अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वस्तू आणि सेवा कर गुप्तचर संचालनालयाच्या, दिल्ली विभागीय पथकाने 645 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीचे रॅकेट केले उघड, मुख्य सूत्रधारालाही केली अटक

Posted On: 13 NOV 2025 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 नोव्हेंबर 2025

 

वस्तू आणि सेवा कर गुप्तचर संचालनालयाच्या, दिल्ली विभागीय पथकाने, दिल्लीस्थित एका टोळीचे बनावट पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिटचे लाभ मिळवण्याचा, आणि फसवणुकीच्या माध्यमातून अशा लाभाच्या हस्तांतरण करण्याचे एक मोठे प्रकरण उघडकीला आणले आहे. या टोळीने वस्तू आणि सेवा कराअंतर्गत नोंदणीकृत 229 बनावट कंपन्यांचे जाळे उभारले होते, आणि या कंपन्यांच्या माध्यमातून ही फसवणूक केली जात होती.

या संदर्भात वस्तू आणि सेवा कर गुप्तचर संचालनालयाच्या, दिल्ली विभागीय पथकाला विश्वासार्ह स्रोताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतील अनेक ठिकाणी छापे मारत, एक समन्वित शोध मोहीम राबवली. या शोध मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात या फसवणुकीसाठी वापरली गेलेले दस्तऐवज, डिजिटल उपकरणे आणि खातेवह्या जप्त केल्या आहेत. या पथकाच्या हाती आलेल्या या पुराव्यांतून, प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या कंपन्या, प्रत्यक्षात वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता, केवळ देयके जारी करण्यासाठीच उपयोगात आणल्या जात असल्याचे आढळून आले आहे. या शोध मोहिमेत पथकाने 162 मोबाइल फोनही जप्त केले आहेत. हे फोन वस्तू आणि सेवा कर विषयक अथवा बँकिंगशी संबंधित कामांबाबत ओटीपी मिळवण्यासाठी वापरले जात होते असा अधिकाऱ्यांचा कयास आहे. याशिवाय या शोधमोहिमेतील जप्तीत  44 डिजिटल स्वाक्षऱ्या आणि विविध कंपन्यांच्या 200 पेक्षा जास्त धनादेशांचाही समावेश आहे. या शोध मोहिमेनंतरच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, या सर्व बनावट संस्था कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्षात पुरवठा न करताही देयके जारी करण्याचे काम करत होत्या, आणि त्यातून अंदाजे 645 कोटी रुपयांच्या अपात्र इनपुट टॅक्स क्रेडिटच्या हस्तांतरणाची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. या फसवणुकीमुळे सरकारी महसुलाचेही  मोठे नुकसान झाले आहे.

मुकेश शर्मा हा इसम या बनावट संस्थांचे जाळे उभारून या फसवणुकीला आयाम देण्याच्या कटकारस्थानाचा मुख्य सूत्रधार असल्याचेही या तपासातून उघड झाले आहे. या शोध मोहिमेत हाती लागलेल्या पुराव्यातून, या इसमाने वस्तू आणि सेवा कर नोंदणी तसेच, प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांची विवरण पत्रे, त्यांच्या नोंदींचे व्यवस्थापन, बँकिंग व्यवहार यासोबतच, विविध मार्गांनी अवैध निधीचे व्यवहार करण्यात सक्रिय भूमिका बजावली असल्याचेही आढळून आले आहे. मुकेश शर्मा याचे हे सर्व गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असल्याने, त्याला दि. 11 नोव्हेंबर .2025 रोजी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम, 2017 च्या कलम 132(1)(b) आणि 132(1)(c) अंतर्गत अटक करण्यात आली असून, न्यायालयीन कोठडीत रवाना केले गेले आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या तपासातून संभाव्य हवाला प्रकरणाचा पैलूही उघड झाला आहे. याअंतर्गत फसवणुकीच्या माध्यमातून मिळालेले पैसा कथितरित्या एका स्वयंसेवी संस्था आणि एका राजकीय पक्षाच्या माध्यमातून व्यवहारात आणला गेला असल्याचे आढळले असून, आता त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2189880) Visitor Counter : 9