पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 9 नोव्हेंबर रोजी डेहराडूनच्या दौऱ्यावर
उत्तराखंड राज्य स्थापनेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार
पंतप्रधान 8140 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार
पिण्याचे पाणी, सिंचन, तांत्रिक शिक्षण, ऊर्जा, शहरी विकास, क्रीडा आणि कौशल्य विकास अशा महत्त्वाच्या क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश
पीएम पीक विमा योजनेअंतर्गत 28,000 हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान 62 कोटी रुपये थेट हस्तांतरित करणार
Posted On:
08 NOV 2025 9:26AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 नोव्हेंबर रोजी डेहरादूनला भेट देणार असून दुपारी 12:30 च्या सुमारास ते उत्तराखंडच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित समारंभात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचेही प्रकाशन होणार असून ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
या कार्यक्रमात, पंतप्रधानांच्या हस्ते 8140 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये 930 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन तर 7210 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांच्या पायाभरणीचा समावेश आहे. पिण्याचे पाणी, सिंचन, तांत्रिक शिक्षण, ऊर्जा, शहरी विकास, क्रीडा आणि कौशल्य विकास यासह इतर अनेक प्रमुख क्षेत्रांशी संबंधित प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.
पंतप्रधान 28,000 हून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम पीक विमा योजनेअंतर्गत 62 कोटी रुपयांच्या मदतीच्या रकमेचेही थेट हस्तांतरण करतील.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असलेल्या प्रकल्पांमध्ये अमृत योजनेअंतर्गत डेहराडूनमधील 23 विभागांसाठीची समावेशक पाणीपुरवठा व्यवस्था, पिथोरागड जिल्ह्यातील विद्युत उपकेंद्र, सरकारी इमारतींमधील सौर ऊर्जा प्रकल्प, नैनितालमधील हल्द्वानी स्टेडियममधील अॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान इत्यादींचा समावेश आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते - डेहराडूनला 150 एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी सोंग धरण पेयजल प्रकल्प तसेच पेयजल पुरवठा, सिंचन आणि वीज निर्मितीसाठी सहाय्यक ठरणाऱ्या नैनितालमधील जमरानी धरण बहुकार्यात्मक प्रकल्प अशा जलविद्युत क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या दोन प्रकल्पांचीही पायाभरणी होणार आहे. या शिवाय विद्युत उपकेंद्रे, चंपावतमधील महिला क्रीडा महाविद्यालय आणि नैनितालमधील आधुनिक दुग्ध प्रकल्प या प्रकल्पांचीही ते पायाभरणी करणार आहेत.
***
सुषमा काणे/मंजिरी गानू/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2187715)
Visitor Counter : 10
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam