पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत-जॉर्डन व्यापार बैठकीत पंतप्रधानांचे संबोधन

प्रविष्टि तिथि: 16 DEC 2025 5:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025

मान्यवर राजे अब्दुल्ला, 

राजकुमार,

दोन्ही देशांची शिष्टमंडळे,

व्यवसाय क्षेत्रातील नेते

नमस्कार, 

मित्रहो,

जगात अनेक देशांच्या सीमा जोडलेल्या असतात तर काही देशांच्या बाजारपेठा जोडल्या जातात. परंतू भारत आणि जॉर्डन यांचे संबंध असे आहेत जिथे ऐतिहासिक विश्वास आणि भविष्यातील आर्थिक संधी यांचे एकत्रीकरण होते.

हीज मॅजेस्टीसोबत काल झालेल्या माझ्या चर्चेचा सारांश हाच होता. भूगोल संधीमध्ये आणि संधी विकासात कसे बदलता येईल, यावर आम्ही तपशीलवार चर्चा केली. 

युवर मॅजेस्टी,

आपल्या नेतृत्वात जॉर्डन हा असा सेतू झाला आहे जो वेगवेगळ्या भागांमध्ये सहयोग आणि सहकार्य वाढवण्यात खूप मदत करतो. आपल्या चर्चेमध्ये काल भारतीय कंपन्या जॉर्डनच्या मार्गाने अमेरिका, कॅनडा तसेच अन्य देशांच्या बाजारपेठांपर्यंत कशाप्रकारे पोहोचू शकतील ते आपण सांगितलंत. मी इथे आलेल्या भारतीय कंपन्यांना या संधीचा पूर्ण फायदा घेण्याचे आवाहन करतो. 

मित्रहो, 

भारत आज जॉर्डनचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारी मित्र आहे. व्यापाराच्या जगतात आकडेवारीचे महत्त्व असते, याची मला जाणीव आहे. परंतु येथे आपण फक्त आकडे मोजण्यासाठी आलेलो नाही तर दीर्घकालीन संबंध निर्माण करण्यासाठी आलेलो आहोत. 

एकेकाळी गुजरात पासून पेट्रा मार्गे युरोपपर्यंत व्यापार होत होता. आपल्या भविष्यातील समृद्धीसाठी आम्हाला त्या लिंक्स पुन्हा पुनरुज्जीवीत कराव्या लागणार आहेत आणि हे कार्य साकार करण्यासाठी आपण सर्व महत्त्वपूर्ण योगदान देणार आहोत.

मित्रहो,

आपण सर्व जाणताच की भारत एक तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे. भारताचा विकासाचा दर हा आठ टक्क्यांहून जास्त आहे. हा विकासाचा दर म्हणजे उत्पादनाला चालना देणारे प्रशासन आणि संशोधनाला चालना देणारी धोरणे यांचा परिणाम आहे.

आज जॉर्डनच्या प्रत्येक व्यापारासाठी प्रत्येक गुंतवणूकदारासाठीसुद्धा भारतात संधीची नवीन दारे उघडली जात आहेत. भारताच्या वेगाने होणाऱ्या या विकासातील सहयोगी आपण बनू शकता आणि आपल्या गुंतवणुकीवर मोठा परतावा सुद्धा मिळवू शकता.  

मित्रहो, 

आज जग विकासाच्या नवीन इंजिनाच्या प्रतिक्षेत आहे. जगाला एका विश्वासार्ह पुरवठा साखळीची आवश्यकता आहे. भारत आणि जॉर्डन एकत्र येऊन जगाच्या गरजा पूर्ण करण्यासंदर्भात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. 

आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी काही महत्त्वाच्या क्षेत्रांची चर्चा आपल्यासोबत नक्कीच करु इच्छितो. अशी क्षेत्रे जिथे दूरदृष्टी, व्यवहार्यता आणि वेग या सगळ्यांचे अस्तित्व आहे.

पहिले क्षेत्र म्हणजे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि माहिती तंत्रज्ञान. यामधला भारताचा अनुभव जॉर्डनला भरपूर उपयोगी पडू शकतो. भारतात डिजिटल तंत्रज्ञान हे समावेशनाचे आणि कार्यक्षमतेचे मॉडेल बनले आहे. यूपीआय, आधार यासारख्या प्रत्यक्षात आलेल्या आमच्या संकल्पना आज जागतिक मानके म्हणून गणल्या जात आहेत. या प्रत्यक्षात आलेल्या संकल्पना जॉर्डनच्या व्यवस्थेशी जोडण्यावर हीज मॅजेस्टी आणि मी चर्चा केली. हे दोन्ही देश अर्थविषयक तंत्रज्ञान,आरोग्यसंबधी तंत्रज्ञान आणि कृषिविषयक तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपली स्टार्टर्स थेट जोडू शकता, एक सामायिक इकोसिस्टीम तयार करू शकता‌. जिथे आपण कल्पना भांडवलाशी आणि संशोधन प्रमाणाशी जोडू शकतो.

मित्रहो,

फार्मा आणि वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात सुद्धा अनेक शक्यता आहेत. आज आरोग्य सेवा हे फक्त क्षेत्र नाही तर एक धोरणात्मक प्राधान्य असणारी बाब आहे.

जॉर्डनमध्ये भारतीय कंपन्या औषधे तयार करतील, वैद्यकीय उपकरणे तयार करतील आणि त्यामुळे जॉर्डनच्या लोकांना फायदा होईल. पश्चिम आशिया आणि आफ्रिका यांच्यासाठी सुद्धा जॉर्डन एक विश्वासार्ह हब बनू शकतो. जेनेरिक्स असो, वॅक्सीन असो, आयुर्वेद असो किंवा वेलनेस; कोणतेही क्षेत्र असो, भारत विश्वास घेऊन येतो आणि जॉर्डन व्यापक पोहोच प्रदान करतो.

मित्रहो,

आता पुढचे क्षेत्र कृषीचे आहे. भारताला कोरड्या हवामानातील शेतीचा मोठा अनुभव आहे. आमचा हा अनुभव जॉर्डनमध्ये खराखुरा फरक आणू शकतो. आम्ही ठराविक कृषी आणि मायक्रोइरिगेशन यासारख्या समस्यांवर काम करू शकतो. शीतगृह साखळी, फूड पार्क आणि स्टोरेज फॅसिलिटी तयार करण्यामध्ये सुद्धा आपण एकत्र येऊन काम करू शकतो. ज्या प्रकारे आम्ही खत उत्पादनामध्ये एकत्रित येऊन जॉईंट व्हेंचर करत आहोत तसेच अन्य क्षेत्रामध्ये ही आपण पुढे वाटचाल करु शकतो. 

मित्रहो, 

वेगवान विकासासाठी पायाभूत सुविधा आणि बांधकाम या आवश्यक गोष्टी आहेत. या क्षेत्रांमधील आपले सहकार्य आपल्याला वेग आणि प्रमाण या दोन्ही गोष्टी मिळवून देईल. 

हीज मॅजेस्टींनी जॉर्डनमध्ये रेल्वे आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याची संकल्पना सामायिक केली आहे. त्या संकल्पना साकार करण्यासाठी आमच्या कंपन्या सक्षम आहेत आणि उत्सुकसुद्धा आहेत हा विश्वास त्यांना मी देऊ इच्छितो.

हीज मॅजेस्टींनी काल आमच्या चर्चेमध्ये पायाभूत सुविधांच्या पुनर्उभारणीच्या गरजांबाबत सांगितले. भारतातील तसेच जॉर्डनमधील कंपन्या या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे काम करू शकतात. 

मित्रहो, 

आज जग हरित विकासाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. स्वच्छ ऊर्जा हा आता केवळ एक पर्याय नाही तर गरज आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हरित हायड्रोजन, ऊर्जा साठा यामध्ये भारत एक मोठा गुंतवणूकदार म्हणून काम करत आहे. जॉर्डनकडेसुद्धा याबाबतीत भरपूर क्षमता आहे ती एकत्रितपणे कार्य करून आपण उलगडू शकतो.

असेच एक क्षेत्र, म्हणजे वाहन आणि वाहतूक क्षेत्र. भारतात किफायतशीर इलेक्ट्रॉनिक वाहन, मोटारसायकल आणि सीएनजीवर आधारित वाहतूक यामध्ये जगातील सर्वात आघाडीवर असणाऱ्या देशांपैकी एक आहे. या क्षेत्रातसुद्धा आपल्याला एकत्र येऊन अधिकाधिक काम केले पाहिजे. 

मित्रहो, 

भारत आणि जॉर्डन या दोन्ही देशांना आपापली संस्कृती आणि परंपरा यांचा अतिशय अभिमान आहे. परंपरा आणि सांस्कृतिक पर्यटन याला दोन्ही देशांमध्ये खूप जास्त वाव आहे. मला वाटते की दोन्ही देशातील गुंतवणूकदारांनी या दिशेने पुढे गेले पाहिजे.

भारतात भरपूर चित्रपट तयार होतात. या चित्रपटांचे शूटिंग जॉर्डनमध्ये करता येईल. संयुक्त चित्रपट महोत्सव होतील. यासाठी सुद्धा आवश्यक प्रोत्साहन देता येईल. भारतात पुढील वेळी वेव्ज परिषदेत जॉर्डनकडून एक मोठे शिष्टमंडळ येईल, अशी आम्ही खात्री बाळगतो.

मित्रहो,

जॉर्डनचे जे बलस्थान आहे ते म्हणजे भूगोल आणि भारताच्या जवळ कौशल्यसुद्धा आहे आणि प्रमाणसुद्धा. दोन्ही बलस्थाने एकत्र येतील तेव्हा त्यामुळे दोन्ही देशातील युवकांना नवीन संधी मिळतील. 

दोन्ही देशातील सरकारचे दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहेत आता व्यापारी जगतातील आपल्या सर्व साथीदारांना आपल्या कल्पना, संशोधन आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात आणायला हवेत. 

शेवटी पुन्हा एकदा सांगू इच्छितो 

या…

आपण एकत्र गुंतवणूक करूया,

एकत्र नवनिर्मिती करूया,

आणि एकत्र विकास साधूया

युवर मॅजेस्टी 

मी पुन्हा एकदा आपले, जॉर्डन सरकारचे आणि या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानतो.

शुक्रान,

खूप खूप धन्यवाद 

नितीन फुल्लुके /विजया सहजराव/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2205406) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam