पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत-ग्रीस संयुक्त निवेदन

प्रविष्टि तिथि: 25 AUG 2023 11:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2023

 

पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी हेलेनिक येथे अधिकृत भेट दिली.

भारत आणि ग्रीस या दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक संबंध असल्याचे पंतप्रधान मित्सोटाकिस आणि पंतप्रधान मोदी यांनी मान्य केले, आणि जागतिक व्यवस्थेत अभूतपूर्व बदल होत असताना, आपले द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन आवश्यक आहे, यावर सहमती दर्शवली.

दोन्ही नेत्यांनी सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण वातावरणात उच्चस्तरीय चर्चा केली. त्यांनी दोन्ही बाजूंमधील सध्याच्या सहकार्याची नोंद घेतली आणि परस्पर हिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली.

दीर्घकालीन सागरी दृष्टिकोन असलेल्या दोन प्राचीन सागरी प्रवासी राष्ट्रांचे नेते म्हणून, त्यांनी सागरी कायद्यानुसार, विशेषतः UNCLOS च्या तरतुदींचे पालन करणे, आंतरराष्ट्रीय शांतता, स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि जलवाहतूक स्वातंत्र्याचा पूर्ण आदर ठेवणे, यासह मुक्त, खुल्या आणि नियमाधारित भूमध्य सागर आणि हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रावरील त्यांचा दृष्टीकोन सामायिक केला.

युरोपियन युनियन आणि भारताकडे जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि मुक्त बाजारपेठ आहे, असे दोन्ही नेत्यांनी नमूद केले, आणि युरोपियन युनियन-भारत संबंध अधिक दृढ करणे परस्पर फायदेशीर ठरेल आणि त्याचा सकारात्मक प्रादेशिक आणि जागतिक परिणाम दिसून येईल यावर त्यांनी सहमती दर्शवली. ग्रीस आणि भारत या दोन्ही देशांनी आपापल्या प्रदेशात आव्हाने असूनही असाधारण आर्थिक लवचिकता दर्शविली आहे, आणि देशांतर्गत आर्थिक विकास पुनर्संचयित केला आहे याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या भारत-युरोपियन यूनियन व्यापार आणि गुंतवणुक विषयक वाटाघाटींना आणि भारत-युरोपियन यूनियन दळणवळण भागीदारीच्या जलद  अंमलबजावणीला आपला भक्कम पाठिंबा दर्शवला.

दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या नागरिकांमधील दीर्घकालीन जिव्हाळ्याच्या आणि घनिष्ट संबंधांच्या पायावर आधारित, ग्रीक-भारत द्विपक्षीय संबंध "धोरणात्मक भागीदारी"च्या स्तरावर पुढे नेण्याला मान्यता दिली, आणि राजकीय, सुरक्षा आणि आर्थिक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य आणखी विस्तारण्यासाठी काम करण्यावर सहमती दर्शवली. दोन्ही देशांच्या नागरिकांमधीलसंबंध अधिक दृढ करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णयही दोन्ही पंतप्रधानांनी घेतला. अलिकडच्या वर्षांत द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक गुंतवणूकीत वाढ झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून, दोन्ही देशांनी 2030 साला पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यासाठी काम करण्याचा निर्धार केला.

संरक्षण, नौवहन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायबर स्पेस, शिक्षण, संस्कृती, पर्यटन आणि कृषी या क्षेत्रात द्विपक्षीय संबंध अधिक व्यापक आणि सखोल करण्याच्या गरजेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला. परस्पर फायद्यासाठी क्षेत्रीय सहकार्य सुलभ करण्यासाठी कृषी क्षेत्रातील  हेलेनिक-भारत संयुक्त उपसमितीच्या स्थापनेसह, कृषी क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची त्यांनी नोंद घेतली. राजकीय, आर्थिक, संरक्षण, सुरक्षा आणि सार्वजनिक मुत्सद्देगिरीसह इतर क्षेत्रांमध्ये नियमित संवाद सुनिश्चित करण्याचे निर्देश दोन्ही नेत्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. ग्रीस आणि भारता दरम्यान थेट विमानसेवा सुरू करायला प्रोत्साहन देण्यावरही त्यांनी सहमती दर्शवली.

भारत आणि ग्रीस दरम्यान दीर्घ काळापासून सुरु असलेले सांस्कृतिक आदान-प्रदान लक्षात घेऊन, दोन्ही नेत्यांनी सर्व प्रकारच्या कलांच्या देवाणघेवाणीला चालना देण्याच्या प्रयत्नांचे स्वागत केले. प्राचीन स्थळांचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याबरोबरच युनेस्को (UNESCO) मधील सहकार्य बळकट करण्यावरही त्यांनी सहमती दर्शवली.

गतिशीलता आणि स्थलांतर भागीदारी कराराला (एमएमपीए) लवकरात लवकर अंतिम रूप देणे परस्परांसाठी फायदेशीर ठरेल, आणि यामुळे विशेषत: दोन्ही देशांमधील कामगारांची मुक्त ये-जा सुलभ होईल, यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

दोन्ही नेत्यांनी केव्हाही, कुठेही आणि कोणाकडूनही होणाऱ्या सर्व प्रकारच्या दहशतवादाचा, तसेच  सीमापार दहशतवादासाठी केल्या जाणाऱ्या छुप्या कारवायांचा तीव्र निषेध केला.

पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये ग्रीसचे स्वागत केले आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडीमध्ये (सीडीआरआय) ग्रीसच्या सदस्यत्वासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

भारताच्या G20 मंचाच्या अध्यक्षपदाचे स्वागत करून, G20, भारताच्या नेतृत्वाखाली आपली उद्दिष्टे यशस्वीपणे पुढे नेईल, असा विश्वास पंतप्रधान मित्सोटाकिस यांनी व्यक्त केला.

ग्रीस सरकार आणि ग्रीसच्या जनतेने केलेल्या आदरातिथ्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मित्सोटाकिस यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मित्सोटाकिस यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले.

 

* * *

आशिष सांगळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2202103) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam