पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कॉप-28 मध्ये ‘हरित क्रेडिट्स कार्यक्रमा’तील उच्चस्तरीय कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

प्रविष्टि तिथि: 01 DEC 2023 10:22PM by PIB Mumbai

 

महोदय,

महामहीम,

या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे स्वागत.

माझे बंधू आणि संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) राष्ट्रपती माननीय शेख मोहम्मद बिन झायेद यांनी दिलेल्या पाठींब्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो.

इतके व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांचे येथे येऊन आपल्यासोबत काही क्षण व्यतीत करणे, आणि आपल्याला त्यांचा पाठींबा मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे.

युएईसह या कार्याक्रमचे सह-आयोजन करणे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे.

स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांच्याप्रती देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो.

मित्रांनो,

मला नेहमीच असे वाटत आले आहे की कार्बन क्रेडिट्सचा परीघ मर्यादित आहे आणि या तत्वज्ञानावर एका अर्थी व्यावसायिक घटकाचा मोठा प्रभाव आहे. कार्बन क्रेडिट्सच्या प्रणालीत मला नेहमीच सामाजिक जबाबदारीचा अभाव दिसून आला आहे. आपल्याला समग्र पद्धतीने नव्या तत्वज्ञानावर भर द्यायला हवा आणि हाच हरित क्रेडिट्सचा पाया आहे.

सामान्यतः, मानवी जीवनात आपण तीन प्रकारच्या गोष्टींचा अनुभव घेतो. अगदी आपल्या नैसर्गिक संवादांच्या बाबतीत, जेव्हा आपण लोकांना भेटतो तेव्हा आपल्या स्वभावातील या तीन बाबी चटकन समोर येतात.

पहिली बाब आहे स्वभाव म्हणजेच आपली प्रवृत्ती अथवा कल

दुसरी आहे विकृती किंवा ज्याला आपण अपलाप किंवा विपर्यास म्हणतो,

आणि तिसरी बाब आहे संस्कृती

एक नैसर्गिक प्रवृत्ती अशी असते, एक नैसर्गिक कल, स्वभाव असतो जो म्हणतो की मी पर्यावरणाची हानी करणार नाही. ही आहे त्याची प्रवृत्ती.

तसेच, एक विकृत मनोवृत्ती असते, जेथे त्या व्यक्तीला असा विश्वास असतो की, जगावर होणारे परिणाम किंवा भविष्यातील पिढ्यांच्या कल्याणाची पर्वा न करता, कितीही मोठे नुकसान झालेले असले तरीही वैयक्तिक फायद्याचाच विचार प्रामुख्याने झाला पाहिजे. ही एक विकृत मानसिकता आहे.

आणि,

अशी ही संस्कृती आहे, मूल्ये आहेत जे पर्यावरणाच्या समृद्धतेत स्वतःची समृद्धी पाहतात.

अशा माणसाला वाटते की मी जर पृथ्वीचे भले केले तर त्याचा त्याला देखील फायदा होईल.

आपण विकृती सोडून देऊया आणि पर्यावरणाच्या समृद्धतेसह आपल्या समृद्धीची संस्कृती विकसित करूया, असे केले तरच आपला निसर्ग म्हणजेच पर्यावरण सुरक्षित राहील.

आपण ज्या पद्धतीने आपल्या जीवनात आरोग्य पुस्तिकेला महत्त्व देतो, आपले आरोग्य पुस्तिका म्हणजे काय, तर आपल्या आरोग्याचा अहवाल कसा आहे हे आपण नियमितपणे तपासत राहतो, त्या बाबतीत आपण सजग असतो. आपण या पुस्तिकेमध्ये सकारात्मक बाबींची भर घालण्याचा प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने आपण पर्यावरणाचा देखील विचार करण्याची सुरुवात केली पाहिजे.

पृथ्वीच्या आरोग्य पुस्तिकेत सकारात्मक बाबींची भर घालण्यासाठी काय करता येईल हे आपल्याला बघावे लागेल.

आणि माझ्या मते हेच हरित क्रेडीट आहे. आणि हीच माझी हरित क्रेडीट विषयीची संकल्पना आहे.

पृथ्वीच्या आरोग्य पुस्तिकेत हरित क्रेडीटची भर कशा पद्धतीने घालता येईल याचा विचार आपल्याला आपली धोरणे आणि आपल्या निर्णयांमध्ये समाविष्ट करायला हवा.

याचे एक उदाहरण म्हणजे निकृष्ट पडीक जमीन.

जर आपण हरित क्रेडिटची संकल्पना अनुसरायची ठरवली तर प्रथम निकृष्ट पडीक जमिनीची यादी केली जाईल.

त्यानंतर, एखादी व्यक्ती अथवा संस्था स्वयंस्फूर्तपणे वृक्षारोपणासाठी त्या जागेचा वापर करेल.

आणि त्यानंतर, या सकारात्मक कृतीसाठी त्या व्यक्तीला अथवा संस्थेला हरित क्रेडीट दिले जाईल. ही हरित क्रेडिट्स भविष्यातील विस्तारासाठी सहाय्यक ठरतील तसेच ती देवाणघेवाणीयोग्य देखील असतील. हरित क्रेडीटची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरुपाची असेल, मग ती नोंदणी असो, वृक्षारोपणाची पडताळणी असो, अथवा हरित क्रेडिट्स जारी करणे असो, या सगळ्या प्रक्रिया डिजिटल असतील.

आणि हे केवळ एक छोटेसे उदाहरण मी तुम्हाला दिले. आपल्याला अशा असंख्य संकल्पनांवर एकत्र येऊन काम करायचे आहे.

आणि म्हणूनच आज आम्ही जागतिक मंचाची देखील स्थापना करत आहोत.

वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षण यांच्याशी संबंधित संकल्पना, अनुभव तसेच नवोन्मेष यांना हे पोर्टल एकाच जागी एकत्र करेल.

आणि हा माहितीचा कोष धोरणे, पद्धती तसेच जागतिक पातळीवर हरित क्रेडिट्ससाठीची जागतिक मागणी यांना आकार देण्यासाठी उपयुक्त ठरेल.

मित्रांनो,

आपल्याकडे असे म्हटले जाते की, "प्रकृति: रक्षति रक्षिता”, याचा अर्थ असा की जो निसर्गाचे रक्षण करेल त्याचे निसर्ग रक्षण करतो.

या व्यासपीठावरुन मी तुम्हा सर्वांना या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती करतो.

आपण एकत्र येऊन आपल्या या ग्रहासाठी, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिक हरित, अधिक स्वच्छ आणि अधिक चांगले भविष्य उभारुया.

येथे येऊन आपल्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ काढल्याबद्दल मी मोझांबिकच्या राष्ट्रपतींचे आभार मानतो.

आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो.

अस्वीकरण: पंतप्रधानांच्या भाषणाचे हे अंदाजे भाषांतर आहे. मूळ भाषण हिंदी भाषेत आहे. 

***

आशिष सांगळे / संजना चिटणीस/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2202990) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , हिन्दी , Manipuri , Telugu , Malayalam , English , Urdu , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil