पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचे तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मधील भाषण
Posted On:
19 NOV 2025 11:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2025
वणक्कम!
व्यासपीठावर उपस्थित तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एल मुरुगन जी, तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर के. रामासामी जी, निरनिराळ्या कृषी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आलेले सर्व मान्यवर आणि इतर सर्व लोकप्रतिनिधीवर्ग, माझे प्रिय शेतकरी बांधव आणि भगिनी तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्यासोबत सहभागी झालेले देशभरातील लाखो शेतकरी, त्यांनाही मी येथून वणक्कम म्हणतो, नमस्कार करतो आणि सगळ्यात आधी मी तुम्हा सर्वांची आणि देशभरातून जमलेल्या माझ्या शेतकरी बंधू-भगिनींची क्षमा मागतो. मला इथे येण्यासाठी जवळ जवळ एक तास उशीर झाला आहे, कारण मी आज पुट्टपर्थी इथे सत्य साई बाबांच्या कार्यक्रमात होतो, तिथला कार्यक्रम जरा जास्त वेळ लांबला, त्यामुळे मला यायला उशीर झाला, तुम्हा सर्वांची जी गैरसोय झाली, मला दिसते आहे की देशभरातील अनेक लोक इथे थांबून आहेत, याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.
मी जेव्हा पांडियन जी यांचं भाषण ऐकत होतो, मला वाटत होतं की, मला जर लहानपणी तामिळ शिकवलं असतं, तर मी आज त्या भाषणाचा खूप चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकलो असतो, पण मला ते भाग्य मिळालं नाही, पण जे काही मला थोडंफार समजत होतं, ते जल्लीकट्टू बद्दल बोलत होते, कोविडच्या काळात ज्या अडचणी येत होत्या त्याची चर्चा करत होते, पण मी रवीशजींना सांगितलं की पांडियनजी यांचं भाषण मला हिंदी आणि इंग्रजीमध्ये भाषांतरित करून पाठवा, मला ते वाचायचं आहे. मात्र मला त्यांची भावना पूर्णपणे लक्षात येत होती, मी ती अनुभवत होतो आणि माझ्यासाठी तो खूप चांगला क्षण होता. जेव्हा मी इथे व्यासपीठावर आलो, तेव्हा मी पाहत होतो की बरेच शेतकरी बंधू भगिनी, त्यांचा गमछा गोल गोल फिरवत होते, तेव्हा मला असं वाटलं की मी येण्याच्या अगोदर बिहारची हवा इथे येऊन पोहोचली आहे.
माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो,
कोईम्बतूरच्या या पावन भूमीत, सर्व प्रथम मी मरुद-मलई चे श्रद्धास्थान असलेल्या भगवान मुरुगन यांना वंदन करतो. कोईम्बतूर ही संस्कृती, करुणा आणि सर्जनशीलतेची भूमी आहे. हे शहर आपल्या दक्षिण भारताच्या उद्यम शक्तीचे ऊर्जा केंद्र आहे. इथल्या वस्त्रोद्योग क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेत खूप मोठा वाटा आहे आणि आता तर कोईम्बतूर आणखी एका गोष्टीसाठी विशेष झाले आहे, इथले माजी खासदार सी.पी.राधाकृष्णन जी, आता उपराष्ट्रपती या नात्याने आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत आहेत.
मित्रांनो,
नैसर्गिक शेती, हा असा विषय आहे, जो माझा अतिशय जिव्हाळ्याचा आहे. मी तामिळनाडूतील सर्व शेतकरी मित्रांना, दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेच्या अशा अभूतपूर्व आयोजनाबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो. आताच मी प्रदर्शन पाहायला गेलो होतो, तेव्हा मला बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलण्याची संधी मिळाली, त्यापैकी कोणी मेकॅनिकल इंजीनियरिंग करून, पी.एचडी करून शेती करत आहेत, कोणी नासामध्ये चांद्रयानावर काम करता करता नोकरी सोडून शेती करू लागला आहे, आणि ते फक्त स्वतःच शेती करत आहेत असं नाही तर अनेक शेतकरी देखील तयार करत आहेत, नवयुवकांना प्रशिक्षित करत आहेत. मी आज जाहीरपणे सांगतो की, जर आज मी या कार्यक्रमाला आलो नसतो तर, मी माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी चुकवल्या असत्या आणि आज इथे येऊन मला खूप काही शिकायला मिळालं आहे. तामिळनाडूतील शेतकऱ्यांमध्ये जे धारिष्ट्य आहे, बदल स्वीकारण्याची त्यांच्यामध्ये जी ताकद आहे, तिला मी मनापासून शतशः प्रणाम करतो. इथे शेतकरी बंधू-भगिनी, कृषी वैज्ञानिक, या उद्योगाशी संबंधित मंडळी, स्टार्ट अप्स आणि नवोन्मेषक सर्व जण एकत्र जमले आहेत. मी आपणा सर्वांचं खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आगामी काही वर्षांमध्ये भारतातील शेतीमध्ये अनेक मोठे बदल होण्याची चिन्हे मला दिसत आहेत. भारत नैसर्गिक शेतीचे जागतिक केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. आपली जैवविविधता नवा आकार घेत आहे, देशातील युवकही आता शेतीकडे आधुनिक, स्केलेबल संधी या दृष्टीकोनातून बघत आहेत. यामुळे देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला लवकरच फार मोठी ताकद मिळणार आहे.
माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो,
गेल्या 11 वर्षांमध्ये देशाच्या संपूर्ण कृषी क्षेत्रात खूप मोठे परिवर्तन झाले आहे. आपली कृषी निर्यात जवळ जवळ दुप्पट झाली आहे. शेती आधुनिक बनविण्यासाठी, सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचा प्रत्येक मार्ग खुला केला आहे. किसान क्रेडिट कार्ड- एकट्या KCC च्या माध्यमातून शेतकऱ्यांना 10 लाख कोटी रुपयांच्या वर मदत दिली गेली आहे. ही 10 लाख कोटी रुपयांची रक्कम खूप मोठी आहे. सात वर्षांपूर्वी पशुपालक आणि मत्स्यपालकांना KCC ची सुविधा उपलब्ध झाल्यापासून ते देखील याचा मोठ्या प्रमाणात लाभ करून घेत आहेत. जैव-खतांवरील जीएसटी कमी झाल्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आहे.
मित्रांनो,
आताच काही वेळापूर्वी, याच व्यासपीठावरून आम्ही देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता जारी केला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातील शेतकऱ्यांना 18 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. इथल्या तामिळनाडूतल्या लाखो शेतकऱ्यांच्या खात्यातही किसान सन्मान निधीचे पैसे जमा झाले आहेत.
मित्रांनो,
आतापर्यंत या योजनेंतर्गत, देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 4 लाख कोटी रुपयांची रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांकरिता शेतीशी संबंधित अनेक कामे पूर्ण करण्याचे साधन बनली आहे. मी या योजनेचे लाभार्थी असलेल्या कोट्यवधी शेतकरी बंधू भगिनींना खूप-खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. तिथे पाठीमागे, दोन लहान मुली प्लेकार्ड हातात धरून कधीच्या उभ्या आहेत, त्यांचे हात आता बहुतेक दुखायला लागले असतील, मी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगतो की, त्या बहुधा ते माझ्यासाठी घेऊन आल्या आहेत, ते त्यांच्याकडून घेऊन माझ्याकडे आणून द्या आणि तुमचा जो काही संदेश असेल, त्याच्याकडे मी गांभीर्याने लक्ष देईन. ते जरा त्यांच्याकडून घेऊन माझ्यापाशी आणून द्या.
मित्रांनो,
थँक यू बेटा, तुम्ही कधीपासूनच्या हातात वर धरून उभ्या होतात.
मित्रांनो,
नैसर्गिक शेतीचा विस्तार, आज 21व्या शतकातील शेतीची गरज आहे. गेल्या काही वर्षांत, मागणी वाढल्यामुळे, शेतीत आणि कृषिसंबंधित अनेक क्षेत्रांत रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे, जमिनीतील ओलाव्यावर परिणाम होत आहे आणि या सर्वांमुळे शेतीचा खर्च दरवर्षी वाढतच चालला आहे. पीक घेण्यात विविधता आणणे आणि नैसर्गिक शेती या माध्यमातूनच केवळ यावर उपाय शक्य आहे.
मित्रांनो,
आपल्या मातीची सुपीकता आणि पिकांची पोषणक्षमता पुन्हा उंचावण्यासाठी आपल्याला नैसर्गिक शेतीचा मार्ग अनुसरावाच लागेल. हे आपले ध्येयही आहे आणि गरजही. तरच आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी आपली जैवविविधता जतन करू शकू. नैसर्गिक शेती आपल्याला हवामान बदल आणि वातावरणातील बदलांना तोंड देण्यास मदत करते. ती आपल्या मातीचे आरोग्य चांगले ठेवते आणि लोकांना हानी पोहोचवणाऱ्या रसायनांपासून वाचवता येते. आजचे हे आयोजन याच दिशेने एक खूप मोठी भूमिका पार पाडणार आहे.
मित्रांनो,
आपले सरकार भारतातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी खूप प्रोत्साहन देत आहे. एक वर्षापूर्वी केंद्र सरकारने ‘नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग‘ या नैसर्गिक शेतीसाठीच्या राष्ट्रीय मोहिमेची सुरुवात केली होती. यामध्ये लाखो शेतकरी सहभागी झाले आहेत. याचा सकारात्मक परिणाम विशेषतः संपूर्ण दक्षिण भारतात दिसून येत आहे. येथे आज केवळ तामिळनाडूमध्येच सुमारे 35 हजार हेक्टर जमिनीवर सेंद्रिय (ऑर्गॅनिक) आणि नैसर्गिक शेती केली जात आहे.
मित्रांनो,
नैसर्गिक शेती हा भारताचा स्वतःचा स्वदेशी विचार आहे. तो आपण कुठूनही आयात केलेला नाही. म्हणजेच, तो आपल्या परंपरेतून जन्माला आला आहे, आपल्या पूर्वजांनी तपश्चर्येअंती तो घडवला आहे आणि तो आपल्या पर्यावरणाला अनुकूल आहे. मला आनंद आहे की दक्षिण भारतातील शेतकरी पंचगव्य, जीवामृत, बीजामृत, आच्छादन यांसारख्या नैसर्गिक शेतीच्या परंपरांचा सातत्याने अवलंब करत आहेत. या परंपरा मातीचे आरोग्य सुधारतात, पिके रसायनमुक्त ठेवतात आणि उत्पादनाचा खर्च खूप कमी करतात.
मित्रांनो,
नैसर्गिक शेतीसोबतच आपण जर श्रीअन्न-भरड धान्य यांच्या उत्पादनाची जोड दिली, तर ते देखील धरणी मातेच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावते. तामिळनाडूमध्ये तर भगवान मुरुगन यांना मध आणि श्रीअन्नपासून बनवलेला ‘तेनुम् तिनई-मावुम्’ याचा भोग (नैवेद्य) अर्पण केला जातो. तमिळ प्रदेशात 'कम्बु' आणि 'सामई', केरळ-कर्नाटकात 'रागी', तेलुगू भाषक राज्यांमध्ये 'सज्जा' आणि 'जोन्ना' हे खाद्यपदार्थ पिढ्यानपिढ्या आपल्या आहाराचा भाग राहिलेले आहेत. आपले सरकार प्रयत्न करत आहे की, आपले हे श्रेष्ठ अन्न (सुपरफूड) जगभरातील बाजारपेठांपर्यंत पोहोचायला हवे. आणि जागतिक बाजारपेठेत त्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी नैसर्गिक शेतीची, म्हणजेच रसायनमुक्त शेतीचीही खूप मोठी भूमिका आहे. त्यामुळे मला वाटते की, या परिषदेत यासंबंधीच्या प्रयत्नांवर निश्चितच चर्चा व्हायला हवी.
मित्रांनो,
एकाच पिकाच्या (मोनोकल्चर) शेतीऐवजी बहुविध पिके (मल्टीकल्चर अॅग्रीकल्चर) घेण्याबद्दलही मी नेहमीच आग्रह धरलेला आहे. याची प्रेरणा आपल्याला दक्षिण भारतातील अनेक भागांतून मिळते. जर आपण केरळ किंवा कर्नाटकातील डोंगराळ भागांत गेलो, तर तिथे “बहुस्तरीय शेतीची (मल्टी स्टोरी अॅग्रीकल्चर’) ची उदाहरणे दिसतात. एकाच शेतात नारळ, सुपारी आणि फळझाडे असतात. त्यांच्या खाली मसाले आणि काळीमिरीची (Black Pepper) शेती केली जाते. म्हणजे, लहानशा जागेतही इतक्या गोष्टी संपूर्ण व्यवस्थापन करून पिकवता येतात. हेच नैसर्गिक शेतीचेही मूळ तत्त्व आहे. शेतीचा हा नमुना (मॉडेल) आपल्याला अखिल भारतीय स्तरावर पुढे घेऊन जायचा आहे. मी राज्य सरकारांनाही सांगेन की, या पद्धती (Practices) आपण देशाच्या वेगवेगळ्या भागांत कशा प्रकारे राबवू शकतो, यावर त्यांनी विचार करावा.
मित्रांनो,
दक्षिण भारत, कृषीशास्त्राच्या एक जिवंत विद्यापीठा प्रमाणे आहे. याच भूभागावर जगातील सर्वात जुनी कार्यक्षम धरणे बांधली गेली आहेत. येथे तेराव्या शतका मध्ये कलिंग-रायन कालवा अस्तित्वात आला, येथील मंदिरांमधील तलाव, विकेंद्रित जलसंधारण प्रणालीचे (Decentralized Water Conservation Systems) (एका मोठ्या जलप्रकल्पावर न अवलंबून राहता अनेक छोट्या जलप्रकल्पांचा वापर) एक आदर्श नमुना बनले, याच भूमीने नद्यांचे पाणी अडवून ते शेतीसाठी वापरण्याचा नमुना जगाला दिला. याच भूमीने हजारो वर्षांपूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात शास्त्रशुद्ध जल अभियांत्रिकी (Scientific Water Engineering) राबवली आहे. म्हणूनच, मला विश्वास आहे की, देशाला आणि जगाला नैसर्गिक शेतीमध्ये नेतृत्व देखील याच भूभागातून मिळेल.
मित्रांनो,
विकसित भारतासाठी, भविष्याचा विचार करणारी कृषी परिसंस्था तयार करण्यासाठी, आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल. मी देशभरातील माझ्या शेतकरी बंधू-भगिनींना, तामिळनाडूतील माझ्या शेतकरी मित्रांना सांगेन की, तुम्ही 'एक एकर, एक हंगाम' याने सुरुवात करा. म्हणजे, तुम्ही एका हंगामात तुमच्या शेतातील एका कोपऱ्यात, एक एकर जमिनीवर नैसर्गिक शेती करून पाहा. तिथून जे परिणाम मिळतील, त्या आधारावर तुम्ही दुसऱ्या वर्षी आणखी जास्त करा, तिसऱ्या वर्षी आणखी वाढवा आणि पुढे जात रहा. मी सर्व शास्त्रज्ञ आणि संशोधन संस्थांना देखील आग्रह करेन की, नैसर्गिक शेतीला कृषी अभ्यासक्रमाचा मुख्य भाग बनवा. तुम्ही गावात जा, शेतकऱ्यांच्या शेताला आपली प्रयोगशाळा बनवा, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक शेतीला शास्त्राधारित चळवळ बनवावी लागेल. नैसर्गिक शेतीच्या या मोहिमेत राज्य सरकारे आणि शेतकरी उत्पादक संस्था (FPO's) यांची भूमिका खूप मोठी आहे. गेल्या काही वर्षांत देशात 10 हजार FPO's तयार झाले आहेत. FPO's च्या सहकार्याने आपण शेतकऱ्यांचे छोटे-छोटे गट तयार करावेत. तिथेच स्वच्छता, पॅकिंग (मालबांधणी), प्रक्रिया करण्याची सुविधा द्यावी. आणि ई-नाम (E-Nam) सारख्या ऑनलाइन बाजाराशी त्यांना थेट जोडावे, यामुळे नैसर्गिक शेतीशी जोडलेल्या शेतकऱ्यांना अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. जेव्हा आपल्या शेतकऱ्याचे पारंपरिक ज्ञान, विज्ञानाची ताकद आणि सरकारचा पाठिंबा, हे तिन्ही एकत्र येतात, तेव्हा शेतकरीही समृद्ध होईल आणि आपली धरणी माताही निरोगी राहील.
मित्रांनो,
मला ठाम विश्वास वाटतो की ही परिषद, आणि विशेषतः आपल्या शेतकरी बंधू-भगिनींनी जे नेतृत्व दिले आहे, या परिषदेमुळे देशातील नैसर्गिक शेतीला एक नवीन दिशा मिळेल. इथून नवीन कल्पना, नवीन उपाय बाहेर पडतील. याच आशेसह, मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप आभार! माझ्यासोबत बोला-
भारत मातेचा विजय असो।
भारत मातेचा विजय असो।
भारत मातेचा विजय असो।
खूप खूप आभार!
* * *
शैलेश पाटील/मंजिरी गानू/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2192037)
Visitor Counter : 12
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam