उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे काशी तमिळ संगमम 4.0 ला केले संबोधित


उपराष्ट्रपती म्हणाले की, हा उपक्रम देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागाच्या सांस्कृतिक ऐक्याचे आणि त्यांच्या सामायिक नागरी संस्कृतींच्या वारशाचे प्रतीक आहे

उपराष्ट्रपती म्हणाले की, काशी तमिळ संगमम हा उपक्रम एक भारत, श्रेष्ठ भारत संकल्पनेचे मूर्त रूप आहे आणि तो आपल्याला विकसित भारताच्या दिशेने आपल्या वाटचालीत मार्गदर्शन करेल

प्रविष्टि तिथि: 02 DEC 2025 6:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025

काशी आणि तामिळनाडू यांच्यातील शाश्वत सांस्कृतिक बंध साजरे करणाऱ्या काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाच्या चौथ्या वर्षीच्या सोहोळ्यानिमित्त उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी विशेष व्हिडीओ संदेश पाठवला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्ष 2022 मध्ये काशी तमिळ संगममचे आयोजन सुरु झाल्यापासून हा उपक्रम गंगातीरावरील संस्कृती आणि कावेरीतीरी वसलेल्या परंपरा यांना एकत्र आणणाऱ्या मोठ्या राष्ट्रीय मंचात परिवर्तीत झाला असून तो देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागाच्या सांस्कृतिक ऐक्याचे आणि त्यांच्या सामायिक नागरी संस्कृतींच्या वारशाचे प्रतीक ठरला आहे.  

दिनांक 30 नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधानांनी या संगमम ला जगातील सर्वात प्राचीन भाषेचा जगातील सर्वात प्राचीन जिवंत शहराशी झालेला मिलाफ असे संबोधले होते, त्याची आठवण उपराष्ट्रपतींनी उपस्थितांना करून दिली.  

तमिळ भाषेला तिच्या हक्काच्या सन्मानाचे स्थान आणि निरंतर राष्ट्रीय पाठींबा मिळत आहे याबद्दल उपराष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. यावर्षीच्या कार्यक्रमासाठी भाषिक तसेच सांस्कृतिक समन्वयाला मजबूत करणाऱ्या ‘चला तमिळ शिकूया’ या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे याचे त्यांनी स्वागत केले.

चेन्नई येथील केंद्रीय अभिजात तमिळ संस्थेतर्फे प्रशिक्षित हिंदी बोलू शकणारे पन्नास तमिळ शिक्षक वाराणसीमधील पन्नास सरकारी आणि खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या 1,500 विद्यार्थ्यांना 15 दिवसांत मुलभूत तमिळ भाषा शिकवण्यासाठी वाराणसीत येऊन पोहोचले आहेत या उपक्रमाची उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली.

तामिळनाडू आणि काशी यांमधील प्राचीन सांस्कृतिक बंध नव्याने शोधण्याच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना उपराष्ट्रपतींनी तेनकासी ते काशी या प्रतीकात्मक अगाथियार यात्रेचा उल्लेख केला, ही यात्रा  2 डिसेंबर रोजी सुरू झाली आणि 10 डिसेंबर रोजी संपेल. पांड्य  राजा अथिवीरा पराक्रम पांडियन यांनी शांततेच्या संदेशाचा प्रसार केल्याच्या महान गोष्टीचे स्मरण म्हणून ही यात्रा आयोजित केली आहे. पांड्य राजा अथिवीरा यांच्या प्रवासामुळे तामिळनाडू आणि काशी ही  दोन पवित्र शहरे आध्यात्मिक दृष्ट्या जोडली गेली आणि तमिळनाडूमधील तेनकासी—ज्याचा अर्थ “दक्षिण काशी” असा होतो—या शहराची ओळख घडली.

उत्तरप्रदेश मधील 300 विद्यार्थी प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांचे गट करुन केंद्रीय शास्त्रीय तमिळ संस्थेसह तामिळनाडू मधील आघाडीच्या संस्थांना भेट देणार असल्याच्या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले, यामुळे दोन्ही बाजूंचे सांस्कृतिक रीतीरिवाजांचे आकलन आणि आदानप्रदान अधिक मजबूत होईल.

संगमम हे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ तत्त्वाचे प्रतीक असल्याचे सांगून उपराष्ट्रपती म्हणाले की काशी आणि तामिळनाडू हे भारताच्या प्राचीन संस्कृतीचे दीपस्तंभ असून संपूर्ण राष्ट्राला त्यांच्या सांस्कृतिक समृद्धीने उजळून टाकत आहेत.

अशा प्रकारच्या सांस्कृतिक एकता कार्यक्रमाचे इतके भव्य आयोजन केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी शिक्षण मंत्रालय, उत्तर प्रदेश सरकार आणि इतर केंद्रीय मंत्रालयांचे कौतुक केले.

काशी तमिळ संगमम हा उपक्रम सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक स्तरावरील भव्य सोहळा ठरू दे अशा शुभेच्छा उपराष्ट्रपतींनी दिल्या. संगमम नेहमीच स्वयंतेजाने तळपत राहील, काशी आणि तामिळनाडू यांच्यातील बंध हजारो वर्षांसाठी वृद्धिंगत होतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाखाली पाहिलेल्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी ही एकतेची भावना आपल्याला मार्गदर्शन करत राहील, असा विश्वास व्यक्त करुन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

सुषमा काणे/संजना चिटणीस/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(रिलीज़ आईडी: 2197847) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam