पंतप्रधान कार्यालय
ग्रीसमधील अथेन्स येथे भारतीय समुदायाला उद्देशून पंतप्रधानांचे भाषण
प्रविष्टि तिथि:
25 AUG 2023 11:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2023
नमस्कार, कालिस्पेरा (शुभ संध्या), सत श्री अकाल, जय गुरुदेव, बोला…'धन गुरुदेव'....
जेव्हा उत्सवाचे वातावरण असते, सणासुदीचा काळ असतो, तेव्हा व्यक्तीला आपल्या कुटुंबात रमण्याची इच्छा होते. मी देखील माझ्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आलो आहे. हा श्रावण महिना आहे, एक प्रकारे भगवान महादेवाचा महिना मानला जातो आणि याच पवित्र महिन्यात आपल्या देशाने एक नवा मैलाचा दगड गाठला आहे. चंद्राच्या अंधारलेल्या भागात (Dark Zone) म्हणजेच दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरणारा भारत हा जगातील पाहिला देश बनला आहे. भारताने चंद्रावर तिरंगा फडकवून, संपूर्ण जगाला भारताची क्षमता दाखवून दिली आहे. जगभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत. लोक शुभेच्छा पाठवत आहेत आणि माझी पक्की खात्री आहे की लोक तुमचेही अभिनंदन करत असतील, नाही का? तुम्हालाही खूप अभिनंदनाचे संदेश मिळत असतील, बरोबर ना ? प्रत्येक भारतीयाला ते मिळत आहेत. सर्व समाजमाध्यमे अभिनंदनाच्या संदेशांनी ओसंडून वाहत आहेत. जेव्हा यश इतके मोठे असते, तेव्हा त्या यशाचा उत्साह कायम राहतो. तुमचा चेहरा देखील मला सांगतोय की तुम्ही जगात कुठेही राहत असाल, पण तुमचे हृदय भारतासाठी आनंदाने धडधडतेय. तुमच्या हृदयात भारत धडधडतोय, तुमच्या हृदयात भारत धडधडतोय, तुमच्या हृदयात भारत धडधडतोय. आज मी ग्रीसमध्ये, अथेन्स इथे तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित आहे आणि मी पुन्हा एकदा चांद्रयानच्या या भव्य यशाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की आपल्या देशात चंद्राला "चंदा मामा" म्हटले जाते. काय म्हणतात? चंदा मामा! तुम्ही पाहिले असेल की काही लोक चांद्रयानाबद्दलची चित्रे सामायिक करत होते. त्या चित्रांमध्ये असे दर्शवले होते की आपल्या भारत मातेने आपला भाऊ चंद्राला राखी (पारंपरिक कंकण) म्हणून चांद्रयान पाठवले आहे आणि त्या राखीचा मान चंद्रानेही किती सुंदरपणे ठेवला आहे, किती आदर केला आहे. काही दिवसांतच राखीचा सणही येत आहे. मी तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या आगाऊ शुभेच्छा देखील देतो.
माझ्या कुटुंबियांनो,
मी जगभरातील अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे, पण ग्रीसमध्ये, अथेन्समध्ये येणे माझ्यासाठी खूप विशेष आहे. पहिले म्हणजे, अथेन्सचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. दुसरे म्हणजे, मी जगातील सर्वात जुन्या जिवंत शहरांपैकी (शतकानुशतके मानवी जीवन असलेल्या) एक असलेल्या काशीचा खासदार आहे. तिसरा एक पैलू आहे, जो फार कमी लोकांना माहीत असेल - माझा जन्म जिथे झाला, ते गुजरात राज्यातील वडनगर हे देखील अथेन्सप्रमाणेच एक चैतन्यशील कार्यप्रवण शहर आहे. तिथेही हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. त्यामुळे, अथेन्समध्ये येणे माझ्यासाठी एक अद्वितीय भावना आहे. आणि तुम्ही पाहिले आहे की ग्रीसच्या सरकारने मला ग्रीसच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे. या सन्मानाला तुम्हीही सर्वजण पात्र आहात; 1.4 अब्ज भारतीय या सन्मानाला पात्र आहात. मी हा सन्मान भारत मातेच्या सर्व सुपुत्रांना समर्पित करतो.
मित्रांनो,
आज मी ग्रीसच्या जनतेचे सांत्वन देखील करू इच्छितो. येथील जंगलांमध्ये वणवे पेटल्यांमुळे अतिशय मोठे आव्हान उभे राहिले. या दुःखद आपत्तीमुळे ग्रीसमधील अनेक लोक प्राणांस मुकले. संकटाच्या या क्षणी भारत ग्रीसच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे.
मित्रांनो,
ग्रीस आणि भारतामधील संबंध शतकानुशतके प्राचीन आहेत. या संबंधांची मुळे संस्कृती आणि नागरी जीवनामध्ये रुजलेली आहेत. ग्रीक इतिहासकारांनी भारतीय संस्कृतीचे विस्तृत वर्णन केले आहे. ग्रीक आणि मौर्य साम्राज्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. सम्राट अशोकानेही ग्रीससोबत बलाढ्य संबंध ठेवले होते. जगाच्या पाठीवर बहुतेक भागात जेव्हा लोकशाहीवर बोललेही जात नव्हते, तेव्हा आपल्या दोन्ही संस्कृतींमध्ये लोकशाही व्यवस्था अस्तित्वात होती. मग ते खगोलशास्त्र, गणित, कला किंवा व्यापार असो, आपल्या दोन्ही संस्कृतींनी एकमेकांकडून खूप काही शिकून घेतले आहे आणि एकमेकांना खूप काही शिकवले देखील आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
प्रत्येक नागरी जीवन पद्धती आणि संस्कृतीची, स्वतःची अशी एक विलक्षण ओळख असते. भारतीय संस्कृती जगाला जोडणारी असा तिचा लौकिक कायम आहे. आपल्या गुरुंनी या भावनेला सर्वाधिक बळ दिले आहे. गुरु नानक देवजी यांनी जगभर केलेला प्रवास, जो आपण "उदासी" (प्रवास) म्हणून ओळखतो, त्यांचा उद्देश काय होता? या प्रवासांचा उद्देश सर्वत्र माणुसकी जपणे, मानवाचे कल्याण करणे हा होता. गुरु नानक देवजींनी ग्रीसमधील विविध ठिकाणी प्रवास केला. गुरु नानक देवजींच्या शिकवणीचे सार "नानक नाम चड़दी कला, तेरे भाने सरबत दा भला" (तुझ्या कृपेने सर्वांचे कल्याण आणि भरभराट होवो) या उक्तीमध्ये सामावले आहे. सर्वांच्या कल्याणाची ही मनिषा तेव्हाही होती आणि याच मूल्यांसह भारत प्रगती करत आहे. कोरोना महासाथीच्या काळात भारताने औषधांची आपली पुरवठा साखळी कशी सुरुच ठेवली, ती खंडित होऊ दिली नाही, हे तुम्ही पाहिले आहे. "मेड इन इंडिया" (भारतात उत्पादीत) कोविड लसींनी जगभरातील लाखो लोकांचे जीव वाचवले. महासाथीच्या काळात आपल्या गुरुद्वारांनी लंगर (सामुदायिक भोजन) दिले, मंदिरांनी अन्न पुरवले आणि शीख युवक माणुसकीचे दीपस्तंभ बनले. एक राष्ट्र म्हणून, एक समाज म्हणून, या कृतीमधून आपल्या भारतीय मूल्यांचे सार ध्वनित होते.
मित्रांनो,
आज जग एका नवीन जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. भारताच्या वाढत्या क्षमतांसोबतच, जागतिक स्तरावर त्याची भूमिका देखील झपाट्याने विकसित होत आहे. मी दक्षिण आफ्रिकेमध्ये ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर, येथे आलो आहे. काही दिवसांतच भारतात जी-20 शिखर परिषद होणार आहे. जी-20 चे यजमान म्हणून भारताने निवडलेली संकल्पना, जागतिक बंधुत्वाच्या भावनेला मूर्त रूप देते. ही संकल्पना आहे- "वसुधैव कुटुंबकम्", "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य"....याचा अर्थ संपूर्ण जगाचे भविष्य सामायिक आणि परस्परांशी निगडीत आहे. म्हणूनच, आपले निर्णय आणि जबाबदाऱ्या देखील त्याच उद्दिष्टाशी जुळणाऱ्या आहेत.
मित्रांनो,
भारतीयांचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे, आपण जगात कुठेही राहतो, आपण दुधात साखरेप्रमाणे, पाण्यामध्ये साखरेप्रमाणे विरघळून जातो. तुम्ही ग्रीसमधील अर्थव्यवस्थेमध्ये, विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये, सुखसमृद्धी, आनंदाचा गोडवा निर्माण करत आहात. तुम्ही ग्रीसच्या विकासाला चालना देण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहात. त्याचप्रमाणे, भारतात, तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी भारताला जगातील नंबर एकचा दूध उत्पादक बनवले आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी जागतिक स्तरावर तांदूळ, गहू, ऊस, फळे आणि भाज्यांच्या उत्पादनात दुसरे स्थान मिळवले आहे. आज भारत अशा स्तरावर अशा दर्जाचे काम करत आहे, ज्याची 10-15 वर्षांपूर्वी कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. भारत हा असा देश आहे जो स्मार्टफोन डेटाचा जगातील क्रमांक एकचा ग्राहक आहे, भारत हा असा देश आहे जो इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश आहे, भारत हा जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची नवउद्योग परिसंस्था (स्टार्ट-अप इकोसिस्टम) असलेला देश आहे, भारत हा वाहन उद्योगाची जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेला देश आहे, आणि भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक बाजारपेठ असलेला देश आहे.
मित्रांनो,
आज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(आयएमएफ-इंटरनॅशनल मॉनिटरी फंड) आणि जागतिक बँक (World Bank) यांसारख्या संस्था, भारताच्या बलवान अर्थव्यवस्थेची प्रशंसा करताना थकत नाहीत. जगभरातील मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि अनेक बडे विद्वान अर्थतज्ञ अंदाज वर्तवत आहे की, आगामी वर्षांमध्ये भारत जागतिक स्तरावर पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल.
मित्रांनो,
जेव्हा अर्थव्यवस्था वेगाने वाढते, तेव्हा देश त्वरीत गरिबीच्या चक्रातून मुक्त होतो. भारतात फक्त पाच वर्षांत 13.5 कोटींहून अधिक नागरिक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत. भारताची अर्थव्यवस्था वाढत असल्याने, प्रत्येक भारतीय आणि प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढत आहे. त्यामुळे लोकांची कमाई वाढत आहे आणि ते अधिक गुंतवणूक करत आहेत…..खर्च करत आहेत. एका दशकापूर्वी भारतीयांनी म्युच्युअल फंडांमध्ये सुमारे आठ लाख कोटी रुपये गुंतवले होते. आज म्युच्युअल फंडांमध्ये भारतीयांची गुंतवणूक सुमारे 40 लाख कोटी रुपये इतकी आहे. हा बदल घडला आहे कारण प्रत्येक भारतीयामध्ये आत्मविश्वास भरलेला आहे आणि भारत एक राष्ट्र म्हणून आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे.
मित्रांनो,
आजचा भारत त्याच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषासह जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. 2014 पासून, भारताने 25 लाख किलोमीटर लांबीचे ऑप्टिकल फायबरचे जाळे अंथरले आहे, हा आकडा थोडा मोठा वाटेल. 25 लाख किलोमीटरचे ऑप्टिकल फायबरचे जाळे अंथरले गेले आहे आणि हे 25 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर म्हणजे पृथ्वी आणि चंद्रामधील अंतरापेक्षा 6 पट जास्त आहे. जगातील भारत हा असा देश आहे, ज्याने विक्रमी वेळेत 700 हून अधिक जिल्ह्यांमध्ये 5G सेवा पोहोचवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आणि हे 5G तंत्रज्ञान उधार घेतलेले किंवा आयात केलेले नाही, तर ते पूर्णपणे "मेड इन इंडिया" (भारत निर्मित) आहे. संपूर्ण भारतातील प्रत्येक गावात आणि गल्लीत डिजिटल व्यवहार सामान्य झाले आहेत. अमृतसर ते ऐझाॅलपर्यंत, अगदी दहा रुपयांची छोटी खरेदी देखील डिजिटल पेमेंटद्वारे सहज करता येते. जर तुम्ही नुकताच भारतात प्रवास केला असेल, तर तुम्ही याचा अनुभव घेतला असेल. घेतला आहे ना? असे होते ना? खिशात रोख पैशाची गरज नाही कारण व्यवहार करण्यासाठी मोबाईल फोन पुरेसा आहे.
मित्रांनो,
आज भारत ज्या गतीने आणि प्रमाणात प्रगती करत आहे, ते पाहून तुमच्यासह प्रत्येक भारतीयाचे हृदय पुलकीत होईल. तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की, आज जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतात आहे. जगातील सर्वात उंच चारचाकी वाहन चालवण्यायोग्य रस्ता देखील भारतात आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आज भारतात आहे. जगातील सर्वात उंच पुतळा देखील भारतात आहे. जगातील सर्वात मोठे सौर पवन उद्यान भारतात निर्माणाधीन आहे. सध्या चर्चेचा विषय असलेल्या चंद्राबद्दल बोलायचं तर, मी तुम्हाला चंद्राशी संबंधित आणखी एक उदाहरण देतो. गेल्या 9 वर्षांत, भारताने आपल्या खेडोपाडी इतके रस्ते बांधले आहेत…. आणि मी फक्त खेड्यांमधील रस्त्यांबद्दल बोलत आहे….. की, ते सर्व रस्ते एकत्र जोडले तर त्यांचे अंतर पृथ्वी आणि चंद्राच्या मधील अंतराइतके होईल.. इतके ग्रामीण रस्ते 9 वर्षांत बांधले गेले आहेत. गेल्या 9 वर्षांत भारताने टाकलेल्या रेल्वे मार्गांची लांबी 25 हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. जेव्हा मी 25 हजार किलोमीटर म्हणतो, तेव्हा तो फक्त एक आकडा वाटू शकतो. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की भारताने गेल्या 9 वर्षांत इटली, दक्षिण आफ्रिका, युक्रेन, पोलंड आणि ब्रिटन सारख्या देशांच्या एकत्रित रेल्वे जाळ्यापेक्षा जास्त रेल्वे मार्ग टाकले आहेत. आज भारत आपल्या पायाभूत सुविधांमध्ये ज्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे, ते अभूतपूर्व आहे.
मित्रांनो,
आज, भारत जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान (संशोधन) या मंत्रासह आगेकूच करत आहे, प्रत्येक क्षेत्र मजबूत करत आहे. येथे ग्रीसमध्ये, आमचे अनेक मित्र पंजाबमधून आले आहेत आणि त्यापैकी बहुतेक शेती आणि संबंधित कामे करत आहेत. भारतात, आम्ही शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये शेतीच्या खर्चासाठी सरकार त्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे थेट हस्तांतरित करते. पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत, 2.5 लाख कोटींहून अधिक रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच, मी लाल किल्ल्यावरून एक घोषणा केली होती, आणि मी त्यावर पुन्हा येथे भर देऊ इच्छितो की, भारत आपल्या खेड्यांमधील भगिनींना ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षित करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू करत आहे. कल्पना करा की आमच्या खेड्यांमधील मुली ड्रोन पायलट बनतील आणि आधुनिक शेतीला मदत करतील. ड्रोनच्या मदतीने, त्या शेतांमध्ये कीटकनाशके (Pesticides) फवारण्यास आणि आवश्यक वस्तुंचा पुरवठा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करण्यास सक्षम असतील.
मित्रांनो,
भारतात, आम्ही शेतकऱ्यांना 20 कोटींहून अधिक मृदा आरोग्य पत्रिका (सॉइल हेल्थ कार्ड) प्रदान केल्या आहेत. आता त्यांना त्यांच्या शेताला कोणत्या प्रकारच्या खतांची, किती प्रमाणात गरज आहे आणि त्यांच्या जमिनीसाठी कोणती पिके योग्य आहेत हे माहीत आहे. यामुळे, ते आता मर्यादित जागेतही अधिक उत्पादन घेत आहेत. आपले शेतकरी बांधव आणि भगिनी देखील भारतात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक शेतीकडे वळत आहेत. सरकारने आणखी एक योजना सुरू केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. ही आहे "एक जिल्हा, एक उत्पादन" (One District, One Product) योजना. तुम्हाला माहीत आहे की, प्रत्येक जिल्ह्याचे स्वतःचे एक वैशिष्ट्य असते. उदाहरणार्थ, कर्नाटकमधील कोडगू कॉफीसाठी प्रसिद्ध आहे, तर अमृतसर लोणचे आणि मुरंब्यांसाठी, भिलवाडा मक्याच्या उत्पादनांसाठी, फतेहगड साहिब, होशियारपूर आणि गुरुदासपूर गुळासाठी, निजामाबाद हळदीसाठी ओळखले जाते. प्रत्येक जिल्ह्यातील एका खास उत्पादनावर लक्ष केंद्रित करून, आम्ही त्याची निर्यात वाढवत आहोत. हा आजचा भारत आहे, जो नवीन उद्दिष्टांसाठी नवीन पद्धतींनी काम करत आहे.
मित्रांनो,
ग्रीस या ठिकाणीच ऑलिम्पिकची सुरुवात झाली. भारतातील तरुणांमध्येही खेळांबद्दलची आवड सतत वाढत आहे. भारतातील आमची लहान शहरे आणि गावांमधील खेळाडू ऑलिम्पिकपासून ते विद्यापीठ क्रीडा स्पर्धां पर्यंतच्या क्रीडा उत्सवांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले, तेव्हा प्रत्येकाला अभिमान वाटला. काही दिवसांपूर्वी, भारतीय तरुणांनी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी केली. या स्पर्धेच्या इतिहासात, सुरुवातीपासून आतापर्यंत भारताने जिंकलेल्या एकूण पदकांपेक्षा जास्त पदके, यावेळी आणली आहेत.
मित्रांनो,
ग्रीसमध्ये त्यांची संस्कृती आणि प्राचीन वारसा कसा जपला जातो, हे तुम्ही पाहत आहात. आजचा भारत देखील आपल्या वारशाचा उत्सव विकासाशी जोडून साजरा करत आहे. जगातील सर्वात मोठे संग्रहालय, 'युगे युगीन भारत', दिल्लीत बांधले जात आहे. तुम्ही नीट ऐकले ना? अलीकडेच, मला मध्य प्रदेशातील सागर येथे संत रविदास स्मारकाच्या भूमीपूजन समारंभात सहभागी होण्याची संधी मिळाली. संत रविदास यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत, हा परिसर 50,000 हून अधिक गावांमधून गोळा केलेली माती आणि 300 हून अधिक नद्यांमधून मिळालेल्या चिकणमातीने बांधला जात आहे. या मोहिमेची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना करा. संत रविदास यांचा जन्म काशीत झाला होता. काशीतील त्यांच्या जन्मस्थानावरील विविध सुविधांच्या विस्ताराचे साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. गेल्या नऊ वर्षांमध्ये, आम्ही आमच्या गुरुंच्या पवित्र स्थळांना जोडणाऱ्या सुविधा सुधारण्यासाठीही खूप मेहनत घेतली आहे. एक काळ असा होता की लोक दूरून कर्तारपूर साहिबला दुर्बिणीतून पाहत असत. आमच्या सरकारने कर्तारपूर साहिबचा प्रवास सोपा केला आहे. गुरु नानक देवजींच्या 550 व्या प्रकाशपर्वाच्या, गुरु तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाशपर्वाच्या आणि गुरु गोविंद सिंहजींच्या 350 व्या प्रकाशपर्वाच्या निमित्ताने, आमच्या सरकारने या शुभ प्रसंगांना जागतिक स्तरावर साजरे करण्यासाठी मनःपूर्वक काम केले. आम्ही आता साहेबजाद्यांच्या (गुरु गोविंदसिंगजी यांचे 4 पुत्र) स्मरणार्थ दरवर्षी 26 डिसेंबर रोजी भारतात 'वीर बाल दिवस' पाळतो.
मित्रांनो,
भारतात प्रत्यक्ष, डिजिटल आणि सांस्कृतिक अशा संपर्काच्या सर्व स्तरांवर 'अमृत काल' सुरू झाला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, जसे जगभरातील लोक, ज्यात भारतीयही समाविष्ट आहेत, ग्रीसचा वारसा पाहण्यासाठी येतात, त्याचप्रमाणे युरोपमधील, विशेषतः ग्रीसमधील लोकही भारतात अधिकाधिक येतील. तुम्ही तुमच्या जीवन काळात ते दिवसही पाहाल. पण मी तुम्हाला इथे भारताविषयी जे सांगितले आहे, त्याचप्रमाणे तुम्हीही भारताची कहाणी तुमच्या ग्रीक मित्रांना सांगणे आवश्यक आहे. सांगाल ना? विसरणार तर नाही ना? ही देखील भारत मातेची एक महत्त्वपूर्ण सेवा आहे.
मित्रांनो,
तुमच्या ग्रीक मित्रांसाठी ऐतिहासिक स्थळांव्यतिरिक्त भारतात अजून खूप काही बघण्यासारखे आहे. येथील लोक वन्यजीवन प्रेमी आणि पर्यावरण जपण्यासाठी प्रयत्नशील आहेत. क्षेत्रफळानुसार बघायचे, तर जगातील भू क्षेत्राच्या 2.5% पेक्षा कमी भूभाग असूनही, भारतात जगातील 8% पेक्षा जास्त जैवविविधता आहे. भारतात जगातील 75% पेक्षा जास्त वाघांचा निवास आहे. सर्वाधिक वाघ, आशियाई हत्ती आणि एकशिंगी गेंडे भारतात आढळतात. आशियाई सिंह आढळणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. आज, भारतात 100 हून अधिक, समुदाय संचालित अभयारण्ये (Community Reserves) आणि 400 हून अधिक राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये आहेत.
माझ्या कुटुंबियांनो,
आजचा भारत ,भारत मातेच्या कोणत्याही लेकराला कधीही एकटे सोडत नाही. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात एखादा भारतीय कठीण परिस्थितीत सापडला, तरी भारत त्याची साथ सोडत नाही, त्याला कधीच एकटे पडू देत नाही. आणि म्हणूनच मी म्हणतो की, तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्य आहात. तुम्ही पाहिले आहे की, जेव्हा युक्रेनमध्ये संघर्ष झाला, तेव्हा आम्ही आमच्या हजारो मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले. जेव्हा अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार पसरला, तेव्हा भारताने आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणले, ज्यात मोठ्या संख्येने आमच्या शीख बंधू-भगिनींचा समावेश होता. एवढेच नाही, तर आम्ही गुरु ग्रंथ साहिबचे 'स्वरूप' (धर्मग्रंथ) देखील अत्यंत आदराने अफगाणिस्तानातून भारतात आणले. जगभर पसरलेली भारतीय मिशन्स ( परदेशातील दुतावास, उच्चायुक्तालये,कॉन्सुलेट्स ) आता केवळ सरकारी कार्यालये राहिलेली नाहीत, तर ती तुमच्या स्वतःच्या घराचाच एक भाग बनत आहेत. येथे ग्रीसमध्येही, भारतीय मिशन तुमच्या सेवेसाठी चोवीस तास समर्पित आहे. भारत आणि ग्रीसचे बंध अधिक मजबूत होत असताना, एकमेकांच्या देशांना भेट देणे आणि व्यवसाय-व्यापार करणे अधिक सोपे आणि सोयीचे होईल. आपण सर्वांनी आपल्या दोन्ही राष्ट्रांमधील संबंध मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.
मित्रांनो,
तुम्ही येथे एवढ्या मोठ्या संख्येने असणे, प्रत्येक भारतीयाच्या मनाला अपार समाधान देते. मी पुन्हा एकदा येथील सर्व कष्टाळू सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि चला, आपण सर्वजण पूर्ण शक्तीने आणि दोन्ही हात वर करून म्हणूया, "भारत मातेचा – विजय असो," तो आवाज थेट भारतापर्यंत पोहोचला पाहिजे – भारत मातेचा विजय असो, भारत मातेचा विजय असो,, भारत मातेचा विजय असो….. वंदे मातरम्, वंदे मातरम्, वंदे मातरम्, वंदे मातरम्, वंदे मातरम्. तुमचे खूप खूप आभार.
* * *
आशिष सांगळे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202205)
आगंतुक पटल : 34
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam