पंतप्रधान कार्यालय
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवाची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली सामायिक
Posted On:
25 NOV 2025 11:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवाची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली. अयोध्येतील पवित्र श्री रामजन्मभूमी मंदिराच्या शिखरावर त्यांनी समारंभपूर्वक भगवा ध्वज फडकावला. हा ध्वज मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेचे प्रतीक आहे आणि सांस्कृतिक उत्सव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा एक नवीन अध्याय सुरू करणारा आहे. पंतप्रधान मोदी यांनी महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहल्या, निषादराज गुहा आणि माता शबरी यांच्याशी संबंधित मंदिरे असलेल्या सप्तमंदिरांना भेट दिली. यानंतर शेषावतार मंदिर आणि माता अन्नपूर्णा मंदिराला भेट देवून , त्यांनी दर्शन घेतले. पंतप्रधानांनी राम दरबार गर्भगृहात दर्शन आणि पूजा केली, त्यानंतर रामलल्लाचे गर्भगृहात जावून दर्शन घेतले.
‘एक्स’ या समाजमाध्यमवरील पोस्टमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की :
"आज, अयोध्येतील रामलल्ला मंदिरात ध्वजारोहण समारंभाच्या आधी, मंदिर संकुलातील सात मंदिरांना भेट देण्याचे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचे सद्भाग्य मला लाभले. महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहल्या, निषादराज आणि माता शबरी ही सात मंदिरे आपल्याला भगवान रामाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी योग्य,पात्र बनवतात तसेच आपल्याला ज्ञान आकलनाची शक्ती आणि भक्ती प्रदान करतात."
"सात मंदिरांमधील सर्व सात ऋषी आणि महान भागवतांच्या उपस्थितीनेच रामचरित पूर्ण होते. महर्षी वसिष्ठ आणि महर्षी विश्वामित्रांनी भगवान रामाच्या शिक्षणाची लीला पूर्ण केली. वनवासात असताना महर्षी अगस्त्य यांच्याशी श्रीरामाने ज्ञानविषयक चर्चा केली आणि राक्षसांच्या दहशतीचा नाश करण्याचा मार्ग मुक्त झाला. आदिकवी महर्षी वाल्मिकी यांनी जगाला अलौकिक रामायण दिले. देवी अहल्या, निषादराज आणि माता शबरी यांनी महान भक्तीची उदाहरणे सादर केली आणि आम्हाला भगवान रामाच्या सुसंवादी आदर्शाची ओळख झाली. यात त्यांनी स्वतः म्हटले आहे - कह रघुपति सुनु भामिनि बाता। मानउँ एक भगति कर नाता॥”
"आज, अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात धर्मध्वजारोहण उत्सवापूर्वी, मंदिर परिसरातील सप्त मंदिर संकुलात प्रार्थना करून, आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली."
"महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहल्या, निषादराज आणि माता शबरी यांना समर्पित ही सात पवित्र मंदिरे आपल्याला ज्ञान आणि भक्ती दोन्ही देतात. हीच दैवी कृपा आपल्याला प्रभु श्री रामांच्या आदर्शांचे अनुसरण करण्यास पात्र होण्यास मदत करते."
"अयोध्येच्या पवित्र तीर्थक्षेत्रातील श्री रामजन्मभूमी मंदिरावरील ध्वजारोहण समारंभात सहभागी होणे हा मला अतिशय भावूक करणारा एक अनुभव होता. शुभ मुहूर्तावर पार पडलेले हे अनुष्ठान आपल्यादृष्टीने सांस्कृतिक अभिमानाचा विषय आहे. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेच्या एका नवीन अध्यायाचा शुभारंभ झाला आहे. राम मंदिराचा गौरवशाली ध्वज विकसित भारताच्या नवजागरणाची संस्थापना आहे. हा ध्वज धोरण आणि न्यायाचे प्रतीक बनावा, हा ध्वज सुशासनाद्वारे समृद्धीचा मार्ग ठरावा आणि हा ध्वज सदैव याच स्वरूपात फडकत राहो , विकसित भारताची ऊर्जा बनो... अशी मी भगवान श्री रामाच्या चरणी कामना व्यक्त करतो. जय जय सीयाराम."
"श्री रामजन्मभूमी मंदिरावरील धर्मध्वजारोहण सोहळा पाहण्याच्या क्षणाची भारतातील आणि जगातील कोट्यवधी लोक वाट पाहत होते, तो क्षण आज सर्वांनी अनुभवला आहे. अयोध्येत इतिहास रचला गेला आहे आणि या कार्यक्रमातून आपल्याला प्रभू श्री राम यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे चालण्यासाठी प्रेरणा मिळते."
"आज, मला अयोध्येतील माता अन्नपूर्णा मंदिरात पूजा करण्याचे सद्भाग्य मिळाले. मी माझ्या सर्व देशवासीयांच्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी देवीला प्रार्थना केली. माता अन्नपूर्णा धनधान्य, आनंद आणि अभय यांची अधिष्ठात्री - देवता आहे. मी प्रार्थना करतो की या अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने विकसित भारताच्या प्रत्येक प्रयत्नांना वैभव आणि सद्भाग्य मिळावे आणि प्रेरणा मिळावी."
"दिव्य श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री राम परिवाराचे – रामपंचायतनचे दर्शन घेण्याचे सद्भाग्य मला मिळाले. या क्षणाने मला श्रद्धा आणि भक्तीने भरून टाकले. भगवान श्री राम, माता जानकी, शेषावतार लक्ष्मण जी आणि संपूर्ण कुटुंबाचे हे दिव्य रूप भारताच्या चेतनेचे जिवंत स्वरूप आहे. हे असंख्य रामभक्तांच्या तपश्चर्येचे फळ आहे. मी प्रार्थना करतो की, भगवान श्री रामांच्या दिव्य आशीर्वादामुळे सर्व भारतीयांना जीवनात यश आणि कीर्ती लाभावी."
"अयोध्येच्या पवित्र भूमीवरील भव्य- दिव्य श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्ला यांना पाहण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा दिव्य क्षण अनुभवल्यामुळे माझे हृदय अपार आनंदाने भरून गेले आहे. रामलल्लाची ही बालमूर्ती भारताच्या चेतनेचे जागृत रूप आहे. प्रत्येक वेळी, रामलल्लाची ही दिव्यमूर्ती मला अफाट ऊर्जा देण्याचे माध्यम बनते. ही ऊर्जा जगभरातील रामभक्तांचा संकल्प आहे. आजचा ध्वजारोहण उत्सव या संकल्पाच्या पूर्ततेचा एक प्रसंग बनला आहे. प्रभु कीं कृपा भयउ सबु काजू। जन्म हमार सुफल भा आजू॥”
"श्री रामलल्ला मंदिराच्या गर्भगृहाची अनंत ऊर्जा आणि त्यांची दिव्य शक्ती धर्मध्वजाच्या रूपात दिव्य आणि भव्य श्री रामजन्मभूमी मंदिरात स्थापित झाली आहे. हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही तर भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचे प्रतीक आहे."
"राम मंदिराचे दिव्य प्रांगण भारताच्या सामूहिक शक्तीचे चेतनास्थान बनत आहे याचा मला खूप आनंद आहे. मी प्रत्येक नागरिकाला येथील सप्तमंदिराला भेट देण्याचे आवाहन करतो, जे केवळ आपल्या श्रद्धाच नव्हे तर मैत्री, कर्तव्य आणि सामाजिक सौहार्द या मूल्यांचे प्रतिबिंब देखील दर्शवते."
"राम हे एक मूल्य, एक मर्यादा, एक दिशा आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित आणि समाजाला बळकट करण्यासाठी आपण आपल्या आत राम स्थापित केला पाहिजे."
"म्हणूनच मी म्हणतो की जर आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असला पाहिजे..."
"राम भारतातील प्रत्येक घरात, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आणि भारताच्या प्रत्येक कणात आहे. परंतु गुलामगिरीची मानसिकता इतकी प्रबळ झाली की भगवान राम यांनाही काल्पनिक घोषित केले जाऊ लागले."
"आपल्याला रामराज्याने प्रेरित भारत निर्माण करायचा आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा स्वयंहितापूर्वी राष्ट्रीय हित ठेवले जाते आणि राष्ट्रीय हित सर्वोपरि असते."
* * *
सोनाली काकडे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
(Release ID: 2194578)
Visitor Counter : 4