सांस्कृतिक मंत्रालय
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नोव्हेंबर 2025 रोजी करणार उद्घाटन
Posted On:
05 NOV 2025 10:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2025
संस्कृती मंत्रालय 7 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे "वंदे मातरम्" या राष्ट्रीय गीताच्या 150 वर्षांच्या स्मरणोत्सवाचा उद्घाटन समारंभ आयोजित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. हा कार्यक्रम 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या वर्षभर चालणाऱ्या राष्ट्रव्यापी स्मरणोत्सवाचा औपचारिक प्रारंभ आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि आजही राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत करणाऱ्या या कालातीत रचनेच्या 150 वर्षांचा हा उत्सव आहे.
2025 हे वंदे मातरम् चे 150 वे वर्ष आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेले आपले "वंदे मातरम्", हे राष्ट्रीय गीत 1875 मध्ये 7 नोव्हेंबर रोजी असलेल्या अक्षय नवमीच्या शुभ मुहूर्तावर लिहिले गेले असे मानले जाते. वंदे मातरम् सर्वप्रथम त्यांच्या आनंदमठ या कादंबरीचा भाग म्हणून 'बंगदर्शन' या साहित्यिक नियतकालिकात मालिका स्वरूपात आणि नंतर 1882 मध्ये एका स्वतंत्र पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाले. त्या काळात, भारत मोठ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय बदलांमधून जात होता आणि राष्ट्रीय अस्मिता तसेच वसाहतवादी राजवटीला विरोध करण्याची जाणीव वाढत होती. मातृभूमीला सामर्थ्य, समृद्धी आणि देवत्वाचे प्रतीक मानणारे हे गीत भारताच्या जागृत होत असलेल्या एकता आणि आत्मसन्मानाच्या भावनेला काव्यात्मक अभिव्यक्ती देत होते. हे गीत लवकरच राष्ट्रासाठी भक्तीचे अखंड प्रतीक बनले. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी घोषित केले की, स्वातंत्र्य लढ्यात ऐतिहासिक भूमिका बजावलेल्या "वंदे मातरम्" या गीताला "जन गण मन" या राष्ट्रगीताच्या बरोबरीने सन्मान दिला जाईल.
या सोहळ्याला सकाळी ठीक दहा वाजता सर्व सार्वजनिक स्थानांवर वंदे मातरमच्या पूर्ण आवृत्तीच्या सामूहिक गायनाने सुरुवात होणार असून त्यात सर्व नागरिक, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नियुक्त लोकप्रतिनिधी, पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, शिक्षक, वाहनचालक, दुकानदार आणि समाजातील सर्व संबंधित घटक भाग घेतील. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होईल.
वंदे मातरम गीताचे ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एक ऑक्टोबर 2025 रोजी वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताच्या 150 वर्षा निमित्त देशभरात उत्सव साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर, 24 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय अंमलबजावणी समितीने 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 पर्यंत वर्षभर हा सोहळा साजरा करण्यास मान्यता दिली.
उद्घाटन समारंभाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे असतील:
प्रमुख पाहुण्यांच्या आगमनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम
राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'च्या 150 वर्षांच्या इतिहासावर आधारित प्रदर्शन.
भारतमातेला पुष्पार्पण सोहळा
वंदे मातरम: नाद एकम, रूपम अनेकम:
वंदे मातरमच्या 150 वर्षांच्या इतिहासावर लघुपटाचे प्रदर्शन.
स्मारक तिकीट आणि नाण्याचे प्रकाशन.
प्रमुख पाहुण्यांचे भाषण.
वंदे मातरमचे सामूहिक गायन.
सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश, केंद्र सरकारची मंत्रालये/विभाग आणि त्यांची संलग्न/अधीनस्थ कार्यालये आपल्या कार्यालय परिसरात 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता “वंदे मातरम्” या गीताचे सामूहिक गायन आयोजित करतील. हे गायन उद्घाटन समारंभाशी समन्वयित असेल.या वेळी पंतप्रधानांच्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण देशभरातील सर्व कार्यालये आणि संस्थांमध्ये सामूहिकरीत्या पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल.
संस्कृती मंत्रालयाने या उपक्रमासाठी एक विशेष वेबसाइट: https://vandemataram150.in/ सुरू केली आहे. या संकेतस्थळावर नागरिक आणि संस्थात्मक सहभागासाठी खालील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत:
- अधिकृत ब्रँडिंग साहित्य (होर्डिंग्ज, बॅनर्स, वेब क्रिएटिव्ह्ज)
- लघुपट आणि निवडक प्रदर्शनी
- सामूहिक गायनासाठी संपूर्ण गीताचा संगीतबद्ध ध्वनीफीत व गीतपाठ
- “कराओके विथ वंदे मातरम्” सुविधा
या उपक्रमात देशातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून आपल्या राष्ट्रीय गीताबद्दलचा देशभक्तीचा आणि कृतज्ञतेचा भाव सामूहिकरीत्या व्यक्त करता येईल.हे गीत आजही आपल्याला अभिमान, आदर आणि एकात्मतेच्या भावनेने एकत्र बांधून ठेवते.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186793)
Visitor Counter : 19