पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

22व्या आसियान - भारत शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे प्रारंभिक भाषण

Posted On: 26 OCT 2025 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑक्‍टोबर 2025

 

महामहीम पंतप्रधान आणि माझे परममित्र अन्वर इब्राहिमजी,

मान्यवर,

महोदय,

नमस्कार.

आपल्या आसियान कुटुंबासोबत पुन्हा एकदा मला संपर्कात येण्याची संधी मिळाली आहे. मला खूप आनंद होत आहे.

आसियानच्या यशस्वी अध्यक्षतेसाठी, मी पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे हार्दिक अभिनंदन करतो. भारताच्या समन्वयक  देशाची भूमिका कौशल्यतेने पार पाडल्याबद्दल फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांचे आभार मानतो. आणि आसियानच्या नव्या सदस्याच्या रूपात तिमोर लेस्टे चे स्वागत करतो.

थायलंडच्या राजमाता यांच्या निधनाबद्दल मी सर्व भारतवासियांच्या वतीने थायलंडच्या राजघराण्याप्रति आणि जनतेप्रति आपली गहिरी संवेदना व्यक्त करतो.

मित्रहो,

भारत आणि आसियान एकत्र मिळून जगभरातील जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. आपली केवळ भौगोलिक परिस्थितीच सामायिक करत नाही, तर आपण दृढ ऐतिहासिक संबंध आणि परस्पर सामायिक मूल्यांच्या बंधनानेही जोडलेले आहोत.

आपण ग्लोबल साउथचे सहप्रवासी आहोत. आपण केवळ व्यापारीच नाही, तर सांस्कृतिक भागीदारही आहोत. आसियान भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा मुख्य स्तंभ आहे. भारत नेहमीच आसियान सेन्ट्रॅलिटी आणि हिंद-प्रशांत क्षेत्राच्या बाबतीत आसियानच्या दृष्टीकोनाचे पूर्ण समर्थन करत आला आहे.

अनिश्चिततांच्या या काळातही, भारत – आसियान मधील व्यापक धोरणात्मक भागीदारीत सातत्यपूर्ण प्रगती झाली आहे. आणि आपली ही मजबूत भागीदारी जागतिक स्थैर्य आणि विकासाचा सशक्त आधार म्हणून उदयाला येऊ लागली आहे.

मित्रहो,

या वर्षीच्या आसियान शिखर परिषदेची मुख्य संकल्पना  आहे – “समावेशकता आणि शाश्वतता”. ही संकल्पना आपल्या सामायिक प्रयत्नांमध्ये स्पष्टपणे दिसून येते, मग ती डिजिटल समावेशनाची बाब असो, किंवा सध्याच्या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा आणि सक्षम पुरवठा साखळी सुनिश्चित करणे असो. भारत या सर्व प्राधान्यांना पूर्ण पाठिंबा देतो आणि या दिशेने एकत्र पुढे जाण्यास वचनबद्ध आहे.

मित्रहो,

भारत प्रत्येक आपत्तीच्या काळात आपल्या आसियान मित्रांसोबत खंबीरपणे उभा राहिला आहे. एचएडीआर, समुद्री सुरक्षा आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्ये आपले सहकार्य जलदगतीने वाढत आहे. हे लक्षात घेऊन, आम्ही 2026 हे “आसियान-भारत सागरी  सहकार्य वर्ष” म्हणून घोषित करत आहोत.

तसेच, शिक्षण, पर्यटन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य, हरित ऊर्जा आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रांमधील परस्पर सहकार्यालाही आम्ही दृढपणे पुढे नेत आहोत. आपल्या सामायिक सांस्कृतिक वारशाचे जतन आणि जनतेतील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी आपण एकत्रितपणे कार्य करत राहू.

मित्रहो,

एकविसावे शतक हे आपले शतक आहे — भारत आणि आसियानचे शतक आहे. मला विश्वास आहे की आसियान समुदाय दृष्टीकोन 2045 आणि विकसित भारत 2047 या दोन्हींचे उद्दिष्ट मानवतेसाठी एक उज्ज्वल भविष्य घडवेल. आपण सर्वांच्या सहकार्याने भारत खांद्याला खांदा लावून या दिशेने कार्य करण्यास वचनबद्ध आहे.

मनःपूर्वक धन्यवाद.

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/नितीन गायकवाड/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2182662) Visitor Counter : 14