शरीराची लपलेली भाषा उलगडताना: विनय कुमार यांनी इफ्फीला मोहित केले श्वास-भावनांच्या प्रवासातून
एक मास्टरक्लास जिथे भेट होते प्राचीन ज्ञान आणि आधुनिक वास्तवांची
मनोरंजक सराव आणि सादरीकरणांनी प्रेक्षकांना दिली आनंदानुभूती
#IFFIWood, 22 नोव्हेंबर 2025
'आदिशक्ती'चे नाट्यगुरु विनय कुमार के जे यांच्या नेतृत्वाखालील 'ब्रेथ अँड इमोशन: अ मास्टरक्लास ऑन परफॉर्मन्स' हा कार्यक्रम या वर्षी इफ्फीमध्ये बौद्धिकदृष्ट्या सर्वाधिक चालना देणाऱ्या आणि तल्लीन करणाऱ्या सत्रांपैकी एक म्हणून गाजला. दिवंगत नाट्यगुरू वीणापाणी चावला यांचे शिष्य आणि आदिशक्ती प्रयोगशाळेच्या नाट्यकला संशोधनाचे कलात्मक संचालक विनय यांनी रंगमंचावर परंपरा आणि मूर्त ज्ञानाचे एक विशिष्ट मिश्रण सादर केले.
सत्र सुरू होण्यापूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात यांनी वक्त्यांचा सत्कार केला. त्यानंतर एक मास्टरक्लास झाला जो व्यासपीठ आणि प्रेक्षकांच्या सीमा ओलांडून पलीकडे गेला. विनय वारंवार स्टेजवरून उतरत, प्रेक्षकांशी थेट संवाद साधत, प्रश्न विचारत, लक्षपूर्वक ऐकत आणि सभागृहाला चिंतन-मनन करायला लावत होते.

विनय यांनी सत्राची सुरुवात श्रोत्यांना भावनेच्या कल्पनेवर पुनर्विचार करण्यास प्रवृत्त करून केली. त्यांनी नमूद केले की, लोक बहुतेकदा एकाच छताखाली राहतात परंतु एकमेकांच्या भावनिक जगाबद्दल त्यांना माहिती नसते. दशकांपूर्वी ज्या भावना निर्माण झाल्या होत्या त्या आज कदाचित प्रासंगिक नसतील, कारण विशेष करून भावना या काळ, संदर्भ आणि सांस्कृतिक परिस्थितीनुसार विकसित होतात.
त्यानंतर ते भावना जाणण्यातील तसेच व्यक्त करण्यातील शरीराच्या भूमिकेकडे वळले, त्यांनी असे सुचवले की आपल्या कोणत्याही शारीरिक हालचाली पूर्णपणे अंतर्ज्ञानी नसतात. सामाजिक जागांपासून ते सार्वजनिक वातावरणापर्यंत, आपले हावभाव शिकलेल्या वर्तनांनी आकार घेतात. म्हणूनच, भावना केवळ अंतर्गतच जाणवत नाहीत तर बाह्यरीत्या व्यक्तदेखील केल्या जातात, बहुतेकदा जाणीव नसतानाही.
मास्टरक्लासच्या सर्वात उल्लेखनीय भागांपैकी एकात विनय यांनी असा युक्तिवाद केला की मेंदू नव्हे तर श्वास हा मानवी यांत्रिकींचा प्राथमिक नियंत्रक आहे. प्रत्येक श्वास दाब निर्माण करतो; दाबातील प्रत्येक बदल स्नायूंच्या क्षमतेत बदल करतो. ही शारीरिकता, त्यांनी स्पष्ट केले की, आपण ज्याला भावना म्हणतो तिचा आधार बनते. 72 बीपीएम हृदय गती संतुलन दर्शवू शकते, तर याहून कमी किंवा जास्त श्रेणी नैराश्य, भीती किंवा क्षोभ दर्शवते. या चौकटीत मानसिक व्याख्या बनण्यापूर्वी भावना ही एक शारीरिक प्रतिक्रिया बनते.

विनय यांनी या कल्पनांना प्राचीन भारतीय ज्ञान प्रणालींशी जोडले, प्रेक्षकांना आठवण करून दिली की सुरुवातीच्या डॉक्टरांनी, विशेषतः आयुर्वेदात, शरीराच्या रक्ताभिसरण आणि अंतर्गत लयीद्वारे भावनांचा अभ्यास केला. तथापि, आज व्यक्ती अभूतपूर्व भावनिक गुंतागुंतीमध्ये जगत असतात, एक ओझे वाहतात जे नैसर्गिकरित्या वाहून नेण्यासाठी मानवी शरीराची रचना झालेली नाही.
या पायावर उभारणी करून विनय यांनी श्रोत्यांना नवरसामध्ये नेले, प्रत्येक रसाची शारीरिक प्रतिक्रिया, श्वासाची पद्धत आणि स्नायूंची विशिष्ट छाप कशी असते हे स्पष्ट केले. विनय यांनी अशा सूक्ष्म लयींवर देखील चर्चा केली ज्यांच्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो: उदाहरणार्थ श्रोत्याचा होकार, वक्त्याचे हातवारे आणि भावनिक संवादाचे मार्गदर्शन करणारे श्वासोच्छवासाचे संकेत.

प्रात्यक्षिके, सराव आणि सतत संवाद याद्वारे विनय कुमार यांनी बौद्धिकदृष्ट्या समृद्ध आणि अनुभवात्मकदृष्ट्या आधारभूत असा मास्टरक्लास सादर केला. सहभागींना श्वास, शरीर आणि भावना यांचे एकत्र कार्य कसे चालते, याची सखोल समज मिळाली, हे ज्ञान केवळ कलाकारांसाठीच नाही तर मानवी स्थिती अधिक पूर्णपणे समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56new/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2193099
| Visitor Counter:
8