जलशक्ती मंत्रालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार आणि जल संचय-जन भागीदारी पुरस्कार प्रदान
सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची बाजी
Posted On:
18 NOV 2025 8:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे झालेल्या समारंभात सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 आणि जल संचय-जन भागीदारी पुरस्कार प्रदान केले. सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली असून प्रथम क्रमांक पटकाविला. गुजरातला द्वितीय तर हरयाणाला तृतीय क्रमांक मिळाला आहे.

जल संवर्धन आणि व्यवस्थापन या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 46 विजेत्यांना विविध श्रेणींमधील पुरस्कारांनी यावेळी गौरवण्यात आले.यामध्ये 10 श्रेणीतील सहविजेत्यांचा समावेश आहे. प्रत्येक पुरस्कार विजेत्याला प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह आणि विशिष्ट श्रेणींमध्ये रोख पारितोषिके देण्यात आली. याशिवाय जल संचय जल भागीदारी उपक्रमात भूजल पुनर्भरण संरचनांच्या विकासासाठी केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दलही 100 मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याची सुरुवात जल कलश पूजनाने पारंपरिक पद्धतीने झाली.
सर्व पुरस्कार विजेत्यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रात अतिशय सामर्थ्यशाली भूमिका घेऊन पाण्याशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या अथक परिश्रमांनी त्यांनी समाजात पाण्याच्या महत्त्वाबद्दल नवीन प्रकारे जागरूकता निर्माण केली आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला.
संपूर्ण देश 7 नोव्हेंबर पासून वंदे मातरम या आपल्या राष्ट्रीय गीताचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे, बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिलेल्या या राष्ट्रीय गीतातील सुजलाम या शब्दाचा अर्थ पाण्याच्या स्त्रोतांची मुबलकता असा होतो. यावरुनच आपल्या देशात पाण्याला दिले जाणारे प्राधान्य दिसून येते असे राष्ट्रपती म्हणाल्या.

देशातील ग्रामीण भागात नळाद्वारे स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरु केलेल्या जल जीवन मिशन या जगातील सर्वात मोठ्या पेयजल योजनेचे देखील त्यांनी यावेळी कौतुक केले. गेल्या सहा वर्षांत गावांमधील घरांपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 17% वरून 81% पर्यंत वाढला आहे, असे सांगून त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला.
जनशक्ती जल शक्तीचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी सहाय्य करु शकते यावर त्यांनी भर दिला.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटिल यांनी जल व्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील प्रयत्नांबद्दल पुरस्कार विजेत्यांचे आभार मानले. या पुरस्कारांनी खोलवर परिणाम केला आहे आणि जल क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये निरोगी स्पर्धात्मक वातावरण निर्माण केले आहे,असे ते म्हणाले.
2024 च्या सहाव्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी https://www.jalshakti-dowr.gov.in/ वर पाहता येईल.
जल संचय-जन भागीदारी उपक्रमाविषयी : जल संचय-जन भागीदारी हा उपक्रम गुजरात मधील सुरत येथे 6 सप्टेंबर 2024 रोजी सुरु करण्यात आला होता. संपूर्ण-समाज आणि संपूर्ण-सरकारी दृष्टिकोनातून हा उपक्रम चालवला जात असून या उपक्रमाच्या माध्यमातून तळागाळात सहभागी व्यवस्थापन आणि शाश्वत जल प्रशासनाला प्रोत्साहन दिले जाते. समुदाय, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व आणि खर्च या 3Cs मंत्राने प्रेरित होऊन, हा उपक्रम एक समावेशक प्रोत्साहन देणारे मॉडेल स्वीकारतो.
जल संचय-जन भागीदारी उपक्रम आणि पुरस्कार विजेत्यांच्या यादीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया PIB प्रेस रिलीज पहा.(https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2188706)
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2191422)
Visitor Counter : 7