पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सेमीकंडक्टर कार्यकारी गोलमेज परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर आघाडीच्या सेमीकंडक्टर कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली प्रशंसा

Posted On: 10 SEP 2024 11:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 सप्‍टेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7, लोक कल्याण मार्ग येथे सेमीकंडक्टर कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) गोलमेज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. पंतप्रधानांनी यावेळी सेमीकंडक्टर क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. हे क्षेत्र आपल्या पृथ्वी ग्रहाला विकासाच्या मार्गावर आणखी पुढे कसे नेऊ शकते, याबद्दल मोदी यांनी चर्चा केली. त्यांनी देशात होत असलेल्या सुधारणांचाही उल्लेख केला . या सुधारणांमुळे भारत गुंतवणुकीचे एक आदर्श केंद्र बनला आहे, असे ते म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सेमीकंडक्टर क्षेत्राच्या विकासाप्रति असलेल्या भारताच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली, आणि ते म्हणाले की, आजची ही बैठक अभूतपूर्व असून, या निमित्ताने सेमीकंडक्टर क्षेत्रातील धुरीण एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.

मायक्रॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा म्हणाले की, भारतात सेमीकंडक्टर विकसित करण्याचा आणि त्यात आत्मनिर्भरता वाढवण्याचा पंतप्रधान मोदी यांचा दृष्टीकोन अत्यंत उत्साहवर्धक आहे आणि भारतात सेमीकंडक्टर उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे पंतप्रधान मोदी यांचे धोरण देखील आश्वासक आहे. "भारताच्या सेमीकंडक्टर मिशनसाठी, सेमीकंडक्टर क्षेत्रातील संधी विकसित करण्यासाठी, ही योग्य वेळ आहे, कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास होईल, संधी वाढतील आणि मला विश्वास आहे की, त्याचे सर्वोत्तम परिणाम दिसून येतील”, असे ते म्हणाले.

सेमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मनोचा म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाला तोड नाही, आणि ते असाधारण आहे. त्यांच्या नेतृत्वाने केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आहे, असे ते म्हणाले. "मोदी यांच्या नेतृत्वाला वाटते की, या शिखर परिषदेच्या निमित्ताने संपूर्ण जग माझ्या बरोबर येत आहे, ही गोष्ट प्रशंसनीय आहे", असे ते म्हणाले.

एनएक्सपीचे सीईओ कर्ट सिव्हर्स म्हणाले की, भारतासाठी सेमीकंडक्टर उद्योग परिसंस्थेच्या विकासाच्या दृष्टीकोनातून आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दलचा पंतप्रधान मोदी यांचा   दृष्टीकोन, सातत्य आणि दूरदृष्टी पाहून ते अत्यंत प्रभावित आणि आनंदित झाले आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्यासारखा सेमीकंडक्टर उद्योगाबाबत सखोल माहिती असलेला एकही जागतिक नेता त्यांनी आतापर्यंत पहिला नाही.

टीईपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर ठाकूर म्हणाले की, पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि आपल्या देशाच्या भविष्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधांबाबतचा त्यांचा दृष्टीकोन पाहून  सेमीकंडक्टर उद्योगामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. विकसित भारतात सेमीकंडक्टर्स महत्त्वाची भूमिका बजावतील, असे ते म्हणाले.

जेकब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब प्रागदा म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताचे स्थान  उंचावण्यासाठी पंतप्रधान करत असलेले काम ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी गरजेची गोष्ट आहे. "भारत उत्पादन पुनर्जागरणात आघाडीवर राहील. तेच घडणार आहे. मला वाटते की पुढील दशकात भारत जागतिक  स्तरावर नेतृत्व करेल ”,असे  ते म्हणाले.

रेनेसासचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिदेतोशी शिबाता म्हणाले की, पंतप्रधानांचा संदेश नेहमीच सोपा आणि स्पष्ट असतो, त्यामुळे त्यांना काय हवे आहे हे आम्हाला माहित आहे. “पूर्ण स्पष्टता नेहमीच मदत करते, खूप जलद प्रगती करते”, असे ते म्हणाले.

आयएमईसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ल्यूक वान डेन होवे म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाने ते खूप प्रभावित झाले आहेत. सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला महासत्ता बनवण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची आणि समर्पणाची त्यांनी प्रशंसा केली. उत्पादन क्षेत्रापलीकडे, दीर्घकालीन संशोधन आणि विकासाबाबत पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. संशोधन आणि विकास क्षेत्रात भारताला बळकट करण्यासाठी त्यांनी धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

टॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी रसेल एलवांगर म्हणाले की, पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि त्याची अंमलबजावणी खरोखरच अद्वितीय आणि कौतुकास्पद आहे.

गेल्या काही वर्षांत पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व पाहताना आनंद वाटत आहे, असे केडन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देवगण म्हणाले. सेमीकंडक्टर हे सर्व डिजिटल उद्योगांसाठी आवश्यक तंत्रज्ञान आहे, असे ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वामुळे, तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता या क्षेत्राला मोठी गती मिळाली आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की सुरुवातीपासूनच यामध्ये सहभागी होण्याचे भाग्य त्यांना लाभले  आणि दरवर्षी यात मोठी सुधारणा होत आहे, हे पाहताना आनंद वाटत आहे.

सिनॉप्सिसचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ससिन गाझी म्हणाले की, गेल्या दोन, तीन वर्षांत, डिझाइनपासून ते निर्मितीपर्यंत कशा प्रकारे आणि कुठे गुंतवणूक करावी याबाबतच्या स्पष्ट धोरणामुळे या क्षेत्रावर लक्ष केंद्रित झाले आणि उत्साह निर्माण झाला. त्यांनी सांगितले की आता स्थानिक आणि जागतिक वापरासाठी उत्पादने तयार करण्यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्र स्वारस्य दाखवताना दिसत आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे मानद प्राध्यापक आरोग्यस्वामी पॉलराज म्हणाले की, सेमीकंडक्टर उद्योगात भारताने मोठे पाऊल टाकले आहे. "खूप ऊर्जा, खूप प्रगती, आणि खरोखरच  पंतप्रधानांची  दूरदृष्टी आणि प्रेरणा, यामुळे हे शक्य झाले आहे", असे ते म्हणाले.

सीजी पॉवरचे अध्यक्ष वेल्लायन सुब्बैया म्हणाले की, सेमीकंडक्टर उद्योगासाठी हा अतिशय उत्साहवर्धक काळ आहे आणि ही केवळ सुरुवात आहे. भारत अभूतपूर्व पातळीवर पोहोचेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आणि उद्योग-सरकार सहकार्याच्या यापूर्वी कधीही न पाहिलेल्या पातळीची प्रशंसा केली.

यूसीएसडीचे कुलपती प्रा. प्रदीप खोसला म्हणाले की, पंतप्रधानांनी सेमीकंडक्टर मिशनमध्ये एक अद्भुत दूरदृष्टी दाखवली आहे. ते म्हणाले की, या देशाच्या इतिहासात कोणत्याही नेतृत्वामध्ये  सेमीकंडक्टरच्या बाबतीत योग्य धोरण तयार करण्याचे धाडस नव्हते. पंतप्रधानांकडे ही दूरदृष्टी आहे आणि वचनबद्धता आहे, आणि मला खात्री आहे की, पंतप्रधान आपल्याला  यशस्वी बनवतील, असे ते म्हणाले.

 

* * *

सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2183586) Visitor Counter : 6