आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेच्या आरंभापूर्वी उलट्या गणतीला सुरुवात

प्रविष्टि तिथि: 08 DEC 2025 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025

येत्या 17 ते 19 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे जागतिक आरोग्य संघटनेची, दुसरी जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषद होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने ही परिषद आयोजित केली जाईल. या पार्श्वभूमीर आयुष मंत्रालयाने आज राष्ट्रीय माध्यम केंद्रात या परिषदेची रुपरेषा मांडणाऱ्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. 

आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 2023 मध्ये गुजरातमध्ये पहिली परिषद यशस्वी झाली होती, आता त्यानंतर, आता भारत या दुसऱ्या जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे याबद्दल त्यांनी अभिमान वाटत असल्याचे सांगितले. ही परिषद म्हणजे 'सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः' या भारताच्या संकल्पनेशी सुसंगत राहात, मानवतेच्या आरोग्य, आनंद आणि कल्याणासाठी पारंपरिक औषध व्यवस्थेला जागतिक पातळीवर मुख्य प्रवाहात आणण्याच्या सामूहिक प्रयत्नांमधील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.

संतुलाची पुनःर्स्थापना : आरोग्य आणि कल्याण विषयक विज्ञान आणि कार्यसराव (Restoring balance: The science and practice of health and well-being) अशी या वर्षीच्या परिषदेची संकल्पना असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात जगभरातील मंत्री, धोरणकर्ते, जागतिक आरोग्य क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे, संशोधक, तज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि वैद्यकीय व्यावसायिक तज्ञ एकत्र येणार आहेत. तसेच, 100 पेक्षा जास्त देश या परिषदेत सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या परिषदेच्या पार्श्वभूमीवर समांतरपणे आयुष मंत्रालयाच्या वतीने, अश्वगंधा या भारताच्या सर्वाधिक प्रसिद्ध आणि वैज्ञानिक पातळीवर अभ्यासल्या गेलेल्या औषधी वनस्पतीवर एक समर्पित कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. पारंपरिक आणि समकालीन आरोग्य विषयक कार्यपद्धतींमधील या वनस्पतीचे महत्त्व या कार्यक्रमात अधोरेखित केले जाईल असे त्यांनी सांगितले.

भारत पारंपरिक औषधांच्या जागतिक क्षेत्राचे नेतृत्व करणारा देश असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा, आणि होमिओपॅथी अशा विविध रुपात आयुष व्यवस्थेने शतकानुशतके लोकांची सेवा केली आहे, आणि जगभरातील सर्वांगीण आरोग्यासाठी विश्वसार्ह पद्धत म्हणूनही आपले स्थान निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या भागिदारीत गुजरातमधील जामनगर इथे जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध केंद्राची स्थापना झाली आहे. हे केंद्र म्हणजे भारताच्या पारंपरिक ज्ञान व्यवस्थेवरील वाढत्या जागतिक विश्वासार्हतेचे प्रतीक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आगामी परिषदेच्या नियोजनासाठी आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना सातत्यपूर्णतेने करत असलेल्या प्रयत्नांचीही जाधव यांनी प्रशंसा केली. पारंपरिक औषधांबद्दल जागरूकता वाढवण्यात तसेच या पद्धतीवरील लोकांचा विश्वास दृढ करण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेच्या समारोप समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. या परिषदेतून होणारे विचारमंथन आणि सहकार्य जगाला अधिक समग्र, सर्वसमावेशक आणि आरोग्य विषयक शाश्वत भविष्याच्या दिशेने नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया क्षेत्राच्या प्रादेशिक संचालक एमेरिटस आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांच्या पारंपरिक औषधांवरील वरिष्ठ सल्लागार पूनम खेत्रपाल यांनीही माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला. दुसरी जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषद, ही जागतिक आरोग्य विषयक सहकार्याला पुढची दिशा देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. या परिषदेत सहभागी होणाऱ्या 100 पेक्षा जास्त देशांमुळे, आगामी दशकांसाठीचा एक दीर्घकालीन मार्गदर्शक आराखडा तयार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यातून पारंपरिक, पूरक, एकात्मिक आणि स्वदेशी औषध व्यवस्थांचे, राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेअंतर्गत तथ्थ्याधारीत, न्याय्य आणि शाश्वत मार्गाने एकात्मिकीकरण घडवून आणण्याची दिशा मिळेल असे त्यांनी सांगितले. 

पारंपरिक औषधांवर असलेल्या जागतिक अवलंबित्वाचा मुद्दाही त्यांनी मांडला. संशोधन, नवोन्मेष आणि नियमनांचे बळकटीकरण अशा माध्यमातून तथ्यांसंदर्भातील दरी भरून काढणे ही तातडीची  गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या परिषदेतील विचारमंथन विषयक उपक्रमांअंतर्गत, या परिषदेला समांतरपणेच, दि. 17–19 डिसेंबर 2025 या कालावधीत अश्वगंधा : पारंपरिक ज्ञानापासून जागतिक प्रभावापर्यंत – जगातील आघाडीच्या तज्ञांचा दृष्टिकोन” (Perspectives from Leading Global Experts) या विषयावर समर्पित उपक्रमही राबवला जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक पारंपरिक औषध केंद्र आणि आयुष मंत्रालयाच्या वतीने संयुक्तपणे या सत्राचे आयोजन केले जाईल. या सत्राच्या निमित्ताने अश्वगंधाविषयीची वैज्ञानिक माहिती आणि समज वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने आघाडीचे संशोधक, धोरणकर्ते आणि चिकित्सक एकत्र येणार आहेत. या सत्राअंतर्गत या वनस्पतीशी संबंधित उपयुक्त पारंपारिक ज्ञानासोबतच, या वनस्पतीच्या वैद्यकीय गुणधर्माची अनुकूलनशील, मज्जासंरक्षक आणि रोगप्रतिकार गुणधर्मांच्या बाबतीत समकालीन तथ्ये-पुराव्यांबद्दल सविस्तर चर्चा केली जाईल. या सोबतच या चर्चेमध्ये सुरक्षिततेच्या मूल्यांकनावरही भर दिला जाणार आहे. उच्च गुणवत्तेच्या, तथ्ये आणि पुराव्यावर-आधारित अश्वगंध विषयक उत्पादनांना जागतिक मान्यता मिळून देणे हा या सत्राचा उद्देश असणार आहे.

या पत्रकार परिषदेला आयुष मंत्रालयाचे सचिव, वैद्य राजेश कोटेचा, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे  प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा, आयुष मंत्रालयाच्या सहसचिव अलार्मेलमंगई डी, आयुष मंत्रालयाच्या सहसचिव मोनालिसा डॅश, आणि आयुष मंत्रालयाचे उपमहासंचालक सत्यजित पॉल यांच्यासह आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. माध्यम प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते..

या परिषदेच्या पार्श्वभूमीवर आजच्या उद्घाटनपूर्व कार्यक्रमाआधी दि. 9 - 10 नोव्हेंबर 2025 रोजी राजदूतांचा स्वागत समारंभ झाला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राजदुतांना भारत आणि जागतिक आरोग्य संघटनेमधील सहकार्यपूर्ण भागिदारीविषयी तसेच या परिषदेच्या जागतिक महत्त्वाविषयीची माहिती दिली गेली.

आजच्या या कार्यक्रमासह, भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेला प्रत्यक्ष प्रारंभ होण्याच्यादृष्टीने उलट्या गणतीला सुरुवात केली आहे. या आयोजनातून भारताने समग्र, एकात्मिक आणि शाश्वत आरोग्य सेवांना जागतिक पातळीवर नवी दिशा देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा दृढतेने व्यक्त केली आहे.

सोनल तुपे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2200531) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil