पंतप्रधान कार्यालय
नागपट्टिनम (भारत) आणि कंकेसंथुराई (श्रीलंका) दरम्यान फेरी सेवेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
Posted On:
14 OCT 2023 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2023
महामहिम, बंधू आणि भगिनींनो, नमस्कार, आयुबोवान, वणक्कम!
मित्रांनो,
या महत्त्वाच्या प्रसंगी तुमच्यासोबत सहभागी होणे हा मी माझा बहुमान समजतो. आपण भारत आणि श्रीलंका यांच्यातील राजनैतिक आणि आर्थिक संबंधांमध्ये एका नवीन अध्यायाची सुरुवात करत आहोत. नागपट्टिनम आणि कंकेसंथुराई दरम्यान फेरी सेवेचा शुभारंभ, हे आपले संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे.
मित्रांनो,
भारत आणि श्रीलंका यांचा संस्कृती, वाणिज्य आणि सभ्यतेचा एक सखोल इतिहास आहे. नागपट्टिनम आणि जवळील शहरे श्रीलंकेसह अनेक देशांसोबतच्या सागरी व्यापारासाठी पूर्वीपासून ओळखली जातात. प्राचीन तमिळ साहित्यात पुम्पुहार या ऐतिहासिक बंदराचा एक प्रमुख केंद्र म्हणून उल्लेख आहे. 'पट्टिनप्पालै' आणि 'मणिमेखलै' सारखे संगम काळातील साहित्य भारत आणि श्रीलंका दरम्यान प्रवास करणाऱ्या बोटी आणि जहाजांबद्दल सांगते. महान कवी सुब्रमण्य भारती यांनी त्यांच्या 'सिंधू नदियिन मिसै' या गीतात आपल्या दोन देशांना जोडणाऱ्या पुलाबद्दल उल्लेख केला होता. ही फेरी सेवा त्या सर्व ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना पुन्हा जिवंत करत आहे.
मित्रांनो,
राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांच्या अलीकडील भेटीदरम्यान, आम्ही आमच्या आर्थिक भागीदारीसाठी संयुक्तपणे एक दूरदृष्टी दस्तऐवज स्वीकारला. संपर्क हा या भागीदारीचा मुख्य विषय आहे. संपर्क म्हणजे केवळ दोन शहरे जवळ आणणे नव्हे. त्यामुळे आपले देश जवळ येतात, आपले लोक जवळ येतात आणि आपली मने जवळ येतात. कनेक्टिव्हिटीमुळे व्यापार, पर्यटन आणि लोकांमधील संबंध वाढतात. तसेच, यामुळे दोन्ही देशांतील तरुणांसाठी संधी निर्माण होतात.
मित्रांनो,
2015 मधील माझ्या श्रीलंका दौऱ्यानंतर, आपण दिल्ली आणि कोलंबो दरम्यान थेट विमानसेवा सुरू होताना पाहिली. त्यानंतर, श्रीलंकेहून आलेले पहिले आंतरराष्ट्रीय विमान तीर्थक्षेत्र कुशीनगर येथे उतरल्याचा आनंद आपण साजरा केला. 2019 मध्ये चेन्नई आणि जाफना दरम्यान थेट विमानसेवा सुरू झाली. आता, नागपट्टिनम आणि कंकेसंथुराई दरम्यानची ही फेरी सेवा या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
मित्रांनो,
संपर्काबाबतची आमची दूरदृष्टी केवळ वाहतूक क्षेत्रापुरती मर्यादित नाही. भारत आणि श्रीलंका फिन-टेक आणि ऊर्जा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये जवळून सहकार्य करत आहेत. यूपीआय मुळे डिजिटल पेमेंट भारतात एक जनआंदोलन आणि जीवनशैली बनले आहे. आम्ही यूपीआय आणि लंका पे (Lanka Pay) यांना जोडून फिन-टेक क्षेत्रातील संपर्कावर काम करत आहोत. आपल्या देशांच्या विकासाच्या प्रवासाला गती देण्यासाठी ऊर्जा सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. ऊर्जा सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी आम्ही आमची विद्युतवाहक ग्रिड्स (energy grids) जोडत आहोत.
मित्रांनो,
प्रगती आणि विकासासाठी भागीदारी हा आपल्या द्विपक्षीय संबंधांचा एक मजबूत स्तंभ आहे. विकास सर्वांपर्यंत पोहोचावा, कोणीही मागे राहू नये, ही आमची दूरदृष्टी आहे. याच दूरदृष्टीनुसार, श्रीलंकेत भारतीय सहाय्याने राबवलेल्या प्रकल्पांनी लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. उत्तर प्रांतात गृहनिर्माण, पाणी, आरोग्य आणि उपजीविका सहाय्याशी संबंधित अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आम्ही कंकेसंथुराई बंदराच्या उन्नतीकरणासाठी सहकार्य केले याचा मला आनंद आहे. उत्तर आणि दक्षिणेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गांची पुनर्बांधणी असो; प्रतिष्ठित जाफना सांस्कृतिक केंद्राचे बांधकाम असो; संपूर्ण श्रीलंकेत आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ असो; किंवा डिक ओया (Dick Oya) इथले बहुउद्देशीय रुग्णालय असो, आम्ही 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या दूरदृष्टीने काम करत आहोत.
मित्रांनो,
भारताने नुकतेच जी20 शिखर परिषदेचे आयोजन केले होते याची तुम्हा सर्वांना कल्पना आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' या आमच्या दूरदृष्टीचे आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वागत केले आहे. याच दूरदृष्टीचा एक भाग म्हणजे 'शेजारी राष्ट्राला प्राधान्य' (Neighborhood First) धोरण, प्रगती आणि समृद्धी एकमेकांसोबत वाटून घेणे. जी20 शिखर परिषदेदरम्यान, 'भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक मार्ग' सुरू करण्यात आला. हा एक महत्त्वाचा संपर्क मार्ग आहे, जो संपूर्ण प्रदेशावर मोठा आर्थिक प्रभाव टाकेल. श्रीलंकेतील लोकांनाही याचा फायदा होईल, कारण आपण आपल्या दोन देशांमधील विविध प्रकारचा संपर्क मजबूत करत आहोत. आज फेरी सेवेच्या यशस्वी शुभारंभाबद्दल मी राष्ट्राध्यक्ष, श्रीलंका सरकार आणि श्रीलंकेच्या जनतेचे आभार मानतो. आजच्या या फेरी सेवेच्या सुरुवातीसोबतच, आम्ही रामेश्वरम आणि तलाईमन्नार दरम्यानची फेरी सेवा पुन्हा सुरू करण्याच्या दिशेनेही काम करू.
मित्रांनो,
उभय देशांच्या जनतेच्या परस्पर हितासाठी श्रीलंकेसोबत जवळून काम करून आपले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.
धन्यवाद!
आशिष सांगळे / निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
(Release ID: 2204811)
अभ्यागत कक्ष : 21
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam