रेल्वे मंत्रालय
रेल्वे तिकीट आरक्षण प्रणाली अधिक सुरक्षित; जानेवारी 2025 पासून 3.02 कोटी संशयास्पद आयडी बंद
96 लोकप्रिय, गर्दी असणाऱ्या गाड्यांपैकी 95% गाड्यांमध्ये खात्रीलायक तात्काळ तिकीट उपलब्धतेच्या प्रमाणात वाढ
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2025 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025
भारतीय रेल्वेने आपली तिकीट आरक्षण प्रणाली अधिक सुरक्षित आणि मजबूत करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. प्रवाशांना सुलभतेने तिकीट मिळावे आणि दलालांचा सुळसुळाट कमी व्हावा, यासाठी सायबर सुरक्षेचे अत्याधुनिक उपाय योजण्यात आले आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून, जानेवारी 2025 पासून आतापर्यंत तब्बल 3.02 कोटी संशयास्पद ‘यूजर आयडी’ निष्क्रिय करण्यात आले आहेत.
रेल्वेची आरक्षण प्रणाली आता औद्योगिक दर्जाची आणि अत्याधुनिक सायबर सुरक्षा नियंत्रणांनी सुसज्ज करण्यात आली आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी उचललेली प्रमुख पावले:
बनावट वापरकर्त्यांवर कारवाई: यूजर अकाऊंट्सची कसून फेरतपासणी आणि पडताळणी करण्यात आली आहे. परिणामी 3.02 कोटी संशयास्पद आयडी बंद करण्यात आले आहेत.
‘अँटी-बॉट’ तंत्रज्ञान: खऱ्या प्रवाशांना विनासायास तिकीट मिळावे आणि बनावट वापरकर्त्यांना रोखता यावे, यासाठी 'AKAMAI' सारखे ‘अँटी-बॉट’ उपाय अंमलात आणण्यात आले आहेत.
तात्काळ बुकिंगसाठी आधार ओटीपी: ऑनलाइन तात्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी टप्प्याटप्प्याने आधार-आधारित 'वन-टाइम पासवर्ड' (ओटीपी ) पडताळणी सुरू करण्यात आली आहे. 04.12.2025 पर्यंत ही सुविधा 322 गाड्यांसाठी सुरू झाली आहे. यामुळे यापैकी 65% गाड्यांमध्ये खात्रीलायक तात्काळ तिकीट मिळण्याचा कालावधी वाढला आहे.
आरक्षण खिडकीवरही नियम कडक: रेल्वे खिडकीवरून होणाऱ्या तात्काळ बुकिंगसाठीही आधार-आधारित ओटीपी पडताळणी सुरू करण्यात आली असून, 04.12.2025 पर्यंत ती 211 गाड्यांसाठी लागू झाली आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा: या सर्व उपाययोजनांमुळे तिकीट उपलब्धतेत मोठी सुधारणा झाली आहे. 96 लोकप्रिय गाड्यांपैकी सुमारे 95% गाड्यांमध्ये खात्रीलायक तात्काळ तिकीट मिळण्याचा वेळ वाढला आहे, त्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्याची शक्यता वाढली आहे. तसेच, संशयास्पदरीत्या बुक केलेल्या पीएनआर विरोधात राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202283)
आगंतुक पटल : 25