56 व्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) नॉर्वेजियन चित्रपट 'सेफ हाऊस'ला प्रतिष्ठित ICFT–UNESCO गांधी पदक प्रदान
सेफ हाऊस मधून अराजकतेच्या परिस्थितीही मानवता टिकवण्यासाठी धडपडणाऱ्यांसमोरील नैतिक द्विधा मानसिकता अधोरेखित
#IFFIWood, 28 नोव्हेंबर 2025
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2025), एरिक स्वेन्सन दिग्दर्शित 'सेफ हाऊस' या नॉर्वेजियन चित्रपटाने, सिने क्षेत्रात शांतता, अहिंसा आणि आंतरसांस्कृतिक संवाद वृद्धींगत करण्यासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल युनेस्को तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरचित्रवाणी आणि दृकश्राव्य संवाद परिषदेच्या गांधी पदकाने (ICFT–UNESCO ) सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक एरिक स्वेन्सन यांच्या वतीने पॅरिसचे मानद प्रतिनिधी मनोज कदम यांनी हा पुरस्कार स्विकारला आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला गेला.

'सेफ हाऊस' हा सत्य घटनेवर आधारीत चित्रपट आहे. हा चित्रपट मध्य आफ्रिका प्रजासत्ताकमधील 2013 च्या गृहयुद्धाच्या काळात, बांगुई इथल्या डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या रुग्णालयात घडलेल्या 15 तासांमधील अत्यंत संघर्षमयी तणावाच्या घडामोडींवर आधारीत आहे. या चित्रपटातील प्रखर मानवी नाट्यमय घडामोडींचे कथानक आणि चित्रण प्रेक्षकांना खिळवून ठेवते. या चित्रपटातून रुग्णालयात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पथकाने अशक्यप्राय आणि अनाकलनीय निर्णय घ्यावे लागल्याच्या परिस्थितीतून जात असताना दाखवलेल्या, सेवा सुश्रुषेची नितीमूल्ये, धैर्य आणि कर्तव्यभावनेचे पैलू उलगडून दाखवले आहेत. वास्तविक वेळेच्या स्वरुपात मांडलेल्या या कथानकातून, हा चित्रपट मानवी भावनेची लवचिकता आणि अराजकतेच्या परिस्थितीतही मानवता टिकवण्यासाठी धडपडणाऱ्यांसमोरील नैतिक द्विद्धा मनःस्थिती आपल्यासमोर ठळकपणे मांडतो.
आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरचित्रवाणी आणि दृकश्राव्य संवाद परिषद तसेच युनेस्को यांच्यातील सहकार्यपूर्ण भागिदारीअंतर्गत दिला जाणारा हा पुरस्काराच्या माध्यमातून सहिष्णुता, आंतरसांस्कृतिक संवाद आणि शांततेच्या संस्कृतीचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटांचा सन्मान केला जातो.

परीक्षक मंडळानेही 'सेफ हाऊस' चित्रपटाचे प्रचंड कौतुक केले आहे. या चित्रपटात अत्यंत तणावाच्या परिस्थितही नैतिक धैर्य आणि मानवतावादी मूल्यांचे सामर्थ्यशाली, प्रामाणिक चित्रण केले असल्याचे परीक्षक मंडळाने म्हटले आहे. तसेच, सांस्कृतिक सीमा ओलांडून प्रेक्षकांशी अंत्यंत गहिऱ्या भावनिक पातळीवर जोडून घेण्याची क्षमता या चित्रपटाने सिद्ध केली असल्याचे म्हणत परीक्षक मंडळाने या चित्रपटाचे कौतुक केले. सत्य घटनांवर आधारित वास्तविक वेळेतील या चित्रपटाची कथा संघर्षग्रस्त भागांमधील मदतनीस म्हणून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसमोरची नैतिक द्विधा मानसिकता ठळकपणे अधोरेखित करते, यातून करुणाभाव, उत्तरदायीत्व आणि मानवी जगण्याचे पवित्र्य या बाबतीतीली जागतिक संकल्पना आपल्यासमोर ठळकपणे उभी राहते. या चित्रपटाची संयमी, रहस्यमयी कथात्मक मांडणी आणि मूख्य भूमिकेतील क्रिस्टीन कुजाथ थॉर्प यांच्या दमदार अभिनयाने चित्रपटाचा प्रभाव अधिक वाढवला, यामुळेच हा चित्रपट ICFT–UNESCO गांधी पदकासाठी सर्वोत्तम निवड ठरल्याचे मत परीक्षक मंडळाने व्यक्त केले.
एरिक स्वेन्सन, हे नॉर्वेजियन चित्रपटकारांच्या नवीन पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे दिग्दर्शक आहेत, याआधीही त्यांनी केलेल्या 'वन नाईट इन ओस्लो' आणि 'हाराजुकु' हे चित्रपटांनी सर्वत्र प्रशंसा मिळवली होती. 48 व्या गोटेबोर्ग चित्रपट महोत्सवाचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून 'सेफ हाऊस' चा जागतिक प्रीमियर झाला होता. या महोत्सवातही या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट नॉर्डीक चित्रपटासाठीचा प्रेक्षक ड्रॅगन पुरस्कार जिंकला होता.
हा पुरस्काराच्या माध्यमातून करुणाभाव, एकता आणि विविध संस्कृतींमधील परस्पर संवादाला प्रोत्साहन देणाऱ्या जागतिक सिनेमाला मुख्य पटलावर आणण्याचे IFFI चे उद्दिष्टही अधोरेखित झाले आहे, यासोबतच यातून विविध समाजांमध्ये दूवा सांधण्याची सिनेमाची परिवर्तनीय ताकदही पुन्हा एकदा दिसून आली आहे.
ICFT - UNESCO गांधी पदकाविषयी
46 व्या IFFI पासून ICFT-UNESCO गांधी पदक पुरस्कार द्यायला सुरुवात झाली होती. उच्च दर्जाची कलात्मक आणि सिनेमॅटिक मूल्ये दर्शवणाऱ्या चित्रपटांसोबतच, समाजातील सर्वाधिक महत्त्वाच्या समस्यांवर नैतिक चिंतन करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सुरु केला गेला होता. सिनेमाच्या परिवर्तनीय ताकदीच्या आधारे मानवतेच्या परस्पर सामायिक मूल्यांविषयीची सखोल जाणिव वाढावी या उद्देशानेच या पुरस्काराची संकल्पना मांडली गेली होती. ICFT UNESCO गांधी पदक हा केवळ एक पुरस्कार नसून, तो प्रेरणा देण्याची, शिक्षित करण्याची आणि एकसंधता साधण्याच्या चित्रपटांच्या ताकदीचा गौरव करणाऱ्या उत्सवासमान आहे.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | जयदेवी पुजारी स्वामी/तुषार पवार/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2196082
| Visitor Counter:
7