पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बिहारमधील जमुई येथील आदिवासी गौरव दिवस कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांचे भाषण

प्रविष्टि तिथि: 15 NOV 2024 3:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 नोव्‍हेंबर 2024

 

भारत माता की – जय !

भारत माता की – जय !

भारत माता की – जय !

मी म्हणेन भगवान बिरसा मुंडा - तुम्ही म्हणा अमर रहे, अमर रहे !

भगवान बिरसा मुंडा - अमर रहे, अमर रहे !

भगवान बिरसा मुंडा - अमर रहे, अमर रहे !

भगवान बिरसा मुंडा - अमर रहे, अमर रहे !

बिहारचे माननीय राज्यपाल राजेंद्र आर्लेकर जी, बिहारचे लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जुआल ओराम जी, जीतन राम मांझी जी, गिरीराज सिंह जी, चिराग पासवान जी आणि दुर्गादास उईके जी, आणि आज आपल्यामध्ये बिरसा मुंडा जी यांचे वंशज आहेत हे आपले भाग्य आहे. आज त्यांच्या घरी एक मोठा धार्मिक कार्यक्रम होत असला तरी, त्यांचे कुटुंब धार्मिक विधींमध्ये व्यग्र असले तरी बुधराम मुंडा जी आपल्यात सामील झाले आहेत आणि सिद्धू कान्हू यांचे वंशज मंडल मुर्मू जी आपल्यासोबत आहेत ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. मला हे सांगताना आनंद होतो की आज भारतीय जनता पक्षात जर सर्वात ज्येष्ठ नेते असतील तर ते आमचे करिया मुंडा जी आहेत, जे एकेकाळी लोकसभेचे उपसभापती होते आणि ते अजूनही आम्हाला मार्गदर्शन करतात. जुआल ओराम जी यांनी म्हटल्याप्रमाणे ते माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. करिया मुंडा जी झारखंडहून खास येथे आले आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि माझे मित्र विजय कुमार सिन्हा जी, सम्राट चौधरी जी, बिहार सरकारचे मंत्री, संसद सदस्य, विधानसभेचे सदस्य, इतर लोकप्रतिनिधी, देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिष्ठित पाहुणे आणि जमुई येथील माझे प्रिय बंधू आणि भगिनी.

आज अनेक मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री देशभरातील विविध जिल्ह्यांमधील महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित आहेत आणि मी त्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्यात आभासी पद्धतीने सामील झालेल्या लाखो आदिवासी बंधू आणि भगिनींनाही मी शुभेच्छा देतो. गीत गौर दुर्गा माई आणि बाबा धनेश्वर नाथ यांच्या या पवित्र भूमीला मी नमन करतो. भगवान महावीरांच्या जन्मभूमीला मी वंदन करतो. आज खूप शुभ दिवस आहे. कार्तिक पौर्णिमा, देव दीपावली आणि गुरु नानक देवजींची 555 वी जयंती आहे. मी या सणांसाठी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. आजचा दिवस देशातील प्रत्येक नागरिकासाठी आणखी एका कारणासाठी ऐतिहासिक आहे. आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे, जी राष्ट्रीय आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. आदिवासी गौरव दिवसानिमित्त मी सर्व नागरिकांना, विशेषतः माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींचे अभिनंदन करतो. मला माहिती मिळाली आहे की या सणांपूर्वी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जमुईमध्ये मोठी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. प्रशासनाने या मोहिमेचे नेतृत्व केले आणि आमचे विजयजी येथे तळ ठोकून होते. भाजप कार्यकर्त्यांनीही महत्त्वपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली. नागरिक, तरुण, माता आणि भगिनींनी उत्साहाने योगदान दिले. या विशेष प्रयत्नांबद्दल मी जमुईच्या लोकांचे खूप कौतुक करतो.

मित्रांनो,

गेल्या वर्षी याच दिवशी मी धरती आबा बिरसा मुंडा यांच्या उलीहाटू गावात होतो. आज मी त्या भूमीवर आहे जी शहीद तिलका मांझी यांच्या शौर्याची साक्षीदार झाली. यावर्षी हा कार्यक्रम आणखी खास बनला आहे. आजपासून देश भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरी करणार आहे, जी एक वर्ष चालेल. मला आनंद वाटतो आहे की शेकडो जिल्ह्यांतील सुमारे एक कोटी लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत, ज्यामुळे जमुईच्या लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण बनला आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो. यापूर्वी भगवान बिरसा मुंडा यांचे वंशज बुधराम मुंडा जी यांचे स्वागत करण्याचा मान मला मिळाला. काही दिवसांपूर्वी, सिद्धू कान्हू यांचे वंशज मंडल मुर्मू जी यांचाही सन्मान करण्याचा मान मला मिळाला. त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवली आहे.

मित्रांनो,

धरती आबा बिरसा मुंडा यांच्या या भव्य स्मृतिदिनानिमित्त आज सहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले. यामध्ये माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींसाठी सुमारे दीड लाख कायमस्वरूपी घरे, आदिवासी मुलांच्या भविष्यासाठी शाळा, वसतिगृहे, आदिवासी महिलांसाठी आरोग्य सुविधा, आदिवासी भागांना जोडणारे शेकडो किलोमीटर रस्ते, आदिवासी संस्कृतीला समर्पित संग्रहालये आणि संशोधन केंद्रे यांना मंजुरी देण्यात आली आहे. देवदिवाळीनिमित्त आज 11,000 हून अधिक आदिवासी कुटुंबे त्यांच्या नवीन घरात प्रवेश करत आहेत. यासाठी मी सर्व आदिवासी कुटुंबांचे मनापासून अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आपण आदिवासी गौरव दिवस साजरा करत असताना आणि आदिवासी गौरव वर्ष सुरू करत असताना हा कार्यक्रम का आवश्यक होता हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. इतिहासातील एका मोठ्या अन्यायाला दुरुस्त करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. स्वातंत्र्यानंतर आदिवासी समुदायाच्या योगदानाला इतिहासात ती मान्यता मिळाली नाही जी मिळायला पाहिजे होती. आदिवासी समुदायानेच राजकुमार रामला भगवान राम बनवले. आदिवासी समुदायानेच भारताची संस्कृती आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी शतकानुशतके चाललेल्या लढाईचे नेतृत्व केले. तथापि, स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्ये स्वार्थी राजकारणाने केवळ एकाच पक्षाला भारताच्या स्वातंत्र्याचे श्रेय देण्यासाठी आदिवासी इतिहासातून हे अमूल्य योगदान पुसून टाकण्याचे प्रयत्न केले गेले. पण जर फक्त एकाच पक्षाने किंवा कुटुंबाने स्वातंत्र्य मिळवले असेल, तर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखालील उलगुलान चळवळ का घडली? संथाल बंड काय होते? कोल बंड काय होते? महाराणा प्रताप यांच्यासोबत लढलेल्या शूर भिल्लांना आपण विसरू शकतो का? सह्याद्रीच्या घनदाट जंगलात छत्रपती शिवाजी महाराजांना सामर्थ्य देणाऱ्या आदिवासी बांधवांना आणि भगिनींना  कोण विसरेल? अल्लुरी सीताराम राजूच्या अधिपत्याखालील आदिवासींनी केलेल्या भारत मातेच्या सेवेकडे किंवा तिलका मांझी, सिद्धू कान्हू, बुधू भगत, धीरज सिंग, तेलंगा खारिया, गोविंद गुरू, तेलंगणाचे रामजी गोंड, बादल भोई, राजा शंकर शाह, मध्यप्रदेशातील कुमार रघुनाथ शाह, तंट्या भिल्ल, नीलांबर-पीतांबर, वीर नारायण सिंह, दिवा किशून सोरेन, जत्रा भगत, लक्ष्मण नायक आणि मिझोरामचे महान स्वातंत्र्यसैनिक, रोपुइलियानी जी, राजमोहिनी देवी, राणी गैडिनलियू, वीर बालिका कालीबाई आणि गोंडवानाची राणी दुर्गावती यांच्या शौर्याकडे कोणी दुर्लक्ष करू शकेल का? या अगणित आदिवासी वीरांना कोणी कसे विसरेल? माझ्या हजारो आदिवासी बांधवांनी हौतात्म्य पत्करलेले मानगड येथील हत्याकांड आपण विसरू शकतो का?

मित्रांनो,

संस्कृती असो किंवा सामाजिक न्याय, आजच्या एनडीए सरकारची मानसिकता अद्वितीय आहे. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती बनवण्याची संधी मिळाली, हे मी केवळ भाजपचेच नाही तर संपूर्ण एनडीएचे भाग्य मानतो. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. मला आठवते की जेव्हा एनडीएने द्रौपदी मुर्मू यांचे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून नामांकन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आमच्या नितीशबाबूंनी देशभरातील लोकांना त्यांचा विजय मोठ्या फरकाने सुनिश्चित करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान जनमन योजना, ज्या अंतर्गत अनेक उपक्रम सुरू झाले आहेत, त्याचे श्रेय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही जाते. झारखंडच्या राज्यपाल आणि नंतर राष्ट्रपती झाल्यावर त्या अनेकदा माझ्याशी उपेक्षित आदिवासी समुदायांबद्दल चर्चा करत असतात‌. मागील सरकारांनी या सर्वात मागासलेल्या आदिवासी समुदायांची कधीही काळजी घेतली नाही. त्यांच्या जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी 24,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची पंतप्रधान जनमन योजना सुरू करण्यात आली. पंतप्रधान जनमन योजना देशातील सर्वात मागासलेल्या आदिवासी वस्त्यांचा विकास सुनिश्चित करते. आज या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले. या काळात आम्ही या उपेक्षित आदिवासी समुदायांना हजारो कायमस्वरूपी घरे प्रदान केली आहेत. या समुदायांच्या वस्त्यांना जोडण्यासाठी शेकडो किलोमीटर रस्ते बांधण्यात आले आहेत आणि मागासलेल्या आदिवासी भागातील शेकडो गावांमधील प्रत्येक घराला पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे.

मित्रांनो,

ज्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही, त्यांची सेवा मोदी करतात. मागील सरकारांच्या वृत्तीमुळे, आदिवासी समुदाय अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित होता. मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असलेले अनेक जिल्हे विकासात मागे राहिले. जर एखाद्या अधिकाऱ्याला शिक्षा झाली असेल किंवा शिक्षेसाठी पोस्टिंगची आवश्यकता असेल तर अशा जिल्ह्यांची निवड त्यांच्या पोस्टिंगसाठी केली जात असे. रालोआ सरकारने जुन्या सरकारांची ही मानसिकता बदलली. आम्ही या जिल्ह्यांना आकांक्षी जिल्हे म्हणून घोषित केले आणि तेथे नवीन आणि उत्साही अधिकारी पाठवले. आज अनेक आकांक्षी जिल्हे विविध विकास मापदंडांमध्ये इतर जिल्ह्यांना मागे टाकत आहेत याचे मला समाधान आहे. याचा माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींना खूप फायदा झाला आहे.

मित्रांनो,

आदिवासी कल्याण हे नेहमीच रालोआ सरकारचे प्राधान्य राहिले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने आदिवासी कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली. दहा वर्षांपूर्वी आदिवासी भाग आणि कुटुंबांच्या विकासासाठीची तरतूद 25,000 कोटी रुपयांपेक्षा कमी होती . एक दशकापूर्वीची परिस्थिती पहा - 25,000 कोटी रुपयांपेक्षा कमी. आमच्या सरकारने ही रक्कम पाच पटीने वाढवून 1.25 लाख कोटी रुपये केली आहे. काही दिवसांपूर्वीच, आम्ही देशातील साठ हजारांहून अधिक आदिवासी गावांच्या विकासासाठी एक विशेष योजना सुरू केली. 

धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत, आदिवासी गावांमध्ये सुमारे 80,000 कोटी रुपये गुंतवले जातील. यामागील उद्दिष्ट केवळ आदिवासी समुदायाला आवश्यक सुविधा प्रदान करणे एवढेच नाही तर तरुणांसाठी प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे देखील आहे. या मोहिमेद्वारे विविध ठिकाणी आदिवासी विपणन केंद्रे स्थापन केली जातील, होमस्टे बांधण्यास मदत केली जाईल आणि प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे आदिवासी भागात पर्यटनाला चालना मिळेल आणि जंगलातील आदिवासी कुटुंबांमध्ये इको-टुरिझमला चालना मिळेल, ज्यामुळे स्थलांतर थांबेल आणि पर्यटन वाढीला प्रोत्साहन मिळेल.

मित्रांनो,

आपल्या सरकारने आदिवासी वारसा जपण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. आदिवासी कला आणि संस्कृतीला समर्पित अनेक व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आम्ही रांचीमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाने एक भव्य संग्रहालय सुरू केले आहे. मी सर्व शालेय विद्यार्थ्यांना भगवान बिरसा मुंडा यांना समर्पित अशा या संग्रहालयाला भेट देण्याचे आणि त्याचा अभ्यास करण्याचे आवाहन करतो. मला आनंद आहे की आज मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील बादल भोई संग्रहालय आणि मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राजा शंकर शाह आणि कुंवर रघुनाथ शाह संग्रहालयाचे उद्घाटन झाले आहे. 

आज श्रीनगर आणि सिक्कीममधील दोन आदिवासी संशोधन केंद्रांचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाणी आणि टपाल तिकिटे जारी करण्यात आली आहेत. हे प्रयत्न देशाला आदिवासी समुदायाच्या शौर्याची आणि अभिमानाची आठवण करून देत राहतील.

मित्रांनो,

भारताच्या प्राचीन वैद्यकीय पद्धतींमध्ये आदिवासी समुदायाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. हा वारसा जतन केला जात आहे आणि भावी पिढ्यांसाठी नवीन आयाम जोडले जात आहेत. रालोआ सरकारने लेहमध्ये राष्ट्रीय सोवा रिग्पा संस्था स्थापन केली आहे आणि अरुणाचल प्रदेशमध्ये ईशान्य आयुर्वेद आणि लोक चिकित्सा संशोधन संस्थेचे उन्नतीकरण केले आहे. भारतात डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन देखील स्थापन केले जात आहे. यामुळे भारतातील आदिवासी समुदायांच्या पारंपरिक वैद्यकीय पद्धती जगभर पसरण्यास मदत होईल.

मित्रांनो,

आपले सरकार आदिवासी समुदायासाठी शिक्षण, रोजगार आणि आरोग्यसेवेवर खूप लक्ष केंद्रित करत आहे. आज डॉक्टर, अभियंता, सैनिक किंवा विमान पायलट बनणे असो, आदिवासी मुले आणि मुली प्रत्येक व्यवसायात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. हे शक्य झाले आहे कारण गेल्या दशकात आदिवासी भागात शाळांपासून ते उच्च शिक्षणापर्यंत चांगल्या शैक्षणिक संधी निर्माण झाल्या आहेत. स्वातंत्र्याच्या सहा-सात दशकांनंतरही, देशात फक्त एकच केंद्रीय आदिवासी विद्यापीठ होते.

गेल्या 10 वर्षांत रालोआ सरकारने देशाला दोन नवीन केंद्रीय आदिवासी विद्यापीठे दिली आहेत. आदिवासी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये अनेक पदवी महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि आयटीआय स्थापन करण्यात आले आहेत. गेल्या 10 वर्षांत आदिवासी जिल्ह्यांमध्ये 30 नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत आणि आणखी अनेक महाविद्यालयांचे काम सुरू आहे. जमुई येथेही एक नवीन वैद्यकीय महाविद्यालय बांधले जात आहे. आम्ही देशभरात 700 हून अधिक एकलव्य शाळांचे एक मजबूत जाळे तयार करत आहोत.

मित्रांनो,

आदिवासी समुदायासाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि तांत्रिक शिक्षणात भाषा हा एक महत्त्वाचा अडथळा राहिला आहे. आमच्या सरकारने मातृभाषेतून परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या निर्णयामुळे आदिवासी समुदायाच्या मुलांना नवीन आत्मविश्वास मिळाला असून त्यांची स्वप्ने उंच भरारी घेत आहेत.

मित्रांनो,

गेल्या दशकात आदिवासी तरुणांनी खेळांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी पदके जिंकण्यात आदिवासी खेळाडूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या प्रतिभेला ओळखून, आदिवासी भागात क्रीडा सुविधांचा विस्तार केला जात आहे. खेलो इंडिया मोहिमेअंतर्गत, आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आधुनिक क्रीडा संकुल बांधले जात आहे. भारताचे पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ देखील मणिपूरमध्ये स्थापन झाले आहे.

मित्रांनो,

स्वातंत्र्यानंतरची 70 वर्षे बांबूशी संबंधित कायदे कडक होते, ज्याचा आदिवासी समुदायावर सर्वाधिक परिणाम झाला. आमच्या सरकारने बांबू तोडण्याशी संबंधित कायदे सोपे केले. मागील सरकारच्या काळात फक्त 8-10 वन उत्पादने किमान आधारभूत किमतीत समाविष्ट होती. एनडीए सरकारने जवळपास ९० वन उत्पादने किमान आधारभूत किमतीच्या कक्षेत आणली आहेत. आज देशभरात 4,000 हून अधिक वन धन केंद्रे कार्यरत आहेत, ज्यामध्ये 12 लाख आदिवासी बंधू-भगिनींचा समावेश आहे. त्यांना उपजीविकेचे एक चांगले साधन सापडले आहे.

मित्रांनो,

लखपती दीदी मोहिमेची सुरुवात झाल्यापासून सुमारे 20 लाख आदिवासी भगिनी लखपती दीदी बनल्या आहेत. याचा अर्थ असा नाही की त्यांनी एकदाच एक लाख रुपये कमावले आहेत; तर ते दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात. अनेक आदिवासी कुटुंबे कपडे, खेळणी आणि सजावटीच्या वस्तू यासारख्या सुंदर वस्तू बनवण्यात गुंतलेली आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी, आम्ही अशा उत्पादनांसाठी प्रमुख शहरांमध्ये हाट बाजार आयोजित करत आहोत. येथे एक मोठा हाट देखील उभारला आहे आणि तो पाहण्यासारखा आहे. भारतातील विविध जिल्ह्यांतील आपल्या आदिवासी बंधू-भगिनींनी बनवलेल्या उल्लेखनीय वस्तू पाहून मी तिथे अर्धा तास घालवला. मी तुम्हाला सर्वांना भेट देण्याचे आणि प्रेरणा मिळाल्यास खरेदी करण्याचे आवाहन करतो. आम्ही या उत्पादनांसाठी जागतिक ऑनलाइन बाजारपेठ देखील निर्माण करत आहोत. जेव्हा मी परदेशी नेत्यांना भेटवस्तू देतो तेव्हा मी अनेकदा आपल्या आदिवासी बंधू-भगिनींनी बनवलेल्या वस्तूंचा समावेश करतो. अलिकडेच मी झारखंडमधील सोहराई चित्रे, मध्य प्रदेशातील गोंड चित्रे आणि महाराष्ट्रातील वारली चित्रे प्रमुख परदेशी नेत्यांना भेट म्हणून दिली आहेत. आता या कलाकृती त्यांच्या कार्यालयांच्या भिंतींवर शोभून दिसतील, ज्यामुळे तुमच्या प्रतिभेची आणि कलेची कीर्ती जगभरात पसरेल.

मित्रांनो,

शिक्षण आणि कमाईचे फायदे तेव्हाच मिळू शकतात जेव्हा कुटुंबे निरोगी राहतात. सिकलसेल ॲनिमिया हे आदिवासी समुदायासाठी एक महत्त्वाचे आव्हान आहे. आमच्या सरकारने या आजाराशी लढण्यासाठी एक राष्ट्रीय मोहीम सुरू केली आहे, जी गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. या काळात अंदाजे 4.5 कोटी लोकांची तपासणी करण्यात आली आहे. आदिवासी कुटुंबांना इतर वैद्यकीय तपासणीसाठी दूर जावे लागू नये यासाठी असंख्य आयुष्मान आरोग्य मंदिरे स्थापन केली जात आहेत. सर्वात दुर्गम भागात फिरते वैद्यकीय युनिट देखील तैनात केले जात आहेत.

मित्रांनो,

आज, हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणाच्या लढाईत भारत जागतिक स्तरावर एक प्रमुख नाव बनले आहे. याचे कारण म्हणजे आदिवासी समुदायाच्या मूलभूत मूल्यांनी आपल्याला नेहमीच निसर्गाशी सुसंगत राहायला शिकवले आहे. मी आपल्या निसर्गप्रेमी आदिवासी समाजाची शिकवण जगासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो. आदिवासी समुदाय सूर्य, वारा आणि झाडांची पूजा करतो.

या शुभ दिवशी मी तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशातील आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये बिरसा मुंडा जनजातिय गौरव उपवन (आदिवासी गौरव उद्यान) स्थापन केले जाईल. या प्रत्येक बिरसा मुंडा जनजातिय गौरव उपवनात 500-1000 झाडे लावली जातील. मला विश्वास आहे की सर्वजण या उपक्रमाला पाठिंबा देतील आणि योगदान देतील.

मित्रांनो

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा उत्सव आपल्याला महत्त्वाची ध्येये निश्चित करण्याची प्रेरणा देतो. एकत्रितपणे, आपण आदिवासी संस्कृतींना नवीन भारताचा पाया बनवू. आपण आदिवासी समुदायाचा वारसा जपू आणि शतकानुशतके त्यांनी जपलेल्या परंपरांपासून शिकू. असे करून आपण खरोखरच एक मजबूत, समृद्ध आणि सक्षम भारत निर्माण करू. पुन्हा एकदा, मी तुम्हा सर्वांना आदिवासी गौरव दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा, तुम्ही माझ्यानंतर पुन्हा म्हणाल –

मी म्हणेन भगवान बिरसा मुंडा - तुम्ही म्हणाल अमर रहे, अमर रहे!

भगवान बिरसा मुंडा - अमर रहे, अमर रहे!

भगवान बिरसा मुंडा - अमर रहे, अमर रहे!

भगवान बिरसा मुंडा - अमर रहे, अमर रहे!

खूप खूप धन्यवाद!

 

* * *

आशिष सांगळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2184100) आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam