पंतप्रधान कार्यालय
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात दिलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
Posted On:
31 OCT 2025 4:13PM by PIB Mumbai
मी म्हणेन सरदार पटेल , तुम्ही म्हणा अमर रहे , अमर रहे .
सरदार पटेल – अमर रहे, अमर रहे।
सरदार पटेल – अमर रहे, अमर रहे।
सरदार पटेल – अमर रहे, अमर रहे।
सरदार पटेल यांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीच्या या ऐतिहासिक दिवशी, एकता नगरची ही दिव्य प्रभात , हे विहंगम दृश्य, सरदार साहेबांच्या चरणांशी आमची उपस्थिती, आज आपण सर्व जण एका महान क्षणाचे साक्षीदार आहोत. देशभरात आयोजित एकता दौड, रन फॉर युनिटी , कोट्यवधी भारतीयांचा उत्साह, नूतन भारताच्या संकल्पशक्तीचा आपणा सर्वाना साक्षात्कार होतो आहे. नुकतेच इथे जे कार्यक्रम झाले, काल संध्याकाळी जे अद्भुत सादरीकरण झाले, त्यांच्यातही भूतकाळातील परंपरा होती, वर्तमानातील श्रम व शौर्य होते, आणि भविष्यकाळातील सिद्धतेची झलकही होती. सरदार साहेबांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ विशेष नाणे आणि विशेष टपाल तिकिटदेखील जारी केले गेले आहे. मी सर्व 140 कोटी देशवासियांना सरदार साहेबांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो !
मित्रांनो,
सरदार पटेल म्हणत असत कि भूतकाळातील इतिहासाच्या नोंदी लिहिण्यात वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा नवा इतिहास घडवण्यासाठी परिश्रम केले पाहिजेत. त्यांचा हा विचार आपल्याला त्यांच्या जीवनगाथेत पदोपदी दिसून येतो. सरदार साहेबांनी जी जीवनमूल्ये अंगिकारली , जे निर्णय घेतले, त्यातून त्यांनी नवा इतिहास घडवला. स्वातंत्र्यानंतर देशातल्या साडेपाचशे संस्थानांना भारतात सामावून घेण्याचे अतिशय कठीण कार्य त्यांनी शक्य करून दाखवले. ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’ हे तत्व त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे होते. त्यामुळे स्वाभाविकपणे आज सरदार पटेल यांच्या जयंतीचा दिवस राष्ट्रीय एकतेचे महापर्व म्हणून आपण साजरा करत आहोत. आपण 140 कोटी भारतीय ज्याप्रमाणे 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्यदिन साजरा करतो, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो, त्याचप्रमाणे ‘एकता दिन’ आपल्यासाठी एक प्रेरणा आहे, एक अभिमानाचा दिवस आहे. आज कोट्यवधी लोकांनी एकतेची शपथ घेतली आहे, देशाच्या एकतेला बळकटी देणाऱ्या कार्यांना प्रोत्साहन देण्याचा आम्ही संकल्प केला आहे. इथे एकता नगरातच एकता मॉल, एकता उद्यान इत्यादी स्थळातून एकतेचे सूत्र बळकट होताना दिसत आहे.
मित्रांनो,
देशाच्या एकतेला हानी पोचवणाऱ्या कोणत्याही कृतीपासून देशवासियांनी दूर राहिले पाहिजे. हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, हीच सरदार साहेबांना खरी श्रद्धांजली आहे. आज देशाला याचीच आवश्यकता आहे, सर्व भारतीयांसाठी हाच एकता दिनाचा संदेश आहे, संकल्पदेखील आहे.
मित्रांनो,
देशाच्या सार्वभौमत्वाला सरदार साहेबांनी नेहमीच अत्युच्च मानले. परंतु दुर्दैवाने सरदारसाहेबांच्या मृत्यूनंतरच्या काळातील तत्कालीन सरकारांनी सार्वभौमत्वाच्या तत्वाला तितके महत्व दिले नाही. एकीकडे काश्मीरमध्ये झालेल्या चुका, दुसरीकडे ईशान्य भारतात निर्माण झालेल्या समस्या, आणि देशभरात जागोजागी बोकाळलेला नक्षलवादी-माओवादी दहशतवाद ही सारी देशाच्या सार्वभौमत्वाला सरळ सरळ दिलेली आव्हानेच होती. परंतु त्यावेळच्या सरकारांनी सरदार साहेबांच्या तत्वांना तिलांजली देत कणाहीन नीतीची निवड केली. याचाच परिणाम म्हणून देशात रक्तपात आणि हिंसा होऊ लागली.
मित्रांनो,
आजच्या पिढीतील बहुतेक युवकांना याची कल्पना नसेल, कि इतर संस्थानांप्रमाणेच संपूर्ण काश्मीर संस्थानाचेही भारतात विलीनीकरण व्हावे अशी सरदार साहेबांची इच्छा होती. परंतु नेहरूजींनी त्यांची इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. काश्मीरला वेगळे संविधान आणि वेगळा ध्वज देऊन त्याला भारतापासून विलग केले गेले.
मित्रांनो,
काश्मीरच्या बाबतीत काँग्रेसने जी चूक केली, त्याच्या परिणामांमुळे पुढची अनेक दशके काश्मीर धगधगत राहिले. काँग्रेसच्या अयोग्य धोरणांमुळे काश्मीरच्या एका भागावर पाकिस्तानने अवैध कब्जा केला, पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन दिले - सरकारने प्रायोजित केलेला दहशतवाद.
मित्रांनो,
काश्मीरसह संपूर्ण देशाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागले. परंतु तरीही काँग्रेसने दहशतवादासमोर नेहमीच मान तुकवली.
मित्रांनो,
सरदार साहेबांच्या विचारांचे काँग्रेसला विस्मरण झाले, पण आम्ही मात्र विसरलो नाही. 2014 नंतर पुन्हा एकदा त्यांच्या प्रेरणादायी पोलादी इच्छाशक्तीचे दर्शन देशाला झाले. आज काश्मीर कलम 370 च्या शृंखला तोडून देशाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहे. भारताची खरी ताकद काय आहे ते आता पाकिस्तानला आणि दहशतवादाच्या पोशिंद्यांना कळून चुकले आहे! भारताकडे कोणी वाकड्या नजरेने पहिले तर भारत त्यांच्या घरात घुसून त्यांचा बंदोबस्त करतो हे ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये साऱ्या जगाने पाहिले आहे. प्रत्येक आगळिकीनंतर भारताचे उत्तर शेरास सव्वाशेर असते , आधीपेक्षाही जास्त निर्णायक असते. हा भारत पोलादी पुरुष सरदार पटेलांचा भारत आहे, हा स्वतःच्या सुरक्षेशी आणि स्वाभिमानाशी कधीही तडजोड करणार नाही , भारताच्या शत्रूंसाठी हा एक मोठा महत्वाचा संदेश आहे.
मित्रांनो,
राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी गेल्या 11 वर्षांमधील भारताचे सर्वात मोठे यश म्हणजे देशातील नक्षलवाद माओवादाची विषवल्ली समूळ उखडून टाकणे. 2014 च्या पूर्वी देशाच्या भूमीवर नक्षली व माओवादी राजरोसपणे हुकूमत चालवत होते. नक्षलप्रभावित क्षेत्रात देशाचे संविधान लागू नव्हते. पोलीस प्रशासन तिथे निष्प्रभ होते. नक्षली राजरोसपणे नवनवीन फतवे काढत असत, रस्त्यांची कामे अडवून ठेवत असत, शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांमध्ये बॉम्बस्फोट घडवले जात असत. शासन व प्रशासन त्यांच्यासमोर हतबल झाले होते.
मित्रांनो,
2014 नंतर आमच्या सरकारने नक्षलवादी माओवाद्यांवर मोठा प्रहार केला. शहरांमध्ये बस्तान बसवलेल्या शहरी नक्षलवाद्यांच्या समर्थकांना , शहरी नक्षलवाद्यांना आळा घातला. आम्ही वैचारिक संघर्षातही विजयी झालो , तसेच नक्षलवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करून त्यांना धूळ चारली. याचाच परिणाम आज देश पाहतो आहे. 2014 च्या पूर्वी देशातले सुमारे सव्वाशे जिल्हे नक्षलवादाने ग्रासलेले होते. आता ती संख्या कमी होत फक्त 11 जिल्हे उरले आहेत. त्यातही फक्त 3 जिल्ह्यांमध्येच खूप मोठ्या प्रमाणात नक्षलवाद जिवंत आहे. आणि आज, मी सरदार पटेलांच्या सान्निध्यात , एकता नगराच्या या भूमीवर उभा राहून संपूर्ण देशाला आश्वासन देतो आहे, कि जोवर देश पूर्णपणे नक्षलवाद - माओवादापासून मुक्त होत नाही तोवर आम्ही थांबणार नाही, शांत बसणार नाही.
मित्रांनो,
आज देशाच्या एकतेला आणि अंतर्गत सुरक्षेला घुसखोरांपासूनही मोठा धोका आहे. देशात अनेक दशकांपासून परदेशातून बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून अनेक घुसखोर येत आहेत. इथे राहून इथल्या नागरिकांच्या साधनसंपत्तीवर कब्जा करत आहेत, देशाची एकात्मता धोक्यात आणत आहेत, देशाच्या डेमोग्राफीचा समतोल बिघडवत आहेत, परंतु पूर्वीच्या सरकारांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले , मतपेटीच्या राजकारणापायी देशाच्या सुरक्षेला जाणूनबुजून संकटात टाकले गेले. आता प्रथमच देशाने या घुसखोरांच्या विरोधात निर्णायक युद्ध पुकारले आहे . लाल किल्ल्यावरून मी डेमोग्राफी मिशनची घोषणा केली आहे.
परंतु मित्रांनो,
आता आज ज्यावेळी आपण हा विषय गांभीर्याने घेत आहोत, त्यावेळी काही लोक देशहितापेक्षा स्वार्थ साधण्याला महत्व देत आहेत. हे लोक घुसखोरांना अधिकार देण्यासाठी राजकीय लढाई करत आहेत. त्यांना वाटते की,देशाचे एकदा तुकडे केले गेले, तसेच यापुढेही देशाचे तुकडे करता येतील. त्यांना वाटते की, देशाचे वारंवार तुकडे केले, तसेच यापुढेही तुकडे केले तर काय बिघडले, त्यांना त्यामुळे काहीच फरक पडत नाही. परंतु सत्य असे आहे की, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे आणि देशाची जी प्रतिमा आहे, त्या प्रतिमेला धोका निर्माण होत आहे. असे देशाचे तुकडे केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला धोका निर्माण होणार आहे. आपल्याला आज राष्ट्रीय एकता दिनी पुन्हा एकदा संकल्प करायचा आहे, की आम्ही भारतामध्ये वास्तव्य करीत आहोत, इथे आलेल्या प्रत्येक घुसखोराला बाहेर काढून टाकू.
मित्रांनो,
ज्यावेळी आपण लोकशाहीमध्ये राष्ट्रीय एकतेविषयी बोलतो, त्यावेळी याचे एक असे स्वरूप असते की, आपण वैचारिक वैविध्यतेचा सन्मान करावा. लोकशाहीमध्ये मतभेद स्वीकार्य आहेत, मात्र मनभेद असून चालणार नाहीत. परंतु विरोधाभास असा असतो पहा, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ज्या लोकांवर देशाची जबाबदारी सोपविण्यात आली, त्याच लोकांनी ‘वुई द पीपल’ या चैतन्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपले विचार आणि विचारसरणी यांच्यापेक्षा जो कोणी वेगळा विचार करतो, त्या प्रत्येक व्यक्तीचा आणि संघटनेचा तिरस्कार केला. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. देशामध्ये राजकीय अस्पृश्यतेची एक नवीन संस्कृती तयार केली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे, कॉंग्रेस सरकारमध्ये सरदार पटेल आणि त्यांचे वारस, अनुयायी यांच्याबरोबर कसे वर्तन करण्यात आले? या लोकांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर ते जीवंत असताना आणि ते गेल्यानंतरही कसे वर्तन केले? नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर काय केले? डॉ. लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या लोकांबरोबरही कॉंग्रेसने काय केले? यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला- आरएसएसला 100 वर्ष झाले आहेत. संघावरही कशा कशाप्रकारे हल्ले केले गेले. अनेक कारस्थाने रचण्यात आली! एक पक्ष, एक परिवार यांच्या बाहेरील प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक विचाराला अस्पृश्य बनविण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले.
बंधू- भगिनींनो,
आम्हाला अभिमान आहे की, आम्ही देशाची वाटणी करणारी, देश तोडणारी जी राजकीय अस्पृश्यता होती, ती संपुष्टात आणली. आम्ही सरदार पटेल यांचे स्मारक म्हणून या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘ची निर्मिती केली. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पंचतीर्थ बनवले. दिल्लीमध्ये डॉ. बाबासाहेब यांचे निवासस्थान, त्यांचे महा-परिनिर्वाण स्थान, कॉंग्रेसच्या कार्यकाळामध्ये उपेक्षेमुळे दुर्दशेचे शिकार बनले होते. आम्ही या पवित्र स्थानांचे ऐतिहासिक स्मारकामध्ये रूपांतर केले. कॉंग्रेसच्या काळात फक्त एका दिवंगत पंतप्रधानांच्या नावाचे संग्रहालय होते. आम्ही देशामध्ये आतापर्यंत जितके पंतप्रधान झाले, त्या सर्वांच्या योगदानाला समर्पित, राजकीय स्पृश्य-अस्पृश्यता न मानता, त्याच्याही पुढे जावून एक नवे ‘प्रधानमंत्री संग्रहालय‘ बनवले आहे. आम्ही कर्पूरी ठाकूर यांच्यासारख्या लोकनायक असलेल्या महान नेत्याला ‘भारत रत्न‘ दिले. संपूर्ण जीवन कॉंग्रेसला समर्पण करणारे प्रणवदा यांनाही आम्ही भारत रत्न दिले. आणि विरोधी विचारसरणीच्या मुलायम सिंह यादव यांच्यासारख्या नेत्यालाही आम्ही पद्म पुरस्काराने सन्मानित केले. या निर्णयामागे आमचा असाच विचार होता की, राजकीय मतभेदांच्या पलिकडे जावून देशासाठी एकजूट होण्याची भावना बळकट व्हावी. ऑपरेशन सिंदूरनंतर देशाची भूमिका मांडण्यासाठी परदेशांमध्ये पाठविण्यात आलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळांमध्येही आमची एकतेची अशीच झलक सर्वांनी पाहिली आहे.
मित्रांनो,
राजकीय स्वार्थासाठी देशाच्या एकतेवर प्रहार करण्याचा विचार, हा गुलामगिरीच्या मानसिकतेचा भाग आहे. कॉंगेसने इंग्रजांकडून केवळ पक्ष आणि सत्ताच नाही तर काँग्रेसने गुलामगिरीची मानसिकताही आत्मसात केली. तुम्ही पहा ना, आता लवकरच काही दिवसांमध्येच आपल्या राष्ट्रगानाला - ‘वन्दे-मातरम्‘ ला 150 वर्ष पूर्ण होणार आहेत. 1905 मध्ये ज्यावेळी इंग्रजांनी बंगालचे विभाजन केले, त्यावेळी त्याच्या विरोधामध्ये ‘वंदेमातरम‘ प्रत्येक देशवासियाचा स्वर बनले होते. वन्देमातरम देशाची एकता आणि एकजुटता यांचा आवाज बनला होता. इंग्रजांनी वंदेमातरम् हा शब्द मुखातून काढण्यास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इंग्रजाचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. हिंदुस्तानच्या कोनाकोप-यातून ‘वंदे मातरम्‘ चा जयघोष दुमदुमत राहिला होता. परंतु जे काम इंग्रज करू शकले नाहीत, ते काम कॉंग्रेसने करून दाखवले. कॉंग्रेसने धर्माच्या आधारे वंदेमातरमचा एक भाग हटवून टाकला. आणि मी आज एक गोष्ट अतिशय जबाबदारीने बोलतो आहे, - ज्या दिवशी कॉंग्रेसने वंदेमातरम तोडण्याचा, त्याचे तुकडे करण्याचा, विभागणी करण्याचा निर्णय घेतला होता; त्याच दिवसापासून भारताच्या विभाजनाचा पाया घातला गेला होता. कॉंग्रेसने असे पाप केले नसते तर आज भारताची प्रतिमा काही वेगळीच निर्माण झाली असती.
मित्रांनो,
त्या काळामध्ये सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळेच देशाने इतक्या दशकांपर्यंत गुलामगिरीच्या प्रतीकांचे ओझे वाहिले आहे. तुम्ही मंडळींनी स्मरण करावे, ज्यावेळी तुम्ही आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी दिली आणि आमचे सरकार सत्तेवर आले, त्यावेळी आमच्या नौदलाच्या ध्वजातील गुलामगिरीची खूण आम्हाला उतरविता आली. ज्यावेळी सत्ता परिवर्तन घडून आले, त्यावेळी राजपथ कर्तव्यपथ बनला. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये क्रांतिकारकांच्या बलिदानांचे स्थान, अंदमानातील सेल्युलर तुरूंगात होते, ज्यावेळी केंद्रामध्ये मोरारजीभाई देसाई यांचे सरकार सत्तेमध्ये आले, त्यावेळी अंदमानच्या कारागृहाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला. अंदमानातील वेगवेगळ्या बेटांची-व्दीपांची नावे अगदी अलिकडच्या काळापर्यंत इंग्रजांच्या नावेच होती. आम्ही ही नावे बदलली. आता या व्दीपांना नेताजी सुभाष यांचे नाव दिले आहे. काही बेटांना परमवीर चक्र विजेत्यांचे नाव दिले आहे. इंडिया गेटवर आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा लावला.
मित्रांनो,
देशाच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करणा-या सैनिकांचाही गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे कधी सन्मान केला जात नव्हता. आम्ही राष्ट्रीय युद्ध स्मारकाची स्थापना करून वीरांच्या स्मृतींना अमर बनवले. देशाच्या आंतरिक सुरक्षेमध्ये 36 हजार सैनिकांनी, आमच्या या पोलिस ताफ्यातील जवानांनी, देशाला माहितीही नाही, इतके शौर्य गाजवले आहे. पोलिस ताफ्यातील या खाकी गणवेशातील 36 हजार सैनिक हुतात्मा झाले आहेत. 36 हजार हुतात्मा होणे, ही संख्या काही लहान नाही. आमचे पोलिस, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आमचे सर्व अर्धसैनिक दल, यांनी दाखवलेल्या शौर्यालाही सन्मानापासून वंचित ठेवले. आज मी सरदार पटेल यांच्या चरणाशी उभा आहे. देशातील ज्या-ज्या लोकांनी, पोलिस दलात राहून सेवा केली आहे, त्या-त्या सर्व लोकांना, पोलिस दलामध्ये सध्या कार्यरत राहून देशाची सेवा करीत असलेल्या सर्वांना , सरदार पटेल यांच्या चरणापाशी उभे राहून मी सलामी देतो. या सर्वांच्या कार्याचा मी गौरव करतो, त्यांचा मी सन्मान करतो आहे. आज देश गुलामगिरीच्या मानसिकतेची प्रत्येक खूण- चिन्ह पुसून टाकत आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या लोकांचा मान राखत आपण 'राष्ट्र प्रथम' ही भावना अधिक बळकट करत आहोत.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
एकता हा राष्ट्र आणि समाजाच्या अस्तित्वाचा आधार आहे. समाजात जोपर्यंत एकता आहे, तोपर्यंत राष्ट्राचे अखंडत्व सुरक्षित आहे. म्हणूनच, विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी, देशाची एकता तोडू पाहणारे प्रत्येक कारस्थान आपण एकतेच्या सामर्थ्याने निष्प्रभ केले पाहिजे. यासाठी, आज देश राष्ट्रीय एकतेच्या प्रत्येक स्तरावर सातत्याने काम करत आहे. भारताच्या एकतेच्या या व्रताचे 4 आधारस्तंभ आहेत. एकतेचा पहिला स्तंभ आहे - सांस्कृतिक एकता! भारताच्या या संस्कृतीनेच हजारो वर्षांपासून, राजकीय परिस्थिती कशीही असली तरी, भारताला एक राष्ट्र म्हणून जिवंत ठेवले आहे. आपली बारा ज्योतिर्लिंगे, सात पुरी (अयोध्या,द्वारका,मथुरा, काशी, कांची हरिद्वार, उज्जैन या सप्तपुरी), चार धाम, 50 पेक्षा अधिक शक्तिपीठे, तीर्थयात्रांची परंपरा, भारताला एक चैतन्यमय राष्ट्र बनवणारी प्राण ऊर्जा आहे. याच परंपरेला आज आपण सौराष्ट्र तमिळ संगमम् आणि काशी तमिळ संगमम् सारख्या उपक्रमांद्वारे पुढे नेत आहोत. आपण आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून भारताच्या महान योग शास्त्राला नवी ओळख मिळवून देत आहोत. आपला योग आज लोकांना जोडण्याचे माध्यम बनत आहे.
मित्रांनो,
आपल्या एकतेचा दुसरा स्तंभ आहे - भाषिक एकता! भारतातील शेकडो भाषा आणि बोलीभाषा (Dialects) या भारताच्या खुल्या आणि विधायक विचारसरणीचे प्रतीक आहेत. कारण, आपल्याकडे कोणत्याही समाजाने, सत्तेने किंवा पंथाने कधीही भाषेला आपले शस्त्र बनवले नाही. एका भाषेला लादण्याचा प्रयत्न झाला नाही. म्हणूनच भारत भाषिक विविधतेच्या दृष्टीने जगातील इतका समृद्ध देश बनला आहे. आपल्या भाषांनी संगीताच्या वेगवेगळ्या सुरांप्रमाणे आपली ओळख समृद्ध केली आहे. म्हणूनच मित्रांनो, आपण प्रत्येक भाषेला राष्ट्रीय भाषा मानतो. आपण अभिमानाने म्हणतो की, भारताकडे तमिळसारखी जगातील सर्वात जुनी भाषा आहे, आणि आपल्याला याचा अभिमान आहे. आपल्याकडे संस्कृतसारखा ज्ञानाचा वारसा-अमूल्य ठेवा आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक भारतीय भाषेचा स्वतःचा विशिष्ट गुण आहे, साहित्यिक आणि सांस्कृतिक ठेवा आहे. आपण प्रत्येक भारतीय भाषेला प्रोत्साहन देत आहोत. आमची इच्छा आहे की, हिंदुस्थानातील मुलांनी त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घ्यावे आणि प्रगती करावी. भारतातील लोकांनी देशाच्या दुसऱ्या भाषाही समजून घ्याव्या, त्यातून शिकावे. भाषांनी आपल्या एकतेचे सूत्रधार बनावे. आणि हे एका दिवसाचे काम नाही. हे निरंतर चालणारे काम आहे….या कामाची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून उचलायची आहे.
मित्रांनो,
आपल्या एकतेचा तिसरा स्तंभ आहे - भेदभाव मुक्त विकास! कारण, गरिबी आणि भेदभाव हीच सामाजिक विणीचा सर्वात मोठा कमकुवतपणा असतो. देशाच्या शत्रूंनी नेहमीच या कमकुवत बाजूंचा उपयोग केला आहे. म्हणूनच, सरदार साहेब गरिबीविरुद्ध देशासाठी दीर्घकालीन योजनेवर काम करू इच्छित होते. सरदार पटेलांनी एकदा म्हटले होते की, जर भारताला 1947 च्या ऐवजी 10 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले असते, तर 1947 पर्यंत भारत अन्नधान्य टंचाईच्या संकटातून मुक्त झाला असता. त्यांनी म्हटले होते की, जशी त्यांनी संस्थानांच्या विलीनीकरणाच्या आव्हानावर मात केली, तशीच मात अन्नटंचाईच्या आव्हानावरही केल्याशिवाय ते राहिले नसते. ही होती सरदार साहेबांची इच्छाशक्ती. मोठ्या संकटांशी लढण्यासाठी आपल्याला हीच इच्छाशक्ती दाखवावी लागते. आणि मला अभिमान आहे की, आपले सरकार सरदार साहेबांचे हे अपूर्ण संकल्प पूर्ण करण्यासाठी झटत आहे. मागील एका दशकभरात आपण 25 कोटी देशवासियांना गरिबीतून बाहेर काढले आहे. आज कोट्यवधी गरिबांना घर मिळत आहे. घरोघरी स्वच्छ पाणी पोहोचत आहे. मोफत उपचारांची सुविधा मिळत आहे. म्हणजेच, प्रत्येक नागरिकासाठी प्रतिष्ठित जीवन हे आज देशाचे मिशन (ध्येय) आणि व्हिजन (संकल्प) दोन्ही आहे. भेदभाव आणि भ्रष्टाचार मुक्ती ही धोरणे आज राष्ट्रीय एकतेला बळकट करत आहेत.
मित्रांनो,
राष्ट्रीय एकतेचा चौथा स्तंभ आहे - दळणवळण-संपर्क व्यवस्थेतून मनांचे जुळणे! आज देशात विक्रमी महामार्ग आणि द्रुतगती मार्ग बनत आहेत. वंदे भारत आणि नमो भारत सारख्या गाड्या भारतीय रेल्वेचे रुपडे पालटत आहेत. छोटी शहरेही आता विमानतळाच्या सुविधेने जोडली जात आहेत. या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलत आहे. या सुविधांनी उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम,असे देशातील विविध भागांमधील अंतरही कमी केले आहे. आज लोक सहजपणे दुसऱ्या राज्यांमध्ये पर्यटनासाठी जात आहेत, व्यापारासाठी जात आहेत. हा लोकांचा लोकांशी संपर्क आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याचे एक नवे युग आहे, जे राष्ट्रीय एकतेला बळ देत आहे. आणि जी डिजिटल क्रांती झाली आहे, तिने या एकतेला नवी बळकटी देण्याची संधी दिली आहे. आज डिजिटल संपर्कव्यवस्थेतूनही मने जुळण्याचा एक नवा मार्ग खुला होत आहे.
मित्रांनो,
सरदार पटेलांनी एकदा म्हटले होते - मी देशासाठी काम करतो, तेव्हा मला सर्वात जास्त आनंद मिळतो. मीही आज प्रत्येक देशवासियांना हेच आवाहन करतो. देशासाठी काम करण्यापेक्षा मोठा आनंद दुसरा असू शकत नाही. मातृभूमीची सेवा ही प्रत्येक देशवासियाची सर्वात मोठी भक्ती-सेवा आहे. जेव्हा 140 कोटी भारतवासीय एकत्र उभे राहतात, तेव्हा मार्गातले संकटरुपी अडथळे (काटे) आपोआप दूर होतात. जेव्हा 140 कोटी देशवासीय एका सुरात बोलतात, तेव्हा ते शब्द भारताच्या यशाचा जयघोष बनतात. आपल्याला एकतेच्या याच मूळ मंत्राला आपला संकल्प बनवायचे आहे. आपल्याला आपापसात फूट पडून द्यायची नाहीये, आपल्याला दुर्बळ व्हायचे नाही. हीच सरदार साहेबांना आपली खरी आदरांजली आहे. मला विश्वास आहे, आपण सर्व एकत्र मिळून 'एक भारत, श्रेष्ठ भारत' च्या संकल्पाला बळकटी देऊ. आपण एकत्र मिळून विकसित भारत आणि स्वावलंबी (आत्मनिर्भर) भारताचे स्वप्न पूर्ण करू. याच भावनेने, मी पुन्हा एकदा सरदार साहेबांच्या चरणी आदरांजली वाहतो. माझ्यासोबत बोला - भारत मातेचा विजय असो! हा आवाज देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात दुमदुमला पाहिजे,
मित्रांनो!
भारत मातेचा विजय असो!
भारत मातेचा विजय असो!
भारत मातेचा विजय असो!
वंदे मातरम्! वंदे मातरम्! वंदे मातरम्! वंदे मातरम्! वंदे मातरम्! वंदे मातरम्! वंदे मातरम्!
आपणा सर्वांचे खूप खूप आभार!
***
आशिष सांगळे/ उमा रायकर/ सुवर्णा बेडेकर/ आशुतोष सावे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2185335)
Visitor Counter : 5