बालमनावरील खोलवर आघात ते न्यायिक विजय: 12 वर्षांच्या चिमुरड्या 'कार्ला'च्या सशक्त कथेने इफ्फी-2025 मध्ये सिनेप्रेमींना मंत्रमुग्ध केले
फुकीच्या नजरेतून: 'रेनोयर' बालपणीचे आश्चर्य आणि गुंतागुंत यांचे चित्रण करते
#IFFIWood, 23 नोव्हेंबर 2025
12 वर्षांच्या कार्लाच्या धाडसी न्यायालयीन संघर्षापासून ते 11 वर्षांच्या फुकीच्या लहरी, कल्पनारम्य जगापर्यंत, इफ्फीचे पडदे हृदयात रेंगाळणाऱ्या कथा आणि या हृदयस्पर्शी कथांमागील प्रवासांनी झळाळून निघाले, जिथे साहस, कुतूहल आणि कल्पनाशक्ती बालपणीच्या कसोट्यांना सिनेमॅटिक विजयात रूपांतरित करते.
56 व्या इफ्फीमध्ये आज एक लक्षवेधक पत्रकार परिषद झाली, ज्यात कार्लाच्या दिग्दर्शक क्रिस्टीना थेरेसा टूर्नाट्झेस आणि रेनॉयरच्या सह-निर्मात्या क्रिस्टोफ ब्रंचर यांनी त्यांच्या प्रशंसित चित्रपटांमागील कथा सामायिक केल्या.

कार्ला: सत्य आणि प्रतिष्ठेसाठी बालकांचा लढा

दिग्दर्शिका क्रिस्टीना थेरेसा टूर्नाट्झेस यांनी कार्लाला पडद्यावर जिवंत करण्याचा नाजूक आणि भावनिक प्रवास उलगडून सांगितला. हा चित्रपट 12 वर्षांच्या कार्लाची दुःखदायक सत्यकथा सांगतो, जी एक धाडसी मुलगी आहे आणि न्यायालयात तिच्या अत्याचारी वडिलांना सामोरी जाते. अवघ्या दोन साक्षीदारांसह, हा खटला "शब्दाविरुद्ध शब्द" ची तणावपूर्ण लढाई बनतो आणि कार्लासाठी, आपल्या आघाताचे वर्णन करणे हृदय पिळवटून टाकणारे आणि अतिशय आव्हानात्मक असे दोन्ही आहे.
हा चित्रपट कार्लाचा दृष्टिकोन जवळून दाखवतो, जो आघातामुळे निर्माण झालेली शांतता, संकोच आणि निःशब्दता अधोरेखित करतो. न्यायाधीश एक निर्णायक व्यक्ती बनतो, अशी एकमेव व्यक्ती जो खरोखर ऐकतो आणि कार्लाला तिचा आवाज शोधण्यास मदत करतो. कथेची प्रामाणिकता कौटुंबिक इतिहासात रुजलेली आहे आणि कार्लाचा एक नातेवाईक या कथेसह मोठा झाला आहे आणि तिला आयुष्यभराच्या प्रकल्पात रूपांतरित केले आहे आणि अखेरीस पडद्यावर आणले आहे.
क्रिस्टीनाने चित्रपटाची सार्वत्रिक प्रासंगिकता अधोरेखित केली. बालकांवरील लैंगिक अत्याचार ही एक व्यापक जागतिक समस्या आहे आणि बालकांची प्रतिष्ठा काळजीपूर्वक जपताना कार्ला हा चित्रपट पीडितेच्या कथेवर लक्ष केंद्रित करतो.
तिने म्युनिकमध्ये झालेल्या या चित्रपटाच्या प्रीमियरवरही मत व्यक्त केले आणि त्याचे "होम रन" असे वर्णन केले आणि इफ्फी मध्ये पहिल्यांदाच भारतात तो सादर करण्याचा आनंद सामायिक केला. 12- वर्षांच्या मुख्य कलाकारासोबत काम करताना, क्रिस्टीनाने एक सुरक्षित आणि पोषक वातावरण तयार करण्यावर भर दिला, ज्यामुळे बाल कलाकाराचा अभिनय सहज, प्रामाणिक आणि आकर्षक राहील.
रेनॉयर : एका मुलाच्या जादुई कल्पनेतून जग पाहणे

सह-निर्माता क्रिस्टोफ ब्रंचर यांनी रेनॉयरच्या पडद्यामागील एक आकर्षक झलक सादर केली, हा चित्रपट 11 वर्षांच्या फुकीच्या डोळ्यांमधून बालपणीचे मोहक जग टिपतो.
हे शीर्षक प्रसिद्ध फ्रेंच चित्रकाराकडे इशारा करते, मात्र ब्रंचर यांनी स्पष्ट केले की, "हा चरित्रपट नाही. एखाद्या प्रभावशाली चित्राप्रमाणे, ही कथा छोट्या छोट्या विखुरलेल्या क्षणांनी बनलेली आहे जी एकत्र पाहिल्यावर एक समृद्ध भावनिक चित्र तयार होते. यामुळेच हा चित्रपट जिवंत आणि काव्यात्मक वाटतो."
1987 मधील जपानच्या आर्थिक भरभराटीच्या काळातली टोकियोची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट रेनॉयर फुकी नावाच्या एका संवेदनशील आणि जिज्ञासू मुलीची कथा आहे जी तिच्या वडिलांच्या गंभीर आजाराचा आणि तिच्या आईच्या वाढत्या ताणाचा सामना करत असते . तिचे एकाकीपण आणि वाढत्या वयाच्या दबावाचा सामना करण्यासाठी, ती कल्पनाशक्ती, टेलिपथी आणि खेळकर प्रयोगांच्या जादुई जगात परत जाते -इतकी की डेटिंग हॉटलाइनवरही कॉल करते!
ब्रंचर यांनी फुकीच्या प्रवासाची सार्वत्रिकता अधोरेखित केली. “आम्हाला हे टिपायचे होते की मुले त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत तर्काने मोठ्या, प्रौढांच्या समस्या कशा हाताळतात. फुकीची कल्पनाशक्ती ही जगाला समजून घेण्याचा तिचा मार्ग आहे,” असे ते म्हणाले.
हा चित्रपट बालपण, कुटुंब आणि सामाजिक बदलांच्या कडू-गोड वास्तवांचा नाजूकपणे शोध घेतो, असे ब्रंचर म्हणाले. “फुकीची भूमिका साकारणारी लहानगी अभिनेत्री खरोखरच विलक्षण आहे—तांत्रिकदृष्ट्या सक्षम, सहज अभिनय करणारी आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी. जरी तीचा कान्समधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार थोडक्यात हुकला असला तरी, तिला आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे तिच्या उल्लेखनीय प्रतिभेची चुणूक पुन्हा एकदा दिसून आली आहे,” असे ते म्हणाले.
रेनॉयर हा चित्रपट बालपणातील कौतुक, कुतूहल आणि धैर्याचा उत्सव आहे, जो प्रेक्षकांना खेळ आणि जीवनातील कठोर वास्तव यांच्यातील नाजूक संतुलनातून मार्ग काढणाऱ्या एका बालकाच्या दृष्टिकोनातून जग पाहण्यास आमंत्रित करतो.
चित्रपटाबद्दल
1. कार्ला
जर्मनी | 2025 | जर्मन | 104' | रंगीत

कार्ला हा 1962 मध्ये म्युनिकमध्ये घडलेल्या वास्तविक घटनेवर आधारित एका भावनिक नाट्य आहे. हा चित्रपट 12 वर्षांच्या कार्लाची खरी कहाणी सांगतो, जी तिच्या अत्याचारी वडिलांविरुद्ध धैर्याने आरोप दाखल करते आणि वर्षानुवर्षे होणाऱ्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण मिळवते. बाल पीडितांना अनेकदा दुर्लक्षित करणाऱ्या न्यायव्यवस्थेतून मार्ग काढताना, कार्ला आपली कहाणी स्वतःच्या पद्धतीने सांगण्यावर ठाम राहते, आणि एक न्यायाधीश तिचा प्रमुख समर्थक बनतो. हा चित्रपट लैंगिक आघाताची वेदना आणि एका मुलीचे धैर्य तसेच प्रतिष्ठेसाठीची तिचा संघर्ष दाखवतो, कार्लाच्या आवाजाचा सन्मान राखत – कोणत्याही प्रकारच्या भडक किंवा अश्लील चित्रणाशिवाय…
2. रेनॉयर
जपान, फ्रान्स, सिंगापूर, फिलीपिन्स, इंडोनेशिया, कतार | 2025 | जपानी | 116’ | रंगीत

1987 मध्ये, जपानच्या आर्थिक भरभराटीच्या काळात टोकियो येथे घडणारी कथा असणारा हा चित्रपट 11 वर्षांच्या फुकीची कथा सांगतो, जी एक जिज्ञासू आणि संवेदनशील मुलगी आहे जी तिच्या मृत्यूशय्येवर असलेल्या वडिलांशी आणि तणावग्रस्त आई उताको ओकिता यांच्याशी झुंजते. तिचे पालक भावनिक आणि आर्थिक दबावांना तोंड देत असताना, फुकी तिच्या स्वतःच्या जगात आश्रय घेते, जादूचा शोध घेते, टेलिपॅथी करते आणि डेटिंग हॉटलाइनवर कॉल करते. ती एकटेपणा, मोठी होण्याच्या यातना अनुभवते आणि मैत्री करताना तसेच प्रौढ जगातील आव्हानांना सामोरे जाताना स्वतःमध्ये सतत बदल घडवते. हा चित्रपट तिच्या शांत पण धाडसी प्रवासाचे चित्रण करतो, - वियोग, वाढ, बालपणातील कडवट गोड गुंतागुंत, कौटुंबिक संघर्ष आणि सामाजिक बदल यांना सामोरे जाणाऱ्या तिच्या आयुष्याचे दर्शन घडवतो.
संपूर्ण पत्रकार परिषद येथे पहा :
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, Click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | शैलेश पाटील/सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2193268
| Visitor Counter:
8