इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी आमूलाग्र बदल घडवणारे ठरेल असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले अधोरेखित, यामुळे एआय-फर्स्ट पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा आणि उच्च-मूल्य असलेल्या रोजगार निर्मितीला चालना मिळेल


विशाखापट्टणममध्ये गुगलने 15 अब्ज डॉलर्सच्या एआय हबची घोषणा केली - विकसित भारत दृष्टिकोनाशी सुसंगत एआय-चालित सेवांना चालना देण्यासाठी भारतातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे

Posted On: 14 OCT 2025 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑक्‍टोबर 2025

 

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की विशाखापट्टणममधील गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी एक परिवर्तनकारी पाऊल आहे.  आगामी इंडिया एआय शिखर परिषदेपूर्वी गुगलने आयोजित केलेल्या भारत एआय शक्ती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. वैष्णव  म्हणाले, "गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी एका नवीन युगाची सुरुवात करत आहे. ही पायाभूत सुविधा एआय-फर्स्ट डेटा सेंटर आर्किटेक्चरच्या क्षेत्रात नवीन आयाम स्थापन  करते, जे नवीन सबसी केबल नेटवर्क्समधील गुंतवणूकीवर आधारित आहे आणि स्वच्छ ऊर्जेद्वारे संचालित आहे.  हे केवळ एआय-चालित सेवांच्या नवीन युगाला गती  देणार नाही तर देशभरात उच्च-मूल्य असलेल्या नोकऱ्या आणि आर्थिक संधी निर्माण करेल. ही भागीदारी भारतात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणत आहे हे पाहून आम्हाला अभिमान वाटतो असे सांगत इंडिया एआय मिशनच्या उद्दिष्टांना पुढे नेण्यात हबची भूमिका त्यांनी अधोरेखित केली . “ही डिजिटल पायाभूत सुविधा आमच्या इंडिया एआय मिशनची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मोठे योगदान देईल ,” असे ते  म्हणाले.

भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत एआय सेवा हे  एक प्रमुख उदयोन्मुख क्षेत्र असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी अधोरेखित केले आणि प्रतिभा आणि रोजगार निर्मितीसाठी या सुविधेचा लाभ  घेण्याचे आवाहन त्यांनी गुगलला केले. इंडिया एआय मिशन अंतर्गत कॉमन कॉम्प्युट इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग म्हणून एनव्हीडियाच्या जीपीयू (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) शी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी गुगलच्या टीपीयू (टेन्सर प्रोसेसिंग युनिट) चे स्वागत केले. एआय हब हे इंडिया एआय मिशनच्या उद्दिष्टांना लक्षणीयरीत्या गती देईल  यावरही त्यांनी भर दिला, तसेच जलद गतीने होत असलेल्या एआय-चालित बदलांच्या पार्श्वभूमीवर  आयटी व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात नवीन कौशल्ये शिकवण्याची आणि कौशल्य वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.  त्यांनी गुगलला या प्रयत्नात  उद्योगाला पाठिंबा देण्याचे आवाहन  केले.

समुद्राखालील केबल कनेक्टिव्हिटीचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले  की, "अंदमान आणि निकोबार बेटे सामरिकदृष्ट्या मोक्याच्या जागी स्थित आहेत. सिंगापूर आधीच मोठ्या ओझ्याखाली दबले आहे. आपण अंदमानला जागतिक इंटरनेट डेटा स्थानांतरणासाठी  पुढील प्रमुख केंद्र का बनवू शकत नाही? भारत सरकारच्या दृष्टिकोनातून, आम्ही या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा देऊ. अंदमान बेटे गुगल आणि इतर इंटरनेट-आधारित संस्थांना आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया आणि नवीन डेटा क्षमता शोधत असलेल्या इतर प्रदेशांशी जोडण्यास मदत करू शकतात, जे नवीन डेटा क्षमतेच्या शोधात आहेत. "


ईशान्येकडील राज्यात डिजिटल कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडून विशाखापट्टणम -सिटवे लिंकचा प्रस्ताव

केंद्रीय मंत्र्यांनी ईशान्येकडील राज्यांमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी विशाखापट्टणम -सिटवे (म्यानमार) लिंक स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडला. त्यांनी विद्यमान रेलटेल नेटवर्क विस्तारण्याची गरज अधोरेखित केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री  एन. चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी सांगितले की, “आंध्र प्रदेशातील ही महत्त्वपूर्ण गुंतवणूक भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासातील एक नवीन अध्याय आहे.

गुगल क्लाउडचे मुख्य कार्यकारी अधिकारी  थॉमस कुरियन यांनी अधोरेखित केले की, "विशाखापट्टणममधील गुगल एआय हब हे भारताच्या डिजिटल भविष्यातील एक ऐतिहासिक गुंतवणूक आहे. ही भागीदारी भारत आणि अमेरिकन सरकारांसोबत एआयचा जबाबदारीने वापर करण्यासाठी आणि समाजासाठी परिवर्तनात्मक प्रभाव पाडण्याप्रति  आमची सामायिक वचनबद्धता दर्शवते."

गुगल एआय हब: एआय परिवर्तनाला गती

गुगलने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (वायझॅग) येथे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) हब स्थापन करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे कंपनी संपूर्ण भारतात एआय-चालित परिवर्तनाला गती देण्याच्या उद्देशाने त्यांचे संपूर्ण एआय स्टॅक तैनात करू शकेल. नवीन एआय हब प्रगत एआय पायाभूत सुविधा, डेटा सेंटर क्षमता, मोठ्या प्रमाणात नवीकरणीय ऊर्जा स्रोत आणि विस्तारित फायबर-ऑप्टिक नेटवर्क हे सर्व एकाच ठिकाणी एकत्र आणेल.

पाच वर्षांमध्ये (2026–2030) अंदाजे 15 अब्ज अमेरिकन डॉलर्सची ही गुंतवणूक गुगलची भारतातील आजपर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे आणि भारत सरकारच्या विकसित भारत दृष्टिकोनाला अनुरूप आहे, जे एआय-चालित सेवांच्या विस्ताराला गती देण्याचा प्रयत्न करते.

कार्यान्वित झाल्यावर, नवीन डेटा सेंटर संकुल 12 देशांमध्ये विस्तारलेल्या  गुगलच्या विद्यमान एआय डेटा सेंटरच्या नेटवर्कमध्ये सामील होईल. बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे येथील गुगलच्या संशोधन आणि विकास केंद्रांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा त्याला फायदा होईल, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर नवोन्मेषांची रचना  आणि विकास समाविष्ट आहे. 

नवीन आंतरराष्ट्रीय सबसी गेटवेची निर्मिती

गुगलच्या एआय हब गुंतवणुकीत एक नवीन आंतरराष्ट्रीय सबसी गेटवे बांधणे समाविष्ट आहे, ज्यामध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील विशाखापट्टणमपर्यंत पोहचण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय सबसी केबल्सचा समावेश आहे - ज्या गुगलच्या दोन दशलक्ष मैलांपेक्षा जास्त विद्यमान स्थलीय आणि सबसी केबल्सशी जोडल्या जातील. यामुळे विशाखापट्टणम हे एआय आणि कनेक्टिव्हिटी हब म्हणून स्थापित होईल जे केवळ भारतालाच नव्हे तर उर्वरित जगाला सेवा पुरवेल.

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2179176) Visitor Counter : 12