अर्थ मंत्रालय
मुंद्रा बंदरात तस्करी करून आणलेले 5 कोटी रुपयांचे 30,000 फटाके महसूल गुप्तचर संचालनालयाने घेतले ताब्यात; एकाला अटक
Posted On:
17 NOV 2025 1:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2025
फटाक्यांची अवैध आयात रोखण्यासाठी हाती घेतलेल्या “फायर ट्रेल” मोहिमेंतर्गत सातत्यपूर्ण कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) चीनमध्ये निर्मित फटाके आणि आतिषबाजीसाठी लागणाऱ्या साहित्याची अवैध आयात करण्यासाठी तस्करीचा आणखी एक प्रभावी प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडला.
सदर कारवाई दरम्यान, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी गुजरातमधील मुंद्रा बंदरात चीनहून आलेला 40 फुटी कंटेनर पकडला. या कंटेनरमध्ये “पाणी पिण्याच्या ग्लासचे संच” तसेच “फुलांच्या सजावटीसाठी लागणारी भांडी” आहेत असे घोषित करण्यात आले होते. तपशीलवार तपासणीअंती असे आढळून आले की, यात काचेच्या भांड्यांच्या समोरच्या थराआड आतिषबाजीसाठी लागणारे साहित्य तसेच फटाके असे 30,000 नग लपवलेले आढळले. यापूर्वी, ऑक्टोबर 2025 मध्ये डीआरआयने मुंबई तसेच तुतीकोरीन येथे चिनी फटाक्यांची अवैध आयात करण्याचे प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडले होते.

भारतीय व्यापार वर्गीकरण (समन्वयीत प्रणाली) अंतर्गत फटाक्यांची आयात ‘प्रतिबंधित’ करण्यात आली असून अशा आयातीसाठी स्फोटके कायदा, 2008 अंतर्गत परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) तसेच पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटना (पीईएसओ) या दोन संस्थांकडून वैध परवाना मिळवणे अनिवार्य करण्यात आले आहे. उपरोल्लेखित घटनेत, आयातदाराकडे त्या साहित्याच्या आयतीसंबंधी कोणतेही वैध दस्तावेज उपलब्ध नव्हते. तसेच त्या वस्तूंची आर्थिक फायद्यासाठी तस्करी केल्याचे देखील आयातदाराने मान्य केले. त्यानुसार, सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत कारवाई करत तस्करी करण्यात आलेले चिनी फटाके आणि ते लपवण्यासाठी वापरलेल्या वस्तू तसेच कार्गो असा एकूण 5 कोटी रुपयांचा मुद्देमाल दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी ताब्यात घेण्यात आला. सदर व्यवहाराचा सूत्रधार आणि पैसे पुरवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या धोकादायक वस्तूंच्या अवैध आयातीमुळे सार्वजनिक सुरक्षितता, राष्ट्रीय सुरक्षा, बंदरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा तसेच अधिक विस्तृत नौवहन आणि लॉजिस्टिक्स साखळीला धोका निर्माण होतो. अशा संघटीत तस्करी जाळ्यांचा शोध घेऊन त्यांना उध्वस्त करत धोकादायक तास्कारीपासून जनतेचे रक्षण करणे आणि देशाच्या व्यापार तसेच सुरक्षा परिसंस्थेची अखंडता कायम राखणे यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेसंदर्भात डीआरआय ठामपणे कार्यरत आहे.
* * *
नितीन फुल्लुके/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2190756)
Visitor Counter : 12