संरक्षण मंत्रालय
ऑपरेशन सिंदूर दरम्यान 'मेड-इन-इंडिया' उपकरणांच्या प्रभावी वापरामुळे भारताची प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा वाढली : संरक्षणमंत्री
“'मेक इन इंडिया', 'मेड फॉर द वर्ल्ड' उपकरणे तयार करण्यासाठी सरकार एक वास्तविक उत्पादन तळ स्थापित करत आहे."
Posted On:
27 OCT 2025 8:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2025
ऑपरेशन सिंदूर दरम्यान सशस्त्र दलांनी ‘मेड इन इंडिया’ म्हणजेच स्वदेशी बनावटीच्या उपकरणांचा प्रभावी वापर केल्यामुळे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही स्तरांवर भारताची पत मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. ते आज नवी दिल्लीत सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफक्चरर्सच्या ‘संरक्षण आत्मनिर्भरताः स्वदेशी उत्पादन उद्योगाच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी’ या विषयावरील वार्षिक सत्रामध्ये मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी स्थानिक उद्योगाला, विशेषत: खाजगी क्षेत्राला, नवोन्मेष आणि संशोधन आणि विकास, तंत्रज्ञान-आधारित उत्पादन, वैयक्तिक उपप्रणाली आणि सुट्या भागांचे उत्पादन यावर भर देत तसेच पुरवठा आणि देखभाल साखळ्यांवर वर्चस्व मिळवून आत्मनिर्भरतेचा पाठपुरावा अधिक गतिमान करण्याचे आवाहन केले.

सध्याच्या काळातील जागतिक अस्थिरतेमुळे प्रत्येक क्षेत्राचे सखोल मूल्यांकन करण्याची गरज निर्माण झाली असल्यावर त्यांनी भर दिला आणि सातत्यानं नवे बदल होत असलेल्या संरक्षण क्षेत्रामुळे आणि युद्धतंत्रामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वदेशीकरण हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले. “प्रस्थापित जागतिक व्यवस्था कमकुवत होत आहे आणि अनेक प्रदेशांमध्ये संघर्षाच्या क्षेत्रांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळेच भारताला आपली सुरक्षा आणि धोरण नव्याने परिभाषित करावे लागेल”, संरक्षणमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार संरक्षण उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि स्वदेशी परिसंस्थेला बळकट करण्यासाठी सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणारे वातावरण तयार करत आहे आणि उद्योगाने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे, याकडे राजनाथ सिंह यांनी निर्देश केला. “ संरक्षण उपकरणांची देशात केवळ जोडणीच होणार नाही तर ‘मेड इन इंडिया. मेड फॉर द वर्ल्ड’ ही भावना असलेला खऱ्या अर्थाने उत्पादन करणारा तळ स्थापित होईल, हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.

सरकारच्या आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांमुळे साध्य झालेली प्रगती अधोरेखित करत संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की 2014 पूर्वी भारत आपल्या सुरक्षाविषयक गरजांसाठी केवळ आयातीवर अवलंबून होता, पण आता देश स्वतःच्या भूमीवरच संरक्षण उपकरणांचे उत्पादन करत आहे. 2014 मध्ये केवळ 46,000 कोटी रुपये असलेले आपले संरक्षण उत्पादन आता विक्रमी 1.51 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे आणि यात खाजगी क्षेत्राचे योगदान 33,000 कोटी रुपये इतके आहे. तसेच, 10 वर्षांपूर्वी 1,000 कोटी रुपयांहून कमी असलेली आपली संरक्षण निर्यात आता अंदाजे विक्रमी 24,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मार्च 2026 पर्यंत संरक्षण निर्यात 30,000 कोटी रुपयापर्यंत पोहोचेल असा मला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.
स्वदेशीकरण अधिक जास्त वाढवण्यासाठी, राजनाथ सिंह यांनी उद्योगाला केवळ संपूर्ण प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित न करता, वैयक्तिक उपप्रणाली आणि सुटे भाग यांच्या स्वदेशी उत्पादनावर भर देऊन पुरवठा साखळ्या आणि देखभाल साखळ्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या उपकरणांच्या निर्मितीमध्ये केवळ जोडणी करण्याचा नव्हे तर देशात तंत्रज्ञान आधारित उत्पादन करण्याचा उद्देश असला पाहिजे, असे संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले. नवोन्मेष आणि संशोधन आणि विकासाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही असे सांगत राजनाथ सिंह यांनी पुढील वर्षी एसआयडीएमला एक दशक पूर्ण होत असताना संपूर्ण उत्पादन प्रक्रियेद्वारे तयार होणारी तंत्रज्ञानयुक्त उत्पादने मोठ्या प्रमाणावर विकसित करण्याचे आवाहन उद्योगाला केले.

निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183122)
Visitor Counter : 12