पंतप्रधान कार्यालय
जी 20 शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन – सत्र 1
Posted On:
22 NOV 2025 6:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 22 नोव्हेंबर 2025
महोदय, नमस्कार!
सर्वप्रथम जी 20 शिखर परिषदेच्या दिमाखदार आयोजनासाठी आणि यशस्वी अध्यक्षतेसाठी राष्ट्रपती रामाफोसा यांचे अभिनंदन!
दक्षिण अफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली कुशल कामगार स्थलांतर, पर्यटन, अन्न सुरक्षा, कृत्रिम बुद्धीमत्ता, डिजिटल अर्थव्यवस्था, नवोन्मेष आणि महिला सक्षमीकरण यासारख्या क्षेत्रांमध्ये चांगले काम झाले आहे.
नवी दिल्लीत झालेल्या जी 20 शिखर परिषदेत जे ऐतिहासिक उपक्रम सुरू करण्यात आले होते, ते इथेही सुरू ठेवण्यात आले आहेत.
मित्रांनो,
गेल्या काही दशकांमध्ये जी 20 संघटनेने जागतिक अर्थसहाय्य आणि जागतिक आर्थिक विकासाला दिशा दिली आहे. मात्र विकासाच्या ज्या मानकांनुसार आतापर्यंत काम झाले आहे; त्यामुळे खूप मोठ्या लोकसंख्येला संसाधनांपासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय निसर्गाचे अतिरिक्त शोषणही झाले आहे. अफ्रिकेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. आज अफ्रिकेत पहिल्यांदाच जी 20 शिखर परिषद होत असताना विकासाच्या मानकांचा नव्याने विचार करणे आवश्यक आहे.
यावरचा एक उपाय भारताच्या सांस्कृतिक मूल्यांमध्ये सापडतो. तो मार्ग समावेशक मानवतेचा आहे. म्हणजेच मानव, समाज आणि निसर्ग यांना एकाच घटकाच्या रुपात पाहिले जाणे आवश्यक आहे. तेव्हाच निसर्ग आणि विकास यांच्यामध्ये समतोल साधला जाईल.
मित्रांनो,
जगात असे अनेक समुदाय आहेत ज्यांनी आपली पारंपरिक आणि पर्यावरणपूरक जीवनशैली आजही जपली आहे. या परंपरांमध्ये शाश्वतता तर आहेच; शिवाय सांस्कृतिक ज्ञान, सामाजिक एकता आणि निसर्गाप्रती आदरभावनादेखील आहे.
जी 20 संघटनेअंतर्गत एक जागतिक पारंपरिक ज्ञान भांडार निर्माण केले जावे असा भारताचा प्रस्ताव आहे. याची संरचना भारतातील भारतीय ज्ञान प्रणाली उपक्रमानुसार केली जाऊ शकते. हा जागतिक मंच मानवतेविषयीचे एकत्रित ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यात मदत करेल.
मित्रांनो,
आफ्रिकेचा विकास आणि आफ्रिकेच्या तरुण प्रतिभावंतांना सक्षम बनवणे संपूर्ण जगासाठी हितकारक आहे. म्हणूनच भारत जी-20 आफ्रिका कौशल्य वृद्धी उपक्रमाचा प्रस्ताव मांडतो आहे. हा उपक्रम वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी ‘ट्रेन द ट्रेनर’ प्रारुपांतर्गत चालवता येईल. आणि जी-20 चे सर्व भागीदार देश या उपक्रमाला आर्थिक मदत करु शकतात, सहकार्य करु शकतात.
आगामी दशकात आफ्रिकेत 10 लाख प्रमाणीत प्रशिक्षक तयार करणे, हे आमचे सामूहिक उद्दिष्ट आहे. हे प्रशिक्षण प्राप्त प्रशिक्षक भविष्यात कोट्यवधी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देतील. हा असा उपक्रम आहे ज्याचा भविष्यात द्विगुणीत प्रभाव पाहायला मिळेल. यामुळे स्थानिक क्षमता निर्माण होईल, आणि आफ्रिकेच्या दीर्घकालीन विकासाला बळ मिळेल.
मित्रांनो,
आरोग्य संबंधित आपत्कालीन परिस्थिती तसेच नैसर्गिक संकटांना तोंड देणे ही देखील आमची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच, जी-20 जागतिक आरोग्य सेवा प्रतिसाद समूहाची स्थापना करण्याचा प्रस्ताव भारत मांडत आहे. यामध्ये जी-20 सदस्य देशातील प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असेल. हा समूह कोणत्याही जागतिक आरोग्य समस्येला तोंड देण्यासाठी किंवा नैसर्गिक संकटाच्या काळी त्वरित तैनातीसाठी सज्ज असेल.
मित्रांनो,
आणखीन एक मोठी समस्या म्हणजे अंमली पदार्थांची तस्करी. विशेष करून फेंटेनिल सारख्या अत्यंत घातक अंमली पदार्थांचा वापर जलद गतीने वाढत आहे. ही बाब सार्वजनिक आरोग्य, सामाजिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेसाठी गंभीर आव्हान बनली आहे. हे दहशतवादाला अर्थसहाय्य करण्याचे एक मोठे माध्यम देखील आहे.
या जागतिक धोक्याचा प्रभावी पद्धतीने सामना करण्यासाठी भारत ‘अंमली पदार्थ - दहशतवाद साखळीला आळा घालण्यासाठी जी-20 उपक्रमा’चा प्रस्ताव मांडत आहे. या अंतर्गत आम्ही अर्थसहाय्य, प्रशासन आणि सुरक्षिततेशी संबंधित वेगवेगळी साधने एकत्र करू शकतो. या माध्यमातूनच अंमली पदार्थ - दहशतवाद साखळी खंडित केली जाऊ शकते.
मित्रांनो,
भारत आफ्रिका एकजुटता नेहमी मजबूत राहिली आहे. नवी दिल्ली शिखर परिषदे दरम्यान आफ्रिकन युनियन या समूहाचा एक स्थायी सदस्य बनणे हे खूप मोठे पाऊल होते. या भावनेचा विस्तार जी-20 च्या पुढे होणे आवश्यक आहे. सर्व जागतिक संस्थांमध्ये ग्लोबल साउथ चा आवाज बुलंद होवो यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.
खूप खूप धन्यवाद!
सुषमा काणे/सुरेखा जोशी/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2192944)
Visitor Counter : 11