पंतप्रधान कार्यालय
जर्मनीचे चान्सलर स्कोल्झ यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना केलेले निवेदन.
Posted On:
25 FEB 2023 2:24PM by PIB Mumbai
महामहिम, चान्सलर स्कोल्झ
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यमांतील सहकारी,
गुटन टाग!
नमस्कार!
मी माझे मित्र चान्सलर स्कोल्झ आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करतो. चान्सलर स्कोल्झ अनेक वर्षांनी भारत दौऱ्यावर आले आहेत. 2012 मध्ये त्यांनी हॅम्बर्ग शहराचे महापौर म्हणून भारताला भेट दिली होती. आणि ती हॅम्बर्गच्या कोणत्याही महापौराची पहिलीच भारत भेट होती. यावरून हे स्पष्ट होते की त्यांनी भारतीय-जर्मन संबंधांची क्षमता खूप आधीपासूनच जाणली होती.
गेल्या वर्षी आमच्या तीन बैठका झाल्या. प्रत्येक वेळी, त्यांच्या दूरदृष्टी आणि कल्पकतेमुळे आमच्या द्विपक्षीय संबंधांना एक नवीन गती आणि ऊर्जा मिळाली. आजच्या बैठकीत देखील आम्ही सर्व महत्त्वाच्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा केली.
मित्रांनो,
भारत आणि जर्मनीमधील मजबूत संबंध हे सामायिक लोकशाही मूल्यांवर आणि परस्पर हितसंबंधांच्या सखोल आकलनावर आधारित आहेत. दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाणीचा दीर्घ इतिहास आहे. जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही अर्थव्यवस्थांमधील वाढते सहकार्य दोन्ही देशांच्या लोकांसाठी फायदेशीर आहेच, शिवाय आजच्या तणावग्रस्त जगात सकारात्मक संदेश देखील देतो.
युरोपमधील आमचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असण्यासोबतच, जर्मनी भारतात गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा स्रोत देखील आहे. आज, 'मेक इन इंडिया आणि 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेमुळे, भारतातील सर्व क्षेत्रांमध्ये नवीन संधी खुल्या होत आहेत. या संधींबद्दल जर्मनीने दाखवलेला रस आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक आहे.
आज चान्सलर स्कोल्झ यांच्यासोबत आलेल्या व्यावसायिक प्रतिनिधी मंडळाची भारतीय उद्योगपतींबरोबर फलदायी बैठक झाली. या बैठकीत काही चांगले आणि महत्त्वाचे करार देखील करण्यात आले. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, फिनटेक, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि पुरवठा साखळींचे विविधीकरण यासारख्या विषयांवर आम्हाला दोन्ही देशांच्या उद्योग नेत्यांकडून उपयुक्त विचार आणि सूचना मिळाल्या.
मित्रांनो,
भारत आणि जर्मनी तिसऱ्या देशांच्या विकासासाठी त्रिकोणी विकास सहकाराच्या अंतर्गत परस्पर सहकार्य वाढवत आहेत. गेल्या काही वर्षांत, आमच्यातील जनतेच्या परस्पर संबंधांना अधिक बळकटी मिळाली आहे आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारामुळे हे संबंध आणखी दृढ होतील.
बदलत्या काळाच्या गरजांनुसार, आम्ही आमच्या संबंधांमध्ये नवीन आणि आधुनिक पैलू देखील जोडत आहोत. गेल्या वर्षी माझ्या जर्मनी भेटीदरम्यान, आम्ही हरित आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची घोषणा केली होती. आम्ही नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि जैव-इंधन यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रांनो,
सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य हे आमच्या धोरणात्मक भागीदारीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनू शकते. या क्षेत्रातील आमच्या अद्याप न वापरलेल्या संधींचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करत राहू. दहशतवाद आणि फुटीरतावादाविरुद्धच्या लढाईत, भारत आणि जर्मनीमध्ये सक्रिय सहकार्य आहे. सीमापार दहशतवाद संपवण्यासाठी एकत्रित कृती आवश्यक आहे यावर दोन्ही देश सहमत आहेत.
मित्रांनो,
कोविड महामारी आणि युक्रेन संघर्षाचे परिणाम संपूर्ण जगात जाणवले आहेत. या घटनांचा विकसनशील देशांवर विशेषतः नकारात्मक परिणाम झाला आहे. आम्ही याबद्दल आमची सामायिक चिंता व्यक्त केली आहे. या समस्या केवळ संयुक्त प्रयत्नांनीच सोडवता येतील, यावर आम्ही सहमत आहोत. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळातही, आम्ही यावर विशेष भर देत आहोत.
युक्रेनमधील घडामोडींच्या सुरुवातीपासून, भारताने संवाद आणि राजनैतिक कुटनीतिद्वारे हा वाद सोडवण्याचे आवाहन केले होते. भारत कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्यास तत्पर आहे. जागतिक वास्तवांना चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करण्यासाठी बहुपक्षीय संस्थांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे यावरही आम्ही सहमत आहोत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्यासाठी जी-4 मधील आमच्या सक्रिय सहभागातून हे स्पष्ट होते.
महामहिम,
सर्व देशवासीयांच्या वतीने, मी पुन्हा एकदा तुमचे आणि तुमच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात स्वागत करतो. या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी आम्हाला पुन्हा एकदा तुमचे स्वागत करण्याची संधी मिळेल. तुमच्या भारत भेटीबद्दल आणि आजच्या आपल्या उपयुक्त चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद.
अस्वीकरण - हे पंतप्रधानांच्या भाषणाचे अंदाजे भाषांतर आहे. मूळ भाषण हिंदीमध्ये होते.
***
NitinFulluke/ShraddhaMukhedkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2201329)
अभ्यागत कक्ष : 34
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam