वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन, संरक्षण मंत्री जोस मुसिओ मोंटेइरो फिल्हो आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारत–ब्राझील व्यापार संवाद कार्यक्रमाला केले संबोधित


जागतिक अन्न दिनानिमित्त, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कृषी आणि जागतिक अन्न सुरक्षेच्या दृष्टीने भारत आणि ब्राझील मधील भागीदारी केली अधोरेखित

भारताने पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात नोंदवली 7.8% वाढ, वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान कायम : पीयूष गोयल

Posted On: 16 OCT 2025 6:30PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर  2025

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज भारत - ब्राझील व्यापार संवाद कार्यक्रमाला संबोधित केले. आपल्या संबोधनातून त्यांनी भारताची भक्कम आर्थिक प्रगती आणि ब्राझीलसोबतची दृढ द्विपक्षीय भागीदारी अधोरेखित केली.

गोयल यांनी ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन आणि संरक्षण मंत्री जोस मुसिओ मोंटेइरो फिल्हो हे या संवाद कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त केले. या भेटीतून दोन्ही देशांची, परस्परांतील धोरणात्मक आणि आर्थिक संबंधांना अधिक दृढ करण्याची ठाम वचनबद्धता दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आज साजरा होत असलेल्या जागतिक अन्न दिनाचाही त्यांनी उल्लेख केला. यासंदर्भाने त्यांनी भारत आणि ब्राझीलमधील परस्पर सामायिक कृषी क्षमता अधोरेखित केली. हे दोन्ही देश जगातले दोन प्रमुख कृषी उत्पादक देश असून, जागतिक अन्न सुरक्षेत महत्त्वाचे योगदान देत आले आहेत. या संवाद कार्यक्रमामुळे कृषी व्यवसाय आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात अधिक सहकार्य स्थापित होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात पहिल्या तिमाहीत 7.8 टक्के वाढ झाली असल्याचे, आणि भारत गेल्या चार वर्षांपासून जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनला असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढची  किमान दोन दशके भारत ही गती कायम ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रचली जात असलेली भारताची विकासाची गाथा तीन भक्कम स्तंभांवर आधारलेली असल्याचे त्यांनी सांगितले. भक्कम स्थूल अर्थशास्त्रीय पाया उभारणे हा यातला पहिला स्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले. यादृष्टीने सरकारने महागाईचा दर कमी राखला आहे, सातत्यपूर्ण प्रगतीची सुनिश्चिती केली आहे, बँकिंग व्यवस्थेला बळकटी दिली आहे आणि जगातील सर्वात मजबूत परकीय चलन साठ्यांमधील एक स्वतःचा साठा तयार केला आहे असे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत भारत 700 अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या परकीय गंगाजळीसह, परकीय चलन सामर्थ्याच्या बाबतीत जगात पहिल्या 5 देशांमधला एक देश बनला असल्याचे ते म्हणाले.

दुसऱ्या स्तंभाअंतर्गत देशाच्या अगदी दुर्गम भागांपर्यंत आधुनिक, उच्च-गुणवत्तेच्या पायाभूत सुविधा पोहोचवण्यावर भर दिला असल्याचे ते म्हणाले. पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीमुळे युवक आणि महिलांना देशाच्या जडणघडणीत योगदान देण्याची संधी मिळते, उद्योजक आणि स्टार्टअप्सना पाठबळ मिळते तसेच उद्योग व्यवसाय आणि नवोन्मेषासाठी नवे दरवाजेही खुले होतात असे त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या जीवनमानाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्यावर दिलेला भर हा भारताच्या विकासाच्या गाथेचा तिसरा स्तंभ असल्याचे ते म्हणाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ प्रत्येक व्यक्तीला मिळेल तसेच विकास सर्वसमावेशक आणि व्यापक असेल याची सुनिश्चिती करणे हाच सरकारच्या सातत्यापूर्ण प्रयत्नांमागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांनी अलिकडेच भारताच्या धाडसी सुधारणांची प्रशंसा केली होती. त्यांच्या या विधानाचा संदर्भही गोयल यांनी आपल्या संबोधनात दिला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2025 साठी  भारताच्या विकास दराचा अंदाज 6.4 टक्क्यांवरून वाढवून 6.6 टक्क्यांपर्यंत सुधारला असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 12 वर्षांत 250 दशलक्ष भारतीय दारिद्र्यातून बाहेर आले आहेत, ज्यामुळे भारतात एका मजबूत आणि महत्त्वाकांक्षी मध्यमवर्ग निर्माण झाला असून, आता हाच वर्ग देशाच्या उपभोग आणि विकासाच्या गाथेचा कारक घटक बनला असल्याचे  त्यांनी नमूद केले.

यावेळी गोयल यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे विधानही उद्धृत केले. झाडे न लावता कोणीही फळे काढू शकत नाही या त्यांच्या विधानाचा संदर्भ मांडत, भारताने दीर्घकालीन प्रगती आणि भागीदारीची बीजे पेरली आहेत, ही बाब त्यांनी नमूद केली. भारत आणि ब्राझीलमधील मैत्रीमुळे दोन्ही राष्ट्रांना चिरस्थायी समृद्धी लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2180031) Visitor Counter : 13