जपानचे कंट्री फोकस चित्रपट "टायगर" आणि "सीसाइड सेरेंडिपिटी" माध्यमांबरोबर संवादात केंद्रस्थानी
कंट्री फोकस जपान: "टायगर" आणि "सीसाइड सेरेंडिपिटी" च्या टीमचा इफ्फीमध्ये माध्यमांशी संवाद
#IFFIWood, 23 नोव्हेंबर 2025
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मधील कंट्री फोकस जपानने आज सर्वांचे लक्ष वेधून घेतले, त्यांच्या "टायगर" आणि "सीसाइड सेरेंडिपिटी" या दोन चित्रपटांच्या कलाकारांनी आणि क्रूने खास आयोजित एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. चित्रपट निर्मात्यांनी त्यांचा सर्जनशील प्रवास, संकल्पना आधारित प्रेरणा आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जपानचे प्रतिनिधित्व करण्याचे महत्त्व याबद्दल आपले विचार सामायिक केले ज्यामुळे या वर्षीच्या कंट्री फोकस शोकेसची खोली आणखी वाढली.
पत्रकार परिषदेची सुरुवात दोन्ही चित्रपटांच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाने झाली, त्यानंतर टायगरचा क्रू त्यांच्या चित्रपटाची माध्यमांना ओळख करून देण्यासाठी स्टेजवर आला.

"टायगर" हा चित्रपट मालिश करणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीची कथा सांगतो, ज्याचा मालमत्तेच्या मालकीवरून त्याच्या बहिणीशी सततचा संघर्ष त्याला एका गंभीर टप्प्यावर घेऊन जातो, ज्यामुळे नैतिक सीमा धूसर होतात. ही कथा एलजीबीटीक्यू + समुदायासमोरील आव्हाने देखील अधोरेखित करते ज्यामुळे ओळख, हक्क आणि सामाजिक स्वीकृतीचे मुद्दे समोर येतात.
माध्यमांना संबोधित करताना, चित्रपटाचे दिग्दर्शक अंशुल चौहान यांनी चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान सामोरे जावे लागलेल्या सर्जनशील आणि भावनिक गुंतागुंतींबद्दल सांगितले. अशा संवेदनशील विषयाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद लाभेल याची त्यांना सुरुवातीला भीती वाटली कारण एलजीबीटीक्यू नसलेला चित्रपट निर्माता म्हणून एलजीबीटीक्यू समस्या मांडण्यासाठी त्या समुदायाप्रती अधिक जबाबदारी, संवेदनशीलता आणि आदर आवश्यक आहे.

माध्यमांशी संवाद साधताना “सीसाइड सेरेन्डिपिटी” चे कार्यकारी निर्माते तोमोमी योशिमुरा यांनी त्यांचे अनुभव आणि सर्जनशील प्रवासाचे वर्णन केले. भारतीय प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड कौतुकाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, त्यांचा जिव्हाळा आणि उत्साहामुळे इफ्फीमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन अधिक अर्थपूर्ण झाले असे त्यांनी नमूद केले.
संवादादरम्यान, तोमोमी यांनी चित्रपटामागील मुख्य विषयाचा दृष्टिकोन अधोरेखित केला . मुले आणि प्रौढांमधील पिढीजात अंतर कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही कथा वयोगटातील सामंजस्य वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये तरुण आणि वृद्ध दोघांनाही प्रतिध्वनीत करणारे दृष्टिकोन सादर केले आहेत.

एका शांत समुद्रकिनारी वसलेल्या शहरात चित्रित सीसाईड सेरेंडिपिटी हा चित्रपट दीर्घकाळापासून राहत असलेल्या निर्वासित समुदायाचे चित्रण करतो ज्यांचे जीवन कलाकारांच्या आगमनाने आणि असामान्य घटनांच्या मालिकेने प्रभावित होते. मध्यमवयीन विद्यार्थी सोसुके आणि सतत बदलणाऱ्या शहरावर केंद्रित, ही कथा हृदयस्पर्शी दृश्यांच्या माध्यमातून मुलांचा दृढ संकल्प आणि अर्थाच्या शोधात असलेले प्रौढ यावर प्रकाश टाकते. अपूर्ण तरीही कोमल पात्रांचे चित्रण करणारा, हा चित्रपट प्रेम आणि नातेसंबंध यांचा उत्सव साजरा करतो आणि संपूर्ण महोत्सवात तो प्रेक्षकांना आकर्षित करत राहील अशी आशा टीमने व्यक्त केली.

“सीसाईड सेरेंडिपिटी” चा ट्रेलर
"टायगर" चा ट्रेलर
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, Click on:
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2191742
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2190381
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2193217
| Visitor Counter:
10