पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 19 NOV 2024 10:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 नोव्‍हेंबर 2024

 

महामहीम राष्ट्रपती टिनुबू,

ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर या नायजेरियाच्या राष्ट्रीय पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मी तुमचे, नायजेरिया सरकारचे आणि जनतेचे मनापासून आभार मानतो. मी हा सन्मान नम्रतेने आणि आदराने स्वीकारतो. आणि मी हा सन्मान भारताच्या 1.4 अब्ज नागरिकांना व भारत आणि नायजेरियामधील शाश्वत मैत्रीला समर्पित करतो. हा सन्मान भारत आणि नायजेरियामधील धोरणात्मक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत राहील.

मित्रांनो,

भारत आणि नायजेरियामधील संबंध परस्पर सहकार्य, सुसंवाद आणि परस्पर आदर यावर आधारित आहेत. दोन चैतन्यशील लोकशाही आणि गतिमान अर्थव्यवस्था म्हणून आपण आपल्या लोकांच्या कल्याणासाठी सातत्याने एकत्र काम केले आहे. आपल्या दोन्ही देशांमधील सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता ही आपली ओळख आहे, आपली ताकद आहे. नायजेरियाचा 'नूतनीकृत आशा अजेंडा' आणि भारताचा 'विकसित भारत 2047' संकल्प यामध्ये अनेक गोष्टी समान आहेत. गेल्या वर्षी राष्ट्रपती टिनुबू यांच्या भारत भेटीने आपल्या संबंधांमध्ये एक नवीन अध्याय जोडला गेला. आज आपण आपले परस्पर सहकार्य अधिक मजबूत आणि विस्तारित करण्यावर सखोल चर्चा केली. आपण अर्थव्यवस्था, ऊर्जा, कृषी, सुरक्षा, फिनटेक, लघु आणि मध्यम उद्योग आणि संस्कृती यासारख्या क्षेत्रात सहकार्यासाठी नवीन संधी ओळखल्या आहेत. 

एक जवळचा आणि विश्वासू भागीदार म्हणून नायजेरियातील लोकांच्या गरजांनुसार कौशल्य विकास आणि क्षमता बांधणीवर विशेष भर दिला जाईल. नायजेरियात राहणारा 60,000 हून अधिक सदस्यांचा भारतीय समुदाय आपल्या संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांची काळजी घेतल्याबद्दल मी राष्ट्रपती टिनुबू आणि त्यांच्या सरकारचे मनापासून आभार मानू इच्छितो.

मित्रांनो,

नायजेरियाने आफ्रिकेत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक भूमिका बजावली आहे. आणि भारतासाठी आफ्रिकेबरोबरच्या जवळच्या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये आम्ही नायजेरियासारख्या मैत्रीपूर्ण देशासोबत खांद्याला खांदा लावून पुढे गेलो आहोत.

आफ्रिकेत म्हटल्याप्रमाणे: 'मित्र म्हणजे अशी व्यक्ती, ज्याच्यासोबत तुम्ही मार्ग सामायिक करता.' भारत आणि नायजेरिया आपल्या लोकांच्या आणि संपूर्ण आफ्रिकन खंडाच्या समृद्धीसाठी एकत्रितपणे पुढे जात राहतील.

निकट समन्वय साधून आपण ग्लोबल साउथच्या हितसंबंधांना आणि प्राधान्यांना महत्त्व देऊ.

महामहीम,

पुन्हा एकदा 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने मी या सन्मानाबद्दल मनापासून आभार मानतो.

 

* * *

नेहा कुलकर्णी/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2179704) Visitor Counter : 3