पंतप्रधान कार्यालय
रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या भाषणाचा मजकूर
Posted On:
24 OCT 2025 12:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2025
मित्रांनो,
यंदाचा प्रकाशाचा उत्सव 'दिवाळी' तुमच्या सर्वांच्या जीवनात प्रकाशाची एक नवी तिरीप घेऊन आला आहे. सणासुदीच्या काळात कायमस्वरूपी नोकरीचे नियुक्तीपत्र मिळणे, म्हणजेच, उत्सवाचा उत्साह आणि यशाचा दुहेरी आनंद! हाच आनंद आज देशातील 51 हजारहून अधिक तरुण-तरुणींना मिळाला आहे. मला जाणवतंय की, तुम्हा सर्वांचे कुटुंबिय देखील किती आनंदले असतील. मी तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन करतो. जीवनाच्या या नवीन प्रारंभासाठी मी तुम्हाला अनेक शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
तुमचा हा उत्साह, कष्ट करण्याची तुमची तयारी, स्वप्ने पूर्ण झाल्यामुळे आलेला आत्मविश्वास, आणि याला जेव्हा देशासाठी काहीतरी करून दाखवण्याच्या तीव्र इच्छेची जोड मिळेल, तेव्हा तुमचे हे यश केवळ वैयक्तिक यश राहणार नाही, तर ते देशाचे यश बनेल. आज तुम्हाला केवळ सरकारी नोकरी मिळाली नाहीये, तर तुम्हाला राष्ट्रसेवेत सक्रिय योगदान देण्याची संधी मिळाली आहे. मला विश्वास वाटतोय, तुम्ही याच भावनेने काम कराल, प्रामाणिकपणा आणि सचोटीने तुम्ही भविष्यातील भारतासाठी उत्तम व्यवस्था निर्माण करण्यात आपली भूमिका पार पाडाल. आणि तुम्हाला माहीत आहे, आपल्यासाठी 'नागरिक देवो भव:' हा मंत्र आहे. सेवाभावाने, समर्पणाच्या भावनेने, प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आपण कसे उपयुक्त ठरु शकतो, हे कधीही विसरायचे नाही.
मित्रहो,
गेल्या 11 वर्षांपासून देश, 'विकसित भारता' च्या निर्मितीचा संकल्प घेऊन पुढे वाटचाल करत आहे. यात सर्वात मोठी भूमिका आपल्या तरुणाईची, म्हणजे तुमची आहे. त्यामुळे, तरुणाईचे सक्षमीकरण, हे भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचे प्राधान्य आहे. आज 'रोजगार मेळावे’ तरुणाईची स्वप्ने पूर्ण करण्याचे माध्यम बनले आहेत. निव्वळ याच रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून, गेल्या काही काळात 11 लाखांहून अधिक नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. आणि, हे प्रयत्न केवळ सरकारी नोकऱ्यांपर्यंतच मर्यादित नाहीत. आम्ही देशात 'पीएम विकसित भारत रोजगार योजना' देखील सुरू केली आहे. या अंतर्गत साडेतीन कोटी तरुण-तरुणींना नोकरी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मित्रांनो,
आज एका बाजूला स्किल इंडिया मिशन सारख्या कौशल्य युक्त भारत मोहिमांद्वारे तरुणाईला कौशल्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, तर दुसरीकडे नॅशनल करिअर सर्व्हिस प्लॅटफॉर्म या सारखे, नोकरी शोधणारे-नियोक्ता-कौशल्य विकास संस्था आणि प्रशिक्षण केंद्र यांना एकाच डिजिटल मंचावर एकत्र आणणारे उपक्रम त्यांना नवीन संधी उपलब्ध करून देत आहेत. मला सांगण्यात आले आहे की, या माध्यमातून आतापर्यंत 7 कोटींहून अधिक रिक्त पदांची माहिती तरुणाईला दिली गेली आहे. रिक्त जागांचा 7 कोटी हा आकडा लहान नाही.
मित्रहो,
तरुणाईसाठी आणखी एक मोठे पाऊल आहे—'प्रतिभा सेतू पोर्टल'! जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले, पण त्यांची निवड झाली नाही, अशांची मेहनत देखील आता वाया जाणार नाही. त्यामुळे खासगी आणि सार्वजनिक संस्था, या पोर्टलवरून या तरुणाईला बोलावू शकतात, त्यांची मुलाखत घेऊ शकतात आणि त्यांना संधीही देत आहेत. तरुणाईच्या गुणवत्तेचा हा सदुपयोगच भारताच्या युवा सामर्थ्याला जगासमोर घेऊन येईल.
मित्रांनो,
यावेळी सणासुदीच्या या काळात जीएसटी बचत उत्सवाने देखील नवीन रंगत आणली आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे की, देशात वस्तू सेवा कराच्या दरांमधील कपात ही किती मोठी सुधारणा ठरली आहे. याचा परिणाम केवळ लोकांच्या बचती पुरताच मर्यादीत नाही, तर या आधुनिक काळाच्या जीएसटी सुधारणांमुळे रोजगाराच्या संधीही व्यापक होत आहेत. जेव्हा दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतात, तेव्हा मागणीही वाढते. जेव्हा मागणी वाढते, तेव्हा उत्पादन आणि पुरवठा साखळीलाही गती मिळते. आणि जेव्हा कारखाने जास्त उत्पादन काढतात, तेव्हा नवीन नोकऱ्या निर्माण होतात. म्हणूनच, हा जीएसटी बचत उत्सव, रोजगार उत्सवही बनत आहे. नुकतेच आपण पाहिले…धनत्रयोदशी आणि दिवाळीत ज्याप्रकारे विक्रमी विक्री झाली आहे, नवनवीन विक्रम नोंदवले गेले आहेत, जुने विक्रम मोडले आहेत…. त्यावरून हेच दिसते की जीएसटी मध्ये झालेल्या सुधारणांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी गती दिली आहे. सूक्ष्म-लघू- मध्यम उद्योग क्षेत्र (एम एस एम ई) आणि किरकोळ व्यापार क्षेत्रात या सुधारणांचा सकारात्मक परिणाम आपल्याला दिसत आहे. यामुळे उत्पादन-मालपुरवठा व्यवस्थापन-आवरण बांधणी आणि वितरण (मॅन्युफॅक्चुरिंग-लॉजिस्टिक्स-पॅकेजिंग -डिस्ट्रीब्यूशन) अशा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत.
मित्रहो,
आज भारत जगातील सर्वात तरुण देश आहे. आम्ही भारताच्या युवा सामर्थ्याला भारताची मोठी ताकद मानतो. प्रत्येक क्षेत्रात आम्ही याच विचारसरणीने आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहोत. इतकेच काय, आपली परराष्ट्र धोरणे देखील भारतातील तरुणाईचे हित लक्षात घेऊन काम करत आहेत. आपल्या राजनैतिक चर्चा, आपले जागतिक सामंजस्य करार यांमध्ये तरुणाईचे प्रशिक्षण-कौशल्य अद्ययावतीकरण आणि रोजगार निर्मिती (ट्रेनिंग-अप स्किलींग-एम्प्लॉयमेंट जनरेशन) यांचा समावेश केला जात आहे. नुकतेच ब्रिटनचे पंतप्रधान भारतभेटीवर आले होते. त्यांच्या या दौऱ्यात, भारत आणि ब्रिटनने, कृत्रिम बुद्धिमत्ता-आर्थिक तंत्रज्ञान आणि स्वच्छ (पर्यावरण पूरक) ऊर्जा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-फिनटेक-क्लीन एनर्जी) यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवण्याबाबत सहमती दर्शवली आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे (फ्री ट्रेड अॅग्रीमेंट) देखील नवीन संधी तयार होतील. त्याचप्रमाणे युरोपमधील अनेक देशांसोबतही गुंतवणूक विषयक भागीदारी ( इन्व्हेस्टमेंट पार्टनरशिप ) झाली आहे. यातून हजारो नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्राझील, सिंगापूर, दक्षिण कोरिया, कॅनडा, अशा अनेक देशांसोबत करार झाले आहेत. यामुळे गुंतवणूक वाढेल, नवंउद्योग (स्टार्ट अप्स) आणि एम एस एम ईं ना पाठबळ मिळेल, निर्यातीत वाढ होईल, आणि तरुणाईला जागतिक प्रकल्पांमध्ये (ग्लोबल प्रोजेक्ट्स) काम करण्याची नवीन संधी मिळेल, अनेक संधी मिळतील.
मित्रांनो,
आज आपण देशाच्या ज्या यशाबद्दल आणि ज्या संकल्पां बद्दल बोलत आहोत, त्यात येणाऱ्या काळात एक मोठी भूमिका तुम्हालाही वठवायची आहे. आपल्याला विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी, निरंतर काम करत रहायचे आहे. तुमच्यासारखे तरुण कर्मयोगीच या संकल्पाला सिद्धीपर्यंत घेऊन जातील. या प्रवासात तुम्हाला 'iGot कर्मयोगी भारत प्लॅटफॉर्म' या मंचाची खूप मदत होऊ शकते. जवळपास दीड कोटी कर्मचारी या मंचाच्या आधारे शिकत आहेत, आपल्या कौशल्यात भर घालत आहेत. तुम्हीही याचा उपयोग केलात, तर तुमच्यात नवीन कार्यसंस्कृती आणि उत्तम कारभाराची भावना बळावेल. तुमच्या प्रयत्नांतूनच भारताचा भविष्यकाळ नावारुपाला येईल आणि देशवासियांची स्वप्ने पूर्ण होतील. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.
खूप खूप आभार!
* * *
हर्षल आकुडे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2182575)
Visitor Counter : 9
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam