'पोक्खिराजेर डिम' या चित्रपटाने इफ्फीप्रेमींसाठी उभारले एक अद्भुत काल्पनिक विश्व
"भारतात आता व्हीएफएक्स साध्य करणे कठीण राहिलेले नाही; कलात्मक दृष्टिकोन व्यक्त होणे हे खरे महत्त्वाचे": सौकार्य घोषाल
"मी म्हणेन की अशा प्रकारच्या प्रकल्पाचा मी प्रथमच भाग बनलो आहे": अनिर्बान भट्टाचार्य
#IFFIWood, 26 नोव्हेंबर 2025
सौकार्य घोषाल दिग्दर्शित 'पोक्खिराजेर डिम' या बंगाली चित्रपटाने गोव्यात सुरू असलेल्या 56 व्या इफ्फीच्या 7 व्या दिवशी सकाळच्या विशेष प्रदर्शनाद्वारे प्रेक्षकांना एका अद्भुत कल्पना विश्वाच्या सफरीवर नेले. त्यानंतर, दिग्दर्शक सौकार्य घोषाल यांनी मुख्य अभिनेता अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला आणि चित्रपटाच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.

दुसऱ्यांदा इफ्फीमध्ये सहभागी झालेल्या, दिग्दर्शक सौकार्य घोषाल यांनी चर्चेच्या सुरुवातीलाच या चित्रपटाशी असलेले आपले विशेष भावनिक नाते अत्यंत जिव्हाळ्याने व्यक्त केले. त्यांनी आकाशगंज या काल्पनिक गावात चित्रपटाचा सारांश सांगून संवादाची सुरुवात केली. या काल्पनिक गावातील काल्पनिक चित्रपटातील मध्यवर्ती पात्र एक विद्यार्थी ‘घोटोन’ याला मानवी भावना प्रकट करणारा एक जादुई दगड सापडतो, त्यामुळे ब्रिटिश पुरातत्वज्ञांचे लक्ष त्याच्याकडे वेधले जाते. चित्रपटाच्या शेवटी, त्याचे विचित्र पण चाणाक्ष शिक्षक ‘बाटब्याल’ आणि मैत्रिण ‘पॉपिन्स’ यांच्यासह, तो दगडाच्या शक्तींचे रक्षण करतो, असे दिग्दर्शकांनी सांगितले.
अभिनेता अनिर्बान भट्टाचार्य चर्चेत सामील झाले, “मी माझे काम केले आहे; पडद्यावर माझ्याकडून जे अपेक्षित होते ते मी केले आहे. पण हो, हा प्रवास खूपच आनंददायी होता. जर आपण याला 'मुलांसाठीचा चित्रपट' किंवा 'विद्यार्थ्यांसाठीचा चित्रपट' असे लेबल लावले तर मी असे म्हणेन की मी अशा प्रकल्पाचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि ही माझ्यासाठी एक मोठी संधी आहे. मी सत्यजित रे आणि जगभरातील अनेक महान दिग्दर्शकांचे चित्रपट पाहत लहानाचा मोठा झालो आणि त्यांच्या कामानेच माझी चित्रपटाबद्दलची समज घडवली आहे. पण मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या चित्रपटात काम केले आहे,” असे त्यांनी सांगितले.

बंगाली चित्रपट क्षेत्रातील या नामांकित अभिनेत्याने स्पष्ट केले की, “सौकार्य यांनीच मला वैचित्र्यपूर्ण स्वभावाच्या, विविध छटांनी भरलेली अशी व्यक्तिरेखा दिली जी साकारताना मला खूप आनंद मिळाला. सौकार्याकडे विनोदी कल्पनाशक्तीची एक अनोखी जाणीव आहे, मग ती 'रेनबो जेली' असो किंवा 'भूतपोरी', ते अशा जगाची निर्मिती करतात जिथे प्रत्येक गोष्टीत हळवी खिन्नता दिसून येते : शोकांतिका असो वा विनोद, मानवी जीवनातील चढ उतार असोत वा विलक्षणता, म्हणूनच मी त्याच्या चित्रपटांकडे इतका आकर्षित होतो.”
सौकार्य पुढे म्हणाले की अनिर्बानने साकारलेल्या व्यक्तिरेखेत एक दुर्मिळ निरागसता आहे, आणि अशा प्रकारचा भाव ते प्रथमच साकारत होते. अनिर्बानने विशिष्ट हावभाव आणि देहबोली वापरून या व्यक्तिरेखेला अधिक गहिरेपणा आणि वास्तवता दिली असे त्यांनी सांगितले.

चित्रपटात मूलतः कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हीएफएक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे. या पैलूवर भाष्य करताना, सौकार्य यांनी स्पष्ट केले की आपल्याला फोटोशॉप, आफ्टर इफेक्ट्स, माया आणि मॅक्स सारख्या पोस्ट-प्रॉडक्शन साधनांची चांगली जाण असल्यामुळे व्हीएफएक्स टीमसोबत निकट सहकार्य करण्यास मदत झाली. त्यांच्या मते, भारतात आता व्हीएफएक्स करणे कठीण राहिलेले नाही कारण तांत्रिक कौशल्य आता खूप उच्च पातळीवर पोहोचले आहे - परंतु महत्त्वाचे आहे ते म्हणजे दिग्दर्शकाची कलात्मक दृष्टि स्पष्टपणे व्यक्त करणे. जर दिग्दर्शकाला तांत्रिक तर्क समजला असेल तर कलाकार ते सहजपणे अंमलात आणू शकतात, असे ते म्हणाले.
प्रश्नोत्तर सत्रादरम्यान अभिनेता भट्टाचार्य यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना इफ्फीचा त्यांचा अनुभव ऊर्जावान आणि प्रेरणादायी असल्याचे म्हटले. दिवसरात्र सिनेमा पाहण्यास आणि त्यावर चर्चा करण्यास उत्सुक असलेल्या लोकांनी वेढलेले असणे हे सर्वात आनंददायी असते, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, हे उत्साही आदानप्रदानच कोणत्याही महोत्सवाला आनंददायी बनवते. देशभरात इतके चित्रपट महोत्सव सुरू होत आहेत, ज्यात अधिकाधिक लोक चित्रपटाबद्दल विचार करत आहेत आणि चित्रपटाशी जोडले जात आहेत हे पाहून आनंद होतो, असे ते म्हणाले. अशा वातावरणाचा भाग असणे खरोखर सुंदर आहे असे त्यांनी सांगितले.
संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी लिंक:
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Post Link: https://x.com/PIB_Panaji/status/1991438887512850647?s=20
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2195304
| Visitor Counter:
6