पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झालेल्या सिंधिया स्कूलच्या 125 व्या संस्थापक दिन सोहळ्यात पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
Posted On:
21 OCT 2023 9:49PM by PIB Mumbai
मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगू भाई पटेल, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, सिंधिया स्कूलच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, श्री नरेंद्र सिंह तोमर, डॉ जितेंद्र सिंह, शाळा व्यवस्थापनामधील सहकारी आणि सर्व कर्मचारी, अध्यापक आणि पालकवर्ग आणि माझ्या प्रिय युवा सहकाऱ्यांनो !
सिंधिया स्कूलला 125 वर्ष झाल्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आजाद हिंद सरकारचा देखील स्थापना दिवस आहे. मी सर्व देशवासियांना याच्या शुभेच्छा देतो. या गौरवशाली इतिहासाशी जोडण्याची तुम्ही मला संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. हा इतिहास सिंधिया स्कूलचा आहे आणि या ऐतिहासिक ग्वाल्हेर शहराचा देखील आहे. ऋषि ग्वालिपा, संगीत सम्राट तानसेन, श्रीमंत महादजी सिंधिया जी, राजमाता विजयाराजे जी, अटल बिहारी वाजपेयी जी आणि उस्ताद अमजद अली खां यांच्यापर्यंत, ग्वाल्हेरची ही धरती, अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्यांची निर्मिती करत राहिलेली आहे.
ही धरती नारी शक्ती आणि वीरांगनांची तपोभूमि आहे. महाराणी गंगाबाई यांनी या भूमीवर आपले दागिने विकून स्वराज्यासाठी युद्धाचे सैन्य तयार केले. म्हणूनच ग्वाल्हेरला येणे हे एका प्रकारे आपोआपच अतिशय सुखद आहे आणि दोन कारणांमुळे ग्वाल्हेरशी माझे विशेष नाते देखील आहे. एक म्हणजे मी काशीचा खासदार आहे आणि काशीची सेवा करण्यात, आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यात सिंधिया कुटुंबाची खूप मोठी भूमिका राहिली आहे. सिधिया कुटुंबाने गंगेच्या किनाऱ्यावर कित्येक घाट बनवले आहेत, बीएचयूच्या स्थापनेसाठी आर्थिक मदत केली आहे. आज ज्या प्रकारे काशीचा विकास होत आहे, तो पाहून महाराणी वैजाबाई आणि महाराज माधवरावजी त्यांंचा आत्मा जिथे कुठे असेल, त्यांना किती बरे वाटत असेल, याची आपण कल्पना करू शकतो.
आणि जसे मी सांगितले आहे की दोन कारणे आहेत, दुसरे कारण देखील सांगतो. ग्वाल्हेरसोबत माझे दुसरा संबध देखील आहे. आमचे ज्योतिरादित्य जी गुजरातचे जावई आहेत. या संबंधामुळे देखील माझा ग्वाल्हेरसोबत नातेसंबंध आहे. आणि आणखी एक नाते देखील आहे. माझे गाव गायकवाड संस्थानातील गाव होते आणि माझ्या गावात सर्वात पहिले प्राथमिक विद्यालय सुरू झाले ते गायकवाड कुटुंबाने बांधले होते आणि माझे हे सद्भाग्य आहे की मला जिथे मोफत शिक्षण मिळत होते ती शाळा गायकवाड जींनी स्थापन केली होती.
मित्रहो,
आपल्याकडे सांगण्यात आले आहे, मनस्येकं वचस्येकं कर्मण्येकं महात्मानाम्।
अर्थात सज्जन व्यक्ती मनात जसा विचार करतात तसेच बोलतात आणि करतात देखील. कर्तव्य परायण व्यक्तिमत्वाची हीच एक ओळख असते. कर्तव्यनिष्ठ व्यक्ती तात्कालिक लाभांसाठी नाही तर भावी पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी काम करतात. एक जुनी म्हण देखील आहे. जर एक वर्षाचा विचार करत असाल तर धान्याची पेरणी करा. जर एक दशकाचा विचार करत असाल तर फळाचे झाड लावा आणि जर एका शतकाचा विचार करत असाल तर शिक्षणाशी संबंधित संस्था स्थापन करा.
महाराजा माधवराव सिंधिया जी पहिले यांची हीच विचारसरणी तात्कालिक लाभांची नव्हती तर भावी पिढ्यांच्या भविष्याला उज्ज्वल बनवणारी होती. सिंधिया स्कूल हा त्यांच्या दूरगामी विचारसरणीचा परिणाम होता. मनुष्यबळाची ताकद काय असते हे त्यांना माहीत होते. खूपच कमी लोकांना हे ठाऊक असेल की माधवराव जींनी ज्या भारतीय परिवहन कंपनीची स्थापना केली होती ती आजही दिल्लीमध्ये डीटीसी च्या रुपात सुरू आहे. भावी पिढ्यांसाठी जलसंरक्षणावर देखील त्यांचे तितक्याच प्रमाणात लक्ष होते. त्यांनी त्या कालखंडात पाण्यासाठी, सिंचनासाठी एक खूप मोठी व्यवस्था तयार केली होती. हे जे ‘हरसी धरण’ आहे, ते 150 वर्षांनंतरही आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. हे धरण आजही लोकांना उपयुक्त ठरत आहे. माधवरावजींच्या व्यक्तिमत्वामधून आपल्या सर्वांना ही दूरदृष्टी शिकण्यासारखी आहे. शिक्षण असो, करियर असो, जीवन असो किंवा मग राजकारण, शॉर्टकट तुम्हाला काही प्रमाणात तात्कालिक फायदे देत असेलही, मात्र तुम्हाला दीर्घकालीन विचारांनी काम केले पाहिजे, जी कोणी व्यक्ती समाजात किंवा राजकारणात तात्कालिक स्वार्थासाठी काम करते, त्यामुळे समाजाचे, राष्ट्राचे नुकसानच होत असते.
मित्रहो,
2014 मध्ये देशाने माझ्यावर ही प्रधान सेवकाची जबाबदारी सोपवली, त्यावेळी माझ्या समोर दोन पर्याय होते. एक तर फक्त तात्कालिक फायद्यांसाठी काम करायचे किंवा मग दीर्घकालीन दृष्टीकोनाचा अंगिकार करायचा. आम्ही हे ठरवले की 2 वर्षे, 5 वर्षे, 8 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे, असे वेगवेगळे Time band ठेवून यासाठी काम करायचे. आज तुम्ही सांगू शकता की आमच्या सरकारची 10 वर्षे होत आहेत. या 10 वर्षात देशाने दीर्घकालीन नियोजनासह जे निर्णय घेतले आहेत, ते अभूतपूर्व आहेत. आम्ही देशाला कितीतरी प्रलंबित निर्णयांच्या ओझ्यापासून मुक्त केले आहे. 60 वर्षांपासून ही मागणी होत होती की जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात यावे. हे कामं आमच्या सरकारने केले. 40 वर्षांपासून मागणी केली जात होती की माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन दिली जावी. हे काम आमच्या सरकारने केले. 40 वर्षांपासून ही मागणी होत होती की जीएसटी लागू करण्यात यावा. हे काम देखील आमच्याच सरकारने केले.
अनेक दशकांपासून मुस्लीम महिला तिहेरी तलाकच्या विरोधात कायदा बनवण्याची मागणी करत होत्या. तिहेरी तलाकच्या विरोधात कायदा देखील आमच्या सरकारच्या काळातच तयार झाला. तुम्ही पाहिले असेल काही आठवड्यांपूर्वीच लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षणाचा कायदा तयार करण्यात आला. हे काम देखील दशकांपासून प्रलंबित होते. नारी शक्ती वंदन अधिनियम देखील आमच्या सरकारनेच तयार केला आहे.
माझ्याकडे कामांची इतकी लांब यादी आहे की संपूर्ण रात्र निघून जाईल. हे तर काही मोठे निर्णय मी यासाठी सांगत होतो, कारण जर आमच्या सरकारने हे निर्णय घेतले नसते तर त्याचे ओझे कोणावर स्थानांतरित झाले असते? जर आपण हे केले नसते तर इतर कुठे तरी स्थानांतरित झाले असते, तुमच्या पिढीवर झाले असते? तर तुमच्या पिढीवरचे हे ओझे मी काही प्रमाणात हलके केले आहे आणि माझा हाच प्रयत्न आहे की युवा पिढीसाठी आज देशात खूपच सकारात्मक वातावरण निर्माण होईल. एक असे वातावरण ज्यामध्ये तुमच्या पिढीकडे संधींची कोणतीही कमतरता नसेल. एक असे वातावरण ज्यामध्ये भारताचा युवा मोठी स्वप्ने पाहील आणि ती पूर्ण देखील करेल. Dream Big and Achieve Big. आणि ही गोष्ट मी तुम्हाला यासाठी सांगत आहे कारण ज्यावेळी सिंधिया स्कूल आपली दीडशे वर्षे पूर्ण करेल... तेव्हा देश देखील एका महत्त्वाच्या टप्प्यावर असेल. हा टप्पा असेल भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे
आज आपण हा संकल्प केला आहे की या आगामी 25 वर्षांमध्ये देशाला विकसित बनवून दाखवू आणि तुम्हाला हे सर्व करायचे आहे, भारताच्या युवा पिढीला करायचे आहे. तुम्हा युवा वर्गावर माझा विश्वास आहे. तुमच्या युवांच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे आणि मला अशी आशा वाटते की तुम्ही ही स्वप्ने उराशी बाळगून काम कराल, स्वप्नांचे रुपांतर संकल्पात कराल आणि संकल्पांना साध्य करेपर्यंत थांबणार नाहीत.
पुढील 25 वर्षे तुमच्या आयुष्यासाठी जितकी गरजेची आहेत तितकीच भारतासाठी देखील गरजेची आहेत. सिंधिया स्कूलच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा हा संकल्प असला पाहिजे. मी विकसित भारत बनवेन. मित्रांनो, कराल ना, कराल ना? मी राष्ट्र प्रथम या विचाराने प्रत्येक काम करेन. मी नवोन्मेष करेन, मी संशोधन करेन, मी व्यावसायिक विश्वात असेन किंवा कोणत्याही ठिकाणी असेन, मी भारताला विकसित करणारच.
आणि मित्रांनो,
तुम्हाला माहिती आहे का मला सिंधिया विद्यालयावर इतका विश्वास का आहे? कारण मी तुमच्या विद्यालयाच्या काही माजी विद्यार्थ्यांना अतिशय जवळून ओळखतो. पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री असलेले जितेंद्र सिंह आज या मंचावर बसलेले आहेत, ते देखील तुमच्या याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. रेडिओवर ज्यांचा आवाज ऐकून आपण मंत्रमुग्ध व्हायचो ते अमीन सयानी जी, लेफ्टनंट जनरल मोती दार जी, येथे एक उत्तम सादरीकरण करणारे मीत ब्रदर्स तसेच निर्भय सलमान खान आणि माझे मित्र नितीन मुकेश जी येथे बसले आहेत, हे सर्वजण याच विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. सिंधिया विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा रंगपट इतका विशाल आहे की आपल्याला त्यात सर्व प्रकारचे रंग दिसतात.
माझ्या तरुण मित्रांनो, विष्णू पुराणात लिहिले आहे,
“गायन्ति देवाः किल गीतकानि, धन्यास्तु ते भारतभूमिभागे।”
याचा अर्थ असा आहे की देव देखील या भारतभूमीत जन्म घेतलेल्यांचे गुणगान करतात. म्हणजेच भारतभूमीत जन्म घेणारे देवांपेक्षाही भाग्यवान असतात. आज, भारताचा झेंडा यशाच्या अत्युच्च शिखरावर फडकत आहे. भारताचा झेंडा जगभरात फडकत आहे. 23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचून इतिहास रचला, जिथे इतर अजूनपर्यंत कोणताही देश पोहोचला नाही. तुम्ही जी20 शिखर परिषदेदरम्यानही भारताचे यश पाहिले असेल. आज, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिक फिनटेक स्विकार दरात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक रिअल-टाइम डिजिटल व्यवहार करण्यात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच, स्मार्टफोन डेटा ग्राहकांच्या बाबतीतही भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
आज, इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. आज, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाइल उत्पादक देश आहे. स्टार्ट-अप परिसंस्थेत आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आज, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक आहे. आज, भारत अंतराळात आपले अंतराळ स्थानक स्थापित करण्याची तयारी करत आहे. आज सकाळीच, तुम्ही गगनयानाची यशस्वी चाचणी आणि 'क्रू एस्केप सिस्टम'ची यशस्वी चाचणी पाहिली. ग्वाल्हेरमध्ये एवढा मोठा हवाई दलाचा तळ आहे... तुम्ही तेजस विमानाला आकाशात उड्डाण करताना पाहिले नाही का? किंवा समुद्रात आयएनएस विक्रांतची गर्जना तुम्ही ऐकली नाही का? आज भारतासाठी काहीही अशक्य नाही. भारताच्या वाढत्या क्षमतांमुळे प्रत्येक क्षेत्रात तुमच्यासाठी नवीन दारे उघडली जात आहेत.
विचार करा, 2014 पूर्वी आपल्या देशात केवळ काहीशे स्टार्ट-अप होते. आज भारतात स्टार्ट-अप्सचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही वर्षांत, भारताने 100 हून अधिक युनिकॉर्न तयार केले आहेत. तुम्हाला हे देखील माहिती आहे की युनिकॉर्न म्हणजे काय... याचा अर्थ किमान 8 अब्ज रुपयांची कंपनी. सिंधिया विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही येथून पदवी प्राप्त केल्यानंतर युनिकॉर्न बनवावेत, जेणेकरून ते त्यांच्या विद्यालयाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील.
'जग तुमचे शिंपले आहे!!!' (म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे ते करू शकता किंवा कुठेही जाऊ शकता कारण तुमच्यात ते करण्याची क्षमता आहे) आणि सरकार म्हणून, आम्ही तुमच्यासाठी नवीन क्षेत्रे देखील खुली केली आहेत. पूर्वी, केवळ सरकारच उपग्रह विकसित करत असे किंवा परदेशातून आयात करत असे. आता, आम्ही तुमच्यासाठी अंतराळ क्षेत्र उघडले आहे, तरुणांनो. पूर्वी, संरक्षण उपकरणे केवळ सरकारच बनवत असे किंवा परदेशातून आयात करत असे. आता आम्ही तुमच्यासाठी, तरुणांसाठी संरक्षण क्षेत्र देखील उघडले आहे. भारतात आता तुमच्यासाठी अनेक क्षेत्रे विकसित केली जात आहेत.
तुम्ही 'मेक इन इंडिया' उपक्रम पुढे नेण्याची गरज आहे. तुम्ही 'आत्मनिर्भर भारता'चा संकल्प पुढे नेण्याची गरज आहे. माझा आणखी एक मंत्र लक्षात ठेवा - नेहमी ‘चौकटीबाहेर विचार करा’. तसे, ज्योतिरादित्य सिंधियाजी यांच्या वडिलांनी, आपले माधवराव सिंधियाजी यांनी रेल्वेमंत्री असताना शताब्दी ट्रेन सुरू केल्या. त्यानंतर तीन दशके भारतात अशा आधुनिक ट्रेन सुरू झाल्या नव्हत्या. आता, वंदे भारतनेही देशात आपला ठसा उमटवला आहे आणि कालच, तुम्ही नमो भारत या ट्रेनने भारताची गती दाखवून दिली आहे.
मित्रांनो,
येथे येण्यापूर्वी, मी सिंधिया विद्यालयातील वेगवेगळ्या गटांची नावे पाहत होतो आणि ज्योतिरादित्य जी मला ती समजावून सांगत होते. स्वराज्याच्या संकल्पाशी संबंधित नावे तुमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहेत. शिवाजी हाऊस... महादजी हाऊस, राणोजी हाऊस, दत्ताजी हाऊस, कनेरखेड हाऊस, निमाजी हाऊस, माधव हाऊस, एक प्रकारे, तुमच्यात सप्त ऋषींची ताकद आहे. मी विचार करत आहे की नवरात्रीच्या या पवित्र प्रसंगी, मी तुम्हाला नऊ गृहपाठ द्यावेत, कारण हा एक शालेय कार्यक्रम आहे आणि जर तुम्ही गृहपाठ दिला नाही तर तो पूर्ण होत नाही. तर आज मी तुम्हाला नऊ कामे देऊ इच्छितो, तुम्हाला आठवेल का? भावांनो, तुमचा आवाज इतका मंद का आहे? तुम्हाला ते आठवेल का? तुम्ही त्यासाठी एक संकल्प कराल का? ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही आयुष्यभर काम कराल का?
पहिला - तुम्ही सर्वजण येथे जलसंवर्धनासंदर्भात खूप काम करता. जलसुरक्षा हे 21 व्या शतकातील एक मोठे आव्हान आहे. त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबवा.
दुसरे - सिंधिया विद्यालयात गावे दत्तक घेण्याची परंपरा आहे. तुम्ही गावोगावी जाऊन लोकांना डिजिटल व्यवहारांबद्दल माहिती दिली पाहिजे.
तिसरे - स्वच्छतेचा संकल्प. जर मध्य प्रदेशातील इंदूर स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर असू शकते, तर ग्वाल्हेर का नाही? स्वच्छतेत आपले शहर प्रथम क्रमांकावर आणण्याचे आव्हान स्वीकारा.
चौथे - व्होकल फॉर लोकल... शक्य तितकी, स्थानिक उत्पादने वापरा, मेड इन इंडिया उत्पादनांचा प्रचार करा.
पाचवे - प्रथम भारतात प्रवास करा... शक्य तितके, प्रथम स्वतःचा देश पहा, आपल्या देशात प्रवास करा आणि नंतर परदेशांना भेट द्या.
सहावे - शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीबाबत जागरूकता निर्माण करा. भूमातेचे रक्षण करण्यासाठी ही मोहीम अत्यंत आवश्यक आहे.
सातवे - भरड धान्य - 'श्री अन्न' - तुमच्या जीवनात समाविष्ट करा आणि त्याचा जोरदार प्रचार करा. तुम्हाला माहिती आहे, ते एक सुपरफूड आहे.
आठवा - तंदुरुस्ती, मग ती योग असो किंवा खेळ, ती तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा. आजच, येथे बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणीही झाली. त्याचाही पुरेपूर फायदा घ्या.
आणि नववा - किमान एका गरीब कुटुंबाला हात द्या. जोपर्यंत देशात असा एकही व्यक्ती नसेल ज्याच्याकडे गॅस कनेक्शन, बँक खाते, पक्के घर किंवा आयुष्मान कार्ड नाही... तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. भारतातून गरिबी हटवणे खूप आवश्यक आहे. या मार्गावर चालत, फक्त पाच वर्षांत 13.5 कोटींहून अधिक लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत. या मार्गावर चालत, भारत गरिबी दूर करेल आणि विकसित राष्ट्र बनेल.
मित्रांनो,
आजचा भारत सर्व काही भव्य प्रमाणात करत आहे. म्हणून, तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल संकुचित विचार करू नका. तुमची स्वप्ने आणि संकल्प दोन्ही भव्य असले पाहिजेत. आणि मी तुम्हाला हे सांगतो की, तुमचे स्वप्न हा माझा संकल्प आहे. तुम्ही तुमचे विचार, तुमच्या कल्पना नमो ॲपवर देखील नोंदवू शकता. आणि आता मी व्हॉट्सॲपवर देखील आहे, म्हणून तुम्ही तिथेही माझ्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमचे गुपिते देखील मला सांगू शकता आणि मी वचन देतो की मी ती कोणालाही सांगणार नाही.
मित्रांनो,
जीवनात हास्य आणि विनोद कायम चालू राहिले पाहिजे. आनंदी राहा आणि निरोगी राहा. मला तुम्हा सर्वांवर पूर्ण विश्वास आहे. लक्षात ठेवा, सिंधिया विद्यालय ही केवळ एक संस्था नाही तर ती एक परंपरा आहे. स्वातंत्र्यापूर्वीच नव्हे तर स्वातंत्र्यानंतरही महाराजा माधोरावांचे संकल्प सिंधिया विद्यालयाने पुढे नेले आहेत. आता, त्याचा ध्वज तुमच्या हातात आहे. थोड्या वेळापूर्वी सन्मानित करण्यात आलेल्या तरुणांचे मी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा, सिंधिया विद्यालय आणि सर्व तरुण मित्रांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
सर्वांचे आभार. नमस्कार!
***
जयदेवी पुजारी स्वामी/आशिष सांगळे/शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2203503)
अभ्यागत कक्ष : 26
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam