56 व्या इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट वेब मालिकेचा (ओटीटी) मुकुट ‘बंदिश बँडीट्स सिझन 2’ च्या शिरी
कला आणि संगीत सर्वांसाठी उपलब्ध करून देणाऱ्या या मालिकेच्या कथेचे परीक्षकांकडून कौतुक
या सन्मानातून भारतात वेगाने विकसित होत असलेली ओटीटी परिसंस्थेत नवोन्मेषाचे संगोपन करण्याप्रती इफ्फीच्या बांधिलकीचे दर्शन
#IFFIWood, 28 नोव्हेंबर 2025
भारताच्या समृद्ध होत जाणाऱ्या डिजिटल कथाकथन परिदृश्याचा जोरदार सोहोळा साजरा करत, 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘बंदिश बँडीट्स सिझन 2’ ला सर्वोत्कृष्ट वेब मालिकेचा (ओटीटी) पुरस्कार प्राप्त झाला आहे. आनंद तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेची निर्मिती अमृतपाल सिंह बिंद्रा आणि आनंद तिवारी यांनी केली असून, लिओ मिडिया कलेक्टीव्ह कंपनीतर्फे निर्मित ही मालिका अमेझॉनप्राईम व्हिडीओ वर दाखवण्यात आली होती.
अत्यंत सशक्त मालिकांच्या अंतिम यादीतून सर्व परीक्षकांनी एकमताने पुरस्कारासाठी या मालिकेची निवड करत, “कला आणि संगीत सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या”बद्दल या मालिकेचे कौतुक केले. या मालिकेचे निर्मिती करणारे अमृतपाल सिंह बिंद्रा आणि आनंद तिवारी यांनी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरूगन यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट वेब मालिकेचा (ओटीटी) पुरस्कार स्वीकारला.

राजस्थानात जोधपुरच्या भावपूर्ण वातावरणात आणि सिमल्याच्या शांत डोंगरांमध्ये घडणारी ‘बंदिश बँडीट्स सिझन 2’ची कथा राधे आणि तमन्ना यांच्या प्रवासातून प्रेम, महत्वाकांक्षा आणि वारशाचा शोध घेते. राधेचे कुटुंब त्यांच्या पिढीजात घरात वैयक्तिक आणि सांगीतिक चढउतारांचा सामना करत असताना, तमन्ना रॉयल हिमालयन संगीत विद्यालयात नव्याने सुरुवात करत तिचा स्वतःचा मार्ग आखते. राष्ट्रीय दूरचित्रवाणी स्पर्धेत दोन्ही कथांचा आमनासामना होताना, जुन्या जखमा ताज्या होतात, आकांक्षा एकमेकींना भिडतात आणि नियती नव्याने लिहिली जाते.
रित्विक भौमिक, श्रेय चौधरी, राजेश तेलंग, शिबा चढ्ढा, दिव्या दत्ता, कुणाल रॉय कपूर, अतुल कुलकर्णी, सौरभ नायर, आलिया कुरेशी, यशस्विनी दायमा आणि रोहन गुरबक्सानी यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांच्या चमूने सजलेली ही मालिका भावनिक खोलीचा सांगीतिक प्रभुत्वाशी मिलाफ घडवून भारतातील समकालीन वेब मालिकांपैकी सर्वाधिक पसंतीची मालिका म्हणून स्वतःचे स्थान निश्चित करते.
महोत्सवात सुरुवातीच्या काळात, परीक्षक मंडळाच्या अध्यक्ष भारतबाला यांनी शेखर दास, मुंजाल श्रॉफ आणि राजेश्वरी सचदेव या सदस्यांसह पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींना संबोधित केले होते. डिजिटल कथांचे विस्तारत जाणारे विश्व आणि ओटीटी मंच ज्या प्रकारे भारताची सर्जक संस्कृती घडवत आहेत त्या ठळक पद्धतींची त्यांनी चर्चा केली. समकालीन कथाकथनाचे बदलते व्याकरण आणि देशभरातील प्रेक्षकांची अस्सल, वैविध्यपूर्ण आणि मर्यादांची परीक्षा घेणाऱ्या कार्यक्रमांची वाढती भूक याबाबत देखील त्यांनी मौलिक विचार व्यक्त केले.
ही पत्रकार परिषद पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
वर्ष 2023 मध्ये इफ्फीच्या 54 व्या भागात सुरु झालेले सर्वोत्कृष्ट वेब मालिका (ओटीटी) पुरस्कार भारतातील उत्क्रांत होत जाणाऱ्या मनोरंजन परिदृष्याचे आणि डिजिटल पद्धतीला प्राधान्य देणाऱ्या कथाकथनाच्या अभूतपूर्व उदयाचे दर्शन घडवतात. भारताच्या चैतन्यमय ओटीटी परिसंस्थेत निर्माण झालेल्या वेब साहित्यात सर्जनशीलता, नवोन्मेष आणि प्रादेशिक वैविध्य साजरे करणे हा या पारितोषिकाचा उद्देश आहे.
हे पारितोषिक विलक्षण कलात्मक प्रतिभा, तांत्रिक उत्कृष्टता आणि सांस्कृतिक प्रभावाचा गौरव करतात. रुपये 10 लाख रोख असे स्वरूप असलेला हा पुरस्कार वैयक्तिक प्रमाणपत्रांसह सर्जक आणि ओटीटी मंच यांच्यात सामायिक स्वरुपात दिला जातो.
दर वर्षी उत्कृष्ट वेब मालिकांचा गौरव करून, इफ्फी भारताच्या कथाकथन क्षेत्रातील क्रांतीला प्रोत्साहन देण्याप्रती आणि देशाला ओटीटी सर्जनशीलतेचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्याप्रती स्वतःची बांधिलकी आणखी बळकट करत आहे.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | जयदेवी पुजारी स्वामी/संजना चिटणीस/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2196033
| Visitor Counter:
11