इफ्फी मध्ये चार दिवस संध्याकाळी चाललेल्या संगीत, संस्कृती आणि सिनेमाच्या उत्सवांनी इफ्फीएस्टा 2025 चा समारोप
#IFFIWood, 25 नोव्हेंबर 2025
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) भाग म्हणून दूरदर्शनने वेव्हज ओटीटीच्या सहकार्याने इफ्फीएस्टा 2025 चे आयोजन गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे केले होते. चार दिवस संध्याकाळी चैतन्यपूर्ण सांगीतिक , सांस्कृतिक सादरीकरण आणि कलाकारांशी साधलेल्या संवादानंतर इफ्फीएस्टाचा समारोप झाला.
दिवस 1: भव्य उद्घाटनाने सांस्कृतिक उत्सवाचे वातावरण तयार केले




उद्घाटनाच्या दिवशी संध्याकाळी अनेक मान्यवर उपस्थित होते, यामध्ये अनुपम खेर, ऑस्कर विजेते संगीतकार एम.एम. कीरवानी, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री एमी बरुआ, रवी कोट्टारकारा आणि दक्षिण कोरियाचे खासदार-गायक जावोन किम यांच्यासह दूरदर्शनचे महासंचालक के. सतीश नंबुदिरीपाद यांचा समावेश होता.
दूरदर्शनच्या महासंचालकांनी वेव्हज ओटीटीद्वारे संघटनेचे डिजिटल परिवर्तन आणि सुरक्षित कौटुंबिक मनोरंजनाप्रति त्यांची वचनबद्धता अधोरेखित केली. अनुपम खेर यांनी अनेक पिढ्या घडवण्यात दूरदर्शनने बजावलेल्या भूमिकेचे स्मरण केले. या सत्रात जावोन किम यांनी वंदे मातरम गीत सादर केले आणि त्यानंतर ओशो जैन यांचे लाईव्ह सादरीकरण झाले.
दिवस 2: बँड, सूर आणि लोकसंगीताच्या मिलाफाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले



दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीतू चंद्रा आणि निहारिका रायजादा यांनी केले ज्यात द बॅन्डिट्स (भारत ) आणि बीट्स ऑफ लव्ह (आंतरराष्ट्रीय ) यांच्यात बँड्सची चुरशीची लढत अनुभवायला मिळाली.

प्रतिभा सिंग बघेल आणि पाहुण्या कलाकारांचा समावेश असलेल्या 'सुरों का एकलव्य'ने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, तर वुसत इक्बाल खान यांनी वाह उस्ताद विभागांतर्गत मिट्टी की आवाज हे फोक अँड फ्यूजन सादर केले.
दिवस 3: सूफी, भक्ती आणि ऊर्जेने ओतप्रोत सादरीकरण



तिसऱ्या दिवशी निहारिका रायजादा यांनी सूत्रसंचालन केलेल्या कार्यक्रमात MH43 (भारत) आणि द स्वस्तिक (आंतरराष्ट्रीय) यांच्यात सांगीतिक स्पर्धा पार पडली.

सुरों का एकलव्य कार्यक्रमात प्रतिभा सिंग बघेल यांच्या नेतृत्वाखाली भावपूर्ण सादरीकरण झाले. त्यानंतर वाह उस्ताद ने सुफी आणि भक्ती - इश्क और भक्ती की एक सूर याचे सादरीकरण केले, ज्याने प्रेक्षकांना भक्ती आणि संगीत नैपुण्याची अनुभूती दिली.
दिवस 4: लोककला, सिनेमा फ्यूजन आणि भव्य समारोपाने भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा केला

शेवटच्या संध्याकाळी निहारिका रायजादा यांनी सूत्रसंचालन केलेल्या कार्यक्रमात द वैरागी (इंडिया) आणि नाईट्स यांच्यात बँड्सची जुगलबंदी रंगली.

प्रेक्षकांनी देवांचल की प्रेम कथा या लाईव्ह हिमाचली लोकगीताचा आनंद घेतला, ज्यात रझा मुराद, अथर हबीब, कीर्ती नागपुरे, दिनेश वैद्य, मिलन सिंग आणि अदिती शास्त्री हे कलाकार होते.


वाह उस्ताद फिनाले - राग आणि सिनेमा फ्यूजन: सूर से सिनेमा तक - ने शास्त्रीय कौशल्य आणि सिनेमॅटिक सुरांचे एकत्रीकरण केले आणि उत्सवाचा भव्य समारोप झाला.

चारही संध्याकाळचे कार्यक्रम डीडी भारती वर थेट प्रक्षेपित करण्यात आले , वेव्हज ओटीटी वर प्रसारित करण्यात आले आणि डीडी नॅशनल वर क्षणचित्रे सादर करण्यात आली. इफ्फीएस्टा 2025 चा समारोप उत्साही सादरीकरणे आणि हृदयस्पर्शी क्षणांनी झाला, ज्यातून इफ्फीची कलात्मक विविधता आणि सांस्कृतिक ऊर्जा प्रतिबिंबित होते. महोत्सव संपला तरीही इफ्फीएस्टाचा आनंद, लय आणि सिनेमॅटिक भावना प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत राहील.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/सुषमा काणे/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2194855
| Visitor Counter:
6