पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यामधील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

प्रविष्टि तिथि: 28 NOV 2025 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 नोव्हेंबर 2025

 

पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या सगळ्या भक्तांना, आणि अनुयायांना माझा नमस्कार !

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे 24 वे महंत, श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामी जी, राज्यपाल अशोक गजपती राजू, लोकप्रिय मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास डेम्पो, उपाध्यक्ष आर.आर. कामत, केंद्रातील माझे सहकारी श्रीपाद नाईक, दिगंबर कामत आणि इतर सर्व मान्यवर, महिला आणि सद्गृहस्थ हो,

आज या पवित्र प्रसंगी मनामध्ये खोलवर शांतता भरली आहे. साधू-संतांच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर आपोआपच आध्यात्मिक अनुभव येत असतो. इथे विशाल संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांमुळे लक्षात  येते की, या मठाची शतकांपासूनच प्राचीन जीवंत शक्ती आजही वृद्धिंगत होत आहे. आज या समारंभाला मला उपस्थित राहता आले, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. इथे येण्यापूर्वी मला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. त्या शांत वातावरणाने या कार्यक्रमाच्या आध्यात्मिकतेला आणखी सखोलता प्राप्त झाली.

मित्रांनो,  

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ आपल्या स्थापनेचा 550 वा वर्धापन दिन साजरा  करीत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. गेल्या 550 वर्षांमध्ये या संस्थेने काळाची कितीतरी चक्रवादळे झेलली आहेत. युग बदलले, काळ बदलला, देश आणि समाजामध्ये अनेक प्रकारची स्थित्यन्तरे घडून आली. परंतु बदलत्या युगांमध्ये आणि येणा-या आव्हानांसमोरही या मठाने आपल्या कार्याची दिशा हरवली नाही. मात्र या मठाच्या लोकांना दिशा देणारे केंद्र म्हणून कार्य केले. आणि हीच या मठाची सर्वात मोठी ओळख आहे. या मठाची, मठाने केलेल्या कार्याची इतिहासामध्ये पाळेमुळे खोलवर रूजलेली असतानाही हा मठ काळाबरोबर चालत राहिला आहे. या मठाची स्थापना ज्या भावनेने केली गेली होती, ती भावना आजही तितकी जीवंत दिसून येत आहे. ही भावना साधनेला सेवेबरोबर जोडणारी आहे. परंपरेला लोककल्याणाबरोबर जोडणारी आहे. हा मठ पिढ्यांनपिढ्या समाजाला निरंतर असे काही पाठ समजावत आहे;  त्यामधून आध्यात्माचा मूळ उद्देश्य सांगितला जात असल्यामुळे  जीवनामध्ये स्थैर्य, संतुलन आणि मूल्य प्रदान केले जात आहेत.  मठाचा 550 वर्षांचा प्रवास, या शक्तीचे प्रमाण आहे की, जो समाजाला अतिशय अवघड, कठीण काळातही सांभाळून ठेवू शकतो. इथले मठाधिपती, श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामी जी, समितीचे सर्व सदस्य आणि या आयोजनाशी जोडले गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला या ऐतिहासिक क्षणी मी अनेक-अनेक शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

ज्यावेळी एखादी संस्था सत्य आणि सेवा यांच्या पायावर उभी राहते, त्यावेळी काळाचे परिवर्तन होत असले तरी तिचा पाया डगमगत नाही. त्याउलट समाजाला तगून राहण्यासाठी शक्ती देण्याचे काम करते. आज याच परंपरेला पुढे ठेवून हा मठ एक नवीन अध्याय लिहीत आहे. इथे भगवान श्रीरामाच्या  77 फूट उंच भव्य कांस्य पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वीच मला अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज आरोहणाचे सद्भाग्य मिळाले. आणि आज इथे प्रभू श्रीरामांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्याची सुसंधी मिळाली. आज रामायणावर आधारित एका उद्यानाचे उद्घाटनही झाले आहे.

मित्रांनो,

आज या मठाबरोबरच जे नवीन आयाम  जोडले गेले आहेत, ते येणा-या पिढीसाठी  ज्ञान, प्रेरणा आणि साधना यांचे स्थायी केंद्र बनणार आहेत. इथे विकसित होत असलेले संग्रहालय आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज त्रिमितीय नाट्यगृह, यांच्या माध्यमातून मठ आपल्या परंपरा संरक्षित करीत आहे. नवीन पिढीला आपल्या परंपरांनी जोडत आहे. याच प्रकारे 550 दिवसांमध्ये देशभरातील लक्षावधी भाविकांच्या भागिदारीतून ‘श्रीराम नाम जप-यज्ञ‘ आणि त्याला जोडूनच राम रथ यात्रा या प्रतीकांमुळे  आपल्या समाजामध्ये भक्ती आणि शिस्त यांच्या  सामूहिक ऊर्जेचे वहन होणार आहे. अशीच सामूहिक ऊर्जा आज देशाच्या कोनाकोप--यामध्ये नवीन चेतनेचा संचार करीत आहे.

मित्रांनो,

अध्यात्माला आधुनिक तंत्रज्ञानाने जोडण्याची व्यवस्था, भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या निर्माण कार्यासाठी मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो. आज या विशाल उत्सवामध्ये, या विशेष कार्यक्रमाचे प्रतीक म्हणून स्मृती नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशनही आज करण्यात आले आहे. ज्या मंडळींनी अनेक शतकांपासून, युगांपासून समाजाला एकसंध ठेवण्यासाठी कार्य केले, त्या त्या आध्यात्मिक शक्तीला हा सन्मान, समर्पित आहे.

मित्रांनो,

या श्री मठाला सातत्याने प्रवाही राहण्याची शक्ती, त्या महान गुरू-परंपरेतून मिळाली आहे. त्या गुरूंनी  व्दैत वेदांताची दिव्य भावभूमी स्थापित केली होती. श्रीमद् नारायणतीर्थ स्वामीजी यांच्या व्दारे, 1475 मध्ये या मठाची स्थापना करण्यात आली होती, हा मठ त्याच ज्ञान-परंपरेचा विस्तार आहे. आणि त्याचे मूळ स़्रोत जगद्गुरू श्री माधवाचार्य यांच्यासारखे अव्दितीय आचार्य आहेत. या आचार्यांच्या  चरणांवर नतमस्तक होवून मी नमन-वंदन करतो.  आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे, उडुपी आणि पर्तगाळी, हे दोन्ही मठ एकाच आध्यात्मिक सरितेचे जीवंत प्रवाह आहेत. भारताच्या या पश्चिम तीरावरील सांस्कृतिक प्रवाहांना दिशा देणारी गुरू-शक्तीही हीच आहे. आणि माझ्यासाठीही एक विशेष योगायोगाची गोष्ट झाली आहे;  ती म्हणजे, आजच्या एकाच दिवशी मला या परंपरेशी संबंधित दोन कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे सद्भाग्य लाभले.

मित्रांनो,

आपल्या  सर्वांना अभिमान वाटतो की, या परंपरेशी जोडलेल्या कुटुंबांनी अनेक पिढ्यांनपिढ्या शिस्त, ज्ञान, परिश्रम आणि उत्कृष्टता यांना जीवनाचा आधार बनवले आहे. व्यापारापासून ते आर्थिक व्यवहारापर्यंत, शिक्षणापासून ते तंत्रज्ञानापर्यंत, प्रतिभा, नेतृत्व आणि कार्यनिष्ठा त्यामध्ये दिसून येते. त्याच्या मागे याच जीवन-दृष्टीचा अमिट ठसा असल्याचे जाणवते. या परंपरेशी जोडले गेलेले परिवार, व्यक्ती यांना मिळालेल्या यशाच्या अनेक प्रेरणादायी गाथा आहेत. त्या सर्वांच्या यशाची पाळेमुळे विनम्रता, संस्कार आणि सेवा यांच्यामध्ये दिसून येतात. हा मठ त्या मूल्यांना स्थिर ठेवणारी आधारशिला आहे. आणि आपल्याला विश्वास आहे की, भविष्यातही, येणा-या अनेक पिढ्यांना हा मठ अशाच प्रकारे ऊर्जा देत राहील.

मित्रांनो,

या ऐतिहासिक मठाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, त्याचा उल्लेख करणे आज आवश्यक आहे. या मठाची जी एक स्वतंत्र ओळख आहे, ती म्हणजे सेवा भावना! या भावनेने अनेक युगांपासून समाजातील प्रत्येक वर्गाला आश्रय दिला आहे. शतकांपूर्वी ज्यावेळी या क्षेत्रामध्ये विपरीत परिस्थिती निर्माण झाली, ज्यावेळी लोकांना आपले घर-दार, कुटुंब- परिवार सर्व काही सोडून देवून नवीन प्रदेशांमध्ये जावून आश्रय घेण्याची वेळ आली, त्यावेळी या मठाने समाज- समुदायांना मदतीचा हात दिला, आश्रय दिला. त्यांना  संघटित केले आणि नवीन स्थानांवर मंदिर आणि संस्कृतीचेही रक्षण केले. काळाबरोबर मठाची सेवाधारा आणखी विस्तारली जात होती. आज शिक्षणापासून ते वसतिगृहापर्यंत, वृध्दांच्या सेवेपासून ते गरजवंत कुटुंबांना मदत करण्यापर्यंत, या मठाने आपल्याजवळील साधन-सामुग्रींचा सातत्याने लोक-कल्याणासाठी समर्पित भावने वापर केला आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये उभारण्यात आलेली वसतिगृहे असोत, आधुनिक विद्यालये असोत, कोणत्याही कठिण काळामध्ये लोकांना मदत करण्याचे सेवा-कार्य केले आहे. ज्यावेळी अध्यात्म आणि सेवा एकमेकांच्या हातात हात घालून बरोबरीने चालतात, त्यावेळी समाजाला स्थैर्य प्राप्त होते आणि पुढे जाण्याची प्रेरणाही मिळते, या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे या मठाने चालवलेला प्रत्येक उपक्रम, केलेले सेवाकार्य आहे.

मित्रांनो,

असाही काळ आला, ज्यावेळी गोव्यातील मंदिरे आणि स्थानिक परंपरांना संकटाचा सामना करावा लागला.  भाषा आणि सांस्कृतिक ओळख यांच्यावर दबाव येवू लागला. परंतु अशा संकटाच्या परिस्थितीमध्येही कोणीही समाजाचा आत्मा कमकुवत करू शकले नाही. त्याउलट  अशा संकटांनी समाजाला आणखी दृढ बनवले. गोव्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या संस्कृतीने, प्रत्येक परिवर्तनामध्येही आपले मूळ स्वरूप कायम ठेवले आणि काळाच्या बरोबर ते वैशिष्ट्य पुनर्जीवितही केले. यामध्ये पर्तगाळी मठासारख्या संस्थानांचे खूप मोठे योगदान आहे.

मित्रहो,

आज, भारत एका अद्भुत सांस्कृतिक पुनर्जागरणाचा साक्षीदार बनत आहे. अयोध्येतील राम मंदिराची पुनर्स्थापना, काशी विश्वनाथ धामचे भव्य जीर्णोद्धार आणि उज्जैनमधील महाकाल महालोकाचा विस्तार, हे सर्व आपल्या देशाच्या त्या जाणिवेची प्रचिती देत आहेत, जी आपल्या आध्यात्मिक वारशाला नव्या जोमाने आकार देत आहे. रामायण सर्किट, कृष्ण सर्किट, गया इथली विकासकामे आणि कुंभमेळ्याचे अभूतपूर्व व्यवस्थापन, या सगळ्या उदाहरणांतून हे दिसून येते की, आजचा भारत आपल्या सांस्कृतिक ओळखीला नवे संकल्प आणि नव्या आत्मविश्वासाने पुढे नेत आहे. ही जाणीव भावी पिढ्यांना आपल्या मुळांशी जोडून राहण्यासाठी प्रेरित करते.

मित्रहो,

गोव्याच्या या पवित्र भूमीचे स्वतःचे एक विशिष्ट आध्यात्मिक स्वरूपही आहे. इथे शतकानुशतके भक्ती, संत-परंपरा आणि सांस्कृतिक साधनेचा सतत प्रवाह वाहता राहिला आहे. ही भूमी नैसर्गिक सौंदर्यासोबतच दक्षिण काशीची ओळखही जपून आहे. पर्तगाळी मठाने या ओळखीत आणखी गहीरेपणा आणला आहे. या मठाचा संबंध कोकण आणि गोव्यापुरता मर्यादित नाही. इथली परंपरा देशाच्या वेगवेगळ्या भागांशी आणि काशीच्या पवित्र भूमीशीही जोडलेली आहे. काशीचा खासदार असल्याच्या नात्याने  माझ्यासाठी ही आणखी अभिमानाची बाब आहे. संस्थापक आचार्य श्री नारायण तीर्थ यांनी उत्तर भारताच्या आपल्या यात्रेदरम्यान काशीमध्येही एक केंद्र स्थापित केले होते. ज्यामुळे या मठाच्या आध्यात्मिक प्रवाहाचा विस्तार दक्षिण ते उत्तरेपर्यंत झाला. आजही काशीमध्ये त्यांच्याद्वारे स्थापित केंद्र, समाज सेवेचे माध्यम बनलेले आहेत.

मित्रहो,

आज जेव्हा या पवित्र मठाला 550 वर्ष पूर्ण होत आहेत, तेव्हा आपण इतिहासाचा उत्सव साजरा करण्यासोबतच भविष्याची दिशा देखील निश्चित करत आहोत. विकसित भारताचा रस्ता एकतेतून जातो. जेव्हा समाज जोडला जातो, जेव्हा प्रत्येक क्षेत्र प्रत्येक वर्ग एकसंधतेने उभा राहतो, तेव्हाच देश मोठी झेप घेतो. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तम मठाचे प्रमुख ध्येय लोकांना जोडणे, मनाला जोडणे, परंपरा आणि आधुनिकतेमधील दुवा साधणे हा आहे. म्हणूनच विकसित भारताच्या वाटचालीत हा मठ, एक प्रमुख प्रेरणा केंद्राच्या भूमिकेतही आहे.

मित्रहो,

ज्यांच्यावर माझे स्नेह असतो, तिथे मी आदरपूर्वक काही आग्रह करतो. जसे पूज्य स्वामी जी यांनी मला एक काम दिले एकादशीचे. ते तर संत आहेत, त्यामुळे एकावरच समाधान मानतात, परंतु मी एकावरच समाधान मानणाऱ्यांपैकी नाही, आणि म्हणूनच आज तुमच्यामध्ये आलो आहे, तर माझ्या मनात सहजपणे काही गोष्टी येत आहेत, ज्या मी तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो. मी तुम्हाला 9 विनंत्या करू इच्छितो, ज्या तुमच्या संस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जाऊ शकतात. या विनंत्या, 9 संकल्पांसारख्या आहेत. विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा आपण पर्यावरणाच्या रक्षणाला आपला धर्म मानू. भूमी आपली माता आहे, आणि मठांची शिकवण आपल्याला निसर्गाचा आदर करायला शिकवते. म्हणूनच आपला पहिला संकल्प असायला हवा, की आपल्याला जल संरक्षण करायचे आहे, पाणी बचत करायची आहे, नद्यांना वाचवायचे आहे. आपला दुसरा संकल्प असायला हवा, की आपण झाडे लावू. देशभरात एक पेड मां के नाम, अभियानाला गती मिळत आहे. या अभियानासोबत जर या संस्थेची ताकद जोडली गेली, तर याचा प्रभाव आणखी व्यापक होईल. आपला तिसरा संकल्प असायला हवा, स्वच्छतेचे अभियान. आज जेव्हा मी मंदिर परिसरात गेलो, तेव्हा तिथली व्यवस्था, तिथले architecture, तिथली स्वच्छता माझ्या मनाला खूप भावली. मी स्वामी जी यांना सांगितलेही, किती सुंदर पद्धतीने इतके सांभाळले आहे. आपली प्रत्येक गल्ली, मोहल्ला, शहर स्वच्छ असायला हवे. चौथ्या संकल्पाच्या रूपात आपल्याला स्वदेशीचा अवलंब करावा लागेल. आज भारत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीच्या मंत्राने पुढे वाटचाल करत आहे. आज देश म्हणतो आहे, Vocal for Local, Vocal for Local, Vocal for Local, Vocal for Local, आपल्यालाही हा संकल्प घेऊन पुढे वाटचाल करायची आहे.

मित्रहो,

आपला पाचवा संकल्प असायला हवा, देश दर्शन. आपल्याला देशाच्या वेगवेगळ्या भागांना जाणून-समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. सहाव्या संकल्पाच्या रूपात आपल्याला नैसर्गिक शेतीला आपल्या जीवनाचा भाग बनवायला हवे. आपला सातवा संकल्प असायला हवा, की आपण आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करू. आपण श्रीअन्न - भरडधान्यांचा अवलंब करू आणि खाण्यातील तेलाचे 10 टक्के प्रमाण कमी करू. आठव्या संकल्पाच्या स्वरूपात आपल्याला योग आणि खेळांचा अवलंब करावा लागेल. आणि नवव्या संकल्पाच्या रूपात आपण कोणत्या ना कोणत्या रूपात गरिबांची मदत करू. जर एक कुटुंबही दत्तक घेतले ना आपण, तर बघता बघता हिंदुस्थानचे रूप-रंग बदलून जाईल.

मित्रहो,

आपले मठ या संकल्पाला जनसंकल्प बनवू शकतात. या मठाचा 550 वर्षांचा अनुभव आपल्याला सांगतो, परंपरा जर जिवंत राहिली, तर समाज प्रगती करतो, आणि परंपरा तेव्हाच जीवंत राहते, जेव्हा ती काळानुसार आपल्या जबाबदाऱ्या विस्तारते. या मठाने 550 वर्षांत समाजाला जे दिले आहे, आता तीच ऊर्जा आपल्याला भविष्यातील भारताच्या जडणघडणीसाठीही लावायची आहे.

मित्रहो,

गोव्याच्या या भूमीचा आध्यात्मिक गौरव जितका विशिष्ट आहे, तितकाच प्रभावी याचा आधुनिक विकासही आहे. गोवा देशातील त्या राज्यांपैकी आहे जिथे प्रति व्यक्ती उत्पन्न सर्वात जास्त आहे, देशाच्या पर्यटन, औषधनिर्माण आणि सेवा क्षेत्रामध्ये या राज्याचे महत्वाचे योगदान आहे. अलीकडच्या वर्षांमध्ये, शिक्षण आणि आरोग्यामध्ये गोव्याने नवे यश प्राप्त केले आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून इथल्या पायाभूत सुविधा आधुनिक बनवत आहेत. हमरस्ते, विमानतळ आणि रेल्वे जोडणीच्या विस्तारामुळे, भाविकांचा आणि पर्यटकांचा, दोघांचाही प्रवास आणखी सुकर झाला आहे. विकसित भारत 2047 च्या आपल्या राष्ट्रीय दृष्टीकोनात पर्यटन एक प्रमुख भाग आहे, आणि गोवा याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.

मित्रहो,

भारत आज एका निर्णायक टप्प्यातून जातो आहे. देशाची युवा शक्ती, आपला वाढता आत्मविश्वास, आणि सांस्कृतिक मुळांकडे आपला कल, हे सर्व मिळून एका नव्या भारताची निर्मिती करत आहेत. विकसित भारताचा आपला संकल्प तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा अध्यात्म, राष्ट्र-सेवा आणि विकास हे तिन्ही प्रवाह सोबत चालतील. गोव्याची ही भूमी, आणि इथला हा मठ, त्याच दिशेने एक महत्वाचे योगदान देत आहेत. आज पूज्य स्वामी जी यांनी माझ्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, खूप साऱ्या गोष्टींसाठी त्यांनी मला श्रेय दिले, मी त्यांचा खूप आभारी आहे, जी भावना त्यांनी व्यक्त केली, पण सत्य हे आहे की हे जे काही आहे, ज्याला तुम्ही चांगले मानता, ते मोदीचे नाही, 140 कोटी देशवासियांचे, त्यांचा संकल्प, त्यांचा पुरूषार्थ, त्याचा परिणाम आहे आणि पुढेही चांगले परिणाम होणारच आहेत, कारण माझा 140 कोटी देशवासियांवर पूर्ण विश्वास आहे आणि जसे आपण म्हणालात, माझ्या जीवनातील अनेक टप्पे असे आहेत, ज्यात गोवा मोठ्या महत्वाच्या स्थानावर राहिला आहे, हे कसे झाले असेल ते मी तर ठाऊक नाही, पण हे सत्य आहे की प्रत्येक वळणावर ही गोव्याची भूमीच मला कुठून कुठे घेऊन जात राहिली आहे. पण मी पूज्य संत श्री यांचा खूप आभारी आहे, त्यांच्या आशीर्वादासाठी . मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या पवित्र प्रसंगानिमित्त हृदयापासून खूप-खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद

 

* * *

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे


(रिलीज़ आईडी: 2196524) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Gujarati , Odia , Telugu , Kannada