठे 600 आणि कुठे 6000, त्यामुळेच आज देशातील 90 टक्के पेक्षा जास्त रेल्वे जाळ्याचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. उत्तराखंडमध्ये तर संपूर्ण रेल्वे जाळ्याचे शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे.
बंधू आणि भगिनींनो,
हे काम यामुळे होते आहे, कारण आज योग्य विकासाची इच्छा पण आहे, धोरणपण आहे आणि निष्ठा देखील आहे. 2014 च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात जी वाढ झाली आहे, त्याचा थेट लाभ उत्तराखंडलाही झाला आहे. 2014 पूर्वीच्या 5 वर्षांत उत्तराखंडसाठी सरासरी 200 कोटी रुपयांपेक्षाही कमी अर्थसंकल्पीय तरतूद केली जात होती. आणि आता अश्विनीजींनी तपशीलवार याबद्दल सांगितले देखील. 200 कोटी रुपयांपेक्षा कमी, इतका दुर्गम डोंगराळ प्रदेश, रेल्वे सेवेचा अभाव आणि अर्थसंकल्पीय तरतुद किती, 200 कोटींपेक्षाही कमी. या वर्षी उत्तराखंडसाठी रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुद 5 हजार कोटी रुपये आहे. म्हणजेच 25 पटीने वाढ. याच कारणामुळे आज उत्तराखंडच्या नवनवीन प्रदेशांपर्यंत रेल्वे सेवा विस्तारत आहे. रेल्वेच नाही, तर आधुनिक महामार्गांचा देखील उत्तराखंडमध्ये अभूतपूर्व विस्तार होत आहे. उत्तराखंडसारख्या डोंगराळ प्रदेशीय राज्यासाठी अशी संपर्क जोडणी किती आवश्यक आहे, याची आम्हाला जाणिव आहे. संपर्क जोडणीच्या अभावी, भूतकाळात, कशी गावेच्या गावे रिकामी झाली, त्या वेदना आम्हीला कळतात. भावी पिढीला त्या वेदनेपासून आम्ही वाचवू इच्छितो. उत्तराखंडमध्येच पर्यटनातून, शेतीच्या माध्यमातून,, उद्योगांद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी एवढी मेहनत, आज आम्ही करत आहोत. आपल्या सीमा भागांपर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे, देशाच्या रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांची गैरसोय होऊ नये, त्यासाठीही अशा प्रकारची आधुनिक संपर्क जोडणी खूप काी येईल.
बंधू आणि भगिनींनो,
आमचे डबल इंजिन सरकार, उत्तराखंडच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. उत्तराखंडचा जलद विकास, भारताच्या जलद विकासासाठी मदतीचा ठरणार आहे. आणि देश आता थांबणार नाहीए, देशाने आता आपली गती ठरवली आहे. संपूर्ण देश वंदे भारतच्या वेगाने पुढे वाटचाल करत आहे, आणखी पुढे वाटचाल करत राहील. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे उत्तराखंडच्या, पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेसाठी खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. आणि या दिवसांत तर बाबा केदारांच्या चरणी, बद्री विशालांच्या चरणी, यमुनोत्तरी, गंगोत्रीच्या चरणी, खूपच पटापट देशभरातून लोक येत आहेत. त्याच वेळी वंदे भारत एक्स्प्रेसचे येणे, हा त्यांच्यासाठी देखील मोठा सुखद अनुभव असेल. मी पुन्हा एकदा बाबा केदारांच्या चरणी वंदन करतो, आणि देवभूमीला वंदन करून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद!
अस्वीकरण : पंतप्रधानांच्या भाषणाचे हे अंदाजे भाषांतर आहे. मूळ भाषण हिंदीत करण्यात आले होते.
आशिष सांगळे /नीलिमा चितळे /तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2205491)
आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam