युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, 2025 अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन नियमांच्या मसुद्याच्या तीन संचांवर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने जनतेकडून अभिप्राय मागवले
Posted On:
15 OCT 2025 3:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2025
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने नियमांच्या मसुद्याचे पुढील तीन संच तयार केले आहेत: राष्ट्रीय क्रीडा प्रशासन (राष्ट्रीय क्रीडा संस्था) नियमांचा मसुदा, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन (राष्ट्रीय क्रीडा मंडळ) नियमांचा मसुदा, आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशासन (राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण) नियमांचा मसुदा.
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, 2025 ची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, 2025 लोकसभेने 11 ऑगस्ट 2025 रोजी मंजूर केला, राज्यसभेने 12 ऑगस्ट 2025 रोजी मंजूर केला आणि 18 ऑगस्ट 2025 रोजी राजपत्र अधिसूचना क्र. सीजी-डीएल-ई-19082025-265482 द्वारे त्याला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली. क्रीडा संघटनांच्या प्रशासनातील अडथळे दूर करणे आणि भारतात खेळांचे प्रशासन आणि प्रोत्साहनासाठी एक सर्वसमावेशक चौकट प्रस्थापित करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. खेळाच्या सर्व स्तरांवर नैतिक पद्धती आणि निष्पक्ष खेळ सुनिश्चित करणे, प्राथमिक लाभधारक म्हणून खेळाडूंचे हित जपणे आणि देशात खेळांसाठी एक मजबूत परिसंस्था निर्माण करणे, हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन (राष्ट्रीय क्रीडा संस्था) नियमांचा मसुदा उत्कृष्ट गुणवत्तेच्या खेळाडूंचा समावेश करण्यासाठी, सर्वसाधारण सभा आणि कार्यकारी समितीची रचना, निवडणूक प्रक्रिया आणि राष्ट्रीय क्रीडा संस्था आणि प्रादेशिक क्रीडा महासंघांच्या सदस्यांसाठी अपात्रतेचे निकष ठरवण्यासाठी चौकट प्रदान करतो. तसेच तो राष्ट्रीय क्रीडा निवडणूक पॅनेलसाठी तरतुदींची रूपरेषा देतो आणि राष्ट्रीय क्रीडा मंडळाशी संलग्न केंद्रांची नोंदणी आणि वेळोवेळी अद्ययावतीकरण करण्याची प्रक्रिया स्पष्ट करतो.
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन (राष्ट्रीय क्रीडा मंडळ) नियमांचा मसुदा राष्ट्रीय क्रीडा मंडळाची रचना, कार्ये आणि रचना नमूद करतो. यामध्ये शोध-अधिक-निवड समितीची स्थापना, अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीची पद्धत, कर्मचाऱ्यांची व्यवस्था (सरकारी प्रक्रियेनुसार) आणि लागू असेल तेथे केंद्र सरकारकडून शिथिलतेची तरतूद यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन (राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण) नियमांचा मसुदा राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरणाच्या संस्थात्मक चौकटीची व्याख्या करतो. यात अध्यक्ष, सदस्य आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती, कार्यकाळ आणि सेवाशर्ती (सरकारी प्रक्रियेनुसार) यावर नियंत्रण ठेवले जाते. यामध्ये खेळाशी संबंधित विवादांच्या जलद निवाड्यासाठी अधिकार, कार्यपद्धती आणि प्रशासकीय यंत्रणेची रूपरेषा देण्यात आली आहे.
मंत्रालयाने प्रकाशन तारखेपासून 30 दिवसांच्या आत वरील मसुदा नियमांवर सर्वसामान्य नागरिक आणि संबंधित लाभधारकांकडून अभिप्राय आणि टिप्पण्या मागवल्या आहेत. हे मसुदे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अभिप्राय / टिप्पण्या मंत्रालयाकडे संचालक (शासन 1) यांना हॉल नंबर 103, जवाहरलाल नेहरू स्टेडियम, लोधी रोड, नवी दिल्ली येथे टपाल सेवे द्वारे अथवा rules-nsga2025@sports.gov.in या ईमेल वर सादर करता येतील. टिप्पण्या/अभिप्राय सादर करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2025 आहे.
नियमांचा मसुदा पाहण्यासाठी कृपया पुढील लिंक वर क्लिक करावे:
• राष्ट्रीय क्रीडा प्रशासन (राष्ट्रीय क्रीडा मंडळ) नियमांचा मसुदा:
https://yas.gov.in/sports/draft-national-sports-governance-national-sports-board-rules-2025-inviting-comments
• राष्ट्रीय क्रीडा प्रशासन (राष्ट्रीय क्रीडा संस्था) नियमांचा मसुदा:
https://yas.gov.in/sports/draft-national-sports-governance-national-sports-bodies-rules-2025-inviting-comments
• राष्ट्रीय क्रीडा प्रशासन (राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण) नियमांचा मसुदा:
https://yas.gov.in/sports/draft-national-sports-governance-national-sports-tribunal-rules-2025-inviting-comments.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2179409)
Visitor Counter : 12