पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवसानिमित्त पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

Posted On: 17 OCT 2024 12:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2024

 

नमो बुद्धाय!

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत जी, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री श्री किरेन रिजिजू जी, भदंत राहुल बोधी महाथेरो जी, सन्माननीय जांगचुप चोदेन जी, महासंघाचे सर्व आदरणीय सदस्य, मान्यवर राजदूत, बौद्ध विद्वानांनो, धम्माचे अनुयायी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो.

आंतरराष्ट्रीय अभिधम्म (बौद्ध तत्त्वज्ञानाचा सखोल विचार) दिनाच्या या कार्यक्रमात सहभागी होण्याचा बहुमान मला पुन्हा एकदा मिळाला आहे. केवळ करुणा आणि सदिच्छांतूनच आपण जगाला अधिक चांगले बनवू शकतो याची आठवण आपल्याला, अभिधम्म दिवस  करून देतो. 2021 मध्ये कुशीनगर येथेही असाच कार्यक्रम झाला होता, त्यात सहभागी होण्याचे भाग्यही मला मिळाले होते. भगवान बुद्धांशी जोडला जाण्याचा, माझ्या जन्मापासून सुरू झालेला  हा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे, हे माझे भाग्य आहे. माझा जन्म, एकेकाळी बौद्ध धर्माचे एक मोठे केंद्र असलेल्या गुजरातमधील वडनगर येथे झाला,  याच प्रेरणांसह मी बुद्ध धम्म आणि त्यांच्या शिकवणीचा प्रसार करण्याचे असंख्य अनुभव घेतले आहेत.

गेल्या 10 वर्षांत, मला भारतातील ऐतिहासिक बौद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्यापासून ते जगभरातील अनेक देशांना भेट देण्यापर्यंत अनेक पवित्र कार्यक्रमांचा भाग होण्याची संधी मिळाली आहे. यात नेपाळमधील भगवान बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनीला भेट देणे, मंगोलियामध्ये त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करणे आणि श्रीलंकेतील वेसाक उत्सवात सहभागी होणे यांचा समावेश आहे. मला विश्वास आहे की, संघ आणि साधकांचा हा संगम भगवान बुद्धांच्या आशीर्वादाचा परिणाम आहे. आज अभिधम्म दिनाच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना आणि भगवान बुद्धांच्या सर्व अनुयायांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आज शरद पौर्णिमेचा मंगलमय सण आहे. तसेच, आज भारतीय संस्कार चैतन्याचे महान ऋषी वाल्मिकीजी यांची जयंती देखील आहे. शरद पौर्णिमा आणि वाल्मिकी जयंतीनिमित्त मी संपूर्ण देशाला शुभेच्छा देतो.

माननीय मित्रांनो,

या वर्षी अभिधम्म दिवस साजरा करताना त्यासोबत एक ऐतिहासिक कामगिरीही नोंदवली गेली आहे. ज्या पाली भाषेत भगवान बुद्धांच्या अभिधम्माचा, त्यांच्या वचनांचा आणि त्यांच्या शिकवणीचा हा वारसा जगाला मिळाला, तिला भारत सरकारने या महिन्यात 'अभिजात भाषेचा'  दर्जा दिला आहे. यामुळे आजचा हा प्रसंग आणखी विशेष बनला आहे. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, हा भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे की, अभिधम्म हा धम्मातच अंतर्भूत आहे. धम्माचे सार समजून घेण्यासाठी पाली भाषेचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. धम्म म्हणजे बुद्धांचा संदेश, बुद्धांची तत्त्वे ... धम्म म्हणजे मानवी अस्तित्वाशी संबंधित प्रश्नांवरील उपाय... धम्म म्हणजे मानवतेला शांती मिळवून देणारा मार्ग ... धम्म म्हणजे बुद्धांची कालातीत शिकवण ... आणि धम्म म्हणजे संपूर्ण मानवतेच्या कल्याणाची अटळ हमी! भगवान बुद्धांच्या धम्मामुळे संपूर्ण जग प्रबुद्ध (सुजाण, विवेकी) झाले आहे.

परंतु मित्रांनो, 

दुर्दैवाने, आज पाली ही प्राचीन भाषा, ज्यात भगवान बुद्धांचे मूळ शब्द अस्तित्वात आहेत, ती सामान्य व्यवहारांमध्ये प्रचलित नाही. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसते! भाषा ही नागरी जीवन पद्धती आणि संस्कृतीचा आत्मा असते. प्रत्येक भाषेचा स्वतःचा आत्मा असतो. म्हणूनच, भगवान बुद्धांचे शब्द त्यांच्या मूळ स्वरूपात जिवंत ठेवण्यासाठी, पाली भाषेला जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. मला आनंद आहे की, आमच्या सरकारने ही जबाबदारी नम्रपणे पूर्ण केली आहे. भगवान बुद्धांच्या लाखो अनुयायांच्या आणि हजारो भिक्खुंच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा हा आमचा नम्र प्रयत्न आहे. मी या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

आदरणीय मित्रांनो,

भाषा, साहित्य, कला, अध्यात्म—हे राष्ट्राचे खजिने त्याचे अस्तित्व निश्चित करतात. म्हणूनच, जगात कोणत्याही देशाला काही शेकडो वर्षांपूर्वीच्या वस्तू सापडल्या, तर तो देश त्याचा अभिमानाने जगासमोर उल्लेख करतो. प्रत्येक राष्ट्र आपल्या वारशाला आपल्या ओळखीशी-अस्तित्वाशी. जोडते. दुर्दैवाने, या संदर्भात भारत खूप मागे राहिला होता. स्वातंत्र्यापूर्वी आक्रमकांनी भारताची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला, आणि स्वातंत्र्यानंतर वसाहतवादी मानसिकतेच्या लोकांनी ताबा घेतला. यानंतरच्या दशकांमध्ये, भारताच्या आत्म्यात असलेले बुद्ध आणि स्वातंत्र्यसमयी भारताचे प्रतीक म्हणून स्वीकारली गेलेली बुद्धांची चिन्हे हळूहळू विस्मरणात गेली. पाली भाषेला तिचे योग्य स्थान मिळायला सात दशके लागली.

पण मित्रांनो,

देश आता त्या न्यूनगंडातून मुक्त झाला आहे आणि आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि स्वाभिमानानिशी पुढे जात आहे. परिणामी, देश मोठे निर्णय घेत आहे. म्हणूनच, आज पालीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत असताना, मराठीलाही तोच सन्मान दिला जात आहे. आणि हा किती सुंदर योगायोग आहे की, याचा संबंध थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी जोडला गेला आहे. बौद्ध धर्माचे महान अनुयायी असलेले बाबासाहेब आंबेडकर यांना पाली भाषेत धम्मदीक्षा मिळाली, आणि मराठी ही त्यांची मातृभाषा होती. त्याचप्रमाणे, आम्ही बंगाली, आसामी आणि प्राकृतलाही अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मित्रांनो,

भारताच्या या भाषा आपल्या विविधतेचे पोषण करतात. पूर्वी आपल्या प्रत्येक भाषेने राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. आज देशाने स्वीकारलेले नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण देखील या भाषांचे जतन करण्याचे माध्यम बनत आहे. देशातील तरुणाईसाठी मातृभाषेतून शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे, या भाषा आणखी मजबूत होत आहेत.

मित्रांनो, 

आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही लाल किल्ल्यावरून देशाला 'पंच-प्रण' (पाच संकल्प) चा दृष्टिकोन दिला आहे. पंच-प्रण म्हणजे –'विकसित भारत' निर्माण करणे! गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती! राष्ट्राची एकता! कर्तव्यांची पूर्तता! आणि आपल्या वारशाचा अभिमान! म्हणूनच, आज भारत जलद विकास आणि समृद्ध वारसा जतन करण्याच्या दोन्ही वचनबद्धतेसह कार्य करत आहे. भगवान बुद्धांशी संबंधित वारसा जतन करणे, या अभियानाची प्राथमिकता आहे. 'बुद्ध सर्किट' या बौद्धस्थळांच्या जाळ्या अंतर्गत आम्ही भारत आणि नेपाळमधील भगवान बुद्धांशी संबंधित स्थळे कशी विकसित करत आहोत, ते पाहा. कुशीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही झाले आहे. लुंबिनीमध्ये आम्ही इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेज हे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ब संस्कृती आणि वारसा केंद्र उभारत आहोत. लुंबिनीमध्येच बौद्ध विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध अध्ययन पीठ (Dr. Babasaheb Ambedkar Chair for Buddhist Studies) स्थापन केले आहे. बोध गया, श्रावस्ती, कपिलवस्तू, सांची, सतना आणि रेवा यांसारख्या ठिकाणी अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. तीन दिवसांनंतर, 20 ऑक्टोबरला, मी वाराणसीला भेट देणार आहे, जिथे सारनाथमधील अनेक विकास कामांचे उद्घाटन केले जाईल. नवीन बांधकामांसोबतच, आम्ही आपल्या भूतकाळाचेही संवर्धन करत आहोत. गेल्या 10 वर्षांत, आम्ही जगातील विविध देशांतून 600 हून अधिक प्राचीन वारसा कलाकृती आणि अवशेष परत आणले आहेत. आणि यापैकी अनेक अवशेष बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. थोडक्यात सांगायचे तर, बुद्ध वारशाच्या या पुनरुत्थानात भारत आपली संस्कृती आणि नागरी जीवन पद्धती नव्याने जगासमोर मांडत आहे.

आदरणीय मित्रांनो,

बुद्धांवर भारताची श्रद्धा केवळ स्वतःपुरती मर्यादीत नाही, तर संपूर्ण मानवतेच्या सेवेचा तो मार्ग आहे. जगात जे बुद्धांना ओळखतात आणि मानतात, त्या सर्व देशांना आम्ही या अभियानात एकत्र आणत आहोत. मला आनंद आहे की जगभरातील अनेक देश या दिशेने महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहेत. म्यानमार, श्रीलंका आणि थायलंडसारख्या देशांमध्ये पाली भाषेतील भाष्ये-टिप्पण्या संकलित केल्या जात आहेत. भारतातही आम्ही अशा प्रयत्नांना गती देत आहोत. पारंपरिक पद्धतींसोबतच, आम्ही ऑनलाइन मंच, डिजिटल संग्रह (digital archives) आणि ॲप्सच्या माध्यमातून पालीला प्रोत्साहन देत आहोत.

मी पूर्वीही भगवान बुद्धांबद्दल म्हटले होते – " 

बुद्ध बोध भी हैं, और बुद्ध शोध भी हैं" म्हणजेच बुद्ध ज्ञानही आहेत आणि बुद्ध संशोधनही आहेत. म्हणूनच, आम्ही भगवान बुद्धांना जाणून घेण्यासाठी आंतरिक आणि शैक्षणिक संशोधन या दोन्हीवर भर देत आहोत. आणि मला आनंद आहे की आपले संघ, आपल्या बौद्ध संस्था आणि भिक्खू या दिशेने युवकांना मार्गदर्शन करत आहेत.

आदरणीय मित्रांनो,

21 वे शतक आणि आजची भू-राजकीय परिस्थिती... जग पुन्हा अनेक अनिश्चितता आणि अस्थिरतांनी वेढले आहे. अशा काळात, बुद्ध केवळ प्रासंगिक नाही, तर अत्यावश्यक बनले आहेत. मी एकदा संयुक्त राष्ट्रांमध्ये म्हटले होते: भारताने जगाला युद्ध नाही, तर बुद्ध दिले आहेत. आणि आज मी आत्मविश्वासाने म्हणतो की, संपूर्ण जगाला युद्धांत नाही, तर बुद्धांमध्ये उपाय सापडतील. या अभिधम्म दिनाच्या निमित्ताने मी जगाला आवाहन करतो: बुद्धांकडून शिका... युद्धापासून दूर व्हा... शांतीचा मार्ग मोकळा करा... कारण बुद्ध म्हणतात, "नत्थि-संति-परम-सुखं", म्हणजेच "शांतीपेक्षा मोठे सुख दुसरे कोणतेही नाही". भगवान बुद्ध म्हणतात:

नही वेरेन वैरानि सम्मन्तीध कुदाचनम् ।

अवेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनन्ततो ॥

याचा अर्थ, वैर कधीही वैराने संपत नाही. द्वेष प्रेमाने, मानवी करुणेने सरतो. बुद्ध म्हणतात, "भवतु-सब्ब-मंगलम्",  म्हणजे "सर्वांचे मंगल होवो, सर्वांचे कल्याण होवो". हाच बुद्धांचा संदेश आहे, आणि हाच मानवतेचा मार्ग आहे.

आदरणीय मित्रांनो,

पुढील 25 वर्षांचा, म्हणजेच 2047 पर्यंतचा हा काळ 'अमृत काळ' म्हणून ओळखला जातो. हा अमृत काळ भारताच्या उत्कर्षाचा काळ असेल. हा विकसित भारत निर्माण करण्याचा काळ असेल. भारताने आपल्या विकासासाठी तयार केलेला हा कृतीआराखडा भगवान बुद्धांच्या शिकवणीतून मार्गदर्शन घेणारा असेल. बुद्धांच्या याच भूमीवर जगातील सर्वात मोठी लोकसंख्या, साधनसंपत्तीचा वापर करताना जागरूक राहत आहे. आज जग ज्या हवामान बदलाच्या (Climate Change) मोठ्या संकटाचा सामना करत आहे,  त्यावर भारत केवळ स्वतःसाठीच उपाय शोधत नाही, तर ते जगासोबतही सामायिक करत आहे. अनेक देशांना एकत्र आणून आम्ही मिशन LiFE (पर्यावरणपूरक जीवनशैली साठीची मोहीम) सुरू केले आहे. भगवान बुद्ध म्हणायचे, "अत्तान मेव पठमन्// पति रूपे निवेसये", म्हणजेच "कोणत्याही चांगुलपणाची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे". बुद्धांची हीच शिकवण मिशन लाईफ च्या केंद्रस्थानी आहे. याचा अर्थ, शाश्वत भविष्याचा मार्ग प्रत्येक व्यक्तीच्या शाश्वत जीवनशैलीतून (Sustainable Lifestyle) जातो.

जेव्हा भारताने जगाला आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (International Solar Alliance) सारखे व्यासपीठ दिले, जेव्हा जी-20 अध्यक्षपदाच्या काळात जागतिक जैवइंधन आघाडी (Global Biofuel Alliance) स्थापन केली, आणि जेव्हा एक सूर्य-एक पृथ्वी-एक उर्जा जाळे (वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड)  चा संकल्प दिला, तेव्हा या प्रयत्नांमध्ये बुद्धांच्या विचारांचे प्रतिबिंब होते. आमचे प्रत्येक पाऊल जगासाठी शाश्वत भविष्य सुनिश्चित करत आहे. भारत-मध्य पूर्व आशिया-युरोप आर्थिक पट्टा (India-Middle East-Europe Economic Corridor) असो, आमची हरीत (पर्यावरणपूरक) हायड्रोजन मोहीम (ग्रीन हायड्रोजन मिशन) असो, भारतीय रेल्वेला 2030 पर्यंत 'नेट झिरो'(प्रदूषणमुक्त)बनवण्याचे उद्दिष्ट असो, किंवा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण 20 टक्क्यांपर्यंत वाढवणे असो—अशा अनेक उपक्रमांतून आम्ही या पृथ्वीच्या संरक्षणासाठी आपली मजबूत बांधिलकी दाखवत आहोत.

मित्रांनो, आमच्या सरकारचे अनेक निर्णय बुद्ध, धम्म आणि संघातून प्रेरित आहेत. आज जगात जिथे कुठे संकट येते, तिथे भारत पहिला प्रतिसाद देणारा देश (first responder) म्हणून उपस्थित होतो. हा बुद्धांच्या करुणा तत्त्वाचाच विस्तार आहे. तुर्कीयेतील भूकंप असो, श्रीलंकेतील आर्थिक संकट असो, किंवा कोविड-19 महासाथीतील परिस्थिती असो, भारताने मदतीसाठी पुढाकार घेतला. भारत 'विश्वबंधू'  म्हणून सर्वांना सोबत घेऊन जात आहे. योग चळवळ असो, भरड धान्यांशी संबंधित अभियान असो, आयुर्वेद असो, किंवा नैसर्गिक शेती असो, आमच्या अनेक प्रयत्नांमागे भगवान बुद्धांची प्रेरणा आहे. 

आदरणीय मित्रांनो,

भारत विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत असताना, तो आपली पाळंमुळंही मजबूत करत आहे. आमचे उद्दिष्ट आहे की, भारताच्या तरुणाईने, विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करावे, त्याच वेळी त्यांनी आपल्या संस्कृती आणि मूल्यांचा अभिमानही बाळगावा. या प्रयत्नांमध्ये बौद्ध धर्माची शिकवण आम्हाला मोठे मार्गदर्शन करत आहे. मला विश्वास आहे की, आपल्या संत-भिक्खुंच्या मार्गदर्शनाने आणि भगवान बुद्धांच्या शिकवणीसह आपण सर्वजण एकत्रितपणे प्रगती करत राहू.

या शुभदिनी, मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाबद्दल तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. पालीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा अभिमान बाळगण्यासोबतच, या भाषेचे जतन आणि प्रचार-प्रसार करण्याची सामूहिक जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. हा संकल्प करूया आणि तो पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न करूया. याच अपेक्षांसह, मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो.

नमो बुद्धाय!

 

* * *

नेहा कुलकर्णी/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2178645) अभ्यागत कक्ष : 55