आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य सचिवांनी रासायनिक आपत्कालीन परिस्थितीच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनावरील प्रशिक्षण मॉड्यूलचा केला शुभारंभ


रासायनिक घटनांचे वेळेवर आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यावसायिक आणि प्रतिसादकर्त्यांना आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांनी सुसज्ज करण्याचे मॉड्यूलचे उद्दिष्ट आहे

Posted On: 23 OCT 2025 11:45AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2025

रासायनिक आपत्कालीन परिस्थिती ही सार्वजनिक आरोग्य, पर्यावरणीय सुरक्षा आणि सामाजिक स्थिरतेसाठी वाढत जाणारा धोका निर्माण करते. यामुळे राष्ट्रीय पातळीवरील तयारी आणि प्रतिसाद यंत्रणा मजबूत करण्याची गरज अधोरेखित होते. सध्याच्या वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक अर्थव्यवस्थेत, अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतःला अद्ययावत ठेवणे आणि तयार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या विषयीच्या सज्जतेच्या दिशेने एक पाऊल म्हणून, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिवांनी विविध संबंधित मंत्रालये, राष्ट्रीय संस्था, खाजगी क्षेत्रातील तज्ञ, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आज नवी दिल्लीतील निर्माण भवन येथे रासायनिक आपत्कालीन परिस्थितीच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनावरील मॉड्यूलचे प्रकाशन केले.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू), भारत सरकार यांनी एनडीएमए (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) च्या सहकार्याने आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ इंडिया) तांत्रिक सहकार्याने रासायनिक आपत्कालीन परिस्थितीच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनावर तीन विशेष प्रशिक्षण मॉड्यूल विकसित केले आहेत. तीन मॉड्यूलमध्ये हे समाविष्ट आहे:

  • मॉड्यूल 1: रासायनिक आपत्कालीन परिस्थितीच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनासाठी तयारी, देखरेख आणि प्रतिसाद
  • मॉड्यूल 2: रासायनिक आपत्कालीन परिस्थितीचे रुग्णालय पूर्व व्यवस्थापन
  • मॉड्यूल 3: रासायनिक आपत्कालीन परिस्थितीचे वैद्यकीय व्यवस्थापन

या मॉड्यूल्सचा उद्देश सार्वजनिक आरोग्य व्यावसायिक, आरोग्यसेवा कर्मचारी, आपत्कालीन प्रतिसादकर्ते आणि धोरणकर्ते यांना रासायनिक घटनांचे वेळेवर आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि ऑपरेशनल साधनांनी सुसज्ज करणे आहे. रासायनिक आपत्कालीन व्यवस्थापन मजबूत करणे आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन (आयएचआर 2005) अंतर्गत जागतिक आरोग्य सुरक्षेत योगदान देणाऱ्या मुख्य क्षमतांना देखील समर्थन देते.

या उद्घाटनपर कार्यक्रमात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, एनडीएमए, केंद्र सरकारचे मंत्रालये, केंद्रीय संस्था, अकादमी, भारतातील डब्ल्यूएचओ कंट्री ऑफिस आणि इतर प्रमुख भागीदारांचे अधिकारी एकत्र आले आणि त्यांनी "स्वावलंबी लवचिक राष्ट्र" निर्माण करण्याच्या प्रतिबद्धतेची पुष्टी केली.


नेहा कुलकर्णी/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2181736) Visitor Counter : 13