पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय डोनाल्ड ट्रम्प यांचे केले अभिनंदन


त्यांचा शानदार आणि दणदणीत विजय अमेरिकी जनतेचा त्यांच्या नेतृत्वावरील गाढा विश्वास दर्शवतो, असे पंतप्रधानांनी ठळकपणे केले नमूद

जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी भारत-अमेरिका सर्वंकष जागतिक धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व दोन्ही नेत्यांनी पुन्हा केले अधोरेखित

विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा त्यांनी केला पुनरुच्चार

Posted On: 06 NOV 2024 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 नोव्‍हेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. 

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदी झालेल्या त्यांच्या पुनर्निवडीबद्दल, तसेच रिपब्लिकन पार्टीच्या अमेरिकी काँग्रेसमधील यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

त्यांचा हा शानदार आणि दणदणीत  विजय अमेरिकी जनतेचा त्यांच्या नेतृत्वावरील आणि दूरदृष्टीवरील गाढा विश्वास दर्शवतो, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत-अमेरिका भागीदारीला मिळालेल्या सकारात्मक गतीचे स्मरण करत  पंतप्रधानांनी परस्परांतील अविस्मरणीय भेटींची आठवण करून दिली. यामध्ये सप्टेंबर 2019 मध्ये ह्यूस्टन येथे आयोजित 'हाउडी मोदी' कार्यक्रमाचा आणि फेब्रुवारी 2020 मध्ये अध्यक्ष ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान अहमदाबाद येथे झालेल्या 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.

दोन देशांच्या जनतेच्या फायद्यासाठी तसेच जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी, भारत-अमेरिका सर्वंकष जागतिक धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व दोन्ही नेत्यांनी पुन्हा अधोरेखित केले.

तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

 

* * *

नेहा कुलकर्णी/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2183795) Visitor Counter : 6