पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे 26 नोव्हेंबर रोजी करणार उद्घाटन
सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया, ही सफ्रानची लीप इंजिनसाठीची एमआरओ सुविधा
ग्लोबल इंजिन ओईएमने भारतात एमआरओ संचालन सुरू करण्याची ही पहिलीच वेळ
एमआरओ सुविधा हवाई उड्डाण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या उद्दिष्टाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार
Posted On:
25 NOV 2025 7:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन करतील.
सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय), ही सफ्रानची लीप(LEAP-Leading Edge Aviation Propulsion) इंजिनसाठीची एमआरओ अर्थात देखभाल आणि दुरुस्ती सुविधा आहे. ही इंजिन्स एअरबस 320neo आणि बोईंग 737 MAX विमानांना बळ पुरवतात. या सुविधेचा प्रारंभ हा एक मैलाचा टप्पा आहे. कारण,ही जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या विमान इंजिन एमआरओ सुविधांपैकी एक आहेच, शिवाय एखाद्या जागतिक इंजिन ओईएम (Original Equipment Manufacturer-मूळ उपकरण निर्माता ) ने भारतात एमआरओ संचालन सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझमध्ये 45,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेली, सुमारे ₹1,300 कोटींच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह विकसित केलेली ही अत्याधुनिक सुविधा आहे. दरवर्षी 300 लीप इंजिनना सेवा देण्यासाठी आखलेली, सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधा, 2035 पर्यंत पूर्ण कार्यक्षमता प्राप्त केल्यानंतर 1,000 हून अधिक उच्च कुशल भारतीय तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना रोजगार देईल. या सुविधेत जागतिक दर्जाच्या इंजिन देखभाल आणि दुरुस्ती सेवा देण्यासाठी प्रगत प्रक्रिया उपकरणे असतील.
ही एमआरओ सुविधा विमानचालन क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या उद्दिष्टाच्या दिशेने एक मोठे पाऊल असेल. एमआरओमध्ये स्वदेशी क्षमता विकसित केल्याने परकीय चलनाचा बाहेर जाणारा ओघ कमी होईल, उच्च-मूल्य रोजगार निर्माण होईल, पुरवठा-साखळी लवचिकता मजबूत होईल आणि भारताला जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून स्थान मिळेल. केंद्र सरकार या क्षेत्राच्या वेगवान वाढीला पाठबळ देण्यासाठी एक मजबूत एमआरओ परिसंस्था तयार करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. सरकारच्या प्रमुख धोरणात्मक उपक्रमांमध्ये 2024 मधील जीएसटी सुधारणा, एमआरओ मार्गदर्शक तत्त्वे 2021 आणि राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरण 2016 यांचा समावेश आहे. कर संरचना तर्कसंगत करून आणि रॉयल्टीचा भार कमी करून एमआरओ प्रदात्यांसाठी परिचालन सुलभ करण्यात आले आहे.
निलीमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2194260)
Visitor Counter : 9