रेल्वे मंत्रालय
वंदे भारत रेल्वेगाड्यांमध्ये आता मिळणार स्थानिक खाद्यपदार्थ
प्रविष्टि तिथि:
13 DEC 2025 5:34PM by PIB Mumbai
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वे भवन येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू देखील या बैठकीला उपस्थित होते.
केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना वंदे भारत रेल्वेगाड्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ उपलब्ध होतील अशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. प्रवासी प्रवास करत असताना त्यांना त्या विशिष्ट प्रदेशांची संस्कृती आणि स्वाद प्रतिबिंबित होईल, असे अन्नपदार्थ उपलब्ध करून देऊन त्यांना तो भाग अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता यावा, असा स्थानिक खाद्यपदार्थांचा समावेश करण्यामागचा उद्देश आहे. भविष्यात हळूहळू इतर सर्व रेल्वेगाड्यांमध्ये सुद्धा ही सोय उपलब्ध करून दिली जाईल.
बनावट ओळखपत्रांचा वापर करून रेल्वे तिकिटे आरक्षित करणाऱ्यांविरुद्ध भारतीय रेल्वेने केलेल्या कारवाईचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असेही केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी नमूद केले. वापरकर्त्यांची ओळख पडताळण्यासाठी आणि बनावट ओळखपत्रे शोधून काढणारी काटेकोर व्यवस्था लागू केल्यानंतर, आता आयआरसीटीसी संकेतस्थळावर दररोज सुमारे 5,000 नवीन वापरकर्ता आयडी जोडले जात आहेत. या सर्वात अलीकडच्या सुधारणांपूर्वी, वापरकर्ता आयडी जोडले जाण्याची दैनंदिन संख्या एक लाखांच्या आसपास असे.
या उपायांमुळे भारतीय रेल्वेला आताच 3.03 कोटी बनावट खाती काढून टाकण्यास मदत झाली आहे. आणखी 2.7 कोटी वापरकर्ता आयडी तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत किंवा त्यांच्या संशयास्पद क्रियाकलापांच्या आधारे निलंबनाच्या दृष्टीने त्यांची नोंद घेण्यात आली आहे.
तिकीट प्रणालीमध्ये सर्व प्रवासी खऱ्या युजर आयडीद्वारे सहजपणे तिकिटे आरक्षित करू शकतील, अशा पातळीवर सुधारणा करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
***
माधुरी पांगे/मंजिरी गानू/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203559)
आगंतुक पटल : 36